प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

आरमार.- थई राजांच्या आरमारांत लहानमोठ्या आकाराच्या मिळून सुमारें ५०० गनबोटी, आणि कोर्व्हेटी (एक प्रकारच्या बोटी) व यूरोपियन पद्धतीच्या १६ ते ४० पर्यंत तोफा असलेल्या फ्रिगेबोटी मिळून सुमारें ८०० पर्यंत आहेत. १८३४ मध्यें असल्या या आरमाराच्या मदतीनें सयामी लोकांनीं कोचिनचीनच्या आरमारावर जय मिळविला होता हें जरी खरें आहे तरी यूरोपियन आरमाराच्या हल्ल्यानें त्याचा सहज पराजय होण्यासारखा आहे. समुद्रावरील त्यांची सत्ता फारशी मोठी कधींच नव्हती; आणि १७ व्या शतकाच्या अखेरीस तर सयामी राजाजवळ फक्त पांचसहा लढाऊ जहाजें होतीं.
खजिना व कर.- सयामी राजांच्या उत्पन्नांच्या बाबीसंबंधानें अशी माहिती आहे. खजिन्यांतील एकंदर जमेच्या बाबी अशा-मादकपेयांवरील कर; जुगारावरील कर; मेनामनदींतील मासेमारीवरील कर, जकाती, फळझाडवरील कर, जमीनमहसूल, सक्तीच्या नोकरींतून मुक्तता होण्याकरतां भरलेली रक्कम; चिनीलोकांनां सक्तीच्या लष्करी नोकरींतून सुटका होण्याकरितां द्यावी लागणारी डोईपट्टी, व मांडलिकांकडून येणारी खंडणी इ. येथें या सर्व विषयांची भरपूर माहिती देण्यास जागा नसल्यानें यासंबंधाच्या कांहीं महत्त्वाच्या गोष्टींचा फक्त उल्लेख करितों. ज्या बाबींचे मक्ते दिले जातात त्या येणेंप्रमाणें- कथिल, हस्तीदंत, वेलदोडे, आंबोयना लाकूड, कांबोजी डीक, खाण्याचीं पाकोळ्यांची घरटीं, हिरव्या कांसवांची अंडीं व साप्यन लांकूड. सुमारें ४० वर्षांपूर्वीं थईराजानें याशिवाय आणखी ४० जिन्नसांची वरच्या यादींत भर घातली, व त्याचवेळीं एका इंग्रजी वकिलाच्या सल्ल्यावरून  पूर्वीं खाजगी लोक व्यापार करीत अशा बर्‍याच जिन्नसांचा व्यापार स्वतःच करण्याचें ठरवून स्वतः श्रीमंत बनण्याचा बेत केला. या ठिकाणीं राजानें स्वतः व्यापारी हक्क घेतलेल्या सर्व जिनसांची याद देण्याचें प्रयोजन नाहीं, कारण पहिल्या विधानावरून सयामी राजानें आपल्या प्रजेचें व्यापारी बाबतींत नुकसान केलें आहे हें स्पष्ट दिसत आहेच. द ला लुबेर या फ्रेंच वकिलाने दिलेल्या माहितीवरून १६८७ मध्यें सयामी राज्याचें एकंदर उत्पन्न ५१,९५,४६८ टिकेल अथवा ६,४४,९३८ पौंड इतकें होतें. १८२० मध्यें तें बरेंच वाढलें होतें. एकंदर उत्पन्न २०,९१, १३० टिकेल अथवा २,६०, ८९१ पौंड रोख व शिवाय ५२, ६४,१३० टिकेल किंवा ६,५८, ०१६ पौंड इतक्या किंमतीचें इतर उत्पन्न इतकें होतें.
