प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

भरतखंडांत चालू असलेले शक:- आतां भारतीय कालगणनेकडेच लक्ष देऊं. या विषयाकडे लक्ष देणें म्हणजे अनेक अधिक यशस्वी आणि कमी यशस्वी प्रयत्‍न लक्षांत घेतले पाहिजेत. भारतांत शालिवाहन शक, विक्रम शक, फसली शक इत्यादि शकांचें अवलंबन आज होत आहे.

सप्तर्षिसंवत्:- ह्या संवताचा आरंभ वर्षप्रतिपदेपासून होत असून हल्लीं त्याचा प्रसार काश्मीर व त्याच्या आसमंतांतील डोंगरी मुलूख एवढ्याच भागांत, विशेषेंकरून ज्योतिषी लोकांमध्यें आहे, प्राचीन काळीं तो पंजाबांतहि प्रचलित होता तरी आतां त्या प्रांतांत त्याचा प्रचार राहिला नाहीं. याचे महिने पूर्णिमान्त असून वर्ष बहुधा वर्तमान लिहिण्याची चाल आहे. तथापि क्वचित् प्रसंगी गतवर्ष लिहिलेलेहि लेख आढळून येतात [ उदाहरणार्थ, कैय्यटरचित देवीशतकाच्या टीकेंतील शेवटचा श्लोक पहा (इं. अँ; पु. २० पा. १५४)]. या संवतांत शतकाचे आंकडे सोडून केवळ वरील वर्षेंच लिहिण्याची साधारणत: वहिवाट असल्यामुळे त्यास कच्चा संवत असें एक नाव आहे. याशिवाय तो काश्मीर वगैरे भागांत प्रचलित आहे म्हणून लौकिक काल किंवा लौकिक संवत्, डोंगरी मुलखांत त्याचा प्रचार असल्यामुळें पहाडी संवत् आणि पंचांगांत व शास्त्रीय विषयावरील ग्रंथांत तो वापरीत असल्यामुळे शास्त्रसंवत् अशीं त्यास आणखीहि नांवे पडलीं आहेत.

कलियुगाची २५ वर्षे होऊन गेल्यानंतर ह्या संवतास आरंभ झाला असें काश्मीर प्रांतात राहणारे लोक मानतात ( डॉ. बुहलरचा काश्मीरचा रिपोर्ट पान ६०). परंतु पुराणांत व ज्योतिषशास्त्रासंबंधीं ग्रंथांत तो कलियुगास आरंभ होण्यापूर्वीहि चालू होता असा उल्लेख आला आहे. याला सप्तर्षि संवत् असें नांव पडण्याचें कारण सप्तर्षि नक्षत्रांतील सात तार्‍यांच्या कल्पित गतीशीं याचा जोडलेला संबंध होय. अशी कल्पना आहे कीं, हे सात तारे अश्विनी आदिकरून २७ नक्षत्रांत प्रत्येकी शंभर शंभर वर्षेपर्यंत राहत असून २७०० वर्षांत त्यांचे सर्व नक्षत्रांतून एक वेळ भ्रमण होतें [ वाराही संहिता, अध्याय१३, श्लोक४; भागवत, स्कंध १२ अध्याय २ श्लोक २७-२८; आणि विष्णुपुराण अंश ४, अध्याय २४, श्लोक ५३-५४ ]. पुराणांत व ज्योतिषाच्या संहिताग्रंथांत सप्तर्षींची ही जी गति मानण्यांत आली आहे ती केवळ काल्पनिकच आहे. सिद्धांततत्त्वविवेकाचा कर्ता कमलाकरभट याला देखील ही गति संमत नव्हती [सिद्धांततत्त्वविवेक, भग्रहयुत्यधिकार. श्लोक ३२ ]. जेथें जेथें हा संवत् प्रचलित होता तेथें तेथें नक्षत्राचें नांव न लिहितां त्या नक्षत्रांतील सप्तर्षींचें कितवे वर्ष आहे एवढेच फक्त लिहिण्याचा प्रघात होता, व हल्लीहि तीच रीति चालू आहे. तथापि काश्मीरच्या पंचांगांत व दुसर्‍या कित्येक ग्रंथात [ उदाहरणार्थ, हस्तलिखित ‘ ध्वन्यालोक ’ इं. अँ; पु. २० पान १५१ ] कधीं कधीं संवताच्या अगदी आरंभापासूनचें वर्ष दिलेलें पहावयास मिळतें.

