प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
भरतखंडांत चालू असलेले शक:- आतां भारतीय कालगणनेकडेच लक्ष देऊं. या विषयाकडे लक्ष देणें म्हणजे अनेक अधिक यशस्वी आणि कमी यशस्वी प्रयत्न लक्षांत घेतले पाहिजेत. भारतांत शालिवाहन शक, विक्रम शक, फसली शक इत्यादि शकांचें अवलंबन आज होत आहे.
सप्तर्षिसंवत्:- ह्या संवताचा आरंभ वर्षप्रतिपदेपासून होत असून हल्लीं त्याचा प्रसार काश्मीर व त्याच्या आसमंतांतील डोंगरी मुलूख एवढ्याच भागांत, विशेषेंकरून ज्योतिषी लोकांमध्यें आहे, प्राचीन काळीं तो पंजाबांतहि प्रचलित होता तरी आतां त्या प्रांतांत त्याचा प्रचार राहिला नाहीं. याचे महिने पूर्णिमान्त असून वर्ष बहुधा वर्तमान लिहिण्याची चाल आहे. तथापि क्वचित् प्रसंगी गतवर्ष लिहिलेलेहि लेख आढळून येतात [ उदाहरणार्थ, कैय्यटरचित देवीशतकाच्या टीकेंतील शेवटचा श्लोक पहा (इं. अँ; पु. २० पा. १५४)]. या संवतांत शतकाचे आंकडे सोडून केवळ वरील वर्षेंच लिहिण्याची साधारणत: वहिवाट असल्यामुळे त्यास कच्चा संवत असें एक नाव आहे. याशिवाय तो काश्मीर वगैरे भागांत प्रचलित आहे म्हणून लौकिक काल किंवा लौकिक संवत्, डोंगरी मुलखांत त्याचा प्रचार असल्यामुळें पहाडी संवत् आणि पंचांगांत व शास्त्रीय विषयावरील ग्रंथांत तो वापरीत असल्यामुळे शास्त्रसंवत् अशीं त्यास आणखीहि नांवे पडलीं आहेत.
कलियुगाची २५ वर्षे होऊन गेल्यानंतर ह्या संवतास आरंभ झाला असें काश्मीर प्रांतात राहणारे लोक मानतात ( डॉ. बुहलरचा काश्मीरचा रिपोर्ट पान ६०). परंतु पुराणांत व ज्योतिषशास्त्रासंबंधीं ग्रंथांत तो कलियुगास आरंभ होण्यापूर्वीहि चालू होता असा उल्लेख आला आहे. याला सप्तर्षि संवत् असें नांव पडण्याचें कारण सप्तर्षि नक्षत्रांतील सात तार्यांच्या कल्पित गतीशीं याचा जोडलेला संबंध होय. अशी कल्पना आहे कीं, हे सात तारे अश्विनी आदिकरून २७ नक्षत्रांत प्रत्येकी शंभर शंभर वर्षेपर्यंत राहत असून २७०० वर्षांत त्यांचे सर्व नक्षत्रांतून एक वेळ भ्रमण होतें [ वाराही संहिता, अध्याय१३, श्लोक४; भागवत, स्कंध १२ अध्याय २ श्लोक २७-२८; आणि विष्णुपुराण अंश ४, अध्याय २४, श्लोक ५३-५४ ]. पुराणांत व ज्योतिषाच्या संहिताग्रंथांत सप्तर्षींची ही जी गति मानण्यांत आली आहे ती केवळ काल्पनिकच आहे. सिद्धांततत्त्वविवेकाचा कर्ता कमलाकरभट याला देखील ही गति संमत नव्हती [सिद्धांततत्त्वविवेक, भग्रहयुत्यधिकार. श्लोक ३२ ]. जेथें जेथें हा संवत् प्रचलित होता तेथें तेथें नक्षत्राचें नांव न लिहितां त्या नक्षत्रांतील सप्तर्षींचें कितवे वर्ष आहे एवढेच फक्त लिहिण्याचा प्रघात होता, व हल्लीहि तीच रीति चालू आहे. तथापि काश्मीरच्या पंचांगांत व दुसर्या कित्येक ग्रंथात [ उदाहरणार्थ, हस्तलिखित ‘ ध्वन्यालोक ’ इं. अँ; पु. २० पान १५१ ] कधीं कधीं संवताच्या अगदी आरंभापासूनचें वर्ष दिलेलें पहावयास मिळतें.