कायदे व न्यायपद्धति. - आतां शेवटीं सयामी राज्य व्यवस्थेंतील कायदे व न्यायपद्धति या दोहोंबद्दल लिहावयाचें. थई राजाजवळ कित्येक कायदेग्रंथ आहेत. त्या सर्वांचा मूळ आधार
असा एक अगदीं जुना कायदेग्रंथ आहे, तो हिंदू मूळग्रंथावरून जरी प्रत्यक्ष लिहिलेला नाहीं, तरी हिंदुस्थानांतील कायद्यांशीं त्याचा निकट संबंध आहे. या आधारभूत कायद्यामध्यें पुष्कळच फेरफार केलेला आहे, कारण सयामी कायदेग्रंथांचे कर्ते बौद्ध होते, त्यामुळें त्यांच्या पालीभाषेतील धर्मनियमानां धरून त्यांनां आपले कायदेग्रंथ लिहावे लागले. त्यांपैकीं तीन विशेष मान्य अशा कायदेग्रंथांचीं नांवें अशीं आहेत. फ्राटर्मा, फ्राथामान आणि फ्राकामेनाट यानंतर कित्येक नव्या कायदेग्रंथांची त्यांत भर पडली आहे. त्यांत सर्व प्रकारचे कायदे व राज्यव्यवस्थचे नियम आहेत. सर्वांत महत्त्वाच्या धर्मशास्त्राला (कायदेग्रंथाला) फ्राटर्मा असें म्हणतात. त्यांत अधिकारांच्या संबंधाचे नियम व अधिकार्‍यांचे विशिष्ट हक्क यांबद्दलची माहिती आहे. दुसरा ग्रंथ फ्राथामान यांत पूर्वींच्या राजांनीं अम्मलांत आणलेल्या राज्यपद्धतींची माहिती आहे. तिसर्‍या ग्रंथाचें संपूर्ण नांव फ्रारक्षा कामेनाट असें असून त्यांत सयामच्या अलीकडील फार प्रसिद्ध असलेल्या फ्रानारेट यानें केलेले कायदे दिलेले आहेत. हीं तिन्हीं पुस्तकें म्हणजे एकाच कायदेग्रंथाचे भाग असून तिसर्‍या भागाचे आणखी कित्येक पोटभाग आहेत व त्यांत कायद्यांच्या निरनिराळ्या शाखांवरील नियम दिलेले आहेत. यांशिवाय आणखी आलीकडील १६१४ आणि १७७४ या सालांतले दोन कायदेग्रंथ आहेत. लाओमध्यें अमलांत असलेला कायदेग्रंथ हिंदुकायदेग्रंथावरून केलेला आहे, कारण तो मूळ मानवधर्मशास्त्राच्या पालीभाषांतरावरून तयार झालेला आहे.

न्यायासनें.- थईलोकांच्या देशांत तीन प्रकारचीं न्यायासनें आहेत, तीं प्रांतांतील राजधान्यांतले सुभेदार, राजपुत्र व  राजा हे चालवितात. पहिल्या प्रकारच्या न्यायकचेरींत सुभेदाराचा प्रतिनिधि व एक सरकारी वकील असतो. यांचें काम वरिष्ठ अधिकार्‍यांवर देखरेख ठेवणें हें आहे. या कचेरींत तिसरा एक लोकप्रतिनिधि असून त्यानें सैन्यभरती व सुभेदाराच्या हुकुमांची अंमलबजावणी करावयाची असते. शिवाय एक नोंदणी कामगार, एक कायदेग्रंथाचा व्यवस्थापक, एक पोलिसअधिकारी आणि सामान्य अधिकार्‍यांवरचा मुख्य इतके अधिकारी असून शिवाय प्रत्येक कचेरींत