कल्हण पंडिताची राजतरंगिणी [ तरंग १, श्लोक ५२], विक्रम संवत् १७१७ चा चंबामध्यें मिळालेला एक लेख [ इं. अँ. पु.२०, पान १५२], त्याच सालीं लिहिलेलीं पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या ग्रंथसंग्रहालयांत असलेली काशिकावृत्तीची एक प्रत आणि विक्रम संवत् १७५० चें काश्मीर मधील एक पंचांग [ इं अँ. पु. २०, पा. १५०], या सर्व पुस्तकांत त्यांचा कालनिर्देश करतांना सप्तर्षि संवताबरोबरच दुसरे जे निरनिराळे शक दिले आहेत त्यांवरुन सप्तर्षि संवताचा इतर शकांशी पुढें दिल्याप्रमाणें संबंध दिसून येतो. कलियुग संवतांतून २५ वजा केले असतां, किंवा विक्रमसंवतांत ३०१९, इसवी सनांत ३०७५ किंवा ३०७६ व शालिवाहन शकांत ३१५४ मिळविले असतां सप्तर्षि संवत् येतो. उलटपक्षीं शतकांचे आंकडे गाळून लिहिलेल्या सप्तर्षि संवताच्या वर्षांत २४ किंवा २५ मिळविले असतां इसवी सनाचें, २५ मिळविले असतां कलियुग संवताचें, ४६ मिळविले असतां शालिवाहन शकाचें, व ८१ मिळविले असतां विक्रम संवताचें शतकांचे आंकडे नसलेलें साल निघतें. येथें एवढें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, वरील हिशेबांत ज्या विक्रम संवताचा उल्लेख आला आहो तो चैत्रापासून आरंभ होणारा असून इसवी सनाच्या पहिल्या तीन महिन्यांत, इसवी सनापासून सप्तर्षि संवत् काढावयाचा असला तर सामान्यत; एक वर्ष कमी व सप्तर्षि संवतापासून इसवी सन काढावयाचा असल्यास एक वर्ष अधिक मिळवावें लागतें. त्याचप्रमाणें येथें इसवी सनांचें व सप्तर्षि संवताचें साल वर्तमान, व विक्रमसंवताचें व शालिवाहन शकाचें साल गत धरलें आहे.

 कलियुग संवत्.- कलियुग संवतास ‘ भारतयुद्ध संवत् ’ व युधिष्टिर संवत् ‘ अशी दुसरी दोन नांवे असून त्याचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०२ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या १८ व्या तारखेस [ ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँन्ड एथिक्स’ मध्यें जगाच्या युगांसंबंधी माहिती देतांना कलियुगारंभाची तारीख १७ फेब्रुवारी दिली आहे]  प्रात: काळीं झाला असें मानण्यांत येतें. हिंदु कालगणनेंतील महायुगांतर्गत चार युगांपैकी कलि हें शेवटचे युग असून तें ४,३२,००० वर्षांचें असतें. द्वापर, त्रेता व कृत ही उलट क्रमानें कलीच्या पूर्वींची युगें आहेत, व त्यामंध्यें कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट वर्षें असतात. अशा ७१ महायुगांचे एक मन्वंतर होत असून १४ मन्वंतरें व सहा महायुगें झालीं कीं एक कल्प अथवा ब्रह्मदेवाचा दिवस होतो अशी कल्पना आहे. तितक्यांच वर्षांनी पुन्हां ब्रह्मदेवाची रात्र असल्यामुळें अहोरात्र मिळून ब्रह्मदेवाच्या दिवसांची एकंदर ८,६४,००,००,००० वर्षे होतात.

