प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
पोर्तुगीज व्यापार.- या वरील राज्यांशीं पोर्तुगीज लोकांच्या जडलेल्या संबंधाविषयीं सांगावयाचें म्हणजे असें कीं पोर्तुगीजांनीं, आलफान्सो डी आलबुकर्क यानें १५११ मध्यें मोलक्का जिंकून घेतल्यानंतर, लवकरच कोचिनचीनशीं व्यापारी दळणवळण सुरू केलें. हा व्यापार ह्या बेटांतील पोर्तुगीज गव्हर्नरांनीं चालविला होता; दरसाल ते लोक ह्या देशांत एक जहाज पाठवीत असत व त्या जहाजांतून परत इतर जिन्नसांबरोबर आंबोयना अथवा अधिला नांवाचें लाकूड आणीत असत; कारण हें लाकूड म्हणजे ह्या देशांतील एक अत्यंत मौल्यवान माल म्हणून प्रसिद्ध आहे.
राज्यव्यवस्था.- या पूर्वेकडील उपभारतीय राज्यांच्या इतिहासामध्यें असा एक मोठा दोष आहे कीं, त्या इतिहासांत उगीच निरुपयोगी गोष्टींचें भारूड फार असून जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनें त्याला फारसें महत्त्व नाहीं असें लासेन यानें मत प्रदर्शित केलें आहे; व या बाबतींत वाचकांची होणारी निराशा थोडीफार दूर करण्याकरितां या राज्यांची ऐतिहासिक माहिती देण्याचें थांबवून येथें त्याला जोडून तेथील राज्यपद्धतीसंबंधाची थोडीशी चर्चा त्यांनें केली आहे; व सुमारें १०० वर्षांपूर्वींच्या तेथील राज्यव्यवस्थेचें त्यानें पुढें दिल्याप्रमाणें वर्णन दिलें आहे. “राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनें पाहतां या संस्थानांचे दोन विभाग पडतात. पहिला विभाग म्हणजे ज्यांत चिनी राज्यपद्धति प्रचारांत आली अशा संस्थानांचा, व दुसरा ज्यांत ती पद्धति नव्हती अशा संस्थानांचा . पहिल्यांत टांकिन व कोचिनचीन हीं येतात; व दुसर्यांत कांबोज, सयाम, पेगू ब्रह्मदेश व आराकान इतक्यांचा समावेश होतो. यांपैकीं कांबोजची राज्य पद्धति वर दिलेलीच आहे; म्हणून त्याबद्दल पुनरावृत्ति नको. पेगू हें बर्याच काळापूर्वींपासून स्वतंत्र राज्य असें नाहींच; आणि आराकानमधील राज्यपद्धतींत ब्रह्मी राज्यसत्तेमुळें बर्याच बाबतींत भर पडली आहे. तेव्हां आतां टांकिन, कोचिनचीन, सयाम आणि ब्रह्मदेश एवढेच प्रदेश विचारांत घ्यावयाचे.