प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
भरतखंडांत चालू असलेले शक:- आतां भारतीय कालगणनेकडेच लक्ष देऊं. या विषयाकडे लक्ष देणें म्हणजे अनेक अधिक यशस्वी आणि कमी यशस्वी प्रयत्न लक्षांत घेतले पाहिजेत. भारतांत शालिवाहन शक, विक्रम शक, फसली शक इत्यादि शकांचें अवलंबन आज होत आहे.
सप्तर्षिसंवत्:- ह्या संवताचा आरंभ वर्षप्रतिपदेपासून होत असून हल्लीं त्याचा प्रसार काश्मीर व त्याच्या आसमंतांतील डोंगरी मुलूख एवढ्याच भागांत, विशेषेंकरून ज्योतिषी लोकांमध्यें आहे, प्राचीन काळीं तो पंजाबांतहि प्रचलित होता तरी आतां त्या प्रांतांत त्याचा प्रचार राहिला नाहीं. याचे महिने पूर्णिमान्त असून वर्ष बहुधा वर्तमान लिहिण्याची चाल आहे. तथापि क्वचित् प्रसंगी गतवर्ष लिहिलेलेहि लेख आढळून येतात [ उदाहरणार्थ, कैय्यटरचित देवीशतकाच्या टीकेंतील शेवटचा श्लोक पहा (इं. अँ; पु. २० पा. १५४)]. या संवतांत शतकाचे आंकडे सोडून केवळ वरील वर्षेंच लिहिण्याची साधारणत: वहिवाट असल्यामुळे त्यास कच्चा संवत असें एक नाव आहे. याशिवाय तो काश्मीर वगैरे भागांत प्रचलित आहे म्हणून लौकिक काल किंवा लौकिक संवत्, डोंगरी मुलखांत त्याचा प्रचार असल्यामुळें पहाडी संवत् आणि पंचांगांत व शास्त्रीय विषयावरील ग्रंथांत तो वापरीत असल्यामुळे शास्त्रसंवत् अशीं त्यास आणखीहि नांवे पडलीं आहेत.
कलियुगाची २५ वर्षे होऊन गेल्यानंतर ह्या संवतास आरंभ झाला असें काश्मीर प्रांतात राहणारे लोक मानतात ( डॉ. बुहलरचा काश्मीरचा रिपोर्ट पान ६०). परंतु पुराणांत व ज्योतिषशास्त्रासंबंधीं ग्रंथांत तो कलियुगास आरंभ होण्यापूर्वीहि चालू होता असा उल्लेख आला आहे. याला सप्तर्षि संवत् असें नांव पडण्याचें कारण सप्तर्षि नक्षत्रांतील सात तार्यांच्या कल्पित गतीशीं याचा जोडलेला संबंध होय. अशी कल्पना आहे कीं, हे सात तारे अश्विनी आदिकरून २७ नक्षत्रांत प्रत्येकी शंभर शंभर वर्षेपर्यंत राहत असून २७०० वर्षांत त्यांचे सर्व नक्षत्रांतून एक वेळ भ्रमण होतें [ वाराही संहिता, अध्याय१३, श्लोक४; भागवत, स्कंध १२ अध्याय २ श्लोक २७-२८; आणि विष्णुपुराण अंश ४, अध्याय २४, श्लोक ५३-५४ ]. पुराणांत व ज्योतिषाच्या संहिताग्रंथांत सप्तर्षींची ही जी गति मानण्यांत आली आहे ती केवळ काल्पनिकच आहे. सिद्धांततत्त्वविवेकाचा कर्ता कमलाकरभट याला देखील ही गति संमत नव्हती [सिद्धांततत्त्वविवेक, भग्रहयुत्यधिकार. श्लोक ३२ ]. जेथें जेथें हा संवत् प्रचलित होता तेथें तेथें नक्षत्राचें नांव न लिहितां त्या नक्षत्रांतील सप्तर्षींचें कितवे वर्ष आहे एवढेच फक्त लिहिण्याचा प्रघात होता, व हल्लीहि तीच रीति चालू आहे. तथापि काश्मीरच्या पंचांगांत व दुसर्या कित्येक ग्रंथात [ उदाहरणार्थ, हस्तलिखित ‘ ध्वन्यालोक ’ इं. अँ; पु. २० पान १५१ ] कधीं कधीं संवताच्या अगदी आरंभापासूनचें वर्ष दिलेलें पहावयास मिळतें.
कल्हण पंडिताची राजतरंगिणी [ तरंग १, श्लोक ५२], विक्रम संवत् १७१७ चा चंबामध्यें मिळालेला एक लेख [ इं. अँ. पु.२०, पान १५२], त्याच सालीं लिहिलेलीं पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथसंग्रहालयांत असलेली काशिकावृत्तीची एक प्रत आणि विक्रम संवत् १७५० चें काश्मीर मधील एक पंचांग [ इं अँ. पु. २०, पा. १५०], या सर्व पुस्तकांत त्यांचा कालनिर्देश करतांना सप्तर्षि संवताबरोबरच दुसरे जे निरनिराळे शक दिले आहेत त्यांवरुन सप्तर्षि संवताचा इतर शकांशी पुढें दिल्याप्रमाणें संबंध दिसून येतो. कलियुग संवतांतून २५ वजा केले असतां, किंवा विक्रमसंवतांत ३०१९, इसवी सनांत ३०७५ किंवा ३०७६ व शालिवाहन शकांत ३१५४ मिळविले असतां सप्तर्षि संवत् येतो. उलटपक्षीं शतकांचे आंकडे गाळून लिहिलेल्या सप्तर्षि संवताच्या वर्षांत २४ किंवा २५ मिळविले असतां इसवी सनाचें, २५ मिळविले असतां कलियुग संवताचें, ४६ मिळविले असतां शालिवाहन शकाचें, व ८१ मिळविले असतां विक्रम संवताचें शतकांचे आंकडे नसलेलें साल निघतें. येथें एवढें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, वरील हिशेबांत ज्या विक्रम संवताचा उल्लेख आला आहो तो चैत्रापासून आरंभ होणारा असून इसवी सनाच्या पहिल्या तीन महिन्यांत, इसवी सनापासून सप्तर्षि संवत् काढावयाचा असला तर सामान्यत; एक वर्ष कमी व सप्तर्षि संवतापासून इसवी सन काढावयाचा असल्यास एक वर्ष अधिक मिळवावें लागतें. त्याचप्रमाणें येथें इसवी सनांचें व सप्तर्षि संवताचें साल वर्तमान, व विक्रमसंवताचें व शालिवाहन शकाचें साल गत धरलें आहे.
कलियुग संवत्.- कलियुग संवतास ‘ भारतयुद्ध संवत् ’ व युधिष्टिर संवत् ‘ अशी दुसरी दोन नांवे असून त्याचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०२ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या १८ व्या तारखेस [ ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँन्ड एथिक्स’ मध्यें जगाच्या युगांसंबंधी माहिती देतांना कलियुगारंभाची तारीख १७ फेब्रुवारी दिली आहे] प्रात: काळीं झाला असें मानण्यांत येतें. हिंदु कालगणनेंतील महायुगांतर्गत चार युगांपैकी कलि हें शेवटचे युग असून तें ४,३२,००० वर्षांचें असतें. द्वापर, त्रेता व कृत ही उलट क्रमानें कलीच्या पूर्वींची युगें आहेत, व त्यामंध्यें कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट वर्षें असतात. अशा ७१ महायुगांचे एक मन्वंतर होत असून १४ मन्वंतरें व सहा महायुगें झालीं कीं एक कल्प अथवा ब्रह्मदेवाचा दिवस होतो अशी कल्पना आहे. तितक्यांच वर्षांनी पुन्हां ब्रह्मदेवाची रात्र असल्यामुळें अहोरात्र मिळून ब्रह्मदेवाच्या दिवसांची एकंदर ८,६४,००,००,००० वर्षे होतात.