कल्हण पंडिताची राजतरंगिणी [ तरंग १, श्लोक ५२], विक्रम संवत् १७१७ चा चंबामध्यें मिळालेला एक लेख [ इं. अँ. पु.२०, पान १५२], त्याच सालीं लिहिलेलीं पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथसंग्रहालयांत असलेली काशिकावृत्तीची एक प्रत आणि विक्रम संवत् १७५० चें काश्मीर मधील एक पंचांग [ इं अँ. पु. २०, पा. १५०], या सर्व पुस्तकांत त्यांचा कालनिर्देश करतांना सप्तर्षि संवताबरोबरच दुसरे जे निरनिराळे शक दिले आहेत त्यांवरुन सप्तर्षि संवताचा इतर शकांशी पुढें दिल्याप्रमाणें संबंध दिसून येतो. कलियुग संवतांतून २५ वजा केले असतां, किंवा विक्रमसंवतांत ३०१९, इसवी सनांत ३०७५ किंवा ३०७६ व शालिवाहन शकांत ३१५४ मिळविले असतां सप्तर्षि संवत् येतो. उलटपक्षीं शतकांचे आंकडे गाळून लिहिलेल्या सप्तर्षि संवताच्या वर्षांत २४ किंवा २५ मिळविले असतां इसवी सनाचें, २५ मिळविले असतां कलियुग संवताचें, ४६ मिळविले असतां शालिवाहन शकाचें, व ८१ मिळविले असतां विक्रम संवताचें शतकांचे आंकडे नसलेलें साल निघतें. येथें एवढें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, वरील हिशेबांत ज्या विक्रम संवताचा उल्लेख आला आहो तो चैत्रापासून आरंभ होणारा असून इसवी सनाच्या पहिल्या तीन महिन्यांत, इसवी सनापासून सप्तर्षि संवत् काढावयाचा असला तर सामान्यत; एक वर्ष कमी व सप्तर्षि संवतापासून इसवी सन काढावयाचा असल्यास एक वर्ष अधिक मिळवावें लागतें. त्याचप्रमाणें येथें इसवी सनांचें व सप्तर्षि संवताचें साल वर्तमान, व विक्रमसंवताचें व शालिवाहन शकाचें साल गत धरलें आहे.
कलियुग संवत्.- कलियुग संवतास ‘ भारतयुद्ध संवत् ’ व युधिष्टिर संवत् ‘ अशी दुसरी दोन नांवे असून त्याचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०२ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या १८ व्या तारखेस [ ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँन्ड एथिक्स’ मध्यें जगाच्या युगांसंबंधी माहिती देतांना कलियुगारंभाची तारीख १७ फेब्रुवारी दिली आहे] प्रात: काळीं झाला असें मानण्यांत येतें. हिंदु कालगणनेंतील महायुगांतर्गत चार युगांपैकी कलि हें शेवटचे युग असून तें ४,३२,००० वर्षांचें असतें. द्वापर, त्रेता व कृत ही उलट क्रमानें कलीच्या पूर्वींची युगें आहेत, व त्यामंध्यें कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट वर्षें असतात. अशा ७१ महायुगांचे एक मन्वंतर होत असून १४ मन्वंतरें व सहा महायुगें झालीं कीं एक कल्प अथवा ब्रह्मदेवाचा दिवस होतो अशी कल्पना आहे. तितक्यांच वर्षांनी पुन्हां ब्रह्मदेवाची रात्र असल्यामुळें अहोरात्र मिळून ब्रह्मदेवाच्या दिवसांची एकंदर ८,६४,००,००,००० वर्षे होतात.
ह्या संवताचा ज्योतिषग्रंथांत व पंचांगांतच विशेषेंकरून उपयोग केला जात असतो, तरी तो कधी कधीं शिलालेखांतहि वापरलेला आढळून येतो [ इं. अँ. पु. १४ पान २९० ]. प्रत्येक वर्षाच्या पंचागांत चैत्रादि विक्रम संवताचीं, शालिवाहन शकाची व कलियुग संवताची जीं गत वर्षे दिलेलीं असतात त्यांवरून असें दिसून येईल कीं, विक्रम संवतांत ३०४४, शालिवाहन शकांत ३१७९ व इसवी सनांत ३१०१ वर्षे मिळविलीं असतां कलियुग संवताचीं गत वर्षे निघतात. ऐहोळच्या डोंगरावरच्या जैन मंदिरांतील चालुक्यवंशी दुसर्या पुलिकेशीच्या शिलालेखांत [ ए. इं. पु. ६, पां ७] शालिवाहन शकाचीं व भारती युद्ध संवताचीं जीं वर्षै दिली आहेत त्यावरून शालिवाहन शकारंभाच्या ३१७९ वर्षै अगोदर भारती युद्ध झालें असें निघत असल्यामुळें, कलियुग संवत् व भारतयुद्ध संवत् हीं दोन्हीहि एकच आहेत असें ठरतें. कलियुग संवताच्या दुसर्या दोन नांवांवरून व उपरिनिर्दिष्ट शिलालेखांतील कालनिर्दैशावरून, भारतयुनंतर युधिष्टिरांचे राज्यारोहण झालें तेव्हांच कलियुग संवतास आरंभ झाला असला पाहिजे असें वाटण्याचा संभव आहे. परंतु संस्कृत वाङ्मयांत ह्यासंबंधीं परस्परविरूद्ध बराच पुरावा सांपडत असल्यामुळें त्यावरून भारत युद्ध व कलियुगारंभ ह्या दोन्ही समकालीन गोष्टी नाहींत असें म्हणणें प्राप्त होतें. वराहमिहिराच्या व कल्हण पंडिताच्या मतें कलियुगास आरंभ झाल्यावर भारती युद्ध झालें असें आहे. कारण वाराही संहितेंत [ सप्तर्षिचार, श्लोक३] शालिवाहन शकाच्या फक्त २५२६ वर्षे अगोदरच युधिष्टिरांचॆं राज्यारोहण ( म्हणजे भारती युद्ध ) झालें असें म्हटलें असून राजतरंगिणीमध्येंहि [ तरंग १,श्लोक ४९ व ५१ ] कलियुगारंभानंतर ६५३ वर्षांनीं, म्हणजे शकारंभाच्या २५२६ वर्षें अगोदर, कौरवपांडव ( म्हणजे भारती) युद्ध झालें असें दिलें आहे. उलट पक्षीं पुराणांन्वयें ( विष्णुपुराण, अंश ४, अध्याय २४, श्लोक ५५; व भागवत, स्कंध १२, अध्याय२, श्लोक २९) कृष्णाच्या स्वर्गारोहणापासून म्हणजे महाभारताप्रमाणें भारती युनंतर ५१ वर्षांनी [ इं. अँ. पु. ४०, पा. १६३-६४] कलियुगास आरंभ होतो. भारती युच्या काळासंबंधीं तर पुराणांपुराणांतच एकवाक्यता नसून त्यांत दिलेला भारतीयुचा सर्वांत प्राचीन काळ घेतला तरी, तो वराहमिहिरानें दिलेल्या काळाच्या अजमासें ९०० वर्षें व कलियुग संवतारंभाच्या अजमासें १५०० वर्षे अलीकडचा आहे. कारण परिक्षितीच्या जन्मानंतर- म्हणजेच भारतीयुनंतर-मत्स्य,वायु व ब्रह्मांड ह्या पुराणांप्रमाणें १०५०, विष्णुपुराणाप्रमाणें १०१५ व भागवताप्रमाणें १११५ वर्षांनीं महापह्मनंदास राज्याभिषेक झाला असून त्यानंतर [ मत्स्यपुराण, अध्याय २७३, श्लोक ३६; वायुपुराण, अ.९९, श्लो. ४१५; ब्रह्मांडपुराण, मध्यभाग, उपोत पाद ३, अ. ७४, श्लो. २२७; विष्णुपुराण अंश ४, अ. २४, श्लो. ३२; भागवत, स्कंध १२, अ. २, श्लो. २६] नंद घराण्यांतील पुरूषांनीं १०० वर्षेंपर्येत राज्याचा उपभोग घेतला. नंद वंशाचें निर्मूलन करून मौर्य घराण्यांतील जो चंद्रगुप्त राजा सिंहासनारूढ झाला, त्याचा राज्यारोहणकाल ख्रिस्तपूर्व ३२१ च्या सुमारास असल्याविषयीं आतां नक्की ठरलें असल्यामुळें भारती युद्ध शालिवाहन शकास आरंभ होण्याच्या (१०५०+१००+३२१+७८= ) १५४९, १५१४ किंवा १६१४ वर्षे अगोदर झालें असावें असें सदरहू पुराणांवरून निष्पन्न होतें. यांपैकी कोणताहि काळ घेतला तरी त्याचा कल्हणवराहमिहिरांनी दिलेल्या भारती युच्या काळाशीं किंवा ज्योतिष ग्रंथात व पंचागांत जो कलियुगारंभाचा काळ देण्यांत येत असतो त्याशीं मेळ बसणें मुळींच शक्य नाहीं हें उघड आहे.
वीरनिर्वाणसंवत्:- जैनांचा शेवटचा तीर्थकर जो महावीर त्याच्या निर्वाणकाळापासून ज्या शकाचा आरंभ मानण्यांत येतो त्यास ‘वीरनिर्वाण’ असें म्हणतात. हा शक ज्यांच्या मध्यें दिला आहे असें जे कांही शिलालेख उपलब्ध आहेत ते अपवाद म्हणून सोडून दिले तर जैन ग्रंथांशिवाय इतर ठिकाणीं ह्या शकाचा उपयोग केलेला क्वचितच आढळून येईल. जैन संप्रदायांतील श्वेतांबरपंथी मेरूतुंगसूरीच्या विचारश्रेणि नामक ग्रंथात वीरनिर्वाण संवत् व विक्रमसंवत् ह्या दोन शकांतील अंतर ४७० वर्षे दिलें असून त्याच पंथांतील नेमिचंद्राचार्याच्या ‘ महावीरचरितं’ नांवाच्या प्राकृत काव्यांत ‘ माझ्या निर्वाणानंतर ६०५ वर्षें व ५ महिने झाल्यावर शक राजा उत्पन्न होईल’ असें महावीराच्या तोंडी घातलेले शब्द आहेत. यांपैकी दुसरा ग्रंथ विक्रम संवत् ११४१ म्हणजे इ. स. १३१० च्या सुमारास रचण्यांत आला असावा. ह्या दोन ग्रंथातील पुराव्यांवरून असें दिसून येतें कीं, विक्रम संवतांत ४७०, इसवी सनांत ५२७ किंवा शालिवाहन शकांत ६०५ मिळविले असतां वीरनिर्वाण संवत् निघतो. हरिवंश पुराणांतील व मेघनंदीच्या श्रावकाचारांतील वचनांवरून ह्याच कालनिर्णयास पुष्टि मिळते [ अँ. पु. १२, पा. २२ ]. व श्वेतांबरपंथी सर्व जैनांसहि महावीराच्या निर्वाणाचा हाच काळ संमत आहे. परंतु दिगंवरपंथी जैनांस हा निर्णय मान्य नाहीं. त्यांच्या पंथांतील नेमिचंद्रानें विक्रम संवताच्या ११ व्या शतकांत लिहिलेल्या त्रिलोकसार नामक ग्रंथांत [ श्लोक ८४८ पहा ] उपर्युक्त श्वेतांवरपंथी नेमिचंद्राचार्याप्रमाणेंच म्हटलें आहे. पण माधवचंद्रानें त्रिलोकसारावरील आपल्या टीकेंत ‘ सग राजो ’ ह्याचें स्पष्टीकरण ‘ विक्रमाङ्क शकराज: असें केल्यामुळें त्याच्या मागून झालेल्या कित्येक दिगंबरपंथी जैन लेखकांनी [ उदाहरणार्थ, श्रवणबेळगोळचा जैन लेख पहा ( इं. अँ. पु. २५, पा. ३४६) ] त्याचाच अर्थ प्रमाण मानून वीरनिर्वाणाचा काळ १३५ वर्षैं मागे ढकलला आहे. त्याच पंथांतील दुसर्या कांही लेखकांनीं तर याच्याहिपुढें जाऊन कोणीं शालिवाहन शकाच्या ४६१ वर्षें अगोदर, कोणीं ९७९५ वर्षे अगोदर व कोणीं तर १४७९३ वर्षे अगोदर महावीराचें निर्वाण झालें असें लिहिलें आहे [ त्रिलोक प्रज्ञाप्ति, ‘ जैनहितैषी मासिक पत्र ’ ] भाग १३, अंक १२ दिसेंबर १९१७ पा. ५३३ पहा ].