आणखी कित्येक नोकर असतात. यावरून असें दिसून येईल कीं या खरोखर केवळ न्यायकचेर्‍या नसून राज्यकारभार व देखरेख करणार्‍या कचेर्‍या आहेत. सर्व प्रांतांत जादा अथवा विशेष न्यायासनें आहेत. त्यामध्यें राजपुत्रांनां स्थान असून शिवाय जरूर तेवढे दुसरे न्यायाधीश नेमलेले असतात. या न्यायासनापुढें राजघराण्यांतील माणसांबद्दल किंवा मोठाल्या अधिकार्‍यांसंबंधीं फिर्यादींचीं कामें त्यांनां पसंत नसल्यास चालत नाहींत वरिष्ठ अथवा राजाच्या न्यायकचेरींत न्यायमंत्री हा अध्यक्ष नसतो, तर तेथें एक वेगळाच अध्यक्ष नेमलेला असून त्याच्या मदतीला कित्येक न्यायाधीश असतात. या न्यायकचेरींत कित्येक विभाग असून एका विभागांतील न्यायाधीश खटल्यांची तयारी करतात व दुसरे निकाल देतात. न्यायाचें काम जाहीर रीतीनें चालतें. दाव्याचे कामांत साक्षीदार तपासण्याचें काम व्यवस्थित चालतें. साक्षीदाराला शपथ घ्यावी लागते व तीमध्यें खोटी साक्ष दिल्यास फार भयंकर शिक्षा होईल असा धाक घातलेला असतो. लांच घेऊन न्यायाविरुद्ध निकाल न्यायाधीश देतात असेंहि बरेच वेळां घडतें. कित्येक दिवाणी दावे बराच काळ चाललेले असतात.

तुरुंग.- तुरुंगांत सर्वत्र अंधार व घाण सांचलेली असल्यामुळें ते अत्यंत भयंकर वाटतात. ज्यांनां तुरुंगांत टाकतात त्या लोकांनां तेथें दिवसा मोठीं कष्टाचीं कामें करावीं लागतात व रात्रीं सर्वांनां एकत्र एका मोठ्या लोखंडाच्या सांखळीनें इतके घट्ट आंवळून बांधून ठेवतात कीं त्यांनां जरा सुद्धां हालतां येत नाहीं. त्यांनां अन्न म्हणजे फक्त मीठ व भाकर देतात. ज्यांनां कर्जामुळें कैद झालेली असते त्यांनां कर्जाची फेड केल्यास सोडून देतात.

दिव्य.- कित्येक फारच अवघड प्रकारचे खटले असल्यास त्यांत ईश्वरीन्याय अथवा दिव्याचा आश्रय करितात. कोणा दोन इसमांचें परस्पर भांडण झाल्यास त्या दोघांनांहि पाण्यांत टाकून देतात, किंवा उकळणार्‍या तेलांत किंवा कथिलांत हात बुचकळावयास लावतात; आणि जो कोणी पाण्यावर अधिक काळ राहील किंवा त्या उकळणार्‍या द्रव्यांत अधिक काळ हात बुडवून ठेवील त्याच्यासारखा न्याय देतात. तसेंच जेव्हां कित्येक इसमांवर चोरीचा आरोप असतो तेव्हां अशाच विचित्र पद्धतीनें न्याय करितात. त्या सर्वांनां वैद्याकडून वांतीचें औषध देतात व ज्याला प्रथम ओकारी येईल तो चोर असें ठरवितात.  ही दिव्याची पद्धति भारतीयांपासून घेतलेली असण्याचा बराच संभव आहे.