ह्या संवताचा ज्योतिषग्रंथांत व पंचांगांतच विशेषेंकरून उपयोग केला जात असतो, तरी तो कधी कधीं शिलालेखांतहि वापरलेला आढळून येतो [ इं. अँ. पु. १४ पान २९० ]. प्रत्येक वर्षाच्या पंचागांत चैत्रादि विक्रम संवताचीं, शालिवाहन शकाची व कलियुग संवताची जीं गत वर्षे दिलेलीं असतात त्यांवरून असें दिसून येईल कीं, विक्रम संवतांत ३०४४, शालिवाहन शकांत ३१७९ व इसवी सनांत ३१०१ वर्षे मिळविलीं असतां कलियुग संवताचीं गत वर्षे निघतात. ऐहोळच्या डोंगरावरच्या जैन मंदिरांतील चालुक्यवंशी दुसर्या पुलिकेशीच्या शिलालेखांत [ ए. इं. पु. ६, पां ७] शालिवाहन शकाचीं व भारती युद्ध संवताचीं जीं वर्षै दिली आहेत त्यावरून शालिवाहन शकारंभाच्या ३१७९ वर्षै अगोदर भारती युद्ध झालें असें निघत असल्यामुळें, कलियुग संवत् व भारतयुद्ध संवत् हीं दोन्हीहि एकच आहेत असें ठरतें. कलियुग संवताच्या दुसर्या दोन नांवांवरून व उपरिनिर्दिष्ट शिलालेखांतील कालनिर्दैशावरून, भारतयुनंतर युधिष्टिरांचे राज्यारोहण झालें तेव्हांच कलियुग संवतास आरंभ झाला असला पाहिजे असें वाटण्याचा संभव आहे. परंतु संस्कृत वाङ्मयांत ह्यासंबंधीं परस्परविरूद्ध बराच पुरावा सांपडत असल्यामुळें त्यावरून भारत युद्ध व कलियुगारंभ ह्या दोन्ही समकालीन गोष्टी नाहींत असें म्हणणें प्राप्त होतें. वराहमिहिराच्या व कल्हण पंडिताच्या मतें कलियुगास आरंभ झाल्यावर भारती युद्ध झालें असें आहे. कारण वाराही संहितेंत [ सप्तर्षिचार, श्लोक३] शालिवाहन शकाच्या फक्त २५२६ वर्षे अगोदरच युधिष्टिरांचॆं राज्यारोहण ( म्हणजे भारती युद्ध ) झालें असें म्हटलें असून राजतरंगिणीमध्येंहि [ तरंग १,श्लोक ४९ व ५१ ] कलियुगारंभानंतर ६५३ वर्षांनीं, म्हणजे शकारंभाच्या २५२६ वर्षें अगोदर, कौरवपांडव ( म्हणजे भारती) युद्ध झालें असें दिलें आहे. उलट पक्षीं पुराणांन्वयें ( विष्णुपुराण, अंश ४, अध्याय २४, श्लोक ५५; व भागवत, स्कंध १२, अध्याय२, श्लोक २९) कृष्णाच्या स्वर्गारोहणापासून म्हणजे महाभारताप्रमाणें भारती युनंतर ५१ वर्षांनी [ इं. अँ. पु. ४०, पा. १६३-६४] कलियुगास आरंभ होतो. भारती युच्या काळासंबंधीं तर पुराणांपुराणांतच एकवाक्यता नसून त्यांत दिलेला भारतीयुचा सर्वांत प्राचीन काळ घेतला तरी, तो वराहमिहिरानें दिलेल्या काळाच्या अजमासें ९०० वर्षें व कलियुग संवतारंभाच्या अजमासें १५०० वर्षे अलीकडचा आहे. कारण परिक्षितीच्या जन्मानंतर- म्हणजेच भारतीयुनंतर-मत्स्य,वायु व ब्रह्मांड ह्या पुराणांप्रमाणें १०५०, विष्णुपुराणाप्रमाणें १०१५ व भागवताप्रमाणें १११५ वर्षांनीं महापह्मनंदास राज्याभिषेक झाला असून त्यानंतर [ मत्स्यपुराण, अध्याय २७३, श्लोक ३६; वायुपुराण, अ.९९, श्लो. ४१५; ब्रह्मांडपुराण, मध्यभाग, उपोत पाद ३, अ. ७४, श्लो. २२७; विष्णुपुराण अंश ४, अ. २४, श्लो. ३२; भागवत, स्कंध १२, अ. २, श्लो. २६] नंद घराण्यांतील पुरूषांनीं १०० वर्षेंपर्येत राज्याचा उपभोग घेतला. नंद वंशाचें निर्मूलन करून मौर्य घराण्यांतील जो चंद्रगुप्त राजा सिंहासनारूढ झाला, त्याचा राज्यारोहणकाल ख्रिस्तपूर्व ३२१ च्या सुमारास असल्याविषयीं आतां नक्की ठरलें असल्यामुळें भारती युद्ध शालिवाहन शकास आरंभ होण्याच्या (१०५०+१००+३२१+७८= ) १५४९, १५१४ किंवा १६१४ वर्षे अगोदर झालें असावें असें सदरहू पुराणांवरून निष्पन्न होतें. यांपैकी कोणताहि काळ घेतला तरी त्याचा कल्हणवराहमिहिरांनी दिलेल्या भारती युच्या काळाशीं किंवा ज्योतिष ग्रंथात व पंचागांत जो कलियुगारंभाचा काळ देण्यांत येत असतो त्याशीं मेळ बसणें मुळींच शक्य नाहीं हें उघड आहे.
वीरनिर्वाणसंवत्:- जैनांचा शेवटचा तीर्थकर जो महावीर त्याच्या निर्वाणकाळापासून ज्या शकाचा आरंभ मानण्यांत येतो त्यास ‘वीरनिर्वाण’ असें म्हणतात. हा शक ज्यांच्या मध्यें दिला आहे असें जे कांही शिलालेख उपलब्ध आहेत ते अपवाद म्हणून सोडून दिले तर जैन ग्रंथांशिवाय इतर ठिकाणीं ह्या शकाचा उपयोग केलेला क्वचितच आढळून येईल. जैन संप्रदायांतील श्वेतांबरपंथी मेरूतुंगसूरीच्या विचारश्रेणि नामक ग्रंथात वीरनिर्वाण संवत् व विक्रमसंवत् ह्या दोन शकांतील अंतर ४७० वर्षे दिलें असून त्याच पंथांतील नेमिचंद्राचार्याच्या ‘ महावीरचरितं’ नांवाच्या प्राकृत काव्यांत ‘ माझ्या निर्वाणानंतर ६०५ वर्षें व ५ महिने झाल्यावर शक राजा उत्पन्न होईल’ असें महावीराच्या तोंडी घातलेले शब्द आहेत. यांपैकी दुसरा ग्रंथ विक्रम संवत् ११४१ म्हणजे इ. स. १३१० च्या सुमारास रचण्यांत आला असावा. ह्या दोन ग्रंथातील पुराव्यांवरून असें दिसून येतें कीं, विक्रम संवतांत ४७०, इसवी सनांत ५२७ किंवा शालिवाहन शकांत ६०५ मिळविले असतां वीरनिर्वाण संवत् निघतो. हरिवंश पुराणांतील व मेघनंदीच्या श्रावकाचारांतील वचनांवरून ह्याच कालनिर्णयास पुष्टि मिळते [ अँ. पु. १२, पा. २२ ]. व श्वेतांबरपंथी सर्व जैनांसहि महावीराच्या निर्वाणाचा हाच काळ संमत आहे. परंतु दिगंवरपंथी जैनांस हा निर्णय मान्य नाहीं. त्यांच्या पंथांतील नेमिचंद्रानें विक्रम संवताच्या ११ व्या शतकांत लिहिलेल्या त्रिलोकसार नामक ग्रंथांत [ श्लोक ८४८ पहा ] उपर्युक्त श्वेतांवरपंथी नेमिचंद्राचार्याप्रमाणेंच म्हटलें आहे. पण माधवचंद्रानें त्रिलोकसारावरील आपल्या टीकेंत ‘ सग राजो ’ ह्याचें स्पष्टीकरण ‘ विक्रमाङ्क शकराज: असें केल्यामुळें त्याच्या मागून झालेल्या कित्येक दिगंबरपंथी जैन लेखकांनी [ उदाहरणार्थ, श्रवणबेळगोळचा जैन लेख पहा ( इं. अँ. पु. २५, पा. ३४६) ] त्याचाच अर्थ प्रमाण मानून वीरनिर्वाणाचा काळ १३५ वर्षैं मागे ढकलला आहे. त्याच पंथांतील दुसर्या कांही लेखकांनीं तर याच्याहिपुढें जाऊन कोणीं शालिवाहन शकाच्या ४६१ वर्षें अगोदर, कोणीं ९७९५ वर्षे अगोदर व कोणीं तर १४७९३ वर्षे अगोदर महावीराचें निर्वाण झालें असें लिहिलें आहे [ त्रिलोक प्रज्ञाप्ति, ‘ जैनहितैषी मासिक पत्र ’ ] भाग १३, अंक १२ दिसेंबर १९१७ पा. ५३३ पहा ].
बुद्धनिर्वाणशक:- बौद्ध लोकांत गौतम बुच्या निर्वाणापासून ज्या शकाचा आरंभ समजण्यांत येतो त्यास बुद्धनिर्वाण शक हें नांव आहे. ह्या शकाचा उपयोग बहुधा बौद्ध ग्रंथांतूनच केलेला पाहण्यांत येतोय तथापि हा शक घातलेले थोडेसे शिलालेखहि [उदाहरणार्थ, गयेचा लेख ( इं. अँ. पु.१०, पा. ३४३ ] आढळण्यांत आले आहेत. या शकाच्या आरंभाविषयीं इतक्या परस्परभिन्न समजुती प्रचलित आहेत व विद्वानांतहि इतका मतभेद आहे कीं, ख्रि. पू. १०९७ पासून ३५० पावेतोंची ११ निरनिराळीं वर्षे या शकाचा आरंभकाळ म्हणून सुचविण्यांत आलीं आहेत. (१) इ. स. ४०० सालीं चिनी प्रवासू फा हिआन हा हिंदुस्थानांत आला तेव्हां त्यानें असें लिहून ठेविलें कीं [ बा; बु. रे. वे. व. पु. १, प्रस्तावना, पा. ७५ ] बुचें निर्वाण होऊन आज १४९७ वर्षे झालीं आहेत. ह्या विधानावरून बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व १०९७ साली झालें असें निघतें. (२) चीनमध्यें [ प्रिन्सेप; अँ. पु. २ ‘ यूसफुल टेबल्स ’ पा. १६५ ] ह्या शकाचा आरंभ ख्रि. पू. ६३८ सालापासून मानण्यांत येतो व पं. भगवानलाल इंद्रजी यांनीहि लेखाच्या आधारावर हेंच वर्ष बरोबर आहे असें दाखविलें आहे [ इं. अँ. पु १०, पाय ६४६ ]. (३) सिलोन सयाम व ब्रह्मदेश या तीन देशांत बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व ५४४ सालीं झालें अशी समजूत असून [ कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम ( कनिंगहॅमकृत)पु.१ प्रस्तावना पा. ३ ], आसामचे राजोपाध्यायहि [ प्रि. अँ. पु. २, ‘ यूसफुल टेबल्स पा. १६५ ] तेंच वर्षं खरे धरतात.(४) ख्रि. पू. ४८७ सालीं बुचें निर्वाण झालें असावें असें व्ही. ए. स्मिथचे अनुमान आहे [ स्मि. अ. हि. इं. तृतीयावृत्ति, पा. ४७ ]. पण डॉ. बुहलर यांनीं तें ख्रि. पू. ४८३-२ व ४७२-१ ह्या ११ वर्षांच्या दरम्यान केव्हां तरी असावें [इं. अँ. पु. ३, पा. १५४ ] असें ठरविलें असून त्यांमध्यें (५) बार्नेटनें ४८३ [ बा. अँ. इं. पा. ३७ ], (६) डॉ. फ्लीटनें ४८२ [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०६, पा. ६६७], (७) फगर्युसननें ४८१ [ पा. ४९२], (८) जनरल कनिंगहॅम यानें ४७८ [कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम् पु. १ प्रस्तावना पा. ९] आणि (९) मॅक्समुल्लर [ मॅ. हि. ए. सं. लि. पा.२९८] व मिस डफ [ ड. क्रॉ. इं. पा. ६ ] यांनीं ४७७ हें वर्ष सुचविलेलें आहे. (१०) परंतु कर्न यांने तर बुच्या निर्वाणाचा काळ आणखीहि अलीकडें ओढून तो ख्रिस्तपूर्व ३८८ मध्यें आणून ठेविला [ सायक्लोपीडिया ऑफ इंडिया; पु. १, पा. ४९२] व (११) हुएन्तसंग ह्या दुसर्या एका चिनी प्रवाश्याच्या वृत्तावरून [ बी,बु.रे.वे.व.पु.१ पा. १५० ] बुचें निर्वाण याच्याहि नंतर तीस चाळीस वर्षांनीं झालें असावें कीं काय अशी शंका येते. वर सांगितल्याप्रमाणें बुद्धनिर्वाणाच्या काळासंबंधीं निरनिराळ्या विद्वानांची निरनिराळी मतें पडत आहेत. तरी त्यांतल्या त्यांत निदान आज तरी ख्रि. पू. ४८७ हाच काळ स्थूलमानानें अधिक बरोबर असण्याचा संभव आहे असें पं ओझा यांना वाटतें [ भारतीय प्राचीन लिपिमाला. द्वितीयावृत्ति पा. १६४ ].
