प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

फिलिपाइन्स.- फिलिपाइन्सकडे प्रथम वळूं. सध्यां फिलिपाइन बेटांमधील बहुतेक प्रजा ख्रिस्ती आहे, आणि जर येथील डोंगरी लोक सोडून दिले तर बाकीची मुसुलमान आहे. सध्यां तेथें हिंदुत्व नांवाला देखील उरलें नाहीं; पण प्राचीन काळीं हीं बेटें हिंदु संस्कृतीचे महत्त्वाचे भाग होतीं ही गोष्ट सध्यां फिलिपाइन लोकांच्या भाषा तपासून पाहिल्यास दिसून येईल. सध्यां तेथें इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू आहे व जुन्या परंपरागत भाषा नष्ट होत आहेत. पण त्या भाषांचे कोश तयार झाले आहेत. त्या कोशांवरून असें दिसतें कीं, प्रत्येक महत्त्वाचा शब्द संस्कृतमधून घेतला आहे. उदाहरणार्थ-राजा, मंत्री, चिंता, इत्यादि. सध्यां मॅनिलामध्यें स्पॅनिश भाषेचा पक्ष घेऊन इंग्रजी भाषेविरूद्ध भांडणारे लोक आहेत. तथापि तद्देशीय भाषांची बाजू घेऊन भांडणारे कोणीहि नाहींत. फिलिपिनो लोकांत यूरोपियन रक्ताशीं मिसळून जावें ही हीन वृत्ति प्रसार पावली आहे.