प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
सयामी चरित्रग्रंथ.— चरित्रग्रंथहि सयाममध्यें अनेक आहेत. परंतु राम व रामायणांतील इतर व्यक्ति यांच्या विषयींचे ग्रंथ सोडून दिल्यास या ग्रंथांत भारतीय ग्रंथांशीं सदृश ग्रंथ फारच थोडे आढळतात. रुखेंग, मलयु व ब्रह्मी या भाषांतील ग्रंथांसारखे महत्त्वाचे ग्रंथ पुढें दिले आहेत.
(१) राम किएन (२) रादिन (३) सुम्मत्त कोदोम (४) वेत्ज संदोन (५) वोरवोंग (६) उन्नरुत (७) मेलय (८) महोसोत (९) चत्रि (१०) चलवल (११) कुमहोम (१२) प्रथोम (१३) सुथोन (१४) पोखवद्दि (१५) तेंगोन (१६) लिंथोंग (१७) नोक्खुम (१८) फनोन सोन पज (१९) मक्कलिफोन (२०) सुंफंसित (२१) सुअन्न होंग (२२) प्रंगथोंग (२३) नंग सिपसोंग (२४) राम (२५) चंपाथोंग (२६) लुकस्वाको (२७) फिमस्वन (२८) पजफलि (२९) थ्व कंग सोन (३०) खुनफेन (३१) त्रेइवोंग (३२) धिन नरत (३३) फोवित् हत (३४) सुथिन (३५) होइसंग (३६) संगसिंचय (३७) वोरनुत (३८) चित्रकन (३९) नंगुथय (४०) म्लेकथोंग (४१) महाचिनोक.
हे चरित्रग्रंथ, लेखनपद्धति व भाषाशैली या बाबतींत ब्रह्मी, मलयु किंवा रुखेंग ग्रंथांप्रमाणेंच आहेत व त्यावरून सयामी लोकांचा आयुष्यक्रम जो दृष्टीस पडतो तोहि इतर इंडोचिनी राष्ट्रांप्रमाणेंच आहे व पौराणिक कथाहि तशाच प्रकारच्या आहेत. यांपैकीं रामकिएन हा ग्रंथ रामायणाचीच एक आवृत्ति आहे. यांत प्राम अथवा प्रराम व त्याचा बंधु प्रलक अथवा लक्ष्मण यांच्या पराक्रमांचें वर्णन असून त्यांनीं नंगसेत अथवा सीता इचें हरण करणार्या तोत्सकन अथाव दशकंठ या राक्षसास युद्धांत मारल्याची कथा आहे. ही कथा अगदीं संस्कृत रामायणाप्रमाणेंच असून ज्याप्रमाणें 'यममेंग' या ब्रह्मी रामायणांतील प्रसंगांवर ब्रह्मदेशांत नाट्यरचना आढळते त्याप्रमाणें सयामध्येंहि रामायणांतील सर्व प्रसंगांवर नाटकें रचलेलीं आहेत. सुम्मत कोदोम हा सोमोनकोदोम राजाचा इतिहास आहे; व तो पाली भाषेंतून संक्षेपरूपानें घेतलेला आहे. रादिन हें एका जाबानी गोष्टीचें रूपांतर आहे. वेत्ज सुंदोन हें एका राजाचें चरित्र आहे. यांत, राजा एकदां बागेंतून चालत असतांना एका मेलेल्या आंब्याच्या झाडास पाहून त्याला उपरति झाल्याची कथा आहे. वोरवोंग या ग्रंथांत अशी कथा आहे कीं, एक राजा एका स्त्रीवर आसक्त होऊन तिच्या महालाच्या खिडकीकडे चढून जात असतां तिच्या रक्षणाकरितां ठेवलेल्या एका भारलेल्या भाल्याच्या योगानें मृत्यु पावतो. या कथानकावर एक नाटकहि आहे. महोसोत या ग्रंथांत महोसोत आणि चोनिं यांमधील युद्धांचें वर्णन आहे. हा ग्रंथ ब्रह्मी ‘महोसथ’ ग्रंथाप्रमाणेंच आहे. ‘उन्नरुत’ ग्रंथांत अनिरुद्धाची कथा आहे. मेलय या ग्रंथांत नरकाच्या यातनांपासून सोडविणार्या मलयाची स्तुति आहे. ‘चलवल’ या ग्रंथांत एका मगराचें एका राजकन्येवर प्रेम बसून तिला त्यानें आपल्या समुद्रांतील गुहेंत नेलें व पुढें तिची सुटका झाली अशी कथा आहे. ‘कुमहोम’ही एका दुसर्या राजकन्येची गोष्ट असून तिच्यावर प्रेम करणार्या एका हत्तीपासून तिची सुटका झाल्याचें हें वर्णन आहे. ‘प्रमोथ’ या ग्रंथांत बौद्धमताप्रमाणें जगदुत्पत्ति वर्णन केली आहे. ‘नोक्खुम’ यामध्यें पौराणिक हंसाची कथा आहे. ‘पोखवद्दि’ यांत भगवतीचरित्र आहे. ‘फनोन सोन पज’ यामध्यें ‘फनोन’ या वानरानें केलेला बोध दिला आहे. ‘मक्कलिफोन’ या ग्रंथात एका राजपुत्राजवळ कामधेनूप्रमाणें एक गाय होती तिची गोष्ट आहे. ‘सुंफंसित’ हें नीतिशास्त्रावरील पुस्तक आहे. ‘प्रंगथोंग’ यांत अशी गोष्ट आहे कीं, एका राजकन्येस एका फळाचे डोहाळे लागले. होते तें फळ एका राक्षसाजवळ होतें. तेव्हां कांहीं लोकांनीं राक्षसाच्या देशास जाऊन तें फळ आणलें; परंतु त्या राक्षसानें अशी अट घातली कीं पुढें होणारा मुलगा त्यास मिळावा. त्याप्रमाणें त्या राक्षसानें तो मुलगा नेला व पुढें तो मोठा झाल्यावर तेथून निघून आला. ‘लुकस्वाको’ यांत, एका बैलाची आणि वाघाची मैत्री होती व पुढें त्यांनां एका ऋषीनें मनुष्यत्व दिलें अशी कथा आहे. ‘पजफलि’ यांत सुग्रीवाचा बंधु वाली याच्या पराक्रमांचें वर्णन आहे. ‘होइसंग’ या ग्रंथांत एका शंखांत जन्मून वाढलेल्या राजपुत्राची गोष्ट आहे. ‘संगसिंचय’ या ग्रंथांत एका वीराचा वृतांत आहे. तो असा कीं, त्याचा जन्म झाला त्यावेळीं त्याच्या हातांत शंख व धनुष्य होतें. तो लागलाच सिंहावर बसून निघाला व त्यानें पुष्कळ राक्षस, यक्ष वगैरेवर विजय मिळविले. ‘वोरनुत’ या ग्रंथांत वोरनुत आणि वोरनेत या दोन भावांची कथा आहे. ‘नंगुथय’ या ग्रंथांत एका राजानें पळवून नेलेल्या एका नाग राजकन्येची कथा आहे. यांतील बर्याच कथा संस्कृतमधील असून त्या पालींतून या भाषेंत आल्या असाव्या असें लेडेनचें मत आहे. ‘महाचिनोक’ या ग्रंथांत जनक राजाची कथा आहे. ही जरी मूळरामायणावरून घेतली असली तरी तिचें स्वरूप बरेंच पालटलें आहे कारण तींत फ्रेंच व फ्रँक्स यांचा उल्लेख आढळतो.