शिक्षा.- या ठिकाणीं सयामी कायद्यांची संपूर्ण माहिती देण्यास अवकाश नसल्यामुळें लासेन यानें दिलेले त्यांतील कांहीं विशेष चमत्कारिक किंवा लहरी प्रकार दिसतात तेवढेच येथें देतों. जो कोणी देवळांतील सोन्याची किंवा रुप्याची मूर्ति चोरी किंवा वितळवील त्याला जिवंत जाळतात. जारकर्माचा गुन्हा क्वचित आढळतो;  व हा गुन्हा शाबीत होईल त्या इसमाला हनुवटीवर तापून लाल झालेल्या लोखंडानें डाग देतात; गुन्हेगार नवर्‍यास किंवा बायकोस सोडून देण्याचा हक्क प्रतिपक्षाला असतो. पुरोहितवर्गापैकीं कोणी असला गुन्हा केल्यास त्याचा धार्मिक पोषाख काढून घेऊन त्याला छड्यांनीं फटके मारतात; व नंतर त्याला हत्तींकरतां खाणें जमविण्यांचें काम करण्याची शिक्षा देतात.  ही शिक्षा सक्तमजुरीच्या शिक्षेच्या तोडीचीच आहे; व या कृत्याला सर्वांत भयंकर गुन्हा मानतात. या गुन्ह्याला टा-फून म्हणतात. याला फार कडक शिक्षा ठेवून तो केला  जाणार नाहीं असा बंदोबस्त केलेला असतो. असली शिक्षा झाल्यास तींतून कोणाची सुटका होत नांहीं किंवा माफी मिळत नाहीं. दुसरी अशीच एक मोठी लाजीरवाणी शिक्षा देत असतात तिला टा-व्हान असें म्हणतात. तिचा प्रकार असा किं, गुन्हेगाराच्या पायांत लोखंडी बिडी व गळ्यांत लांकडी खोडा घालतात व टाळ वाजवीत वाजवीत, कित्येक पोलिस अंमलदारांबरोबर राजधानींतून त्याला फिरवीतात. ज्या ज्या वेळीं टाळ वाजविण्यांत येतात त्या त्या वेळीं त्यांनें उभें राहून “मीं अमुक प्रकारचा गुन्हेगार आहें; माझें अनुकरण न करण्याची सावधगिरी ठेवा” असें लोकांनां मोठ्यानें सांगावें लागते. असें करण्याला त्यानें कां कूं केल्यास, शिपाई त्याला चाबकाचे फटके देतात. लागोपाठ तीन दिवस राजधानींत व राजधानीसभोंवतीं त्याला अशा प्रकारें हिंडवण्यांत येतें. राजद्रोह व बंड करण्याबद्दल अलीकडे देहान्त शासन करण्यांत येतें. राज्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनीं काळजीपूर्वक चौकशी करून आपली संमति दिल्यानंतरच देहान्त शिक्षा हल्लीं देण्यांत येते; नंतर ती शिक्षा राजापुढें मांडण्यांत येते; बहुधा तो असली शिक्षा माफ करितो; त्यानें माफी न दिल्यास मांग त्या गुन्हेगाराला फांशी देण्याच्या जागीं घेऊन जातो; तेथें तरवारीनें त्याचा शिरच्छेद करण्यांत येतो किंवा भाल्यानें त्याचें शरीर भोंसकण्यांत येतें. नंतर तें प्रेत पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानीं पडावें म्हणून, एका खांबाला बांधण्यांत येतें. चीनप्रमाणेंच येथेंहि लहानलहान गुन्ह्यांबद्दल बांबूच्या काठीनें मारण्याची शिक्षा असते. चोरांनां देण्यांत येणार्‍या शिक्षेचा प्रकार खालीं दिल्याप्रमाणें आहे. चोराजवळून त्यानें नेलेल्या मालाच्या किंमतच्या दुप्पट किंवा तिप्पट किंमत घेण्यांत येते. न्यायाधीश व दोन्ही पक्ष यांमध्यें ती रक्कम सारखी वांटून देण्यांत येते. कायद्याविरुद्ध कोणतीहि वस्तु घेतल्यास त्याला चोरी असें म्हणण्याची चाल सयाममध्यें आहे, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. दुसर्‍याचें वतन एखाद्यानें घेतल्यास त्याला तें परत द्यावें लागतें, इतकेंच नाहीं, तर त्याच्या दुप्पट किंमत द्यावी लागते; त्याचा अर्धा भाग न्यायाधिशाला व अर्धा भाग मूळ मालकाला देण्यांत येतो.