प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

अनाम. — अनाम ही भाषा कोचिनचीन आणि टाँकिन या प्रांतांत चालते. कॅथॉलिक मिशनरी सांगतात किं ही भाषा चंपा व कौंबंग या देशांत व लाव, कांबोज आणि सयाम या देशांतहि चालते. पण या दुसर्‍या देशांच्या बाबतींत त्यांचें म्हणणें बह्वंशीं खरें दिसत नाहीं. अनाम भाषा व देश यांनां सयामी व मलायी लोक जुआन असेंहि म्हणतात. कॅथॉलिक मिशनर्‍यांनीं सर्व पौरस्त्य भाषांपेक्षां या भाषेचा अभ्यास विशेष केलेला दिसतो. इ. स. १६५१ मध्येंच अलेक्झांडर डी र्‍होड्स या जेसुइट पंथाच्या पाद्य्रानें रोम येथें या भाषेचा एक कोश प्रसिद्ध केला. हा कोश सध्या जरी अपुरा वाटत असला तरी बराच महत्त्वाचा आहे. यांत लाटिन लिपीच वापरली आहे व उच्चार बरेच सदोष आहेत. यानंतर बरेच कोश व व्याकरणें तयार झालीं आहेत. पॅरिसमध्यें अनाम भाषा शिकविण्याकरितां एका प्रोफेसराची नेमणूक झालेली आहे.

कोचिनचीन व टाँकिन हे प्रदेश चीनपासून फार जवळ असल्यामुळें चिनी लिपी व वाङ्‌मय यांचा प्रवेश तेथें बराच झाला आहे. चिनी लिपीस ते लोक ‘चूव’ असें म्हणतात. ते व्यवहारांत व खाजगी बाबतींत एक निराळीच लिपी वापरतात. ती चिनीपासून निराळी असून चिनी लोकांस ओळखूं येत नाहीं व अनामी भाषा आल्याशिवाय वाचतां येत नाहीं. हिला ‘नोम’ असें म्हणतात. या लिपीचा थइ लिपीशीं संबंध असावा.

अनाम भाषेंत लिंग, वचन, विभक्ति, किंवा अर्थ, काळ, प्रयोग इत्यादि भेद नाहींत. हीं सर्व कार्यें अव्ययांकडून होतात. बर्‍याच ठिकांणीं शब्दांचा अर्थ केवळ संदर्भावरून करावयाचा असतो. शब्दावरील जोराचाहि अर्थ फिरविण्याच्या कामीं फार उपयोग होतो.

यांचे सांप्रदायिक ग्रंथ व धर्मशास्त्रादि ग्रंथ चिनी ग्रंथांसारखेच दिसतात. चीनमधील बौद्ध संप्रदायासारखींच यांचीं सांप्रदायिक तत्त्वें दिसतात. परंतु या लोकांत कांहीं समजुती विशेष दिसतात. उदाहरणार्थ, हे कुत्र्याची पूजा करतात व त्यास विष्ठा खावयास घालतात. त्याप्रमाणेंच वाघाची पूजा करतात व त्यांस नरमांस खावयास देतात.