प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
बिम.— बिम भाषा ही बिम नावांच्या एका स्वतंत्र राज्यांत प्रचलित आहे. या राज्यामधें सुंबावा बेटाचा पूर्वभाग आणि एन्डे बेटाचा पश्चिमभाग हे येतात. पहिल्या पहिल्या पोर्तुगीज प्रवाशांनीं व त्यांच्या मागून आलेल्या कांहीं प्रवाशांनीं व भूगोलवेत्त्यानीं या एन्डे बेटासच फ्लोअर्स असें म्हटलेलें आढळतें. एन्डे बेटाच्या बहुतेक भागावर बिम भाषा प्रचलित आहे असें लेडेन याचें मत आहे. बिम भाषेचा बूगी व जावानी भाषांशीं संबंध असावा असें दिसतें व किनार्यावरील भाषेमध्यें मलयु भाषेचें मिश्रण झालेलें आढळतें. बूगी भाषेशीं जो संबंध दिसतो तो वास्तविक बूगी भाषेशीं नसून मकासर भाषेशीं आहे. सुंबावा बेटाचा जो भाग बिम येथील सुलतानाच्या ताब्यांत नाहीं त्या भागांतील भाषा बिम, जावानी व बूगी यांच्या मिश्रणानें बनलेली आहे. बिम किंवा सुंबावा या दोन्ही भाषांस स्वतंत्र लिपी नसून त्या बूगी किंवा मलयु भाषेचीच लिपी वापरतात.