प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
 
आनाम, चंपा व लावो:-  अनाम, चंपा, लावो वगैरे भागांत हिंदूंची कालगणनापद्धति जरी स्वीकारली गेली आहे तरी तिजबरोबर चिनी कालगणनापद्धति देखील थोडीशी शिरलीच; आणि मुसुलमानी कालगणनापद्धतीचाहि थोडा परिणाम झाला. शालिवाहन शक चालतो तेथेंच द्वादशवर्षसमुच्चय देखील वर्षगणनेसाठी लावले जातात. हीं बारा वर्षे बारा राशींवरून आलीं आहेत. शालिवाहनशकाशिवाय बुद्धशकहि कांही ठिकाणी चालू आहे. बुद्धशकाचा प्रारंभ ख्रिस्तपूर्व ५४३ वर्षें धरतात आणि महाशकराज म्हणजे शालिवाहनशक ख्रिस्तोत्तर ७८ पासून धरतात. यांशिवाय कांही ठिकाणीं ‘ चुल्लशकराज ’ म्हणून शक वापरण्यांत येतो. चुल्लशकराज म्हणजे कमी महत्त्वाचा शक होय. हा ख्रिस्तोत्तर ६३८ पासून सूरू होतो.

कांबोज, अनाम, चंपा वगैरे प्रदेशांत चैत्र, वैशाख हेच महिने वापरले जातात. एवढेच नव्हे, तर कांही ठिकाणीं मोहरम वगैरे मुसुमानी महिनेहि वापरले जातात. त्यांच्या द्वादशवर्षसमुच्चयाचा उल्लेख चिनी कालगणनापद्धतींत आलाच आहे.