प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
ज्योतिषाशीं असंबद्ध दिसणारे कालमाप:- ज्योतिषाशी म्हणजे नैसर्गिक गोष्टीशीं असंबद्ध, वार्षिक कृत्यमालिकेशी असंबद्ध असें कालमाप म्हटलें म्हणजे आठवडा होय. यांतील दिवसांच्या अनुक्रमासंबंधाने ज्योतिर्विषयक कल्पना पुढें पंचांगविवेचन करतांना दिली आहे. या आठवड्याचा विकास कांही अंशी धार्मिक आवश्यकतेमुळें झाला असावा. हिंदुस्थानामध्यें आठवड्यास धार्मिक महत्त्व फारसें नव्हते. असलें तर तें बरेंच उत्तरकालीन असावें. सोमवार करणारे स्त्रीपुरूष आणि शनिवार करणार्या बायका या आठवड्याच्या कल्पनेस कारक झाल्या नसून सप्तवासरमालिका स्थापन झाल्यानंतर ही वार करण्याची पद्धति उत्पन्न झाली असावी अशी शंका येते. नाक्षत्रिक कालमापन किंवा मासिक कालमापन यांचा विकास आपणांस हिदुस्थानांतच शोधितां येईल. पण साप्ताहिक कालवक्राचा विकास शोधण्यास आपणांस पश्चिमेकडे धांव घ्यावी लागेल. पूर्वेकडे-तिबेट, चीन, जपान या देशांकडे ही साप्ताहिकमानपद्धति नाहीं. साप्ताहिकमानपद्धति पश्चिम आशियांत उत्पन्न झाली आणि यूरोपांत व उत्तर आफ्रिकेंत पसरली. आफ्रिकेच्या इतर भागांत तीन, चार, पांच किंवा सहा दिवसांच्या समुच्चयानें कालगणना करण्यांत येते. पांच दिवसांचा कालसमुच्चय इराण, मलय, जावा सेलिबीस, न्यूगिनी, मेक्सिको व प्राचीन स्कांडिनेव्हिया येथें वापरीत असत. पंचाहिक कालमापन व पांच दिवसांनीं बाजार भरविण्याची चाल यांत कार्य कोणतें व कारण कोणतें म्हणजे कशामुळें काय झालें, याविषयीं भिन्न मतें व्यक्त करण्यांत येतात.
चंद्रावरून महिने मोजावयाचे, तर तें सूर्यावरून मोजतां येणार नाहीत काय ? आकाशाचे नक्षत्रानुरूप भाग पाडावयाच्या ऐवजी राशीवरून भाग पाडले तर सौर वर्षांचे बारा भाग पाडतां येतील; या साध्या कल्पनेचा सुद्धां विकास होण्यास बरेच दिवस लागले, ग्रीकादि पाश्चात्त्य राष्ट्रांचा हिंदुस्थानाशीं संबंध येण्यापूर्वी राशीतारकांचें अवगमन, नामक रण, आणि कालगणनेकडे उपयोग यांची हिंदुस्थानांत माहिती नव्हती असें संशोधकांपैकी अधिक प्रबळ पक्षाचें मत आहे.