ह्या संवताचा ज्योतिषग्रंथांत व पंचांगांतच विशेषेंकरून उपयोग केला जात असतो, तरी तो कधी कधीं शिलालेखांतहि वापरलेला आढळून येतो [ इं. अँ. पु. १४ पान २९० ].  प्रत्येक वर्षाच्या पंचागांत चैत्रादि विक्रम संवताचीं, शालिवाहन शकाची व कलियुग संवताची जीं गत वर्षे दिलेलीं असतात त्यांवरून असें दिसून येईल कीं, विक्रम संवतांत ३०४४, शालिवाहन शकांत ३१७९ व इसवी सनांत ३१०१ वर्षे मिळविलीं असतां कलियुग संवताचीं गत वर्षे निघतात. ऐहोळच्या डोंगरावरच्या जैन मंदिरांतील चालुक्यवंशी दुसर्‍या पुलिकेशीच्या शिलालेखांत [ ए. इं. पु. ६, पां ७] शालिवाहन शकाचीं व भारती युद्ध संवताचीं जीं वर्षै दिली आहेत त्यावरून शालिवाहन शकारंभाच्या ३१७९ वर्षै अगोदर भारती युद्ध झालें असें निघत असल्यामुळें, कलियुग संवत् व भारतयुद्ध संवत् हीं दोन्हीहि एकच आहेत असें ठरतें. कलियुग संवताच्या दुसर्‍या दोन नांवांवरून व उपरिनिर्दिष्ट शिलालेखांतील कालनिर्दैशावरून, भारतयुनंतर युधिष्टिरांचे राज्यारोहण झालें तेव्हांच कलियुग संवतास आरंभ झाला असला पाहिजे असें वाटण्याचा संभव आहे. परंतु संस्कृत वाङ्मयांत ह्यासंबंधीं परस्परविरूद्ध बराच पुरावा सांपडत असल्यामुळें त्यावरून भारत युद्ध व कलियुगारंभ ह्या दोन्ही समकालीन गोष्टी नाहींत असें म्हणणें प्राप्त होतें. वराहमिहिराच्या व कल्हण पंडिताच्या मतें कलियुगास आरंभ झाल्यावर भारती युद्ध झालें असें आहे. कारण वाराही संहितेंत [ सप्तर्षिचार, श्लोक३] शालिवाहन शकाच्या फक्त २५२६ वर्षे अगोदरच युधिष्टिरांचॆं राज्यारोहण ( म्हणजे भारती युद्ध ) झालें असें म्हटलें असून राजतरंगिणीमध्येंहि [ तरंग १,श्लोक ४९ व ५१ ] कलियुगारंभानंतर ६५३ वर्षांनीं, म्हणजे शकारंभाच्या २५२६ वर्षें अगोदर, कौरवपांडव ( म्हणजे भारती) युद्ध झालें असें दिलें आहे. उलट पक्षीं पुराणांन्वयें ( विष्णुपुराण, अंश ४, अध्याय २४, श्लोक ५५; व भागवत, स्कंध १२, अध्याय२, श्लोक २९) कृष्णाच्या स्वर्गारोहणापासून म्हणजे महाभारताप्रमाणें भारती युनंतर ५१ वर्षांनी [ इं. अँ. पु. ४०, पा. १६३-६४] कलियुगास आरंभ होतो. भारती युच्या काळासंबंधीं तर पुराणांपुराणांतच एकवाक्यता नसून त्यांत दिलेला भारतीयुचा सर्वांत प्राचीन काळ घेतला तरी, तो वराहमिहिरानें दिलेल्या काळाच्या अजमासें ९०० वर्षें व कलियुग संवतारंभाच्या अजमासें १५०० वर्षे अलीकडचा आहे. कारण परिक्षितीच्या जन्मानंतर- म्हणजेच भारतीयुनंतर-मत्स्य,वायु व ब्रह्मांड ह्या पुराणांप्रमाणें १०५०, विष्णुपुराणाप्रमाणें १०१५ व भागवताप्रमाणें १११५ वर्षांनीं महापह्मनंदास राज्याभिषेक झाला असून त्यानंतर [ मत्स्यपुराण, अध्याय २७३, श्लोक ३६; वायुपुराण, अ.९९, श्लो. ४१५; ब्रह्मांडपुराण, मध्यभाग, उपोत पाद ३, अ. ७४, श्लो. २२७; विष्णुपुराण अंश ४, अ. २४, श्लो. ३२;  भागवत, स्कंध १२, अ. २, श्लो. २६] नंद घराण्यांतील पुरूषांनीं १०० वर्षेंपर्येत राज्याचा उपभोग घेतला. नंद वंशाचें निर्मूलन करून मौर्य घराण्यांतील जो चंद्रगुप्त राजा सिंहासनारूढ झाला, त्याचा राज्यारोहणकाल ख्रिस्तपूर्व ३२१ च्या सुमारास असल्याविषयीं आतां नक्की ठरलें असल्यामुळें भारती युद्ध शालिवाहन शकास आरंभ होण्याच्या (१०५०+१००+३२१+७८= ) १५४९, १५१४ किंवा १६१४ वर्षे अगोदर झालें असावें असें सदरहू पुराणांवरून निष्पन्न होतें. यांपैकी कोणताहि काळ घेतला तरी त्याचा कल्हणवराहमिहिरांनी दिलेल्या भारती युच्या काळाशीं किंवा ज्योतिष ग्रंथात व पंचागांत जो कलियुगारंभाचा काळ देण्यांत येत असतो त्याशीं मेळ बसणें मुळींच शक्य नाहीं हें उघड आहे.

