प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
अधिकारी वर्ग.- सयामच्या राज्यांत वरिष्ट सरकारी कामगार पुढीलप्रमाणें असतातः घोडे व हत्ती यांवरील, सक्तीच्या नोकरीवरील, परराष्ट्रांसंबंधी, शेतकी कामगार, न्यायमंत्री, वरिष्ठ न्यायाधीश, घोडे व हत्ती यांवरील दुय्यम कामगार, दवाखान्यावरील अधिकारी, कालव्यावरील कामगार, सार्वजनिक इमारती व कामें यावरील अधिकारी, पितळी कामाच्या भट्ट्यांवरीव अधिकारी व तलपत्रींचा मुख्य म्हणजे पारमार्थिक बाबतींत धर्माध्यक्ष. या यादीवरून दिसून येईल कीं, सयामी राज्यांत राज्यकारभाराच्या प्रत्येक खात्यावर योग्य सरकारी कामगार नेमलेला असे. एकंदर कामगारांचे त्यांच्या हुद्याबरहुकुम पांच वर्ग पडतात, परंतु त्यांच्या पदव्यांसंबंधीं येथें उल्लेख करण्याची जरूर नाहीं, कारण येथें सयामी राज्यपद्धतीबद्दलची सामान्य माहिती देण्याचाच उद्देश आहे. त्या उद्देशानुसार सयामी राज्याचे विभाग व त्यांतील राज्यकारभार यांची माहिती थोडक्यांत देऊन नंतर लष्कर, खजिना, न्यायखातें, व कायदेकारण यांची माहिती द्यावयाची आहे.
आतां या गोष्टींची माहिती देण्यापूर्वीं अगोदर ही गोष्ट सांगितली पाहिजे कीं, थइ राज्यपद्धति पूर्वीं फारच साधी होती. पूर्वीं मुख्य सरकारी कामगार दोनच असत, पहिला व सर्वोच्च असे त्याला कोहोम व त्याच्या खालचा दुय्यम असे त्याला चक्री असें म्हणत. पहिला सर्व लोकसमाजाच्या दक्षिण भागाचा पुढारी असे व त्याच्या ताब्यांत खजिना, परदेशाबद्दलचें कामकाज व व्यापार इतक्या गोष्टी असत; त्याप्रमाणेंच राज्यांतील सर्व प्रांतावर व राज्यकारभारांतील व न्यायखात्यातील सर्व कामगारांवरील तो मुख्य असे; लष्करी बाबतींत ही वरिष्ठ देखरेखीचा अधिकार त्याजकडेच असे, आणि सैन्याचा मुख्य सेनापतीहि बहुधा तोच असे; तथापि राजाला त्याच्या जागी दुसरा कोणी सेनापति नेमतां येत असे. चक्री हा राजधानींतील सुभेदार व राजवाड्यांतील मुख्य कामगार असून त्याच्या हाताखालीं जकाती व कर वसूल करणारा अधिकारी असे; तेव्हां व्यापारी धोरणाचे प्रश्न परदेशकारभाराच्या खात्यांत पडत असल्यामुळें त्यामध्येंहि या चक्रीला हजर राहून भाग घेतां येत असे.