बुद्धनिर्वाणशक:- बौद्ध लोकांत गौतम बुच्या निर्वाणापासून ज्या शकाचा आरंभ समजण्यांत येतो त्यास बुद्धनिर्वाण शक हें नांव आहे. ह्या शकाचा उपयोग बहुधा बौद्ध ग्रंथांतूनच केलेला पाहण्यांत येतोय तथापि हा शक घातलेले थोडेसे शिलालेखहि [उदाहरणार्थ, गयेचा लेख ( इं. अँ. पु.१०, पा. ३४३ ] आढळण्यांत आले आहेत. या शकाच्या आरंभाविषयीं इतक्या परस्परभिन्न समजुती प्रचलित आहेत व विद्वानांतहि इतका मतभेद आहे कीं, ख्रि. पू. १०९७ पासून ३५० पावेतोंची ११ निरनिराळीं वर्षे या शकाचा आरंभकाळ म्हणून सुचविण्यांत आलीं आहेत. (१) इ. स. ४०० सालीं चिनी प्रवासू फा हिआन हा हिंदुस्थानांत आला तेव्हां त्यानें असें लिहून ठेविलें कीं [ बा; बु. रे. वे. व. पु. १, प्रस्तावना, पा. ७५ ] बुचें निर्वाण होऊन आज १४९७ वर्षे झालीं आहेत. ह्या विधानावरून बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व १०९७ साली झालें असें निघतें. (२) चीनमध्यें [ प्रिन्सेप; अँ. पु. २ ‘ यूसफुल टेबल्स ’ पा. १६५ ] ह्या शकाचा आरंभ ख्रि. पू. ६३८ सालापासून मानण्यांत येतो व पं. भगवानलाल इंद्रजी यांनीहि लेखाच्या आधारावर हेंच वर्ष बरोबर आहे असें दाखविलें आहे [ इं. अँ. पु १०, पाय ६४६ ]. (३) सिलोन सयाम व ब्रह्मदेश या तीन देशांत बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व ५४४ सालीं झालें अशी समजूत असून [ कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम ( कनिंगहॅमकृत)पु.१ प्रस्तावना पा. ३ ], आसामचे राजोपाध्यायहि [ प्रि. अँ. पु. २, ‘ यूसफुल टेबल्स पा. १६५ ] तेंच वर्षं खरे धरतात.(४) ख्रि. पू. ४८७ सालीं बुचें निर्वाण झालें असावें असें व्ही. ए. स्मिथचे अनुमान आहे [ स्मि. अ. हि. इं. तृतीयावृत्ति, पा. ४७ ]. पण डॉ. बुहलर यांनीं तें ख्रि. पू. ४८३-२ व ४७२-१ ह्या ११ वर्षांच्या दरम्यान केव्हां तरी असावें [इं. अँ. पु. ३, पा. १५४ ] असें ठरविलें असून त्यांमध्यें (५) बार्नेटनें ४८३ [ बा. अँ. इं. पा. ३७ ], (६) डॉ. फ्लीटनें ४८२ [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०६, पा. ६६७], (७) फगर्युसननें ४८१ [ पा. ४९२], (८) जनरल कनिंगहॅम यानें ४७८ [कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम् पु. १ प्रस्तावना पा. ९] आणि (९) मॅक्समुल्लर [ मॅ. हि. ए. सं. लि. पा.२९८] व मिस डफ [ ड. क्रॉ. इं. पा. ६ ] यांनीं ४७७ हें वर्ष सुचविलेलें आहे. (१०) परंतु कर्न यांने तर बुच्या निर्वाणाचा काळ आणखीहि अलीकडें ओढून तो ख्रिस्तपूर्व ३८८ मध्यें आणून ठेविला [ सायक्लोपीडिया ऑफ इंडिया; पु. १, पा. ४९२] व (११) हुएन्तसंग ह्या दुसर्या एका चिनी प्रवाश्याच्या वृत्तावरून [ बी,बु.रे.वे.व.पु.१ पा. १५० ] बुचें निर्वाण याच्याहि नंतर तीस चाळीस वर्षांनीं झालें असावें कीं काय अशी शंका येते. वर सांगितल्याप्रमाणें बुद्धनिर्वाणाच्या काळासंबंधीं निरनिराळ्या विद्वानांची निरनिराळी मतें पडत आहेत. तरी त्यांतल्या त्यांत निदान आज तरी ख्रि. पू. ४८७ हाच काळ स्थूलमानानें अधिक बरोबर असण्याचा संभव आहे असें पं ओझा यांना वाटतें [ भारतीय प्राचीन लिपिमाला. द्वितीयावृत्ति पा. १६४ ].
