प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

आफ्रिका.- हिंदुत्वाची अत्यंत दूरचीं ठाणीं म्हटलीं म्हणजे आफ्रिकेंतील होत. आफ्रिकेंतील सध्यांचा वाढलेला व्यापार व सध्यां मजुरीकरितां आफ्रिकेंत जाणें सोडून दिलें तरी हिंदूस्थानचा व आफ्रिकेचा संबंध फार जुना आहे असें दिसतें. मादागास्करच्या उत्तर भागांत आणि वायव्येकडील भागांत हिंदू आज बरींच शतकें आहेत, आणि तेथें अरबांप्रमाणेंत हिंदू हे व्यापारीवर्गांत प्रमुख आहेत. पोर्तुगीजांच्या आफ्रिकेमध्यें आज दिडशे वर्षांवर हिंदू व्यापार करीत आहेत. {kosh Keane’s Standard Geography, Vol. on Africa.}*{/kosh} फार तर काय, पण वास्कोडीगामा हिंदुस्थानांत आला तेव्हां त्याचा आफ्रिकेपासून हिंदुस्थानपर्यंत वाटाड्या एक गुजराथी गृहस्थ झाला होता. याशिवाय आफ्रिकेमध्यें जो गुलामांचा व्यापार झाला तो व्यापार करण्यास लागलेलें भांडवल हिंदुस्थानांतून  आलें होतें, आणि हिंदूंनीं आपल्या देशांत जरी गुलामगिरी राहूं दिली नाहीं तरी दुसर्‍यांच्या देशांत ती उत्पन्न करून देण्यास त्यांस दिक्कत वाटली नाहीं असा हिंदूंवर आरोप आहे. (Cust’s Languages in Africa पहा.) याशिवाय ईजिप्‍त व अबिसीनिया येथें लोकांचा व्यापार पूर्वापार चालत आलेला आहे. तेथील बायकांनां हिंदुस्थानांतील अत्तरें फार आवडतात असें ऐकिवांत आहे आणि हल्लीं तेथें हिंदुस्थानांतून कापड जातें. तेथील हिंदुस्थानांतील व्यापार्‍यांची संख्या सुमारें दोनशें असावी असा अजमास आहे. अबिसीनियामध्यें आदिस आबाबा नांवाचें एक शहर आहे. त्या शहरांतील मुख्य व्यापारी आर्मेनियन व हिंदू आहेत, असें एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणतो. (Adis ababa शब्द पहा.) अबिसीनियामध्यें व्यापार करणारे कांहीं व्यापारी डॉ. केतकर यांस भेटले होते ते सर्व जातीचे बोहरी होते, असें ते लिहितात.  ईजिप्त येथील कायरो शहरामध्यें हिंदुस्थानी व्यापार्‍यांचें प्रामुख्य नाहीं; पण तेथें हिंदुस्थानी शाली पुष्कळ खपतात आणि पोर्ट सय्यदमध्यें हिंदुस्थानी व्यापार्‍यांचें महत्त्व भासून येण्यासारखें आहे. हे व्यापारी बहुतेक सर्व सिंधमधील वाणी आहेत.

ब्रिटिश ईस्ट आफ्रिका, सोमाली लँड आणि अबिसीनिया यांचा व्यापार आपल्याकडे ओढणारें एक किसमायू नांवाचें बंदर आहे. येथें जूबा नदी हिंदी महासागरास येऊन मिळते. जूबा नदी ज्या भागांतून वहाते त्या भागाला जूबालँड असें म्हणतात. अति प्राचीन काळापासून म्हणजे इ. स. १५०० पूर्वींहि अरब लोकांच्या स्वार्‍या या प्रांतावर होत असत. येथें हिंदू लोक व्यापाराकरितां येत. अशा व्यापार्‍यांपैकीं "रामनाग" या नांवाचा एक हिंदू या जूबालँडमध्यें व्यापार करून बराच श्रीमंत झाला होता. यानें बारदेह भागांतील लोकांशीं चांगलें व्यापारी दळणवळण रहावें म्हणून "गाला" स्त्रीशीं लग्न केलें होतें. ही स्त्री मुसुलमान नव्हती तरी हिंदु देखील नव्हती. बारदेह लोक गाला लोकांनां काफिर समजत असत. यांनां पुढें मुलगा झाला आणि तो पुढें रामनागच्या अलोट संपत्तीचा वारस झाला. अरब लोकांनीं याला "झुमाल" असें नांव दिलें आहे. अनेक जातींचा अगर कुलांचा हा मूलपुरुष होय असें मानण्यांत येतें. {kosh See ‘British Somali Land’ by Dr. Drake Brockman.}*{/kosh} आज तेथील लोकांत हिंदुत्वाचे अवशेष नाहींत. रामनागावरून त्या प्रदेशांतील एका डोंगराच्या समूहास रामआदि हें नांव मिळालें आहे.

