प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

सयामची राजसत्ता.- पूर्वेकडील उपभारतीय राज्यपद्धतींत सुमारें १०० वर्षांपूर्वीं विशिष्टपणें आढळून येणारें जुलमी धोरण, थइ संस्थानांतहि त्या काळीं तसेंच आढळतें असें लासेन यानें वर्णन केलें आहे. तेथील अधिकारी आपल्या फाजीर मानपानांस व अनियंत्रित सत्तेस आणि तलपत्री (छत्रधारी) यांच्या धार्मिक सत्तेस काहीमात्र आळा घालीत नाहींत. सयामचा इल्हे राजा हा तलपत्रींचा वरिष्ठ आहे. त्याच्याकडूनच या तलपत्रींनां त्यांचा अधिकार व देणग्या वगैरे मिळतात. मुलकी कामगारासारख्या यांच्या नेमणुका होत असून त्यांनां काढूनहि टाकितां येतें. अशा प्रकारें उपाध्याय लोक राजावर सर्वस्वीं अवलंबून असून लोकांनां त्रास देण्याच्या व सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणें करण्याच्या कामीं पारमार्थिक बाबतींत तो यांचा उपयोग करूं शकतो. ‘शाअ-फेन-डिन्’ म्हणजे पृथ्वीपति, ‘शा-अ-जेव्हिट’ म्हणजे जीवितेश व ‘फ्रा-नाह-ख्रासट’ म्हणजे अतिशय वैभवशाली अशा अगदीं अर्थपूर्ण पदव्या सयामच्या राजाला आहेत. याशिवाय या राजाला इतर अनेक लहान लहान पदव्या असतात; परंतु त्यांचा येथें उल्लेख करितां येत नाहीं.