मौर्यशक:- आतांपर्यत हा शक ओरिसांत कटकच्या जवळ उदयगिरि येथील ‘ हाथी’ गुफेंत असलेल्या खारवेल (मेघवाहन) नामक जैन राजाच्या एका लेखांतच [ पंडित भगवानलाल इंद्रजी संपादित ‘ दि हाथी गुंफा अँड थ्री अदर इन्सिक्रप्शन्स ’ पहा ] काय तो आढळून आला आहे. डॉ. फ्लीट [ ज. रॉ. ए.सो.इ.स. १९१०, पा.२४३-४४ ], प्रो. लूडर [ ए. इं. पु. १०, ब्राह्मी लेखांची सूचि, पा. १६१ ] व व्हिन्सेंट स्मिथ [ अ. हि. इ. पा. २०७, टीप २ ] यांनी ह्या लेखाचा अर्थ निराळाच करून त्यांत सौर्य शक दिलेला नाहीं असें मानलें आहे. तथापि त्यांचा अर्थ विद्वज्जनांस पटला नसून अद्यापीहि उदयगिरीचा लेख मौर्य शक १६५ मधील आहे [ आर्किऑलॉजिकल सर्व्हेचा रिपोर्ट. इ. स. १९०५-६ पा. १६६ ] अशीच सर्वसाधारण समजूत आहे. याशिवाय लोरिअन तंगाई [आ.स.रि.इ.स.१९०३-४, पा.२५१ ] व हश्तनगर [ ए. इ. पु. १२. पा. ३०२ ] येथें सांपडलेल्या बुच्या मूर्तींच्या आसनावरील लेखांत जे शक दिले आहेत ते कोणते आहेत हें निश्चित झालें नसल्यामुळें तेहि मौर्य शकच असण्याचा संभव आहे. चंद्रगुप्त नंदवंशाचा उच्छेद करून सिंहासनारूढ झाला तेव्हां जर त्यानें हा शक चालू केला असला, तर ह्याचा आरंभ ख्रि. पू. ३२१ च्या सुमारास झाला असला पाहिजे.
सिल्यूकिडी शक:- यालाच मॅसिडोनी शक असेंहि नांव आहे. यासंबंधीं कांहीं माहिती भारतबाह्य शक देतांना अगोदर येऊऩ गेलीच आहे. ख्रि. पू. ३२३ सालीं शिकंदर बादशहा मरण पावल्यावर त्याचें राज्य वांटून घेण्याकरितां त्याच्या सेनापतींमध्यें लढाया होऊन शेवटीं मॅसिडोनिया, मिसर व सिरिया ( बाबिलोन ) हीं तीन राज्यें उत्पन्न झालीं व सिल्यूकस निकेटार हा त्यांतील सिरिया देश बळकावून ख्रि. पू. ३१२ सालीं आक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेस गादीवर बसला. त्यांच्या राज्यारोहणापासून हा शक सुरू झाला असल्यामुळें त्यास सिल्यूकिडी शक असें नांव मिळालें असें पूर्वी सांगितलेंच आहे. बॅक्टिया वगैरे पूर्वेकडील आशियांतील प्रदेश सिल्यूकसच्याच ताब्यांत असल्यामुळें त्याचा शक बॅक्ट्रियांत चालू झाला होता; व पुढें बॅक्ट्रियन ग्रीक लोक काबुल, पंजाब वगैरे भागांवर राज्य करूं लागले तेव्हां तो ग्रीक सत्तेखालील हिंदुस्थानाच्या भागांतहि वापरण्यांत येऊं लागला असावा. वस्तुत: अद्याप असा एकहि लेख हिंदुस्थानांत सांपडला नाहीं कीं ज्यामध्यें दिलेला शक सिल्यूकिडी आहे असें निश्चित म्हणतां येईल. तथापि कुशनवंशी राजांच्या कारकीर्दीतील कांही लेखांत मॅसिडोनियन (ग्रीक) महिन्यांची नांवे [ पेल्लिअस ( दिसेंबर ) क. इं. ई. पा. ४१ आर्टेमिसिअस (मे)- ए. इं. पु. ११, पा. २१०; डेसिअस (जून)- इं. अँ. पु. १०, पा ३२६ व पु.११ पा १२८; आणि पनेमस ( जुलै )- ए. इं. पु. पा, ५५ ] आढळून आलीं असून ते सर्व विदेशीय लोकांनी खोदविलेले आहेत. ह्या लेखांत दिलेलीं वर्षे कोणत्या शकाचीं आहेत याचा अजून पावेतों समाधानकारक निकाल लागला नसल्यामुळें तीं वर्षे, शतकाचे अंक गाळून लिहिलेलीं सिल्यूकिडी शकाचीं वर्षे असण्याचा संभव आहे. संभव आहे असें म्हणण्याचें कारण पर्शियन शक ख्रि. पू. २४७ सालच्या सुमारास सुरू झाला [ क.इं.ई.पा.४६ ] असल्यानें हीं वर्षे त्या शकाचीं किंवा दुसर्या एखाद्या अज्ञात शकाचींहि असूं शकतील.
शालिवाहन शक:- शालिवाहन शक कोणीं सुरू केला याविषयीं जुन्या ग्रंथांत जे उल्लेख आले आहेत ते केवळ परस्पर भिन्नच नाहींत तर परस्परविरोधीहि आहेत. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कीं, दक्षिणेंतील प्रतिष्टानपूर उर्फ पैठण येथील शालिवाहन ( सातवाहन, हाल) राजानें हा शक सुरू केला. कोणी कोणी शालिवाहनाच्या जन्मापासूनच ह्या शकाचा आरंभ होतो असें मानितात [ मुहूर्तमार्तंड, अलंकार श्लोक ३ ). जिनप्रभसूरीनें आपल्या कल्पप्रदीप नामक पुस्तकांत म्हटलें आहे कीं, प्रतिष्टानपूर येथें राहत असलेल्या एका परदेशी ब्राह्मणाच्या विधवा बहिणीपासून शालिवाहन राजाची उत्पत्ति झाली असून, उज्जायिनीच्या विक्रम राजाचा पराभव करून तो प्रतिष्टानपुरचा राजा झाला व तापी नदीपावेतों सर्व मुलूख काबीज करून त्यानें तेथें आपला शक सुरू केला [ ज. ए. सो. मुंबई पु. १० पा. १३२-३३]. उलटपक्षीं अलबेरूणीनें असें लिहून ठेविलें आहे कीं, विक्रमादित्यानें शक राजाचा पराभव करून हा शक सुरू केला होता [ सा. अ. इं. पु. २, पा. ६ ].
ह्या शकाचे जुन्यांत जुने शिलालेख ५२ पासून १४३ पावेतोंच्या सालांतील असून ते पश्चिमेकडील क्षत्रपांनी खोदविले आहेत. त्या क्षत्रपांचींच जीं नाणीं सांपडली आहेत त्यांवर अजमासें १०० पासून ३१० पावेतोंच्या वर्षांचे आंकडे दिलेले आढळतात. सदरहू शिलालेखांत आणि नाण्यांत शालिवाहन किंवा शक यांतील एकाहि शब्दाचा निर्देश केलेला नांही. शिलालेखांत ‘ वर्षे ’ हा शब्द वापरला असून नाण्यांवर तर फक्त आंकडेच दिलेले आहेत [ प्रा. लि. मा. पा. १७१ ].
शके ४२७ मध्यें पहिल्याप्रथम [ सिंहसूररचित लोकविभाग ग्रंथ ११ व्या शतकानंतर लिहिलेला असल्यामुळें त्यांतील शक शब्दाचा प्रयोग प्राचीन नाहीं ( प्रा. लि. मा. पा. १७१ टीप ३ )] संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा ‘ शककाल ’ या नांवानें उल्लेख केला असून [ पंचसिद्धांतिका ( वराहमिहिराची) १|८ ] त्यानंतर शकें १२६२ पावेतोंच्या शिलालेखांत व दानपत्रांत (१) ‘शकनृपति राज्याभिषेक संवत्सर’ (२) ‘शकनृपति संवत्सर,’ (३) ‘शकनृपसंवत्सर,’ (४) ‘ शकनृपकाल,’ (५) ‘ शकसंवत् ‘ , (६) ‘ शकवर्ष,’ (७) ‘ शककाल,’ (८) ‘ शककालसंवत्सर,’ (९) ‘ शक’ व (१०) ‘शाक ’ अशा निरनिराळ्या नांवांखाली ह्या शकाचीं वर्षे दिलेलीं आहेत [ इं अँ: (१) पु. १०, पा. ५८ जवळील आकृतिपट; (२) पु. ६, पा. ७३; (३) पु. १२, पा. १६; (६) पु.६, पा. ८६ व (८) पु. ११ पा. ११२. ए. इं:- (४) पु. ३, पा. १०९; (५) पु. १ पा. ५६; (१०) पु.१, पा. ३४३. (७) ज. ए. सो. मुंबई. पु. १०, पा.१९५.. (९) की. लि. इं. स. इं. पु. ६३ लेख नं. ३४८ ]. मराठीमध्यें संवत्सर या सामान्य अर्थी प्रचारांत असलेला ‘शक’ शब्द ह्या लेखांतील शक शब्दाहून भिन्न आहे हें विसरतां कामा नये. यावरून असें दिसतें कीं, इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभापासून चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, कोणत्या तरी शक राजाच्या राज्याभिषेकापासून ह्या शकाचा आरंभ झाला आहे अशी सर्वसाधारण समजूत होती. निदान शिलालेखांत व ताम्रपत्रांत तरी शके १२६२ पर्यंत शालिवाहन नांवाचा ह्या शकाशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असलेला आढळून येत नाहीं. संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा व शालिवाहन राजाचा संबंध इ. स. १३०० च्या सुमारास लिहिलेल्या जिनप्रभसूरीच्या कल्पप्रदीपांतच प्रथम जोडलेला आहे. त्यानंतर हरिहर गांवी मिळालेल्या विजयानगरच्या पहिल्या बुक्करायाच्या शके १२७६ च्या दानपत्रांत [ की. लि. इं. स. इं. पा. ७८ लेख नं. ४५५] शालिवाहनाचें नांव या शकाच्या मागें लिहिलें असून, त्यापुढें हा प्रचार दिवसेंदिवस वाढत जाऊं लागला [ उदाहरणार्थ, इं. अँ. पु.१०, पा. ६४; ए. इं. पु. १, पा. ३६६; ज. ए. सो. मुंबई पु. १२, पा. ३८४ ]. गाथासप्तशती व बृहत्कथा या दोन ग्रंथामुळें सातवाहन उर्फ शालिवाहन राजाचें नांव लिहितां वाचतां येणार्या बहुतेक सर्व माणसांस अगोदरच दृढ परिचयाचें झालें होते. म्हणून असें संभवनीय वाटतें कीं, उत्तरेकडील लोक आपल्या संवताच्या मागें विक्रमाचें नांव लावूं लागलेले पाहून इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या सुमारास दक्षिणेंतील विद्वानांनीहि शालिवाहन राजाचा आपल्या शकाशीं संबंध जोडला असावा.