मौर्यशक:- आतांपर्यत हा शक ओरिसांत कटकच्या जवळ उदयगिरि येथील ‘ हाथी’ गुफेंत असलेल्या खारवेल (मेघवाहन) नामक जैन राजाच्या एका लेखांतच [ पंडित भगवानलाल इंद्रजी संपादित ‘ दि हाथी गुंफा अँड थ्री अदर इन्सिक्रप्शन्स ’ पहा ] काय तो आढळून आला आहे. डॉ. फ्लीट [ ज. रॉ. ए.सो.इ.स. १९१०, पा.२४३-४४ ], प्रो. लूडर [ ए. इं. पु. १०, ब्राह्मी लेखांची सूचि, पा. १६१ ] व व्हिन्सेंट स्मिथ [ अ. हि. इ. पा. २०७, टीप २ ] यांनी ह्या लेखाचा अर्थ निराळाच करून त्यांत सौर्य शक दिलेला नाहीं असें मानलें आहे. तथापि त्यांचा अर्थ विद्वज्जनांस पटला नसून अद्यापीहि उदयगिरीचा लेख मौर्य शक १६५ मधील आहे [ आर्किऑलॉजिकल सर्व्हेचा रिपोर्ट. इ. स. १९०५-६ पा. १६६ ] अशीच सर्वसाधारण समजूत आहे. याशिवाय लोरिअन तंगाई [आ.स.रि.इ.स.१९०३-४, पा.२५१ ] व हश्तनगर [ ए. इ. पु. १२. पा. ३०२ ] येथें सांपडलेल्या बुच्या मूर्तींच्या आसनावरील लेखांत जे शक दिले आहेत ते कोणते आहेत हें निश्चित झालें नसल्यामुळें तेहि मौर्य शकच असण्याचा संभव आहे. चंद्रगुप्त नंदवंशाचा उच्छेद करून सिंहासनारूढ झाला तेव्हां जर त्यानें हा शक चालू केला असला, तर ह्याचा आरंभ ख्रि. पू. ३२१ च्या सुमारास झाला असला पाहिजे.
सिल्यूकिडी शक:- यालाच मॅसिडोनी शक असेंहि नांव आहे. यासंबंधीं कांहीं माहिती भारतबाह्य शक देतांना अगोदर येऊऩ गेलीच आहे. ख्रि. पू. ३२३ सालीं शिकंदर बादशहा मरण पावल्यावर त्याचें राज्य वांटून घेण्याकरितां त्याच्या सेनापतींमध्यें लढाया होऊन शेवटीं मॅसिडोनिया, मिसर व सिरिया ( बाबिलोन ) हीं तीन राज्यें उत्पन्न झालीं व सिल्यूकस निकेटार हा त्यांतील सिरिया देश बळकावून ख्रि. पू. ३१२ सालीं आक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेस गादीवर बसला. त्यांच्या राज्यारोहणापासून हा शक सुरू झाला असल्यामुळें त्यास सिल्यूकिडी शक असें नांव मिळालें असें पूर्वी सांगितलेंच आहे. बॅक्टिया वगैरे पूर्वेकडील आशियांतील प्रदेश सिल्यूकसच्याच ताब्यांत असल्यामुळें त्याचा शक बॅक्ट्रियांत चालू झाला होता; व पुढें बॅक्ट्रियन ग्रीक लोक काबुल, पंजाब वगैरे भागांवर राज्य करूं लागले तेव्हां तो ग्रीक सत्तेखालील हिंदुस्थानाच्या भागांतहि वापरण्यांत येऊं लागला असावा. वस्तुत: अद्याप असा एकहि लेख हिंदुस्थानांत सांपडला नाहीं कीं ज्यामध्यें दिलेला शक सिल्यूकिडी आहे असें निश्चित म्हणतां येईल. तथापि कुशनवंशी राजांच्या कारकीर्दीतील कांही लेखांत मॅसिडोनियन (ग्रीक) महिन्यांची नांवे [ पेल्लिअस ( दिसेंबर ) क. इं. ई. पा. ४१ आर्टेमिसिअस (मे)- ए. इं. पु. ११, पा. २१०; डेसिअस (जून)- इं. अँ. पु. १०, पा ३२६ व पु.११ पा १२८; आणि पनेमस ( जुलै )- ए. इं. पु. पा, ५५ ] आढळून आलीं असून ते सर्व विदेशीय लोकांनी खोदविलेले आहेत. ह्या लेखांत दिलेलीं वर्षे कोणत्या शकाचीं आहेत याचा अजून पावेतों समाधानकारक निकाल लागला नसल्यामुळें तीं वर्षे, शतकाचे अंक गाळून लिहिलेलीं सिल्यूकिडी शकाचीं वर्षे असण्याचा संभव आहे. संभव आहे असें म्हणण्याचें कारण पर्शियन शक ख्रि. पू. २४७ सालच्या सुमारास सुरू झाला [ क.इं.ई.पा.४६ ] असल्यानें हीं वर्षे त्या शकाचीं किंवा दुसर्या एखाद्या अज्ञात शकाचींहि असूं शकतील.
