प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

अफगाणिस्तान - अफगाणिस्तानमध्ये हिंदु राज्य १० व्या शतकांत होतें. खुद्द सबक्तगीनच्या डोळ्यांसमोर एका ब्राह्मणानें अफगाणिस्तानांत जाऊन काबुल येथें राज्य स्थापन केलें ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे व शालोपयोगी पुस्तकांत देखील तिची नोंद आली आहे. (टाम्सनचें हिस्टरी ऑफ इंडिया पहा.) तेथील हिंदू राजांची पुष्कळ नाणीं सांपडल्यामुळें त्यांची ऐतिहासिक संगतीहि लागली आहे. अफगाणिस्तान हा तर पूर्वीं हिंदुस्थानचाच भाग समजला जात असे आणि कैकेय आणि गांधार येथील राजकन्यांचे प्रसिद्ध भारतीय घराण्यांशीं संबंध झाले होते, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. बाल्हीक देश उर्फ सध्यांचें बल्क शहर व आसपासचा भाग येथें बौद्ध संप्रदायाच्या भरभराटीच्या काळीं सुमारें १०० बौद्ध मठ होते व शेंकडों स्तूप होते. नवविहार जेथें होते ती जागा देखील अर्वाचीन संशोधकांनां सांपडली आहे. सध्यां तेथें कित्येक बौद्ध स्तूप व दुसरे इतर बौद्धावशेष उरले आहेत. कंदहार (पूर्वींचा गांधार) येथें हिंदूंचीं अजून पुष्कळ घरें आहेत. इ. स. १७८३ सालीं फॉस्टर नांवाचा एक इंग्रज प्रवासी गझनी येथें गेला असतां तेथें त्यास असें आढळून आलें कीं, तेथील व्यापार हिंदूंच्याच हातीं आहे आणि तेथील लोकांचें जीवन मुख्यत्वेंकरून हिंदूंच्याच व्यापारवर अवलंबून आहे. अफगाणिस्तानांत बामियन नांवाचे एक गांव आहे, तेथें कित्येक बौद्धमूर्ति अजून दृष्टीस पडतात. तेथें एक जुना शिलालेखहि आहे.  पण त्या शिलालेखाचा अद्याप अर्थ न लागल्यामुळें तेथील प्राचीन इतिहास फारसा अवगत नाहीं. अफगाणी तुर्कस्थानांत हैबक नांवाचें एक गांव आहे, तेथें एक दोन व्यापारी पेठा आहेत. त्यांत अजून देखील हिंदूंचीं पुष्कळ दुकानें आहेत. हैबकशिवाय अफगाणी तुर्कस्थानामध्यें दुसर्‍या पुष्कळ गांवांत हिंदू आहेत. अफगाणिस्तानांतील खुद्द अफगाणांस लागू पडणारा कायद्याचा जो संग्रह उर्फ धर्मशास्त्र आहे त्यास 'पुख्तनवाली' असें म्हणतात. हें धर्मशास्त्र म्हणजे हिब्रू, मुसलमानी व रजपूत चालीरीतींची व कल्पनांची भेंसळ आहे. अफगाणिस्तानांतील पठाणांचें बरेंचसें आयुर्नियमन या 'पुख्तनवाली' धर्मशास्त्रानें होतें.

अफगाणिस्तानांतील हिंदुस्थानीय संस्कृतीचा अवशेष या दृष्टीनें एक महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे काफरिस्तान हा होय. काफरिस्तान व कोहिस्तान हे दोन प्रांत सिंधु नदी व काबूल नदी यांच्या संगमानें जो एक कोंपरा उत्पन्न होतो त्या कोंपर्‍यांत आहेत. हे दोन्ही प्रदेश फार दुर्गम आहेत. जेव्हां मुसुलमानी संप्रदायाचा आघात अफगाणिस्तानावर आला तेव्हां तेथील हिंदू सखल प्रदेशांतून निघून जाऊन या दोन अत्यंत दुर्गम अशा डोंगराळ प्रदेशांत येऊन राहिले. कालांतराने कोहिस्तान येथील हिंदू मुसुलमान झाले. काफरिस्तानांतील लोक इ. स. १८९४ सालापर्यंत मुसुलमान झाले नव्हते. तथापि १८९४ सालीं हा प्रदेश अफगाणिस्तानच्या ताब्यांत इंग्रजांनीं दिला, आणि तेव्हांपासून काफरिस्तानांत मुसुलमानी संप्रदायाचा जोरानें प्रसार झाल्याचें तिकडे गेलेले एक दोन महाराष्ट्रीय प्रवासी सांगतात.