शालिवाहन हा शब्द सातवाहन शब्दाचेंच रूपांतर असून [ प्रबंधचिंतामणी पा. २८] पुराणांतील आंध्रभृत्य उर्फ आंर्ध्र वंशाकरितां शिलालेखांत सातवाहन शब्दाचा प्रयोग केलेला आढळतो. शातवाहन व शातकर्णी हे एकच होत. कां कीं, वाहन किंवा कर्णी म्हणजे हत्ती आणि शातकर्णी म्हणजे शंभर हत्ती बाळगणारा राजा असा अर्थ होय; असें विधान कनकसभे हा आपल्या ‘ तामिल कंट्री एटीन हंड्रेड इयर्स अँगो ’ या पुस्तकांत सुचवितो. आंध्रभृत्य राजांनीं ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकापासून ख्रिस्तोत्तर २२५ साला पावेतों दक्षिणेंत राज्य केलें असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो [ अ. हि. इं. पा. २१८ जवळचा तक्ता ]. गोदावरीतीरी असलेले प्रतिष्टान नगर म्हणजे अर्वाचीन पैठण शहर ही त्याची राजधानी होती व त्यांच्यामध्यें सातवाहन ( शातकर्णी, हाल ) नांवाचा प्रसिद्ध राजाहि होऊन गेला होता. तेव्हां दक्षिणेंतील पंडितांनीं त्याचेंच नांव आपल्या शकाला लाविलें असणें संभवनीय आहे. खुद्द शातवाहन वंशातील कोणींहि राजानें हा शक सूरू केला नाहीं ही गोष्ट मात्र निश्चित आहे. कारण, त्यांच्यापैकी एकाहि राजानें आपल्या शिलालेखांत शक दिला नसून ज्यानें त्यानें स्वत:च्या कारकीर्दीचें वर्षच दिलें आहे. आंध्रभृत्यांचें राज्य नष्ट झाल्यावर ११०० वर्षेंपर्यंत शालिवाहन नांवाचा व ह्या शकाचा कोठेंहि संबंध जोडलेला आढळून येत नसल्यामुळें या शकाचा आरंभ एखाद्या शक राजानेंच केला असला पाहिजे, असें पंडित ओझा म्हणतात. तथापि, आम्ही शातवाहनांचा शकस्थापनेशीं संबंध अजून नाकबूल करीत नाही. रा. राजवाडे यांनी यासंबंधांत खाली दिलेलीं प्रमाणें पुढें मांडलीं आहेत.
हा शक शक नांवाच्या म्लेंच्छ लोकांनी स्थापिला, असें भांडारकरादि विद्वानांचें म्हणणे आहे, पण तें चुकीचें आहे. कारण (१) शककाल ज्या अर्थी धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जातो त्या अर्थी तो कोणातरी हिंदु राजानें स्थापिलेला असला पाहिजे. म्लेंच्छांनीं सुरू केलेला कोणताहि काल हिंदू लोकांच्या धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जाणें केवळ अशक्य आहे. फसली, अरबी, हिजरी, जलाली, इसवी वगैरे अनेक सन येथें आगंतुकांनीं सुरू केले. परंतु धर्मकृत्यांत त्यांपैकीं एकाचाहि प्रवेश झाला नाहीं. (२) शक शब्दाचे दोन अर्थ आहेत. शक म्हणजे म्लेंच्छ असा एक अर्थ आहे. परंतु शक शब्दाच्या दुसर्या अर्थाकडे बहुतेकांनी कानाडोळा केला आहे. शक म्हणजे शातवाहन राजे असा दुसरा अर्थ आहे. शक ४१० तील ताम्रपटांत ‘शालिवाहन’ शक असे शब्द आहेत. नानाघाटांतील पांडवलेण्यांत “ कुमारो हकु सिरी ” असें एका राजपुत्राचें नांव आहे. हा हकु शब्द सकु शब्दाचें दुसरें रूप आहे. (३) प्राय: म्लेंच्छ लोक ज्या प्रांतांत जात त्या प्रांतांतील प्रचलित असलेला काल प्रथम योजीत. जसे, इंग्रज तीस वर्षांपूर्वीं फसली किंवा हिजरी सनानें हिंदुस्थानांत कालगणना करीत. शक, पारद, यवन, वगैरेंची राज्यें हिंदुस्थानांत फार वर्षें न टिकल्यामुळें त्यांनां आपले सन (असलेच तर) इकडे प्रचलित करण्याला प्राय: अवधि व स्वास्थ्य सांपडलें नाहीं. यांपैकी पहिलें एकच कारण शककाल म्लेंच्छस्थापित नाहीं असें म्हणण्यास बस्स आहे.
कलियुगाचीं ३१७९ वर्षे होऊऩ गेल्यावर शालिवाहन शकाचा आरंभ झाला असें मानण्यांत येतें. म्हणजे इसवी सनाच्या वर्षांतून शेवटच्या तीन महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुनअखेरपर्यंत ) ७९ व इतर महिन्यांत ७८ वजा केले असतां शालिवाहन शकाचें गतवर्ष निघतें. तिन्नवेल्ली व मलवार प्रदेश सोडून सार्या दक्षिण हिंदुस्थानांत हा शक प्रचलित असून उत्तरहिंदुस्थानांतहि पंचांगांत, जन्मपत्रिकेंत व वर्षफलांत विक्रमसंवताबरोबर हा शक दिलेला असतो. सिलोनांतील अलीकडील राष्ट्रीय भावनेच्या हिंदू व ख्रिस्ती लोकांनीं याच शकास पुन्हां सुरूवात केली आहे. उत्तर हिंदुस्थानांतील शिलालेखादि प्राचीन लेखांत मात्र हा शक फारसा आढळून येत नाहीं. ज्या ठिकाणीं सौरमान प्रचलित आहे तो भाग वगळून बाकी सर्व हिंदुस्थान देशांत याचा आरंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच मानण्यांत येतो. परंतु उत्तरहिंदुस्थानांत याचे महिने पौर्णिमांत व दक्षिणहिंदुस्थानांत अमांत असतात. सौरमानांत मात्र या शकाचा आरंभ मेष संक्रातीपासून करण्यांत येतो. करणग्रंथाच्या आधारें पंचांग तयार करणारे हिंदुस्थानांतील सर्व ज्योतिषी याच ज्योतिषी याच शकाचा उपयोग करतात. पंचांगांत या शकाची गतवर्षेच देत असतात. परंतु शिलालेखांत मात्र कधीं कधी वर्तमान वर्षेंहि दिलेलीं सांपडतात.
विक्रमसंवत्:- कलियुगाची ३०४४ वर्षें होऊन गेल्यानंतर विक्रम संवत् सुरू झाला असें उत्तर हिंदुस्थानांतील लोक मानतात व त्या शकाचा वर्षारंभ ते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून धरतात. त्यामुळें कलियुगाच्या गत वर्षांतून ३०४४ वजा केले कीं त्यांच्या विक्रम संवताचें साल निघतें. परंतु दक्षिणेमध्यें विक्रम संवताचा आरंभ सात महिने मागून धरीत असल्यामुळे चैत्रारंभापासून अश्विनअखेरपर्यंत येथें कलियुगाच्या व विक्रम संवताच्या गत वर्षांमध्यें ३०४५ अंतर असतें व इतर महिन्यांत तें ३०४४ होतें. वस्तुत: ह्या शकाचा आरंभ कार्तिकापासूनच होत असला पाहिजे; कारण इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचे उत्तरहिंदुस्थानांतील जे लेख सांपडले आहेत त्यांमध्यें वर्षारंभ कार्तिकापासून मानणारेच लेख फार आहेत. पुढच्या चार शतकांतील लेखांत मात्र चैत्रापासून वर्षारंभ धरणार्यांची संख्या अधिक असून त्यानंतर सर्वच लेखांतून शालिवाहन शकाप्रमाणें विक्रम संवताचाहि आरंभ चैत्रापासून धरला जाऊं लागला. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानच्या कालगणनेंतील दुसरा फरक म्हटला म्हणजे दक्षिणेकडील महिना अमांत तर उत्तरेकडील पौर्णिमांत असतो. यामुळें असें होतें कीं शुद्ध पक्षांमध्ये दोन्हीहि भागांतील लोकांचे महिने एकच असतात, परंतु वद्य पक्षांत मात्र आपला जो महिना असतो त्याच्या पुढचा त्यांचा असतो. इसवी सनावरून आपल्याकडील विक्रम संवताचें साल काढणें झाल्यास इसवी सनाच्या वर्षांमध्यें नोव्हेंबर व दिसेंबर महिन्यांत (वस्तुत: कार्तिकारंभापासून दिसेंबरअखेरपर्यंत) ५७ व इतर महिन्यांत ५६ मिळवावे लागतात; आणि उत्तरेकडील विक्रम संवताचें साल काढण्यास जानेवारी, फ्रेब्रुवारी व मार्च ह्या तीनच महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुन अखेरपर्यंत ) ५६ व इतर महिन्यांत ५७ मिळवावे लागतात. काठेवाडांत, गुजराथेंत व राजपुतान्याच्या कांही भागांत ह्या संवताचा आरंभ आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून होत असे [ उदाहरणार्थ, अहमदाबादजवळील अडलिज गांवचा लेख व ‘प्रभास क्षेत्र तीर्थयात्राक्रम’ नामक पुस्तक पहा ( इं. अँ. पु. १८, पा. २५१)] व म्हणून तेथें त्यास आषाढादि संवत् म्हणत असत. उदेपूर वगैरे राजपुतान्यांतील कांही संस्थानांत अद्यापहि राजदरबारमध्यें विक्रम संवताचा आरंभ श्रावण वद्य प्रतिपदेपासून धरण्यांत येत असतो. अलीकडे ह्या संवताचें गत वर्षच देण्याची वहिवाट आहे. जुन्या लेखांत वर्तमान वर्षे दिलेलेहि कांहीं लेख सांपडतात: पण गत वर्ष देणार्या लेखांच्या मानांने अशा लेखांची संख्या फारच थोडी असते.
