प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
 
मुसुलमानी कालगणना:- मुसुलमानी कालगणनेंचें विशेष हें कीं, त्यांचें वर्ष पूर्णपणें चांद्र आहे. यूरोपीयांची कालगणना पूर्वी चांद्रसौर होती ती पुढें केवळ सौर झाली. मुसुलमानांमध्यें त्याच्या उलट क्रिया झाली. अरबांमध्यें पूर्वी चांद्रसौर वर्ष होतें तें महंमदानें हिजरी शकाच्या दहाव्या सालापासून केवळ चांद्र केलें आणि अधिक मास बंद केला यामुळें महिन्यांची नांवें व त्यांत करावयाच्या क्रिया यांची संगति जी महंमदपूर्व अरबस्थानांत होती ती मात्र गेली.