प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
कर.- कोचिन-चिनी राज्यांत कराच्या बाबतींत, खालील गोष्टी लक्षांत ठेवण्यासारख्या आहेत. खजिन्यांत संपत्ति, कांहीं नगद व कांहीं ऐनजिनसी कर, शिल्पकारांवरील एक प्रकारची पट्टी आणि मक्ते देण्याबद्दलचें द्रव्य अशा तर्हेंनें येते. जमिनी खाजगी मालकीच्या किंवा राजाच्या मालकीच्या आहेत; त्यांतल्या त्यांत राजाच्या मालकीच्या जमिनी फार; व त्या गांवक-यांना खंडानें दिल्या आहेत व त्यांवर ३० चौरस टाइस* जमिनीबद्दल, दोन हंड्रेटवेट तांदूळ इतका सारा असतो; खाजगी जमिनीवरील यापेक्षां जरा जास्त सारा असतो. प्रत्येक वयांत आलेल्या कोचिन-चिनी मनुष्याला, जर तो सरकारी वेठ करीत नसेल तर, सुमारें दीड रुपया डोईपट्टी द्यावी लागते. कारण कोचिनचीनमध्यें खेडेगांवांतून सरकारी वेठ असते. या कामावरील मनुष्याला रस्ते, कालवे, पूल वगैरे बांधकामें करावीं लागतात. आयात मालावरील जकातीखेरीज तेथील सरकार लवंगा, वेलदोडे, दालचिनी आणि इतर मौल्यवान् माल यांचे मक्ते देऊन बराच पैसा मिळवितें. नवीन कर शोधून काढण्यांत राजाचे मंत्री फार हुशार आहेत. ते प्रजेच्या निकृष्ट स्थितींत देखील जितकें त्यांच्याकडून काढतां येईल तितकें काढीत असतात. अशा रीतींनें घेतलेला पैसा खजिन्यांत अपरंपार भरलेला असे व इतका पैसा लोकांनां वापरावयास मिळत नसे. ज्याच्याकडून ही माहिती मिळाली तो इंग्रज वकील या दरबारीं असतांना, खजिन्यांत सत्तर लक्ष डॉलर्सपेक्षां जास्त पैसा शिल्लक होता. तेव्हां लोकांनां सरकार फार अप्रिय असून त्यांची बंडाकडे प्रवृत्ति असें यांत विशेषसें आश्चर्य नाहीं. जेव्हां अशी वेळ येते, तेव्हां लोक खजिना लुटतात व सरकारला तो पुन्हां भरण्यासाठीं अन्यायी साधनांकडे धांव घ्यावी लागते.