ह्या संवतासंबंधीं अशी दंतकथा आहे कीं, विक्रम राजानें शक लोकांचा पराभव करून आपल्या नांवाचा शक सुरू केला. विक्रम संवतास मालव संवत् किंवा मालव काल असेंहि एक नांव आहे [ग्यारिसपुरचा लेख-क.आ.स.रि.पु.१०, आकृतिपट ११ ]. वास्तविक पाहिलें असतां आज उपलब्ध असलेल्या लेखांपैकीं ज्यांत विक्रम नांवाचा ह्या शकाशीं संबंध जोडलेला आहे असा जुन्यांत जुना लेख विक्रम संवत् ८९८ म्हणजे इसवी सन ८४१ मधील आहे . [ इं.अँ.पु.१९ पा. ३५] विक्रम संवत् ७९४ चाहि एक लेख काठेवाडांत सांपडला आहे [ इं. अँ. पु. ०२, पा. १५५]. परंतु लेखांत म्हटल्याप्रमाणें त्या दिवशी रविवार, ज्येष्टा नक्षत्र किंवा सूर्यग्रहण यांतील कांहीहि नसल्यामुळें व त्याची लिपीहि असावी तितकी प्राचीन दिसत नसल्यामुळें डॉ. फ्लीट व कीलहॉर्न यांनीं तो बनावट ठरविला आहे. इ. स. ८४१ च्या पूर्वीच्या सर्व लेखांत ह्या शकास मालव लोकांनी किंवा त्यांच्या राजांनीं प्रचलित केलेला संवत् एवढेंच फक्त म्हटलें आहे. [उदाहरणार्थ, मंदसोर येथें सांपडलेले ४६१ ( ए.इं.पु. १२ पा. ३२०), ४९३ (फ्ली. गु. इं. पा. ८३) व ५८९ (फ्ली.गु. इं. पा. १५४) सालचे लेख; अजमेरच्या राजपुताना म्यूझियममध्यें असलेला ४८१ सालचा नगरीचा शिलालेख आणि कोट्याजवळील कणस्व्याचा शिलालेख (इं. अँ. पु. १९. पा. ५९) पहा ]. यांतील कांही ठिकाणी ह्या संवताच्या सालास कृत हें नांव दिलेलें आढळतें. प्राचीन काळीं शकाच्या गत वर्षांस चारानें भागून एक, दोन, तीन किंवा शून्य ( म्हणजे चार ) बाकी उरली असतां त्या सालास अनुक्रमें कलि, द्वापर, त्रेता किंवा कृत हें नांव जींत दिले जात होतें अशी एक युगमानाची कालमापनपद्धति प्रचारांत होती [ आर. शामशास्त्री यांचें गवामयन पा.३, १३८; व जैनांचे भगवती सूत्र १३७१-७२, गवामयन पा. ७२ पहा ]. तिला अनुसरूनच बहुधा सदरहू ठिकाणीं या सालांस कृत म्हटलें असावें. कारण, कृत संज्ञा असलेले, ४२८ सालचा विजयमंदिरगढचा [ फ्ली. गु. इं. पा. २५३], ४६१ सालचा मंदसोरचा, ४८० सालचा गंगधारचा [फ्लि.गु.इं.पा.७४] व ४८१ सालचा नगरीचा असे जे चार लेख उपलब्ध आहेत त्यांतील दुसर्याचें वर्ष वर्तमान व तिसर्याचें गत असल्याचें त्या लेखांवरूनच दिसतें. राहिलेल्यांपैकीं पहिल्याचें वर्ष गत व चौथ्याचें वर्तमान मानलें व वर्तमान वर्षाचें गत वर्ष करण्याकरितां दुसर्या व चौथ्या लेखांच्या संवतांतून एक एक वजा केला तर वरील नियमाप्रमाणें ही चारहि वर्षै कृत असल्याचें आढळून येईल.
ह्या शकाच्या आरंभापासून जवळ जवळ साडे नऊशें वर्षे होऊन जाईपर्यंत विक्रम ह्या नांवाचा त्याच्याशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असल्याचें उपलब्ध झालेल्या लेखांवरून दिसून येत नसल्यामुळें या शकाचें मालव संवत् हेंच मूळ नांव असून मागून केव्हां तरी त्याला विक्रम संवत् म्हणू लागले असावे असें विद्वान् लोकाचें मत झालें आहे. समुद्रगुप्तानें मालव लोकांस कह्यांत आणलें होतें असा पुरावा मिळाला असल्यानें [ फ्ली. गु. इं. पा. ८] मालव लोक ही एक स्वतंत्र राष्ट्रजाति होती असें अनुमान निघतें. जयपूर संस्थानांत [ कर्कोटक] नगर येथें ‘मालवान (नां) जय (य:)’ असा लेख असलेलीं कांहीं नाणीं सांपडलीं [ क. आ. स. रि. पु. ६, पा. १८२ ] असून त्यांचा काल ख्रि. पू. २५० पासून ख्रिस्तोत्तर २५० पर्यंतच्या ५०० वर्षांतील असावा असें त्यांच्या लिपीवरून दिसतें. यावरून असें संभवनीय दिसतें कीं अवंतीचें राज्य जिंकून मालव लोक तेथें वसाहत करून राहिले तेव्हां त्यांनी आपल्या विजयाचें स्मारक म्हणून उपर्युक्त नाणीं पाडलीं व मालव संवत् सूरू केला; आणि ह्या मालव लोकांवरूनच अवंतीच्या आसमंतांतील प्रदेशास माळवा हें नांव मिळालें.
गुप्त घराण्यांतील दुसर्या चंद्रगुप्ताची जीं नाणीं सांपडलीं आहेत त्यांच्या दुसर्या बाजूवर ‘ श्रीविक्रम’ ‘ विक्रमादित्य,’ सिंहविक्रम व ‘ अजितविक्रम: ’ असे लेख आढळून येतात [ जॉन. अँलन संपादित गुप्तांच्या नाण्यांची सूचि ]. हा चंद्र गुप्त मोठा पराक्रमी राजा असून त्यानें माळवा प्रांतहि काबीज केला होता. यावरून काहीं विद्वानांनी असा तर्क केला आहे कीं, चंद्रगुप्तानें माळवा जिंकल्यावर (चौथ्या शतकाच्या अखेर किंवा पांचव्याच्या आरंभी) तेथील संवतास त्याचें नांव जोडलें जाऊं लागलें असावें. परंतु सदरहू चंद्रगुप्तापूर्वी विक्रम नांवाचा दुसरा कोणी पराक्रमी राजा होऊन गेला नव्हता असें सिद्ध झाल्याशिवाय हा तर्फ बरोबर मानतां येत नाहीं [ भारतीय प्राचीन लिपिमाला पान १६७]. दुसर्या चंद्रगुप्तापूर्वी विक्रम नांवाचे आणखीहि कांही राजे होऊन गेले होते असें दिसतें. कारण इसवी सनाच्या आरंभीं बनलेल्या [ बाँ. गॅ. पु. १ भाग २ पा. १७१ व व्हि.स्मि. अ. हि. इं. पा. २०८. भांडारकर कॉमेमोरेशन व्हॉल्यूम पा. १८८-८९ मध्यें रा. देवदत्त भांडारकर यांनी गाथासप्तशती हालाची नाहीं असें जें दाखविलें आहे तें बरोबर नाहीं असें पं. ओझा यांनां वाटतें ( प्राचीन लिपिमाला, पा. १६८).] हालाच्या गाथासप्तशतींत विक्रम नामक राजाचा उल्लेख आलेला आहे [ वेबरचें संस्करण, गाथा ४६४ पहा ]; व इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसर्या शतकांत रचिलेल्या [ बाँ. गॅ. पु. १ भा. २ पा. १७०-७१- हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचरमध्यें वेबरनें गुणाढ्याचा काळ इ. स. चें सहावे शतक असें जें म्हटलें आहे तें निराधार आहे असें पं. ओझा म्हणतात ( भारतीय प्राचीन लिपिमाला; पा. १६८ ).] पैशाची बृहत्कथेचें सोमदेवभट्टाचें कथासरित्सागर नांवाचें जें संस्कृत रूपांतर उपलब्ध आहे त्यांतही [ लंबक ६ तरंग १ व लंबक ७ तरंग १ पहा ] उज्जयिनीच्या विक्रम राजाच्या कित्येक गोष्टी आलेल्या आहेत. सारांश, विक्रम हा एक तर ज्या मालव लोकानीं विजय संपादून नाणीं पाडलीं म्हणून वर म्हटलें आहे त्यांचाच पुढारी असेल किंवा तसें नसल्यास तो दुसर्या चंद्रगुप्ताच्या पूर्वीचा दुसरा कोणी राजा असला पाहिजे.
कलचुरिशक:- ह्या [ इं. अँ. पु. २०, पा. ८४; क. आ. स. रि. पु. १७, आकृतिपट २०] शकास चेदि संवत् [ इं. अँ. पु. १८, पा. २११ व पु. २२ पा. ८२] किंवा त्रैकूटक संवत् [ केव्ह टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया, पा. ५८ व आकृतिपट ] असेंहि म्हणत असत. हा शक कोणीं सुरू केला हें समजत नाहीं. डॉ. भगवानलाल इंद्रजी [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०५, पा. ५६६ ] यांच्या मतें महाक्षत्रप ईश्वरदत्त, डॉ. फ्लीट [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०५, पा. ५६८ ] यांच्या मतें अभीर ईश्वरदत्त किंवा त्याचा बाप शिवदत्त, व रमेशचंद्र मुजुमदार [इं. अँ. पु. ४६, पा. २६९-७०] यांच्या मतें कुशनवंशी कनिष्ट राजा ह्या शकाचा प्रवर्तक असावा. परंतु हीं सर्व अनुमानेंच असल्यामुळें त्यांवरून निश्चितार्थावबोध होऊं शकत नाहीं.