वीरनिर्वाणसंवत्:- जैनांचा शेवटचा तीर्थकर जो महावीर त्याच्या निर्वाणकाळापासून ज्या शकाचा आरंभ मानण्यांत येतो त्यास ‘वीरनिर्वाण’ असें म्हणतात. हा शक ज्यांच्या मध्यें दिला आहे असें जे कांही शिलालेख उपलब्ध आहेत ते अपवाद म्हणून सोडून दिले तर जैन ग्रंथांशिवाय इतर ठिकाणीं ह्या शकाचा उपयोग केलेला क्वचितच आढळून येईल. जैन संप्रदायांतील श्वेतांबरपंथी मेरूतुंगसूरीच्या विचारश्रेणि नामक ग्रंथात वीरनिर्वाण संवत् व विक्रमसंवत् ह्या दोन शकांतील अंतर ४७० वर्षे दिलें असून त्याच पंथांतील नेमिचंद्राचार्याच्या ‘ महावीरचरितं’ नांवाच्या प्राकृत काव्यांत ‘ माझ्या निर्वाणानंतर ६०५ वर्षें व ५ महिने झाल्यावर शक राजा उत्पन्न होईल’ असें महावीराच्या तोंडी घातलेले शब्द आहेत. यांपैकी दुसरा ग्रंथ विक्रम संवत् ११४१ म्हणजे इ. स. १३१० च्या सुमारास रचण्यांत आला असावा. ह्या दोन ग्रंथातील पुराव्यांवरून असें दिसून येतें कीं, विक्रम संवतांत ४७०, इसवी सनांत ५२७ किंवा शालिवाहन शकांत ६०५ मिळविले असतां वीरनिर्वाण संवत् निघतो. हरिवंश पुराणांतील व मेघनंदीच्या श्रावकाचारांतील वचनांवरून ह्याच कालनिर्णयास पुष्टि मिळते [  अँ. पु. १२, पा. २२ ]. व श्वेतांबरपंथी सर्व जैनांसहि महावीराच्या निर्वाणाचा हाच काळ संमत आहे. परंतु दिगंवरपंथी जैनांस हा निर्णय मान्य नाहीं. त्यांच्या पंथांतील नेमिचंद्रानें विक्रम संवताच्या ११ व्या शतकांत लिहिलेल्या त्रिलोकसार नामक ग्रंथांत [ श्लोक ८४८ पहा ] उपर्युक्त श्वेतांवरपंथी नेमिचंद्राचार्याप्रमाणेंच म्हटलें आहे. पण माधवचंद्रानें त्रिलोकसारावरील आपल्या टीकेंत ‘ सग राजो ’ ह्याचें स्पष्टीकरण ‘ विक्रमाङ्क शकराज:  असें केल्यामुळें त्याच्या मागून झालेल्या कित्येक दिगंबरपंथी जैन लेखकांनी [ उदाहरणार्थ, श्रवणबेळगोळचा जैन लेख पहा ( इं. अँ. पु. २५, पा. ३४६) ] त्याचाच अर्थ प्रमाण मानून वीरनिर्वाणाचा काळ १३५ वर्षैं मागे ढकलला आहे. त्याच पंथांतील दुसर्‍या कांही लेखकांनीं तर याच्याहिपुढें जाऊन कोणीं शालिवाहन शकाच्या ४६१ वर्षें अगोदर, कोणीं ९७९५ वर्षे अगोदर व कोणीं तर १४७९३ वर्षे अगोदर महावीराचें निर्वाण झालें असें लिहिलें आहे [ त्रिलोक प्रज्ञाप्ति, ‘ जैनहितैषी मासिक पत्र ’ ] भाग १३, अंक १२ दिसेंबर १९१७ पा. ५३३ पहा ].

