प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
 
आर्मीनियन कालगणना:-  ख्रिस्तीभवनापूर्वी आर्मीनियन लोकांचें वर्ष इजिप्शियन आणि पार्शियन लोकांप्रमाणें ३६५ दिवसांचें होतें; ३६५| दिवसांचें नव्हतें. त्यांच्या कालगणनेविषयीं विवेचन करावयाचें म्हणजे त्यांनी आपली पद्धति ख्रिस्ती राष्ट्रांशीं जुळती कशी करून घेतली हें सांगणें होय. त्यांचे महिने तीस दिवसांचे बारा होते. बारा महिन्यांची जीं नांवें आहेत त्यांत कांही अंशी पर्शूंच्या संबंधाचा परिणाम दिसून येतो. मेहकन हा महिना मेहेर किंवा मिथ शब्दाशीं संबद्ध आहे. मार्गच आणि अहिकन हे शब्द पारसिक शब्दांशी संबद्ध दिसतात. हे बारा महिने झाले म्हणजे दुसरें वर्ष सुरू होण्यापूर्वी पांच दिवस जास्त धरतात. त्यांच्या मध्यें निरनिराळ्या शकपद्धती आहेत. आर्मीनियन कालगणनेचा भारतीय कालगणनेशीं प्रत्यक्ष संबंध आला नसावा. जो संबंध आहे तो दोन मार्गांनीं दाखवितां येईल. कांहीं भारतीय ज्योतिष बाबिलोनियापासून आले असेल आणि काही पर्शुभारतीय काळांतील ज्योतिषापासून विकासलें असेल. यामुळें भारतीय व आर्मीनियन कालगणना सहोदर होत्या असें म्हणतां येईल.