हा शक ज्या लेखांत सांपडतो ते गुजरात वगैरे प्रांतांतील चालुक्य, गुर्जर, सेंद्रक, कलचुरि व त्रैकूटक वंशी पुरूषांचें व चेदि देशांत- म्हणजे मध्यप्रांताच्या उत्तरेकडील भागांत राज्य करणार्या कलचुरि उर्फ हैहयवंशी राजांचे असून ते गुजराथेंत, कोंकणांत किंवा मध्यप्रांतांतच बहुधा आढळून येतात. ह्यांपैकी बरेसचे लेख कलचुरि उर्फ हैहयवंशी राजांचे असून त्यांतच ह्या शकास कलचुरि किंवा चेदि हें नांव दिलेलें असल्यामुळें, त्या वंशातीलच एखाद्या राजाने हा शक सुरू केला असणें संभवनीय आहे.
त्रिपुरीचा कलचुरि राजा नरसिंहदेव याच्या दोन लेखांत कलचुरि शक ९०७ [ ए. इं. पु. २, पा. १०-१३] व ९०९ [ इं. अँ. पु. १८, पा. २१२-१३ ] दिले असून विक्रम संवत् १२१६ [ इं. अँ. पु. १८,. पा. २१४ ] मधील त्याचा तिसरा एक लेख उपलब्ध आहे. यावरून कलचुरि शकाचा आरंभ विक्रम संवताच्या चौथ्या शतकाच्या आरंभाच्या सुमारास, म्हणजे इसवी सनाच्या तिसर्या शतकाच्या मध्यांत केव्हां तरी झाला असावा हें उघड आहे कीं, विक्रम संवत् ३०६ च्या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून [ इं. अँ. पु. १७, पा. २१५; ए. इं. पु. २ पा. २९९ ] म्हणजे इ. स. २४९ च्या २६ ऑगस्टपासून कलचुरि शकाचा आरंभ होतो असें धरलें असतां त्या शकाच्या शिलालेखांतील व दानपत्रांतील तिथी दिलेल्या वारीं पडतात. या शकाची वर्षे बहुधा वर्तमानच [ इं. अँ. पु. १७ पा. २१५ टिपण ५ ] दिलेलीं असतात व त्यांवरून इसवी सनाचें साल काढण्यास आश्विनारंभापासून पुढील तीन चार महिन्यांत (दिसेंवरअखेरपर्यंत) त्यांमध्ये २४८ व इतर महिन्यांत २४९ मिळवावें लागतात. ह्या शकाच्या जुन्यांत जुन्या लेखांतील साल २४५ [ कन्हेरीचा ताम्रपट – केव्ह टेंपल्स आँफ वेस्टर्न इंडिया पा. ५८ ] असून सर्वांत अलीकडचा लेख ९५८ [ क. आ. स. रि. पु. २१, पा. १०२ आकृतिपट २७ ] सालचा आहे. यावरून इसवी सनाच्या अजमासें तेराव्या शतकाच्या आरंभापासून हा शक प्रचारांतून नाहींसा झाला असावे असें दिसतें.
गुप्त अथवा वलभी शक:- ह्या शकाचे जे लेख सांपडले आहेत त्यांमध्यें गुप्तकाल, गुप्तवर्ष इत्यादि प्रकारचे शब्दप्रयोग [ फ्लीट; गु.इं.पाने ६०-६१,१०७ व प्रस्तावना पानें २९-३०; इं.अँ. पु.२,पा.२५८; आणि भां. कॉ.व्हा. ( भांडारकर कॉमेमोरेशन व्हॉल्यूम ) पान २०३ पहा ] आढळून येत असल्यामुळें त्याचा प्रवर्तक कोणी तरी गुप्त राजा असला पाहिजे हें उघड आहे. समुद्रगुप्ताच्या अलाहाबादच्या लेखांत गुप्तवंशांतील गुप्त व घटोत्कच ह्या पहिल्या दोन राजांच्या नांवांमागें फक्त महाराज हीच उपाधि लाविली असून घटोत्कचाच पुत्र पहिला चंद्रगुप्त यास ‘ महाराजाधिराज ’ असें म्हटलें असल्यामुळें, आणि पहिल्या चंद्रगुप्ताचा नातू व समुद्रगुप्ताचा पुत्र जो दुसरा चंद्गगुप्त त्याच्या कारकीर्दीतील ८२ पासून ९३ पावेतोंच्या गुप्तवर्षांचे शिलालेख [ फ्लीट; गु. इं. पा. २५ व ३१-३२ पहा ] सांपडले असल्यामुळें, विद्वान् लोकांनीं त्यांवरुन असा तर्क केला आहे कीं, गुप्तवंशात पहिला चंद्रगुप्त हा मोठा प्रतापी राजा होऊन गेला असावा व त्यानें सिंहासनारूढ झाल्यावर हा शक सुरू केला असावा. गुप्तांच्या मागून काठेवाडांत वलभीचें राज्य उदयास आलें होतें. ह्या राज्याचा अस्त झाल्यावर तेथील लोक गुप्त शकास वलभी शक असें नांव देऊन तो वापरूं लागले असतील असें वाटतें. कारण ज्याच्यामध्यें गुप्त शकाच्या ऐवजी वलभी शक हें नांव घातलें आहे असा काठेवाडांतील सर्वांत जुना लेख म्हणजे वलभी शक ५७४ मधील ऊना गांव येथें मिळालेलें दानपत्र [ ए. इं. पु. ९, पा. ६ ] होय.
अलबेरुणीनें आपल्या ग्रंथांत शालिवाहन शकांतून सहाचा घन व पांचाचा वर्ग, म्हणजे २४१ वजा केले असतां वलभी किंवा गुप्त शक निघतो असें अगोदर सांगून, पुढें विक्रम संवत् १०८८ मध्यें शालिवाहन शक ९५३ व गुप्त किंवा वलभी शक ७१२ पडतो असें लिहून ठेविलें आहे [ सा. अ. इं (एडवर्ड साचो अनुवादित अलबेरूणीज इंडिया) पु. २, पा. ७ आणि फ्लीट; गु. इं. प्रस्तावना पानें ३०-३१ पहा ]. एकाच शकास दोन नांवे असण्याचें कारण त्यानें असें दिलें आहे कीं, गुप्त वंशातील शेवटचा पुरूष वलभ हा काठेवाडांतील वलभीपुरचा राजा होता व त्यानेंच गुप्तशकास आपलें नाव देऊन तो पुढें चालू ठेविला. अलबेरूणी हा गुप्त शकाचा आरंभ झाल्यावर अजमासें ७०० वर्षांनीं हिंदुस्थानांत आला असल्यामुळें, त्याला त्या शकाच्या उत्पत्तीविषयीं खरी माहिती कळण्यास संभव कमी होता. म्हणून गुप्त वंशात वलभ नांवाचा राजा होऊन गेल्याविषयीं जोंपर्यंत आपणांस कांही प्रत्यक्ष पुरावा सांपडत नाहीं, तोंपर्यंत गुप्त शकास वलभी हें नांव वलभ नामक राजाच्या नांवावरूनच पडलें होतें असें मानणें युक्त होणार नाहीं. वलभीपूर ह्या शहरावरूनहि गुप्त शकास तें नांव मिळणें असंभवनीय नाहीं. गुजराथच्या अर्जुनदेव चौलुक्याच्या कारकीर्दीतील वेरावलचा एक शिलालेख [ इं अँ. पु. ११, पा. २४२] मिळाला आहे त्यामध्यें रसूल महंमद संवत् म्हणजे हिजरी सन, विक्रम संवत् व वलभी शक हे तीनहि दिले असल्यानें त्यावरूनहि आपणांस गुप्त किंवा वलभी शकाचा आरंभकाल निश्चित करतां येतो. ह्या लेखांत कार्त्तिकादि [ कारण, त्यांत दिलेल्या हिजरी सन ६६२ चा आरंभ चैत्रादि विक्रम संवत् १३२० च्या मार्गशीर्ष शुद्ध २ स होतो ] विक्रम संवत् १३२० च्या म्हणजे चैत्रादि विक्रम संवत् १३२१ च्या आषाढ महिन्यांत वलभी शक ९४५ दिला आहे. यावरून व अलबेरूणीनें दिलेल्या उदाहरणावरून गुप्त शकाचा आरंभ चैत्रादि विक्रम संवताचीं ३७६ किंवा शालिवाहन शकाचीं २४१ वर्षे उलटून गेल्यावर, म्हणजे इ.स. ३१९ मध्यें झाला असला पाहिजे असें निघतें. अर्थात् चैत्रारंभापासून पुढील ९ महिन्यांत ( वस्तुत: दिसेंबरअखेरपर्यंत) गुप्त शकाच्या गत वर्षांमध्यें ३१९ व इतर महिन्यांत ३२० मिळविलें असतां इसवी सनाचें वर्ष येईल. ह्या शकाचा वर्षारंभ चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून होत असे व त्याचे महिने पौर्णिमांत असत [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १७५]. ह्या शकाची बहुधा गत वर्षेच देत असत. तथापि कधीं कधी वर्तमान वर्ष दिलेलेंहि आढळून येंतें. उदाहरणार्थ, खेडा येथें मिळालेल्या धरसेन (चौथा) नामक वलभी राजाच्या दानपत्रांत गुप्त शक ३३० मध्यें मार्गशीर्ष महिना अधिक दिला आहे [ इं. अँ. पु. १५ पा. ३४० ], तेथें गुप्त शकाचें साल गत आहे किंवा वर्तमान आहे याचा उल्लेख केला नाहीं. पण मार्गशीर्ष महिना मध्यममानाप्रमाणें विक्रम संवत् ७०५ मध्यें अधिक येत असल्यामुळें, या लेखांतील गुप्त शक वर्तमान धरल्याशिवाय त्याची वेरावेलच्या लेखाशीं व अलबेरूणीच्या उदाहरणाशीं संगति लागणार नाहीं. पूर्वी हा शक उत्तरेस नेपाळापासून दक्षिणेस काठेवाडापर्यंत प्रचलित होता. याचा शेवटचा लेख वलभी शक ९४५ म्हणजे इसवी सन १२६४ मधील आहे [ इं. अँ. पु. ११ पा. २४२ ].
