प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
ऐतिहासिक सत्याचा सांप्रदायिक कल्पनेवर विजय:- व्हिक्टोरिया महाराणी राज्यारूढ झाली तोंवर ख्रि. पू. ४००४ हें विश्वोत्पत्तीचें वर्ष मानलें जाई. आजहि जरी हा आंकडा बायबलातं आढळतो, तरी जगाची आणि मानवाची उत्पत्ति लाखों वर्षांमागें झाली असली पाहिजे ही गोष्ट सर्वसंमत आहे. बायबलांतील गोष्टींत ऐतिहासिक सत्य यथातथाच आहे असें म्हणून त्यांच्या प्रामाण्याविषयीं साशंकवृत्ति दाखविणें एके काळी धर्मलंडपणाचें लक्षण मानिलें जाई. परंतु पुष्कळ वादविवाद होऊन नवीन मताला चांगली शाश्वति आणि बळकटी आली आहे.
पुराणवस्तुशास्त्र आणि त्याच्या अंगभूत असलेलीं मानुष्यकशास्त्र आदिकरून आधुनिक शास्त्रें ह्यांचा प्रस्तुत विचार क्रांतीवर फार परिणाम झाला १८ व्या शतकाच्या शेवटच्या चरणांत जेम्स हटन ह्यानें ह्या विचाराला चालना दिली. इंग्लडमध्यें विल्यम स्मिथ आणि फ्रान्सांत कुव्हर ह्या उभयतांनी ह्या मताचा प्रसार केला. सर चार्लस लायल ह्याच्या “भूस्तरशास्त्राचीं प्रमेयें” आणि “मानवी पुरातनत्त्व” ह्या ग्रंथाच्या जोडीनें पुराणमताभिमानी लोकांमध्यें जोराची खळबळ उडवून दिली. नवीन माहितीच्या मार्यापुढें, जुन्या मतांचें समर्थन करण्याचा पुराणमताभिमानी लोकांचा अट्टहास टिकूं शकला नाहीं.