प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
बायबलांतील माहितीचा एकांगीपणा:- इजिप्त आणि असुरिया वगैरेंच्या इतिहासाची पाश्चात्यांची जिज्ञासा स्वयंप्रेरित मात्र नव्हती. हिब्रू लोकांचा इजिप्तमधील प्रवास मह्त्वाचा असल्यामुळें ह्या संशोधकांचा साहजिकपणें असा तर्क होता कीं इजिप्तमधील प्रंसंगासंबंधी संशोधनामुळें बायबलमधील प्रसंगांसंबधी पुराव्यादाखल आणि पुरवणीदाखल कांही तरी माहिती सांपडेल. मिळालेल्या माहितीनें त्यांनां अगदीं निराश करून सोडलें आहे. दिवसानुदिवस असा संशय मात्र बळावत आहे कीं हिब्रू लोकांनीं स्वत:ला जें महत्व दिल्यांचें दिसतें तें महत्व त्यांनां लोक देत नसावे. पौरस्त्य ऐतिहासिक शोधांवरून असें दिसतें की राजकीय दृष्टया हिब्रू लोकांना फारसे महत्व नसावें आणि सहजगत्या भौगोलिक दृष्टीनें आपल्या प्रबळ शेजार्यांचें सीमावर्तित्व त्यांच्याकडे आलें असावें. डेव्हिड आणि सालोमन ह्यांच्या अमदानींत मात्र ह्या लोकांनां बरेंच महत्व आलें. भावी काळांत ह्या हिब्रू लोकांनां जें एवढें महत्व मिळालें तें कांहीसें ‘एरंडोऽपि द्रुमायते’ ह्या न्यायानें मिळालें. इजिप्त, मेसापोटेमिया वगैरेंचीं सारस्वतें उपलब्ध नव्हती; आणि हिब्रु बायबल वगैरे उपलब्ध होते इतकेंच नव्हे, तर तें ईश्वरप्रेरित आणि पवित्र आहे ही कल्पना सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्रांत सररास पसरली होती. इतर सारस्वतें उपलब्ध होऊं लागल्यामुळें अर्थातच ह्या सारस्वतांचें वाढलेलें फाजील महत्व कमी झालें.
कांही वर्षांपूर्वी जर एखाद्दानें असें म्हटलें असतें कीं हिब्रु बायबलांतील ऐतिहासिक गोष्टी एकांगी आहेत आणि त्यांना सर्वथा प्रमाणभूत मानतां येत नाहीं, तर तो मोठा धर्मोच्छेदक गणला जाता. परंतु आज वस्तुस्थिति अशी आहे कीं प्रत्येक समंजस मनुष्य ही गोष्ट कबूल करीत आहे. हिब्रु हस्तलिखिताची जुन्यांत जुनी अशी प्रत इ. स. च्या ८ व्या शतकांतील आहे. अर्थात् ह्या हस्तलिखितांत ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या प्रमादवश लेखकांच्या कित्येक पिढयांच्या हातून गेल्या असल्या पाहिजेत. परंपराप्राप्त अतएव प्रिय अशा समजुती मनुष्य होतां होईल तों सोडीत नाही; तथापि बाह्य प्रमाणांवरून जर असें ठरलें कीं ह्या समजुती चुकीच्या होत्या, तर ती चूक कबूल करण्याची तयारी बहुधा लोक दाखवितात. इजिप्तच्या शिलालेखांचा बायबलमधील गोष्टीनां पाठिंबा मिळेल ही कल्पना जवळ जवळ फोल ठरली; आणि बायबलमधील गोष्टींवरील विश्वास जरी पार उडाला नसला तरी हिब्रू लोकांचा इजिप्तमधील प्रवास प्राय: काल्पनिक आहे अशी कल्पना बरीच फैलावली.
ह्या दिशेनें झालेल्या प्रयत्नांनां जरी अपेक्षित फल आलें नाहीं तरी बाबिलोनिया आणि असुरिया येथील शिलालेखांचें संशोधन फार फायदेशीर ठरलें. बायबलमधील गोष्टींना पुरावा मिळाला; आणि तत्कालीन इतिहासाबरोबर धार्मिक समजुतीसंबंधांतहि माहिती उपलब्ध झाली. उत्पत्ति आणि प्रलय ह्या फार दिवस महशूर असलेल्या गोष्टींनां आधार मिळाला. हे लेख जरी ख्रि. पू. ७ व्या शतकांत लिहिले आहेत, तरी तज्ज्ञांच्या मतें तें अगदीं पुराण्या लेखांचें फक्त तरजुमे आहेत. एकंदरीत विचार केला तर हिब्रू बायबलाचा मूळ आधार बाबिलोनियन आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. अर्थातच मूळ आधाराचा तो निव्वळ तरजुमा नसून अनुवाद आहे. ह्या शोधांनी एके काळीं धर्मभिमानी लोकांचें पित्त उसळे, पण आजमितीला तसा कांही प्रकार होत नाहीं.