काफरिस्तानांतील लोकांस हिंदू म्हणावें कीं म्हणूं नये हा प्रश्न जरासा वादग्रस्त आहे. "हिंदू" हा शब्द पारमार्थिक संप्रदायवाचक नसून संस्कृतिवाचक आहे, तथापि हिंदूंची संस्कृति देखील या लोकांच्या ठायीं पूर्णपणें नव्हती अगर नाहीं असें म्हणावें लागेल. यांच्या आचाराविचारांत आणि हिंदूंच्या आचारविचारांत कांहीं अंगें सारखीं आहेत. तीं येणेंप्रमाणेः- (१) हे लोक डोक्यावर शेंडी ठेवीत. (२) हे मुसुलमानांत आपल्या वस्तींत येऊं देत नसत; पण हिंदूंस येऊं देत. (३) यांच्यामध्यें विटाळशीच्या विटाळाची आणि दासवर्गाच्या विटाळाची कल्पना आहे. (४) यांचा पुजारीवर्ग ब्राह्मणांप्रमाणें एक स्वतंत्र जात आहे. (५) यांच्यामध्यें चौलासारखा प्रथमकेशवपनाचा संस्कार आहे. (६) यांच्यामध्यें स्थानदेवता, जातिदेवता इत्यादि अनेक प्रकारच्या देवता आहेत. या देवतांपैकीं सर्वांत श्रेष्ठ अशा देवतेचें नांव "इम्र" आहे आणि हें नांव इंद्र या शब्दाशीं सदृश्य आहे. या लोकांच्या ज्या भाषा आहेत, त्या पैशाच भाषांपैकीं असाव्यात असा ग्रिअरसनचा तर्क आहे. पेशावर, पिसाऊर आणि पिशाचपुर इत्यादि शब्दांचा संबंध रा. राजवाडे यांनीं जोडला आहे. पैशाची ही अवेस्ता भाषा आणि संस्कृत भाषा या दोहोंच्या मधली भाषा आहे असें ग्रिअरसन म्हणतो. या विषयावर आमचें असें मत आहें कीं, आर्यसंस्कृतीचें दृढीकरण ब्राह्मणजातीच्या प्रसारानंतर झालें. हें दृढीकरण होण्यापूर्वींच्या आर्यसंस्कृतीचा अपभ्रंश होऊन जी पिशाचसंस्कृति उत्पन्न झाली तिचे प्रतिनिधी हे काफिर असावेत. खुद्द महाभारताच्या कालीं आरठ्ठामध्यें (पंजाबमध्यें) चातुर्वर्ण्य चांगले दृढमूल झालें नव्हतें हें कर्णपर्वांतील शल्यास चिडविण्यासाठीं कर्णानें केलेल्या वर्णनावरून दिसून येतें. शिवाय आज पंजाबांत स्वदेशजन्य ब्राह्मण नाहींतच. तेथील ब्रह्मकर्म सारस्वत ब्राह्मणांकडून होतें. कथासरित्सागराच्या कालीं पंजाबमध्यें बौद्धसंप्रदाय होता आणि अफगाणिस्तान, तार्तरि येथपर्यंत तो पसरला होता. ब्राह्मण पश्चिमेकडे फारसे गेले नाहींत आणि पश्चिमेकडील देश ब्राह्मणांनीं नवीन उत्पन्न केलेल्या संस्कृतीपासून बरेचसे अलिप्‍त राहिले होते असें दिसतें. काबुलमध्यें सबक्तगीनच्या कारकीर्दींत एका ब्राह्मणानें राज्य स्थापिलें होतें. त्याशिवाय अफगाणिस्तानांत श्रौतस्मार्तपुरोणोक्त संस्कृति गेल्याचें दिसत नाहीं. यावरून काफिर लोकांची संस्कृति ही श्रौतस्मार्तसंस्कृति तयार होण्यापूर्वींची आर्यसंस्कृति भ्रष्ट होऊन बनलेली आहे असें अनुमान निघतें.

अरबस्तान वगैरे.- अरबस्तानामध्यें हिंदु संस्कृतीच्या अस्तित्वासंबंधानें कोणीं शंकाहि घेतल्याचें ऐकूं येत नाहीं. त्रान्सकाकेशिया व सैबिरिया येथें बौद्धसंप्रदायाचे अवशेष मात्र आढळतात.