प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

कालमापनाच्या प्रारंभबिंदूची विविधता:- आधारभूत कागदपत्रांचा अभाव अगर अपुरेपणा ही एक अडचण तर खरीच, पण त्यापेक्षां जास्त जबरदस्त अडचण कालमापनाच्या आरंभबिंदूची आहे. एके ठिकाणी राजपरंपरे प्रमाणें कालमापन केलें जाई तर दुसर्‍या एखाद्या ठिकाणी दर वर्षी बदलणार्‍या न्यायधिशांच्या कारकीर्दीवरून कालमापन ठरविण्यांत येई. अशा पिढ्या मोजून कालमापन करणें हे आज चमत्कारिक दिसतें. वर्षगणना किती सोईची आहे हा साधा विचार एरॅटोस्थेनिसच्या पूर्वी कोणाला सुचला नाहीं ही गोष्ट मात्र खरी.

पहिल्या प्रथम शकाच्या अभावीं कालनिर्णयाचा गोंधळ उडे, तर पुढें पुढें तो गोंधळ शकाच्या विविधतेमुळें माजूं लागला. परंतु लोकांच्या संकुचित संघांचा जसजसा जास्त राबता पडूं लागला आणि दळणवळण वाढूं लागलें, तसतशी एक सर्वसामान्य शक असण्याची अवश्यकता सर्वांस पटूं लागली.

पुरातन कालच्या विविध शकांमध्ये बाबिलोनियन, ग्रीक आणि रोमन हे महत्त्वाचे शक आहेत. बाबिलोनियामधील नॅबोनसरचा शक ख्रि. पू. ७४७ ह्या वर्षी सुरू होतो. ग्रीक लोकांतील ऑलिंपचतुर्थक पद्धति ख्रि. पू. ७७६ ह्या वर्षी सुरू झाली, रोमन लोकांत रोमच्या स्थापनेंचें वर्ष हें आरंभ वर्ष मानत त; आणि हें वर्ष कोणतें याबद्दल वाद असला तरी ७५३ ( ख्रि. पू ) हें साल साधारपणें ग्राह्य मानिलें जातें. हे तीनहि शक जवळ जवळ समकालीन आहेत. ह्यांपैकी ऑलिंपचतुर्थक पद्धति जरी नांवाला ख्रि. पू. ८ व्या शतकांत सुरू झाली तरी वस्तुत: टायमिअसच्या वेळेपर्यंत ती प्रचारांत आली नव्हती. रोमन पद्धचि प्रचारांत केव्हां आली हें अज्ञात आहे. तिसरी पद्धति मात्र सुरू झाल्याबरोबर तिचा प्रचार देखील जारीनें झाला.

यूरोपांत ख्रिस्ती धर्माच्या संस्थापनेनंतरहि देशवारी, प्रांतवारी अगर धर्मवारी अनेक पद्धती पूर्ववत् चालू राहिल्यामुळें पूर्वीचा घोटाळा तसाच कायम राहिला. एका शकाला सुरूवात झाली कीं शकवर्षाची संख्या वाढूं लागते. अडाणी लोकांत ‘ विसां ’ च्या भाषेंत मोठ्या संख्या सांगतात त्याप्रमाणेंच यूरोपांतील अडाणी लोक ह्या वाढत्या शक वर्षांची संख्या नियमित वर्षांच्या कालावधीनें मापूं लागले. असे पुष्कळ कालावधी अगर कालमापनचक्रें यूरोपांत रूढ झालीं. सौरमानपद्धति आणि चांद्रमानपद्धति ह्यामुळें उद्भवणारा घोटाळा टाळण्याकरीतां ह्यांची मुख्यत: योजना असे. अन्यथा संशयग्रस्त अशा कालनिर्णयविषयक मुद्दयांचा निकाल लावण्याच्या कांमी ह्यांचा फार उपयोग होतो.