पूर्वेकडील प्रदेश.- आतां हिंदुसंस्कृतीचें आधिक्य ज्या प्रदेशांत आहे त्या प्रदेशांकडे वळूं. हिंदुस्थानच्या इतिहासामध्यें पूर्वेकडे ब्रह्मदेशाच्या सरहद्दीपर्यंत असलेल्या राष्ट्रांचा खेळ पहावयास सांपडतो आणि आसाम व बंगाल येथपर्यंत वेदभाषांचें अस्तित्व असल्यामुळें आणि तेथपर्यंत अप्रतिहत लोकव्यवहार असल्यामुळें त्यांच्याविषयीं आपणास फारशी जरी माहिती नसली तरी आपलेपणा वाटण्यापुरती माहिती आहे. गारो डोंगराची सरहद्द ओलांडल्यानंतर तेथपासून कांबोजापर्यंत आणि आग्नेयीकडे फिलिपाइन बेटापर्यंत जो भूभाग दृष्टीस पडतो त्याविषयीं मात्र अशी आपलेपणा उत्पन्न होण्याजोगी माहिती नाहीं. तथापि तामिळसारख्या भाषांवर संस्कृत भाषेचा संस्कार होऊन आणि संस्कृत वाङ्‌मयांतर्गत ज्ञानाचा आणि इतिहासाचा आणि त्याप्रमाणें आचाराचा प्रसार द्राविडी लोकांत होऊन त्यांनां जसें एक विवक्षित स्वरूप प्राप्‍त झालें तसाच प्रकार थोड्या फार अंशांनीं ब्रह्मदेश, मलाक्का, जावा, बलि, सेलिबिस, सयाम, कांबोज येथील राष्ट्रांचा झाला, अशी वस्तुस्थिती आहे. द्राविडदेशांत व भारताबाह्यदेशांत एक फरक हा आहे कीं, दक्षिणेकडे ज्याप्रमाणें तत्त्ववेत्ते आणि आचार्य उत्पन्न होऊन त्यांनी उत्तरेकडील लोकांवर छाप बसविली त्याप्रमाणें ह्या भारत द्वीपकल्पावर छाप बसविण्यास कोणी पलीकडल्या द्वीपांतील अगर द्वीपकल्पांतील आचार्य आले नाहींत. शिवाय येथील लोकांपासून थोडेफार भौम पृथक्त्व असल्यामुळें भारतबाह्यांच्या संस्कृतीस हिंदुस्थानामधील कोणत्याहि दोन स्थानांतील संस्कृतींच्या भेदापेक्षां अधिक निराळेपणा आला.

हिंदुस्थानांतील लोकांचें पूर्वेकडे प्रयाण कसें काय होत होतें याची माहिती इतिहासाविषयीं पूर्णपणें उदासीन असणार्‍या आम्हांस नाहींच. भाषांतील सादृश्यांवरून किंवा भाषाविकृतींच्या स्वरूपांवरून म्हणजे त्या भाषाविकृतींचा हिंदुस्थानांतील भाषांशीं संबंध जोडून यासंबंधींचा कांहीं इतिहास काढण्याचा प्रयत्‍न झाला आहे त्याचा आपण उपयोग करूं.

या विषयावरील आज तागाईतचें संशोधन देण्यास डच संशोधकांच्या ग्रंथाचा आम्हांस उपयोग झाला असता, तथापि डच संशोधकांचे ग्रंथ हिंदुस्थानांत उपलब्ध होत नाहींत त्यामुळें इंग्रजी भाषेंत उपलब्ध असलेल्या जुनाट संशोधनाच्या छायेवरूनच माहिती देणें आम्हांस प्राप्‍त आहे. जावाविषयींची माहिती एकत्र करतांना मात्र डच ग्रंथांचें साहाय्य मिळालें आहे. असो.