बुद्धनिर्वाणशक:- बौद्ध लोकांत गौतम बुच्या निर्वाणापासून ज्या शकाचा आरंभ समजण्यांत येतो त्यास बुद्धनिर्वाण शक हें नांव आहे. ह्या शकाचा उपयोग बहुधा बौद्ध ग्रंथांतूनच केलेला पाहण्यांत येतोय तथापि हा शक घातलेले थोडेसे शिलालेखहि [उदाहरणार्थ, गयेचा लेख ( इं. अँ. पु.१०, पा. ३४३ ] आढळण्यांत आले आहेत. या शकाच्या आरंभाविषयीं इतक्या परस्परभिन्न समजुती प्रचलित आहेत व विद्वानांतहि इतका मतभेद आहे कीं, ख्रि. पू. १०९७ पासून ३५० पावेतोंची ११ निरनिराळीं वर्षे या शकाचा आरंभकाळ म्हणून सुचविण्यांत आलीं आहेत. (१) इ. स.  ४०० सालीं चिनी प्रवासू फा हिआन हा हिंदुस्थानांत आला तेव्हां त्यानें असें लिहून ठेविलें कीं [ बा; बु. रे. वे. व. पु. १, प्रस्तावना, पा. ७५ ] बुचें निर्वाण होऊन आज १४९७ वर्षे झालीं आहेत. ह्या विधानावरून बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व १०९७ साली झालें असें निघतें. (२) चीनमध्यें [ प्रिन्सेप; अँ. पु. २ ‘ यूसफुल टेबल्स ’ पा. १६५ ] ह्या शकाचा आरंभ ख्रि. पू. ६३८ सालापासून मानण्यांत येतो व पं. भगवानलाल इंद्रजी यांनीहि लेखाच्या आधारावर हेंच वर्ष बरोबर आहे असें दाखविलें आहे [ इं. अँ. पु १०, पाय ६४६ ]. (३) सिलोन सयाम व ब्रह्मदेश या तीन देशांत बुचें निर्वाण ख्रिस्तपूर्व ५४४ सालीं झालें अशी समजूत असून [ कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम ( कनिंगहॅमकृत)पु.१ प्रस्तावना पा. ३ ], आसामचे राजोपाध्यायहि [ प्रि. अँ. पु. २, ‘ यूसफुल टेबल्स पा. १६५ ] तेंच वर्षं खरे धरतात.(४) ख्रि. पू. ४८७ सालीं बुचें निर्वाण झालें असावें असें व्ही. ए. स्मिथचे अनुमान आहे [ स्मि. अ. हि. इं. तृतीयावृत्ति, पा. ४७ ]. पण डॉ. बुहलर यांनीं तें ख्रि. पू. ४८३-२ व ४७२-१ ह्या ११ वर्षांच्या दरम्यान केव्हां तरी असावें [इं. अँ. पु. ३, पा. १५४ ] असें ठरविलें असून त्यांमध्यें (५) बार्नेटनें ४८३ [ बा. अँ. इं. पा. ३७ ], (६) डॉ. फ्लीटनें ४८२ [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०६, पा. ६६७], (७) फगर्युसननें ४८१ [ पा. ४९२], (८) जनरल कनिंगहॅम यानें ४७८ [कॉर्पस इन्सिक्रप्शनम इंडिकेरम् पु. १ प्रस्तावना पा. ९]  आणि (९) मॅक्समुल्लर [ मॅ. हि. ए. सं. लि. पा.२९८] व मिस डफ [ ड. क्रॉ. इं. पा. ६ ] यांनीं ४७७ हें वर्ष सुचविलेलें आहे. (१०) परंतु कर्न यांने तर बुच्या निर्वाणाचा काळ आणखीहि अलीकडें ओढून तो ख्रिस्तपूर्व ३८८ मध्यें आणून ठेविला [ सायक्लोपीडिया ऑफ इंडिया; पु. १, पा. ४९२] व (११) हुएन्तसंग ह्या दुसर्‍या एका चिनी प्रवाश्याच्या वृत्तावरून [ बी,बु.रे.वे.व.पु.१ पा. १५० ] बुचें निर्वाण याच्याहि नंतर तीस चाळीस वर्षांनीं झालें असावें कीं काय अशी शंका येते. वर सांगितल्याप्रमाणें बुद्धनिर्वाणाच्या काळासंबंधीं निरनिराळ्या विद्वानांची निरनिराळी मतें पडत आहेत. तरी त्यांतल्या त्यांत निदान आज तरी ख्रि. पू. ४८७ हाच काळ स्थूलमानानें अधिक बरोबर असण्याचा संभव आहे असें पं ओझा यांना वाटतें [ भारतीय प्राचीन लिपिमाला. द्वितीयावृत्ति पा. १६४ ].

मौर्यशक:- आतांपर्यत हा शक ओरिसांत कटकच्या जवळ उदयगिरि येथील ‘ हाथी’ गुफेंत असलेल्या खारवेल (मेघवाहन) नामक जैन राजाच्या एका लेखांतच [ पंडित भगवानलाल इंद्रजी संपादित ‘ दि हाथी गुंफा अँड थ्री अदर इन्सिक्रप्शन्स ’ पहा ] काय तो आढळून आला आहे. डॉ.  फ्लीट [ ज. रॉ. ए.सो.इ.स. १९१०, पा.२४३-४४ ], प्रो. लूडर [ ए. इं. पु. १०, ब्राह्मी लेखांची सूचि, पा. १६१ ] व व्हिन्सेंट स्मिथ [ अ. हि. इ. पा. २०७, टीप २ ] यांनी ह्या लेखाचा अर्थ निराळाच करून त्यांत सौर्य शक दिलेला नाहीं असें मानलें आहे. तथापि त्यांचा अर्थ विद्वज्जनांस पटला नसून अद्यापीहि उदयगिरीचा लेख मौर्य शक १६५ मधील आहे [ आर्किऑलॉजिकल सर्व्हेचा रिपोर्ट. इ. स. १९०५-६ पा. १६६ ] अशीच सर्वसाधारण समजूत आहे. याशिवाय लोरिअन तंगाई [आ.स.रि.इ.स.१९०३-४, पा.२५१ ] व हश्तनगर [ ए. इ. पु. १२. पा. ३०२ ] येथें सांपडलेल्या बुच्या मूर्तींच्या आसनावरील लेखांत जे शक दिले आहेत ते कोणते आहेत हें निश्चित झालें नसल्यामुळें तेहि मौर्य शकच असण्याचा संभव आहे. चंद्रगुप्त नंदवंशाचा उच्छेद करून सिंहासनारूढ झाला तेव्हां जर त्यानें हा शक चालू केला असला, तर ह्याचा आरंभ ख्रि. पू. ३२१ च्या सुमारास झाला असला पाहिजे.