शालिवाहन शक:- शालिवाहन शक कोणीं सुरू केला याविषयीं जुन्या ग्रंथांत जे उल्लेख आले आहेत ते केवळ परस्पर भिन्नच नाहींत तर परस्परविरोधीहि आहेत. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कीं, दक्षिणेंतील प्रतिष्टानपूर उर्फ पैठण येथील शालिवाहन ( सातवाहन, हाल) राजानें हा शक सुरू केला. कोणी कोणी शालिवाहनाच्या जन्मापासूनच ह्या शकाचा आरंभ होतो असें मानितात [ मुहूर्तमार्तंड, अलंकार श्लोक ३ ). जिनप्रभसूरीनें आपल्या कल्पप्रदीप नामक पुस्तकांत म्हटलें आहे कीं, प्रतिष्टानपूर येथें राहत असलेल्या एका परदेशी ब्राह्मणाच्या विधवा बहिणीपासून शालिवाहन राजाची उत्पत्ति झाली असून, उज्जायिनीच्या विक्रम राजाचा पराभव करून तो प्रतिष्टानपुरचा राजा झाला व तापी नदीपावेतों सर्व मुलूख काबीज करून त्यानें तेथें आपला शक सुरू केला [ ज. ए. सो. मुंबई पु. १० पा. १३२-३३]. उलटपक्षीं अलबेरूणीनें असें लिहून ठेविलें आहे कीं, विक्रमादित्यानें शक राजाचा पराभव करून हा शक सुरू केला होता [ सा. अ. इं. पु. २, पा. ६ ].
ह्या शकाचे जुन्यांत जुने शिलालेख ५२ पासून १४३ पावेतोंच्या सालांतील असून ते पश्चिमेकडील क्षत्रपांनी खोदविले आहेत. त्या क्षत्रपांचींच जीं नाणीं सांपडली आहेत त्यांवर अजमासें १०० पासून ३१० पावेतोंच्या वर्षांचे आंकडे दिलेले आढळतात. सदरहू शिलालेखांत आणि नाण्यांत शालिवाहन किंवा शक यांतील एकाहि शब्दाचा निर्देश केलेला नांही. शिलालेखांत ‘ वर्षे ’ हा शब्द वापरला असून नाण्यांवर तर फक्त आंकडेच दिलेले आहेत [ प्रा. लि. मा. पा. १७१ ].
शके ४२७ मध्यें पहिल्याप्रथम [ सिंहसूररचित लोकविभाग ग्रंथ ११ व्या शतकानंतर लिहिलेला असल्यामुळें त्यांतील शक शब्दाचा प्रयोग प्राचीन नाहीं ( प्रा. लि. मा. पा. १७१ टीप ३ )] संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा ‘ शककाल ’ या नांवानें उल्लेख केला असून [ पंचसिद्धांतिका ( वराहमिहिराची) १|८ ] त्यानंतर शकें १२६२ पावेतोंच्या शिलालेखांत व दानपत्रांत (१) ‘शकनृपति राज्याभिषेक संवत्सर’ (२) ‘शकनृपति संवत्सर,’ (३) ‘शकनृपसंवत्सर,’ (४) ‘ शकनृपकाल,’ (५) ‘ शकसंवत् ‘ , (६) ‘ शकवर्ष,’ (७) ‘ शककाल,’ (८) ‘ शककालसंवत्सर,’ (९) ‘ शक’ व (१०) ‘शाक ’ अशा निरनिराळ्या नांवांखाली ह्या शकाचीं वर्षे दिलेलीं आहेत [ इं अँ: (१) पु. १०, पा. ५८ जवळील आकृतिपट; (२) पु. ६, पा. ७३; (३) पु. १२, पा. १६; (६) पु.६, पा. ८६ व (८) पु. ११ पा. ११२. ए. इं:- (४) पु. ३, पा. १०९; (५) पु. १ पा. ५६; (१०) पु.१, पा. ३४३. (७) ज. ए. सो. मुंबई. पु. १०, पा.१९५.. (९) की. लि. इं. स. इं. पु. ६३ लेख नं. ३४८ ]. मराठीमध्यें संवत्सर या सामान्य अर्थी प्रचारांत असलेला ‘शक’ शब्द ह्या लेखांतील शक शब्दाहून भिन्न आहे हें विसरतां कामा नये. यावरून असें दिसतें कीं, इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभापासून चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, कोणत्या तरी शक राजाच्या राज्याभिषेकापासून ह्या शकाचा आरंभ झाला आहे अशी सर्वसाधारण समजूत होती. निदान शिलालेखांत व ताम्रपत्रांत तरी शके १२६२ पर्यंत शालिवाहन नांवाचा ह्या शकाशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असलेला आढळून येत नाहीं. संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा व शालिवाहन राजाचा संबंध इ. स. १३०० च्या सुमारास लिहिलेल्या जिनप्रभसूरीच्या कल्पप्रदीपांतच प्रथम जोडलेला आहे. त्यानंतर हरिहर गांवी मिळालेल्या विजयानगरच्या पहिल्या बुक्करायाच्या शके १२७६ च्या दानपत्रांत [ की. लि. इं. स. इं. पा. ७८ लेख नं. ४५५] शालिवाहनाचें नांव या शकाच्या मागें लिहिलें असून, त्यापुढें हा प्रचार दिवसेंदिवस वाढत जाऊं लागला [ उदाहरणार्थ, इं. अँ. पु.१०, पा. ६४; ए. इं. पु. १, पा. ३६६; ज. ए. सो. मुंबई पु. १२, पा. ३८४ ]. गाथासप्तशती व बृहत्कथा या दोन ग्रंथामुळें सातवाहन उर्फ शालिवाहन राजाचें नांव लिहितां वाचतां येणार्या बहुतेक सर्व माणसांस अगोदरच दृढ परिचयाचें झालें होते. म्हणून असें संभवनीय वाटतें कीं, उत्तरेकडील लोक आपल्या संवताच्या मागें विक्रमाचें नांव लावूं लागलेले पाहून इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या सुमारास दक्षिणेंतील विद्वानांनीहि शालिवाहन राजाचा आपल्या शकाशीं संबंध जोडला असावा.