गांगेय शक:- कलिंग नगर ( म्हणजे मद्रास इलाख्याच्या गंजम जिल्ह्यांतील पर्लाकिमेडीपासून २० मैलांवर असलेलें मुखलिंग ) येथें राज्य करणार्या गंगावंशी राजांच्या कित्येक दानपत्रांत हा शक दिलेला आढळून येतो [उदाहरणार्थ, सत्यवर्मदेवाचें ३५१ सालचें ( इं. अँ. पु. १४, पा. १२ ) व अनंतवर्मदेवाचें ३०४ सालचें ( ए. इं. पु. ३, पा. १८ ) दानपत्र पहा ]. यावरून ह्या शकाचा प्रवर्तक कोणी तरी गंगावंशी राजा असला पाहिजे असें अनुमान निघतें. परंतु हा राजा कोण होता याचा मात्र अद्याप शोध लागला नाहीं. ह्या शकाचे जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यांत तिथीबरोबर कोठेंहि वार दिलेला नसल्यामुळें त्याचा आरंभ केव्हापासून होतो हें ठरविणेंहि दुष्कर झालें आहे.
मद्रास इलाख्याच्या गोदावरी जिल्ह्यांत महाराज प्रभाकर वर्धनाचा पुत्र राजा पृथ्वीमूल ह्याच्या कारकीर्दीच्या २५ व्या वर्षांतील जें एक दानपत्र [ ज. ए. सो. मुंबई, पु. १६, पा. ११६-१७ ] सांपडलें आहे त्यांत लिहिलें आहे कीं, ‘मितवर्म्याच्या ज्या इंद्राधिराज पुत्रानें दुसर्या राजांबरोबर जाऊन इंद्रभट्टारकास राज्यच्युत करण्याच्या कामीं यश संपादन केलें त्याच्या विनंतीवरून मीं चुयिपाक गांव ब्राह्मणांस दान दिला आहे.’ आतां ह्या लेखांत उल्लेखिलेला इंद्रभट्टारक जर डॉ० फ्लीट [ इं. अँ. पु. १३, पा. १२०] ह्यांनीं अनुमान केल्याप्रमाणें वेंगी देशचा त्याच नांवाचा पूर्वचालुक्य ( सोळंकी ) राजा असला, तर हें दानपत्र इं. स. ६६३ च्या सुमारास तयार झालें असावें. कारण, ह्या साली वेंगी देशाचा चालुक्य राजा जयसिंह मरण पावला असून त्याच्या नंतर त्याचा धाकटा भाऊ इंद्रभट्टारक ह्यानें अवघे सातच दिवस राज्यपदाचा उपभोग घेतला होता [ गौ. सो. प्रा. इ. ( गौरीशंकर हीराचंद ओझाकृत सोळंकियोंका प्राचीन इतिहास ) भाग १ पा. १४२ ]; आणि सदरहू दानपत्रांतील इंद्राधिराज हा, ज्याचीं [ गांगेय] ‘संवत्’ ८७ व ९१ सालचीं दानपत्रे उपलब्ध झालीं आहेत तो वेंगी देशच्या शेजारींच असलेल्या कलिंग नगरचा गंगावंशी इंद्रवर्मा राजा आहे हें डॉ० फ्लीटचें [ इं. अँ. पु. १३ पा. १२० ] दुसरें अनुमान बरोबर धरलें तर, इंद्रभट्टारकाशीं युद्ध होईपावेतों इंद्राधिराजास राज्यपद मिळालें असेल असें दिसत नसल्यामुळें [ भारतीय प्राचीन लिपिमाली पा. १७६ ], इंद्राधिराजाचें गांगेय शक ८७ तील दानपत्र इसवी सन ६६३ च्या युनंतरचें असलें पाहिजे. यावरून गांगेय शक ८७ हा इ. स. ६६३ नंतर थोड्याच वर्षांनीं आला असावा व म्हणून त्या शकाचा आरंभ इसवी सन ( ६६३-८७= ) ५७३ नंतर लवकरच पुढें केव्हां तरी झाला असावा असें अनुमान निघतें.
गोवें येंथें मिळालेल्या दुसर्या एका दानपत्रांत [ ज. ए. सो. मुंबई, पु. १० पा. ३६५ ] असें म्हटले आहे कीं, ‘ रेवती द्वीपांत राहणार्या ’ चार जिल्ह्यांचा अधिपति असलेल्या बप्पूरवंशी सत्याश्रय-ध्रुवराज-इंद्रवर्म्यानें पृथ्वीवल्लभ महाराजाच्या ( चालुक्य राजा मंगळीश्वर याच्या) आज्ञेनें विजयराज संवत्सर २० म्हणजे शककाल ५३२ मध्यें माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी खेटाहार देशांतील कारेल्लिका गांव शिवार्यला दान दिला.’ डॉ. फ्लीट यांनी सत्याश्रय-ध्रुवराज इंद्रवर्मा हा राजसिंह इंद्रवर्म्याचा आजा किंवा दुसरा कोणी पूर्वज असावा व त्यानेंच आपल्या अधिकारप्राप्ती पासून गांगेय शक सुरू केला असाव असें धरून, शके ( ५३२-२० = ) ५१२-म्हणजे इ. स. ५९०- मध्ये या शकाचा आरंभ झाला असें ठरविलें आहे [ ए. ब्रि. पु. १३; पा. ४९६ व भारतीय प्राचीन लिपिमाला पान १७६ टीप ६ ].
आतांपंर्यंत ह्या शकाचे जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यांतील पहिला, गांगेय शक ८७ मधील असून शेवटचा ३५१ सालचा आहे.
हर्ष शक:- हा शक ठाणेश्वरचा बैसवंशी श्रीहर्ष उर्फ शिलादित्य राजा सिंहासनारूढ झाल्यापासून सुरू झाला असें मानण्यांत येते; तथापि ज्यांत ह्या शकास श्रीहर्षाचें नांव जोडलें आहे असा एकहि लेख अद्याप मिळालेला नाहीं [ हर्षाच्या दोन्हीहि दानपत्रांत केवळ संवत् हाच शब्द वापरला आहे ( ए. इं. पु. १ पा. ७२ व पु. ४ पा. २११ पहा)]. अलबेरूणीनें म्हटलें आहे कीं, विक्रमादित्यानंतर ६६४ वर्षांनीं श्रीहर्ष झाला असें मीं काश्मीरच्या एका पंचांगांत वाचलें आहे [ सा. अ. इं. पु. २ पा. ५ ]. अलबेरूणीच्या सदरहू विधानाचा अर्थ असा जर घेतला कीं, विक्रम संवत् ६६४ पासून हर्ष शकास प्रारंभ होतो, तर विक्रम संवतांत ६६३ म्हणजे इसवी सनांत ६०६ किंवा ६०७ मिळविले असतां हर्ष शकाचें वर्ष निघतें असें होईल. अलबेरूणीनें दुसर्या एका ठिकाणीं विक्रम संवत् १०८८ मध्यें हर्षं शक १४८८ पडतो असेंहि एक विधान करून ठेविलें आहे [ सा. अ. इं. पु. २, पा. ७; फ्लीट; गु. इं. प्रस्तावना पा ३०- ३१ ]. पण ह्या दुसर्या विधानांतील हर्ष शकाचा एकहि लेख अद्याप कोठें सापडला नाही; इतकेंच नव्हे तर उलट पक्षीं हर्ष शक ० = इ. सन ६०६ (विक्रम संवत् ६६३) धरून ब्रह्मसिद्धांतानुसार गणित केलें असतां, इ०स० ६४० ( विक्रम संवत् ६९७) मध्यें पौषमास अधिक येऊन नेपाळच्या अंशुवर्म्याच्या लेखांतील [की. लि. इं. नॉ. इं. ( कीलहॉर्नसंगृहीत लिस्ट ऑफ इन्स्क्रिप्शन्स ऑफ नॉर्दर्न इंडिया) पा. ७३ लेख नं. ५३० ] ‘ संवत् ३४ ’ हें हर्ष शकाचें साल आहे असें दाखवितां येतें [ इं. अँ. पु. १५ पा. ३३८ ]. अर्थात् हर्ष शकाचा आरंभ इ ० स० ६०६ मध्येंच होत असावा व अलबेरूणीच्या दुसर्या विधानांतील हर्षसंवत् १४८८ हें एखाद्या निराळ्याच हर्ष शकाचें साल असावें असें आपणांस मानलें पाहिजे. हा शक संयुक्त प्रांतांत व नेपाळांत सुमारें ३०० वर्षें प्रचारांत राहू पुढें त्याचा अस्त झाला [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १७७].
भाटिक उर्फ भट्टिक शक:- हा शक जेसलमीरच्या दोन शिलालेखांत सांपडला आहे. जेसलमीरच्या राजघराण्याचा मूळपुरूष भट्टि किंवा भट्टिक नांवाचा राजा असून त्याच्या नांवावरूनच त्याचे वंशज स्वत:स भाटी असें म्हणवीत असतात. तेव्हां सदरहू लेखांतील शक भट्टिक राजानेंच सुरू केला असावा असें दिसतें. उपयुक्त शिलालेखांवरून व जेसलमीरच्या राजांविषयीं जी महिती उपलब्ध आहे तिजवरून या अनुमानास पुष्टीच मिळतें. कारण, ह्या दोन शिलालेखांपैकी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरांतील वैरिसिंह राजाच्या वेळच्या शिलालेखांत विक्रम संवत् १४९४ व भाटिक शक ८१३ दिला असून महादेवाच्या मंदिरांतील भीमसिंह सावळाच्या कारकीर्दीतील लेखांत भाटिक शक ९९३ च्या मार्गशीर्ष महिन्यांत विक्रम संवत् १६७३ व शालिवाहन शक १५३८ लिहिला आहे [ प्रो. श्रीधरपंत भांडारकर यांचा संस्कृत पुस्तकांच्या शोधासंबंधी इ. स. १९०४-५ व १९०५-६ सालचा अहवाल पानें अनुक्रमें ९५ व ९८ पहा ]. ह्या दोन्ही लेखांवरून भाटिक शक व विक्रमसंवत् यांतील अंतर अनुक्रमें ६८१ व ६८० वर्षे निघतें. आतां जोधपूर येथें प्रतिहार बाऊक याचा विक्रम संवत् ८९४ चा जो लेख मिळाला आहे त्या वरून आपणांस असें कळतें कीं, बाउकाच्या शीलुक नामक निपणज्यानें देवराज भट्टिक याचा पराजय केला होता [ कीं.लि. इं. नॉ. इं. पा. ४७ लेख नं. ३३० ]. प्रत्येक राजाची कारकीर्द सरासरीनें २० वर्षें धरलीं असतां बाउकाच्या निपणज्याचा समकालीन जो देवराज यांच्या दरम्यान एकंदर पांच राजे झालें असल्यामुळें [ मेजर अर्सकिनचें जेसलमीरचें गॅझेटियर पानें ९, १० व कोष्टक नंबर ५ पहा ], पूर्वीप्रमाणेंच प्रत्येक राजाची कारकीर्द सरासरी २० वर्षें धरून हिशेब केला असतां भट्टिकाचा काळ विक्रम संवत् ६८० च्या जवळ जवळच येऊन ठेपतो [ चारण रामनाथ रत्न यानें आपल्या ‘ इतिहास राजस्थान ’ पुस्तकांत भट्टिकाचा काळ वि. सं.३३६-३५२ ( पा. २३२) व देवराज याचा काल वि. सं. ९०४-१०३० दिला आहे तो बरोबर नाहीं असें पंडीत ओझा म्हणतात ]. जेसलमीरच्या राज्यांतील पुरातन लेखांच्या संशोधनाचें काम अद्याप कांहीच झालें नसल्यामुळें हा शक कोठपासून कोठपावेतों प्रचारांत होता हें आज सांगतां येणें शक्य नाहीं.