सिल्यूकिडी शक:- यालाच मॅसिडोनी शक असेंहि नांव आहे. यासंबंधीं कांहीं माहिती भारतबाह्य शक देतांना अगोदर येऊऩ गेलीच आहे. ख्रि. पू. ३२३ सालीं शिकंदर बादशहा मरण पावल्यावर त्याचें राज्य वांटून घेण्याकरितां त्याच्या सेनापतींमध्यें लढाया होऊन शेवटीं मॅसिडोनिया, मिसर व सिरिया ( बाबिलोन ) हीं तीन राज्यें उत्पन्न झालीं व सिल्यूकस निकेटार हा त्यांतील सिरिया देश बळकावून ख्रि. पू. ३१२ सालीं आक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेस गादीवर बसला. त्यांच्या राज्यारोहणापासून हा शक सुरू झाला असल्यामुळें त्यास सिल्यूकिडी शक असें नांव मिळालें असें पूर्वी सांगितलेंच आहे. बॅक्टिया वगैरे पूर्वेकडील आशियांतील प्रदेश सिल्यूकसच्याच ताब्यांत असल्यामुळें त्याचा शक बॅक्ट्रियांत चालू झाला होता; व पुढें बॅक्ट्रियन ग्रीक लोक काबुल, पंजाब वगैरे भागांवर राज्य करूं लागले तेव्हां तो ग्रीक सत्तेखालील हिंदुस्थानाच्या भागांतहि वापरण्यांत येऊं लागला असावा. वस्तुत: अद्याप असा एकहि लेख हिंदुस्थानांत सांपडला नाहीं कीं ज्यामध्यें दिलेला शक सिल्यूकिडी आहे असें निश्चित म्हणतां येईल. तथापि कुशनवंशी राजांच्या कारकीर्दीतील कांही लेखांत मॅसिडोनियन (ग्रीक) महिन्यांची नांवे [ पेल्लिअस ( दिसेंबर ) क. इं. ई. पा. ४१ आर्टेमिसिअस (मे)- ए. इं. पु. ११, पा. २१०;  डेसिअस (जून)- इं. अँ. पु. १०, पा ३२६ व पु.११ पा १२८; आणि पनेमस ( जुलै )- ए. इं. पु. पा, ५५ ] आढळून आलीं असून ते सर्व विदेशीय लोकांनी खोदविलेले आहेत. ह्या लेखांत दिलेलीं वर्षे कोणत्या शकाचीं आहेत याचा अजून पावेतों समाधानकारक निकाल लागला नसल्यामुळें तीं वर्षे, शतकाचे अंक गाळून लिहिलेलीं सिल्यूकिडी शकाचीं वर्षे असण्याचा संभव आहे. संभव आहे असें म्हणण्याचें कारण पर्शियन शक ख्रि. पू. २४७ सालच्या सुमारास सुरू झाला [ क.इं.ई.पा.४६ ] असल्यानें हीं वर्षे त्या शकाचीं किंवा दुसर्‍या एखाद्या अज्ञात शकाचींहि असूं शकतील.

शालिवाहन शक:-  शालिवाहन शक कोणीं सुरू केला याविषयीं जुन्या ग्रंथांत जे उल्लेख आले आहेत ते केवळ परस्पर भिन्नच नाहींत तर परस्परविरोधीहि आहेत. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कीं, दक्षिणेंतील प्रतिष्टानपूर उर्फ पैठण येथील शालिवाहन ( सातवाहन, हाल) राजानें हा शक सुरू केला. कोणी कोणी शालिवाहनाच्या जन्मापासूनच ह्या शकाचा आरंभ होतो असें मानितात [ मुहूर्तमार्तंड, अलंकार श्लोक ३ ). जिनप्रभसूरीनें आपल्या कल्पप्रदीप नामक पुस्तकांत म्हटलें आहे कीं, प्रतिष्टानपूर येथें राहत असलेल्या एका परदेशी ब्राह्मणाच्या विधवा बहिणीपासून शालिवाहन राजाची उत्पत्ति झाली असून, उज्जायिनीच्या विक्रम राजाचा पराभव करून तो प्रतिष्टानपुरचा राजा झाला व तापी नदीपावेतों सर्व मुलूख काबीज करून त्यानें तेथें आपला शक सुरू केला [ ज. ए. सो. मुंबई पु. १० पा. १३२-३३]. उलटपक्षीं अलबेरूणीनें असें लिहून ठेविलें आहे कीं, विक्रमादित्यानें शक राजाचा पराभव करून हा शक सुरू केला होता [ सा. अ. इं. पु. २, पा. ६ ].

ह्या शकाचे जुन्यांत जुने शिलालेख ५२ पासून १४३ पावेतोंच्या सालांतील असून ते पश्चिमेकडील क्षत्रपांनी खोदविले आहेत. त्या क्षत्रपांचींच जीं नाणीं सांपडली आहेत त्यांवर अजमासें १०० पासून ३१० पावेतोंच्या वर्षांचे आंकडे दिलेले आढळतात. सदरहू शिलालेखांत आणि नाण्यांत शालिवाहन किंवा शक यांतील एकाहि शब्दाचा निर्देश केलेला नांही. शिलालेखांत ‘ वर्षे ’ हा शब्द वापरला असून नाण्यांवर तर फक्त आंकडेच दिलेले आहेत [ प्रा. लि. मा. पा. १७१ ].

