प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

इराण.- इराण येथील क्षेत्र आपण पाहिलें असतां सध्यां हिंदूंचे अवशेष फारसे दिसत नाहींत, आणि तेथें प्राचीन काळीं जी संस्कृति होती ती हिंदुसंस्कृतीशीं किती जरी सदृश्य असली तरी आज नष्टप्राय झाली आहे. तथापि हिंदूंच्या विचारदृष्टीनें पाहिलें असतां हिंदूंशीं सदृश्य असे पारमार्थिक विचार ज्यांचे आहेत असे लोक तेथें सांपडतीलच. उदाहरणार्थ, लुरिस्तान घ्या. येथील लोक इराणी व यहुदी रक्ताच्या मिश्रणानें झाले आहेत असें एनसाक्लोपीडीया ब्रिटानिका म्हणतो, तथापि हें विधान आम्हांस बरोबर आहेच असें वाटत नाहीं. हे आपणांस मुसलमान म्हणवितात, तथापि या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, ही गोष्ट हिंदुत्वाचे सांस्कृतिक अवशेष पाहण्याच्या दृष्टीनें लक्षांत ठेविली पाहिजे. लुरींचा जिप्सींशीं आणि भारतीय भाटांसारख्या भटक्या जातींशीं संबंध कांहीं संशोधकांनीं जोडला आहे. त्याचें वर्णन पुढें येईलच. आश्रेफ नांवाच्या एक शहरांत 'गुदाद' नावांची एक जात आहे. ही जात तेथें हिंदुस्थानांतून गेली असा समज आहे.