कोल्लम उर्फ कोलंब शक:- ह्या शकास संस्कृत लेखांत कोलंब वर्ष [ इं. अँ. पु. २, पा. ३६० ] व तामिळ मध्यें कोल्लम आंडु म्हणजे पश्चिमेकडील वर्ष असें म्हटलेलें आढळून येतें. हा शक कोणीं व कशाकरितां सुरू केला याविषयीं कांहीच निश्चियात्मक माहिती मिळत नाहीं. परंतु त्यास कोल्लम वर्षांप्रमाणेंच कोठें कोठें कोल्लमच्या उत्पत्तीपासूनचें वर्ष असेंहि म्हटलेलें सांपडत असल्यावरून, मलबार प्रांतांत पश्चिम किनार्यावर कोल्लम अथवा कोलंबपत्तन [मुंबई गँझेटिअर पु. १, भाग १, पा. १८३, टीप १] नांवाचें जें प्राचीन नगर आहे त्याचा ह्या शकाशी कांही तरी संबंध असावा असें वाटतें. तथापि, बर्नेल म्हणतो [ ब. सा. इं. पॅ. पा. ७३] त्याप्रमाणें तो किल्लोन शहराच्या स्थानेपासूनच सुरू झाला असें मात्र कदापि म्हणतां येणार नाहीं. कारण, हा शक इ. स. ८२५ च्या सुमारास चालू झाला आहे; पण किलोन शहराच्या नांवाचा उल्लेख तर इसवी सनाच्या सातव्या शतकांतील लेखांत आढळून येतो [ इंपिरियल गॅझेटिअर ऑफ इंडिया, पु. २१ पा. २२पहा]. तेव्हां, किलोन शहर कोल्लम शकाहूनहि प्राचीन असलें पाहिजे हें उघड आहे. या शकाच्या उत्पत्तीविषयीं श्रीयुत गोपीनाथराव यांचें असें अनुमान आहे कीं [ त्रा. आ. सी. ( त्रावणकोर आर्किऑलॉजिकल सीरीज) पु. २, पा. ७६; ७८-७९. व प्राचीन लिपिमाला द्वितीयावृत्ति पा. १७९ टीप ३], इसवी सन ८२५ मध्यें मरूवान् सपीर नामक कोणी एक ख्रिस्ती व्यापारी आणखी कांही ख्रिस्ती मंडळीनां बरोबर घेऊन कोल्लम बंदरांत आला असावा व त्या प्रसंगाच्या आठवणीकरितां म्हणून तेथील राजानें त्या व्यापार्याचें जहाज बंदरांत आलें त्या दिवसापासून हा शक सुरू केला असावा. ह्या तर्काची इमारत कोट्टयंच्या ख्रिस्त्यांजवळ मिळालेल्या ज्या एक वट्टेळुत्तु लिपीच्या ताम्रपटावर उभारलेली आहे, त्यांत एवढेंच म्हटलें आहे कीं, मरूवान् सपीर यानें कोल्लम येथें तिरिस्सापल्लि ( म्हणजे ख्रिस्त्यांचें प्रार्थनामंदीर ?) बांधिलें; व [ मलबारचा राजा ] स्थाणुरवि याच्या कारकीर्दीत राजमंत्री विजयराघवदेवर वगैरे मंडळींच्या सल्ल्यानें स्थानिक अधिकारी आय्यंडिगळ् तिरुवडी यानें त्या मंदीरास कांहीं जमीन इनाम दिली व त्यास साहाय्य करण्याकरितां त्याच्या स्वाधीन कांही कुटुंबे करून थोडेसे अधिकारहि त्यास दिले. ह्या लेखांत कोणताहि शक दिला नसतां केवळ लिपीवरूनच त्याचा काळ ठरवून व आणखी दुसर्या कित्येक गोष्टी पुरेशा आधारावांचून गृहीत धरून गोपीनाथ राव यांनीं जें अनुमान केलें आहे तें पंडित ओझा यांनां ग्राह्य वाटत नाहीं [ भारतीय प्राचीन लिपिमाला द्वितीयावृत्ति पा. १७९ टीप ३]. कोणी असेंहि म्हणतात कीं, मलबारचा राजा चेरूमान पेरूमाल यानें मक्केस प्रयाण केल्यापासून या शकाचा आरंभ झाला असावा. ‘तुहफुतुल् मजहिदीन ’ नामक पुस्तकाचा कर्ता, चेरूमान् हा हिजरी सन २०० म्हणजे इसवी सन ८१५-१६ मध्यें मुसुलमान झाला असें सांगतो. अरबस्थानच्या किनार्यावर जुफहार नामक ठिकाणीं मलबारच्या अब्दुर्रहमान सामिरीची जी कबर दाखवितात तिजवर हा चेरूमान हिजरी सन २०२ मध्यें तेथें पोंचला व २१६ त मरण पावला असें लिहिलें असल्याचें म्हणतात [ इं. अँ. पु. ११ पा. ११६; ड. क्रॉ. इं. ( डफ; क्रानॉलॉजि ऑफ इंडिया) पा. ७४]. परंतु एक तर हा लेख तेथें असल्याचें सिद्ध झालें नाहीं [ मलबार गॅझेटिअर पा. ४१ ] व दुसरें चेरूमान् बौद्ध झाला होता अशी मलबारांत सर्वसाधारण समजूत आहे [ भारतीय प्राचीन लिपिमाला ]. तेव्हा ही दुसरी असंभवनीय उपपत्तीहि त्याज्यच ठरविली पाहिजे. शंकराचार्यांच्या मृत्यूपासून या शकाचा आरंभ होतो असेंहि कांही लोकांचें म्हणणें आहे. शंकराचार्यांचा जन्म विक्रम संवत् ८४५ [ यज्ञेश्वर शास्त्री यांचें आर्यविद्यासुधारकर पा. २२६-२७ ] म्हणजे इं. स. ७८८ सालीं झाला. व केरळोत्पत्तीप्रमाणें ते आपल्या ३८ व्या वर्षी मरण पावले असें जर आपण धरून चाललों, तर ह्या तिसर्या उपपत्तीप्रमाणें कोलंब शकाचा आरंभ ८२६ मध्यें पडूं शकतो हें खरें आहे. परंतु मलबारांतील दंतकथेशिवाय ह्या समजुतीस दुसरा आधार नसल्याकारणानें तिला विशेष महत्त्व देतां येत नाहीं.
कोल्लम शक यास मलबारांतील लोक ‘ परशुरामाचा संवत् ’ असें म्हणतात व तो एक हजार वर्षांचें एक चक्र असून सांप्रत त्याचें चौथें चक्र चालू आहे अशी त्यांची समजूत आहे. परंतु ज्या अर्थी इ. स. १८२५ सालीं त्याची १००० वर्षे पुरी झालीं असतांहि पुन्हां एकापासून त्याची गणना सुरू करण्याऐवजीं तो १००० च्या पुढेंच मोजण्यांत येत आहे, त्या अर्थी त्याला एक हजार वर्षांचें चक्र मानण्यास आपणांस कांहीच आधार नाहीं. त्रिवेंद्रम् येथें मिळालेल्या एका शिलालेखांत [ त्रा. आ. सी. पु २, पा. २८] ( वर्तमान) कलियुग संवत् ४७०२ बरोबर कोल्लम शक ७७६ दिला आहे. यावरून गत कलियुग संवत् व काल्लेम शक यांच्यामधील अंतर ( ४७०१-७७६=) ३९२५ वर्षें निघतें. बर्नेलच्या मतें ह्या शकाचा आरंभ इसवी सन ८२४ च्या सप्टेंबर महिन्यांत होतो [ सा. इं. पॅ. पा. ७३]. डॉ. हॉर्न यांनी कोल्लम शकाच्या कित्येक शिलालेखांतील संक्राती, वार वगैरे तपशीलांसंबंधी गणित करून कोल्लम शकाच्या सालांत ८२४ किंवा ८२५ मिळविले असतां इसवी सनाचें वर्षे निघतें असें ठरविलें आहे [ इं. अँ. पु. २५, पा. ५४]. दिवाण बहादूर एल. डी. स्वाभिकन्न पिल्ले हे इसवी सनांतून ८२५ वजा केले असतां कोल्लम शक निघतो असें धरून चालतात [इंडियन कॉनॉलॉजी पा. ४३ ].
हा शक मलबारपासून कन्याकुमारीपर्यंत व तिन्नवेल्लि जिल्ह्यांत अद्यापहि चालू आहे. याचें वर्ष सौर असतें व महिन्याचा आरंभ संक्रातीपासून होत. मलबारांत ज्या राशींत सूर्य असेल त्या राशीचेंच नांव महिन्याला देतात. परंतु तिन्नवेल्लि जिल्ह्यांत मेष महिन्यास वैशाख, वृषभ महिन्यास जेष्ठ, अशा रीतीनें बाराहि सौर महिन्यांस चैत्रवैशाखादि नांवेंच देण्यांत येतात. उत्तर मलबारांत वर्षारंभ कन्यासंक्रातीपासून म्हणजे सौर आश्विनापासून मानतात, पण दक्षिण मलबारांत व तिन्नवेल्लि जिल्ह्यांत तो सिंहसंक्रातीपासून म्हणजे सौर भाद्रपदापासून धरतात. ह्या शकाचा सर्वांत जुना लेख १४९ सालचा मिळाला आहे. [ए. इं पु. ९, पा. २३४].