शके ४२७  मध्यें पहिल्याप्रथम [ सिंहसूररचित लोकविभाग ग्रंथ ११ व्या शतकानंतर लिहिलेला असल्यामुळें त्यांतील शक शब्दाचा प्रयोग प्राचीन नाहीं ( प्रा. लि. मा. पा. १७१ टीप ३ )] संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा ‘ शककाल ’ या नांवानें उल्लेख केला असून [ पंचसिद्धांतिका ( वराहमिहिराची) १|८ ] त्यानंतर शकें १२६२ पावेतोंच्या शिलालेखांत व दानपत्रांत (१) ‘शकनृपति राज्याभिषेक संवत्सर’ (२) ‘शकनृपति संवत्सर,’ (३) ‘शकनृपसंवत्सर,’ (४) ‘ शकनृपकाल,’ (५) ‘ शकसंवत् ‘ , (६) ‘ शकवर्ष,’ (७) ‘ शककाल,’ (८) ‘ शककालसंवत्सर,’ (९) ‘ शक’ व (१०)  ‘शाक ’ अशा निरनिराळ्या नांवांखाली ह्या शकाचीं वर्षे दिलेलीं आहेत [ इं अँ: (१) पु. १०, पा. ५८ जवळील आकृतिपट; (२)  पु. ६, पा. ७३; (३) पु. १२, पा. १६; (६) पु.६, पा. ८६ व (८) पु. ११ पा. ११२. ए. इं:- (४) पु. ३, पा. १०९; (५) पु. १ पा. ५६; (१०) पु.१, पा. ३४३. (७) ज. ए. सो. मुंबई. पु. १०, पा.१९५.. (९) की. लि. इं. स. इं. पु. ६३ लेख नं. ३४८ ]. मराठीमध्यें संवत्सर या सामान्य अर्थी प्रचारांत असलेला ‘शक’ शब्द ह्या लेखांतील शक शब्दाहून भिन्न आहे हें विसरतां कामा नये. यावरून असें दिसतें कीं, इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभापासून चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, कोणत्या तरी शक राजाच्या राज्याभिषेकापासून ह्या शकाचा आरंभ झाला आहे अशी सर्वसाधारण समजूत होती. निदान शिलालेखांत व ताम्रपत्रांत तरी शके १२६२ पर्यंत शालिवाहन नांवाचा ह्या शकाशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असलेला आढळून येत नाहीं. संस्कृत वाङ्मयांत ह्या शकाचा व शालिवाहन राजाचा संबंध इ. स. १३०० च्या सुमारास लिहिलेल्या  जिनप्रभसूरीच्या कल्पप्रदीपांतच प्रथम जोडलेला आहे. त्यानंतर हरिहर गांवी मिळालेल्या विजयानगरच्या पहिल्या बुक्करायाच्या शके १२७६ च्या दानपत्रांत [ की. लि. इं. स. इं. पा. ७८ लेख नं. ४५५] शालिवाहनाचें नांव या शकाच्या मागें लिहिलें असून, त्यापुढें हा प्रचार दिवसेंदिवस वाढत जाऊं लागला [ उदाहरणार्थ, इं. अँ. पु.१०, पा. ६४; ए. इं. पु. १, पा. ३६६; ज. ए. सो. मुंबई पु. १२, पा. ३८४ ]. गाथासप्तशती व बृहत्कथा या दोन ग्रंथामुळें सातवाहन उर्फ शालिवाहन राजाचें नांव लिहितां वाचतां येणार्‍या बहुतेक सर्व माणसांस अगोदरच दृढ परिचयाचें झालें होते. म्हणून असें संभवनीय वाटतें कीं, उत्तरेकडील लोक आपल्या संवताच्या मागें विक्रमाचें नांव लावूं लागलेले पाहून इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या सुमारास दक्षिणेंतील विद्वानांनीहि शालिवाहन राजाचा आपल्या शकाशीं संबंध जोडला असावा.