शालिवाहन हा शब्द सातवाहन शब्दाचेंच रूपांतर असून [ प्रबंधचिंतामणी पा. २८] पुराणांतील आंध्रभृत्य उर्फ आंर्ध्र वंशाकरितां शिलालेखांत सातवाहन शब्दाचा प्रयोग केलेला आढळतो. शातवाहन व शातकर्णी हे एकच होत. कां कीं, वाहन किंवा कर्णी म्हणजे हत्ती आणि शातकर्णी म्हणजे शंभर हत्ती बाळगणारा राजा असा अर्थ होय; असें विधान कनकसभे हा आपल्या ‘ तामिल कंट्री एटीन हंड्रेड इयर्स अँगो ’ या पुस्तकांत सुचवितो. आंध्रभृत्य राजांनीं ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकापासून ख्रिस्तोत्तर २२५ साला पावेतों दक्षिणेंत राज्य केलें असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो [ अ. हि. इं. पा. २१८ जवळचा तक्ता ]. गोदावरीतीरी असलेले प्रतिष्टान नगर म्हणजे अर्वाचीन पैठण शहर ही त्याची राजधानी होती व त्यांच्यामध्यें सातवाहन ( शातकर्णी, हाल ) नांवाचा प्रसिद्ध राजाहि होऊन गेला होता. तेव्हां दक्षिणेंतील पंडितांनीं त्याचेंच नांव आपल्या शकाला लाविलें असणें संभवनीय आहे. खुद्द शातवाहन वंशातील कोणींहि राजानें हा शक सूरू केला नाहीं ही गोष्ट मात्र निश्चित आहे. कारण, त्यांच्यापैकी एकाहि राजानें आपल्या शिलालेखांत शक दिला नसून ज्यानें त्यानें स्वत:च्या कारकीर्दीचें वर्षच दिलें आहे. आंध्रभृत्यांचें राज्य नष्ट झाल्यावर ११०० वर्षेंपर्यंत शालिवाहन नांवाचा व ह्या शकाचा कोठेंहि संबंध जोडलेला आढळून येत नसल्यामुळें या शकाचा आरंभ एखाद्या शक राजानेंच केला असला पाहिजे, असें पंडित ओझा म्हणतात. तथापि, आम्ही शातवाहनांचा शकस्थापनेशीं संबंध अजून नाकबूल करीत नाही. रा. राजवाडे यांनी यासंबंधांत खाली दिलेलीं प्रमाणें पुढें मांडलीं आहेत.
हा शक शक नांवाच्या म्लेंच्छ लोकांनी स्थापिला, असें भांडारकरादि विद्वानांचें म्हणणे आहे, पण तें चुकीचें आहे. कारण (१) शककाल ज्या अर्थी धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जातो त्या अर्थी तो कोणातरी हिंदु राजानें स्थापिलेला असला पाहिजे. म्लेंच्छांनीं सुरू केलेला कोणताहि काल हिंदू लोकांच्या धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जाणें केवळ अशक्य आहे. फसली, अरबी, हिजरी, जलाली, इसवी वगैरे अनेक सन येथें आगंतुकांनीं सुरू केले. परंतु धर्मकृत्यांत त्यांपैकीं एकाचाहि प्रवेश झाला नाहीं. (२) शक शब्दाचे दोन अर्थ आहेत. शक म्हणजे म्लेंच्छ असा एक अर्थ आहे. परंतु शक शब्दाच्या दुसर्या अर्थाकडे बहुतेकांनी कानाडोळा केला आहे. शक म्हणजे शातवाहन राजे असा दुसरा अर्थ आहे. शक ४१० तील ताम्रपटांत ‘शालिवाहन’ शक असे शब्द आहेत. नानाघाटांतील पांडवलेण्यांत “ कुमारो हकु सिरी ” असें एका राजपुत्राचें नांव आहे. हा हकु शब्द सकु शब्दाचें दुसरें रूप आहे. (३) प्राय: म्लेंच्छ लोक ज्या प्रांतांत जात त्या प्रांतांतील प्रचलित असलेला काल प्रथम योजीत. जसे, इंग्रज तीस वर्षांपूर्वीं फसली किंवा हिजरी सनानें हिंदुस्थानांत कालगणना करीत. शक, पारद, यवन, वगैरेंची राज्यें हिंदुस्थानांत फार वर्षें न टिकल्यामुळें त्यांनां आपले सन (असलेच तर) इकडे प्रचलित करण्याला प्राय: अवधि व स्वास्थ्य सांपडलें नाहीं. यांपैकी पहिलें एकच कारण शककाल म्लेंच्छस्थापित नाहीं असें म्हणण्यास बस्स आहे.
