प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

सेलिबिस.— सेलिबिस बेटांत हिंदुत्व नाहींच असें नाहीं. तेथें 'बुगी' नावांची एक जात आहे. ही जात फार थोडक्या दिवसांपूर्वीं मुसुलमान बनली आहे. तथापि यांचा मुसुलमानी पाया फारसा घट्ट नाहीं. हिंदु संस्कृतीपैकीं बरेच अवशेष त्यांच्यांत शिल्लक आहेत. त्यांतील महत्त्वाच म्हटला म्हणजे शिवपूजन हा होय. हें बुगी राष्ट्र ८० लहान लहान संस्थानें मिळून बनलें आहे. मलबारी लोकांप्रमाणें यांच्यामध्यें वंश मातृकन्यापरंपरेनें ठरविला जातो. या सर्व संस्थानांचा सामान्य अधिपती उर्फ अध्यक्ष निवडला जातो आणि एकदां निवडला गेल्यानंतर त्याचा अधिकार जन्मभर टिकतो. निरनिराळ्या संस्थानांमध्यें आधिपत्याची महत्त्वाकांक्षा थोर कुळांतील लोक करितात, आणि संस्थानाधिपत्य कधीं कधीं  बायकांसहि मिळतें. बुगींचीं निरनिराळी संस्थानें मिळून जें राष्ट्र बनतें त्यास बोनी असें म्हणतात आणि 'बोनी' हें राष्ट्र सध्यां डच लोकांचें मांडलिक आहे. इ. स. १६६६ सालीं तेथील राजा "पालक" यानें सुमात्राचा सुलतान हसन याशीं युद्ध करण्याकरितां डचांनां बोलविलें आणि तेव्हांपासून डच लोकांची मगरमिठी यांच्या मानेस बसली. मध्यंतरीं कांहीं दिवस हें राष्ट्र ब्रिटिशांचें मांडलिक झालें होतें.