हिंदुत्वप्रसाराचें कार्य सध्यांच्या हिंदुस्थानच्या बाहेर पुष्कळ झालें, तथापि सिंधुनदीच्या पश्चिमेकडे जें कार्य झालें तें पूर्वेकडे झालेल्या कार्याच्या मानानें काहींच नाहीं. हिंदु संस्कृतीचीं ठाणीं सिंधुनदाच्या पश्चिमेकडे थोडींबहुत आहेत; पण हिंदुस्थानच्या पूर्वेकडील देशच्या देश, राष्ट्रेंच्या राष्ट्रें हीं तडाक्यानें हिंदु संस्कृतीच्या छायेखालीं आणलीं गेलीं. चीन व जपान येथें बौद्धधर्म पसरला, तथापि ब्राह्मणांनीं निर्माण केलेल्या धर्मशास्त्राचा पगडा चीन व जपान यांच्यावर फारच थोडा बसला; पण ब्राह्मणांनीं अगदींच कार्य केलें नाहीं असें नाहीं. ब्राह्मण शब्दास उत्पन्न झालेलें गौरव चीन व जपान येथील अनेक जुन्या ग्रंथांत आढळून येतें. ब्राह्मणांच्या वर्चस्वाचें प्रत्यक्ष क्षेत्र जर आपण पाहूं लागलों, तर मात्र चीन व जपान यांचा अंतर्भाव त्यांत होणें शक्य नाहीं. ब्राह्मण्याचें म्हणजे ब्राह्मणवर्चस्वाचें खरें क्षेत्र म्हणजे इंडोचीन व त्याच्या दक्षिणेकडील बेटें हें होय. सुमात्रा, जाव, बोर्निओ, सेलिबिस, फिलिपाइन्स येथें ब्राह्मणवर्चस्व सध्यां जरी नसलें तरी पूर्वीं असलेल्या वर्चस्वाचे अवशेष केवळ मोडक्या मंदिरांच्याच स्वरूपानें दिसत नाहींत, तर जिवंत चालीरीति, परमार्थसाधनें इत्यादिकांच्या रूपानें अस्तित्वांत आहेत. ग्रीक भूगोलवेत्त्यानीं ज्या वेळेस एशियाखंडाचे विभाग केले त्या वेळेस गंगेच्या अलीकडील हिंदुस्थान व पलीकडील हिंदुस्थान असे दोन भाग करून गंगेच्या पलीकडील हिंदुस्थानांत सयाम, कोचीन, चीन इत्यादिकांचा त्यांनी अंतर्भाव केला. सध्यां इंग्रजीमध्यें देखील या पूर्वेकडील द्वीपकल्पास इंडो-चायना म्हणजे 'हिंदुस्थानी चीन' किंवा 'पूर्वेकडील उपभारत' (Further India) असें म्हणतात, आणि तसें म्हणण्यास कारणेंहि सबळ आहेत. कां कीं शैव धर्म (शिवपूजन) आणि ब्राह्मणगौरव हीं त्या देशांतून अद्याप नष्ट झालीं नाहींत.

सुमात्रा, जावा, बोर्निओ, सेलिबिस, बलि, फिलिपाइन्स, सयाम, कांबोडिआ (कांबोज) या सर्व प्रदेशांविषयीं असें एक स्थूल विधान करितां येईल कीं, पूर्वीं या सर्व प्रदेशांत भारतीयत्व पसरलें होतें, आणि सध्यां तें मुसुलमानी आघातामुळें विस्कळित आणि कित्येक ठिकाणीं नष्ट झालें आहे.

जेथें बौद्ध संप्रदाय जिवंत आहे तेथें भारतीयत्व तर शिल्लक आहेच, पण ब्राह्मणगौरव देखील शिल्लक आहे. सयाम, कांबोज, बलि, व फिलिपाइन्स हे प्रदेश वगळतां इतर प्रदेशांतील भारतीयत्व मुसुलमानी आघातानें नष्ट झालें आणि फिलिपाइन्समध्यें ख्रिस्ती आघात त्यावर बसला. असो. आतां या प्रदेशांतील जुन्या नव्या संस्कृतीचा आपण हिशोब घेऊं.