प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
मिसरदेशीय कालगणना:- इजिप्तमधील कालगणनापद्धति बरीच सूक्ष्म असून ती त्यांच्या पारमार्थिक कल्पनांशी निगडित आहे. ती पद्धति स्पष्टपणें मांडण्यास इतर पुष्कळ गोष्टी द्याव्या लागतील. शिवाय, तिचा सर्व सामान्य कालगणनापद्धतीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीं. म्हणून, तिजमध्यें चांद्र आणि सौर वर्षकल्पना होत्या आणि अधिक मासाऐवजीं चांद्रवर्षांतीं कांहीं अधिक दिवस ते धरीत या सांगितलेल्याच गोष्टींकडे लक्ष ओढण्याशिवाय आणखी माहिती येथें देत नाहीं.
भारतीयांच्या कालगणनेंचें स्वरूप चांद्रसौर आहे. चांद्रसौर पद्धति एकत्र करून कालगणना करण्याची पद्धति भारतीयांनी आजपर्यंत चालू ठेवली आहे. तिचें सातत्य आपणांस वेदकालापासून दाखवितां येईल. ऋग्मंत्रकालीच अधिकमासकल्पना होती; म्हणजे चांद्र आणि सौर पद्धतींचा मेळ घालण्याचा प्रयत्न पूर्वींच होऊन गेला होता. मुसुलमान आणि ख्रिस्ती मंडळींनीं ही दोन तत्त्वांची पद्धति कायम ठेवली नाहीं. कदाचित् याचें कारण अधिकमास, आणि अधिकदिवस याला वंचक धार्मिकता उत्पन्न झाली होती हें असावें.