कलियुगाचीं ३१७९ वर्षे होऊऩ गेल्यावर शालिवाहन शकाचा आरंभ झाला असें मानण्यांत येतें. म्हणजे इसवी सनाच्या वर्षांतून शेवटच्या तीन महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुनअखेरपर्यंत ) ७९ व इतर महिन्यांत ७८ वजा केले असतां शालिवाहन शकाचें गतवर्ष निघतें. तिन्नवेल्ली व मलवार प्रदेश सोडून सार्या दक्षिण हिंदुस्थानांत हा शक प्रचलित असून उत्तरहिंदुस्थानांतहि पंचांगांत, जन्मपत्रिकेंत व वर्षफलांत विक्रमसंवताबरोबर हा शक दिलेला असतो. सिलोनांतील अलीकडील राष्ट्रीय भावनेच्या हिंदू व ख्रिस्ती लोकांनीं याच शकास पुन्हां सुरूवात केली आहे. उत्तर हिंदुस्थानांतील शिलालेखादि प्राचीन लेखांत मात्र हा शक फारसा आढळून येत नाहीं. ज्या ठिकाणीं सौरमान प्रचलित आहे तो भाग वगळून बाकी सर्व हिंदुस्थान देशांत याचा आरंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच मानण्यांत येतो. परंतु उत्तरहिंदुस्थानांत याचे महिने पौर्णिमांत व दक्षिणहिंदुस्थानांत अमांत असतात. सौरमानांत मात्र या शकाचा आरंभ मेष संक्रातीपासून करण्यांत येतो. करणग्रंथाच्या आधारें पंचांग तयार करणारे हिंदुस्थानांतील सर्व ज्योतिषी याच ज्योतिषी याच शकाचा उपयोग करतात. पंचांगांत या शकाची गतवर्षेच देत असतात. परंतु शिलालेखांत मात्र कधीं कधी वर्तमान वर्षेंहि दिलेलीं सांपडतात.
विक्रमसंवत्:- कलियुगाची ३०४४ वर्षें होऊन गेल्यानंतर विक्रम संवत् सुरू झाला असें उत्तर हिंदुस्थानांतील लोक मानतात व त्या शकाचा वर्षारंभ ते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून धरतात. त्यामुळें कलियुगाच्या गत वर्षांतून ३०४४ वजा केले कीं त्यांच्या विक्रम संवताचें साल निघतें. परंतु दक्षिणेमध्यें विक्रम संवताचा आरंभ सात महिने मागून धरीत असल्यामुळे चैत्रारंभापासून अश्विनअखेरपर्यंत येथें कलियुगाच्या व विक्रम संवताच्या गत वर्षांमध्यें ३०४५ अंतर असतें व इतर महिन्यांत तें ३०४४ होतें. वस्तुत: ह्या शकाचा आरंभ कार्तिकापासूनच होत असला पाहिजे; कारण इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचे उत्तरहिंदुस्थानांतील जे लेख सांपडले आहेत त्यांमध्यें वर्षारंभ कार्तिकापासून मानणारेच लेख फार आहेत. पुढच्या चार शतकांतील लेखांत मात्र चैत्रापासून वर्षारंभ धरणार्यांची संख्या अधिक असून त्यानंतर सर्वच लेखांतून शालिवाहन शकाप्रमाणें विक्रम संवताचाहि आरंभ चैत्रापासून धरला जाऊं लागला. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानच्या कालगणनेंतील दुसरा फरक म्हटला म्हणजे दक्षिणेकडील महिना अमांत तर उत्तरेकडील पौर्णिमांत असतो. यामुळें असें होतें कीं शुद्ध पक्षांमध्ये दोन्हीहि भागांतील लोकांचे महिने एकच असतात, परंतु वद्य पक्षांत मात्र आपला जो महिना असतो त्याच्या पुढचा त्यांचा असतो. इसवी सनावरून आपल्याकडील विक्रम संवताचें साल काढणें झाल्यास इसवी सनाच्या वर्षांमध्यें नोव्हेंबर व दिसेंबर महिन्यांत (वस्तुत: कार्तिकारंभापासून दिसेंबरअखेरपर्यंत) ५७ व इतर महिन्यांत ५६ मिळवावे लागतात; आणि उत्तरेकडील विक्रम संवताचें साल काढण्यास जानेवारी, फ्रेब्रुवारी व मार्च ह्या तीनच महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुन अखेरपर्यंत ) ५६ व इतर महिन्यांत ५७ मिळवावे लागतात. काठेवाडांत, गुजराथेंत व राजपुतान्याच्या कांही भागांत ह्या संवताचा आरंभ आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून होत असे [ उदाहरणार्थ, अहमदाबादजवळील अडलिज गांवचा लेख व ‘प्रभास क्षेत्र तीर्थयात्राक्रम’ नामक पुस्तक पहा ( इं. अँ. पु. १८, पा. २५१)] व म्हणून तेथें त्यास आषाढादि संवत् म्हणत असत. उदेपूर वगैरे राजपुतान्यांतील कांही संस्थानांत अद्यापहि राजदरबारमध्यें विक्रम संवताचा आरंभ श्रावण वद्य प्रतिपदेपासून धरण्यांत येत असतो. अलीकडे ह्या संवताचें गत वर्षच देण्याची वहिवाट आहे. जुन्या लेखांत वर्तमान वर्षे दिलेलेहि कांहीं लेख सांपडतात: पण गत वर्ष देणार्या लेखांच्या मानांने अशा लेखांची संख्या फारच थोडी असते.