प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
कालमापन हें कर्मानुक्रमाच्या अनुषंगानें जन्मास आलें:- कालमापनपद्धतींचा विकास द्यावयाचा म्हणजे त्यांच्या अनुषंगानें राष्ट्रांच्या आयुष्यक्रमविषयक दुसर्या अनेक गोष्टी देणें प्राप्त होतें. कालमापन हें कार्य ज्या कोणत्या व्यवहारामुळें होतें त्याची थोडी तरी माहिती लागते. हिंदुस्थानांतील कालमापनासंबंधाचे म्हणजे पंचांगासंबंधाचे तंटे जर आपण पाहिले तर ते बरेचसे धार्मिक विधींशी गुंतलेले दिसतात. रामनवमी आज कीं उद्या, वर्षप्रतिपद आज कीं उद्या यासंबंधाचे तंटे आपण पाहतोंच. जेव्हा एखादा पारमार्थिक संप्रदाय दुसर्यापासून फुटून निघतो तेव्हां त्या वेळी जे ज्योतिषविषयक मतभेद उत्पन्न झालेले असतील त्यांचाहि परिणाम त्या संप्रदायांच्या नियमांवर होतो. स्मार्तांनी जर पहिल्या दिवशी एकादशी करावयाची तर भागवतांनी दुसर्या दिवशीं. हे धार्मिक तंटे आपण देऊं लागलों तर कालमापनपद्धतीचा इतिहास बराच मनोरंजक करतां येईल. आज सेहेनशाही आणि कदमी पारशी वैवाहिक बाबतींत एकमेकांपासून बरेचसे निराळे व अलग का, तर म्हणे दोन जातींत निरनिराळीं पंचांगें वापरतात म्हणून. केवळ हिंदू व पारशी यांच्या इतिहासांतच सामाजिक भांडणें, भिक्षुकी तंटे, व्रतें, उत्सव, उद्यापनें यांशीं कालमापनपद्धतीचा इतिहास संबद्ध आहे असें नाहीं, तर पाश्चात्त्य लोकांतहि तीच कथा आहे. ज्योतिषविषयक तंटे. पारमार्थिक तंट्यांशी फार संबद्ध आहेत.