प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

सोकोत्रा.- आतां हिंदुत्वाचें बरेंच दूरचें ठाणें घेऊं. तें ठाणें म्हटलें म्हणजे सोकोत्रा होय. सोकोत्रा हा शब्द 'सुखाधार' द्वीप या संस्कृत शब्दाशीं संबद्ध आहे, असें  पाश्चात्त्यांचें मत आहे. हिंदुस्थानचा व्यापार या बेटाशीं पुष्कळ होता आणि पुढें हिंदुस्थानीं लोकांच्या हातून येथील व्यापार अरबांच्या हातीं गेल्यानंतर तेराव्या शतकापर्यंत हिंदूंची लुटालूट करण्याकरितां सोकोत्रापर्यंत जहाजें येत असत, असें अरब तवारिखकार अबुल फ्रेदा म्हणतो.