प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
इजिप्तमधील इतिहाससंशोधन:- असुरीयाच्या इतिहासाबद्दल जशी ही माहिती मिळत गेली तशी इजिप्तच्या इतिहासाबद्दल हि मिळत चालली. यंग वगैरे संशोधकांची माहिती लेप्शस, लेनार्मंट, बर्च प्रभृति लोकांनी पूर्णावस्थेत नेण्यास प्रयत्न केला आणि विल्किन्सन, प्रोफेसर प्लिंडर्स, पेट्री वगैरेंनीं ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाची नवीन माहिती लोकांच्या नजरेस आणून दिली. अबिडॉसच्या देवळांतील भिंतीवर सांपडलेल्या राजांच्या जंत्रीमुळें मॅनेथोच्या ग्रंथांतील पुष्कळ संशयग्रस्त गोष्टीनां आधार मिळाला; आणि मॅनेथोच्या ग्रंथाची सत्यता लोकांना प्रतीत झाली. इजिप्तच्या प्राचीन इतिहासाबद्दलची माहिती मॅनेथोच्या ग्रंथातील तुटक आणि विस्कळित भागांवरूनच काय ती मिळाली होती; तरी देखील वरील शिलालेखांची माहिती होण्यापूर्वी, मॅनेथोच्या जंत्र्यांबद्दल प्रामाण्यबुध्दि नव्हती; इतकेच नव्हे तर मॅनेथोचें अस्तित्व देखील न मानणारे कुशंकेखोर लोक होते. इंजिप्तच्या इतिहासाबद्दलच्या प्रस्तुत विषयावरून, पुराणवस्तुशोधकांचे शोध विधायक स्वरूपाचे कसे असूं शकतात आणि परंपराप्राप्त गोष्टींवरील विश्वास त्यामुळें कसा दृढमूल होतो हें चांगलें निदर्शनास येतें.
मेसापोटेमियाच्या पूर्वकालीन इतिहासामधील कित्येक सनांबद्दल जसा नक्की निवाडा झाला आहे तसा इजिप्तच्या इतिहासाबद्दल झाला नाहीं. इ. स. १६०० च्या पुढें. मात्र ठोकळमानानें बरोबर असे सन देतां येतात. असें असलें तरी. जवळ जवळ चार हजार वर्षांपूर्वींच्या गोष्टींती परंपरा स्थूलमानानें मुकरर करतां येते. एवंच काय, तर मानवी अस्तित्वाचा एकंदर काल म्हणून जो मानला जाई त्याच्या पूर्वी शेंकडों किंवा हजारों वर्षे इजिप्त आणि मेसापोटेमिया ह्या दोन्ही ठिकाणीं अव्वल दर्जाची सुधारणा नांदत होती हें उघड होतें.
अशा रीतीनें ८|१० हजार वर्षांपूर्वी सुधारणेचा मध्यान्ह झाला होता असें म्हटलें तर सुधारणेचा उष:काल किती मागें जाईल हें कल्पनेला देखील कळण्यासारखें नाहीं. ह्या शोधामुळें रोम आणि ग्रीसच्या सुधारणा म्हणजे अगदीं अलीकडच्या भासूं लागतात. इजिप्तमधील सुधारणेचा शरत्काल सुप्रसिद्ध मनोरे ज्या काळीं तयार झाले त्या कालाला म्हटलें तर सुधारणेच्या किंवा संस्कृतीच्या वसंतकालचा शोध करीत आपल्याला फार मागें जावें लागेल इतिहासपूर्वकालीन पुराण वस्तूंची जर कांही माहिती कळली तर ह्या काळाचा ठाव लागणें शक्य आहे.