प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

कालनिर्णयशास्त्र:- लेखनकलेचा  उदय होण्यापूर्वी गत गोष्टीची आठवण दीर्घकालपर्यंत राहण्याची कांहीच साधनें नव्हती. ज्या गोष्टींमुळे तत्कालीन लोकांच्या शारीरिक सुखदु:खांवर चिरस्थायी परिणाम होत असें अशा, किंवा अन्य कारणांमुळें ज्यांचा पगडा लोकांच्या मनावर बसे अशा गोष्टी दंतकथा म्हणून शतकेंची शतकें रूढ होऊन बसत. पुढें लेखनकला उदय पावली आणि गत गोष्टीनां स्पष्ट आणि शाश्वत स्वरूप देतां येऊं लागलें. परंतु जगाच्या प्राथमिक युगांत कालावधिनिर्णय सूक्ष्म रीतीनें करतां येत नसे. राजकीय बाबतींत जसजशी प्रगति होऊं लागली आणि समाजाचा जेव्हां विकास होऊं लागला तेव्हां महत्त्वाच्या घडामोडींची कालक्रमवार नोंद ठेवणें जरूर पडलें.