शालिवाहन हा शब्द सातवाहन शब्दाचेंच रूपांतर असून [ प्रबंधचिंतामणी पा. २८] पुराणांतील आंध्रभृत्य उर्फ आंर्ध्र वंशाकरितां शिलालेखांत सातवाहन शब्दाचा प्रयोग केलेला आढळतो. शातवाहन व शातकर्णी हे एकच होत. कां कीं, वाहन किंवा कर्णी म्हणजे हत्ती आणि शातकर्णी म्हणजे शंभर हत्ती बाळगणारा राजा असा अर्थ होय; असें विधान कनकसभे हा आपल्या ‘ तामिल कंट्री एटीन हंड्रेड इयर्स अँगो ’ या पुस्तकांत सुचवितो. आंध्रभृत्य राजांनीं ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकापासून ख्रिस्तोत्तर २२५ साला पावेतों दक्षिणेंत राज्य केलें असें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो [ अ. हि. इं. पा. २१८ जवळचा तक्ता ]. गोदावरीतीरी असलेले प्रतिष्टान नगर म्हणजे अर्वाचीन पैठण शहर ही त्याची राजधानी होती व त्यांच्यामध्यें सातवाहन ( शातकर्णी, हाल ) नांवाचा प्रसिद्ध राजाहि होऊन गेला होता. तेव्हां दक्षिणेंतील पंडितांनीं त्याचेंच नांव आपल्या शकाला लाविलें असणें संभवनीय आहे. खुद्द शातवाहन वंशातील कोणींहि राजानें हा शक सूरू केला नाहीं ही गोष्ट मात्र निश्चित आहे. कारण, त्यांच्यापैकी एकाहि राजानें आपल्या शिलालेखांत शक दिला नसून ज्यानें त्यानें स्वत:च्या कारकीर्दीचें वर्षच दिलें आहे. आंध्रभृत्यांचें राज्य नष्ट झाल्यावर ११०० वर्षेंपर्यंत शालिवाहन नांवाचा व ह्या शकाचा कोठेंहि संबंध जोडलेला आढळून येत नसल्यामुळें या शकाचा आरंभ एखाद्या शक राजानेंच केला असला पाहिजे, असें पंडित ओझा म्हणतात. तथापि, आम्ही शातवाहनांचा शकस्थापनेशीं संबंध अजून नाकबूल करीत नाही. रा. राजवाडे यांनी यासंबंधांत खाली दिलेलीं प्रमाणें पुढें मांडलीं आहेत.

हा शक शक नांवाच्या म्लेंच्छ लोकांनी स्थापिला, असें भांडारकरादि विद्वानांचें म्हणणे आहे, पण तें चुकीचें आहे. कारण (१) शककाल ज्या अर्थी धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जातो त्या अर्थी तो कोणातरी हिंदु राजानें स्थापिलेला असला पाहिजे. म्लेंच्छांनीं सुरू केलेला कोणताहि काल हिंदू लोकांच्या धर्मकृत्यांत ग्राह्य धरला जाणें केवळ अशक्य आहे. फसली, अरबी, हिजरी, जलाली, इसवी वगैरे अनेक सन येथें आगंतुकांनीं सुरू केले. परंतु धर्मकृत्यांत त्यांपैकीं एकाचाहि प्रवेश झाला नाहीं. (२) शक शब्दाचे दोन अर्थ आहेत. शक म्हणजे म्लेंच्छ असा एक अर्थ आहे. परंतु शक शब्दाच्या दुसर्‍या अर्थाकडे बहुतेकांनी कानाडोळा केला आहे. शक म्हणजे शातवाहन राजे असा दुसरा अर्थ आहे. शक ४१० तील ताम्रपटांत ‘शालिवाहन’ शक असे शब्द आहेत. नानाघाटांतील पांडवलेण्यांत “ कुमारो हकु सिरी ” असें एका राजपुत्राचें नांव आहे. हा हकु शब्द सकु शब्दाचें दुसरें रूप आहे. (३) प्राय: म्लेंच्छ लोक ज्या प्रांतांत जात त्या प्रांतांतील प्रचलित असलेला काल प्रथम योजीत. जसे, इंग्रज तीस वर्षांपूर्वीं फसली किंवा हिजरी सनानें हिंदुस्थानांत कालगणना करीत. शक, पारद, यवन, वगैरेंची राज्यें हिंदुस्थानांत फार वर्षें न टिकल्यामुळें त्यांनां आपले सन (असलेच तर) इकडे प्रचलित करण्याला प्राय: अवधि व स्वास्थ्य सांपडलें नाहीं. यांपैकी पहिलें एकच कारण शककाल म्लेंच्छस्थापित नाहीं असें म्हणण्यास बस्स आहे.

कलियुगाचीं ३१७९ वर्षे होऊऩ गेल्यावर शालिवाहन शकाचा आरंभ झाला असें मानण्यांत येतें. म्हणजे इसवी सनाच्या वर्षांतून शेवटच्या तीन महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुनअखेरपर्यंत ) ७९ व इतर महिन्यांत ७८ वजा केले असतां शालिवाहन शकाचें गतवर्ष निघतें. तिन्नवेल्ली व मलवार प्रदेश सोडून सार्‍या दक्षिण हिंदुस्थानांत हा शक प्रचलित असून उत्तरहिंदुस्थानांतहि पंचांगांत, जन्मपत्रिकेंत व वर्षफलांत विक्रमसंवताबरोबर हा शक दिलेला असतो. सिलोनांतील अलीकडील राष्ट्रीय भावनेच्या हिंदू व ख्रिस्ती लोकांनीं याच शकास पुन्हां सुरूवात केली आहे. उत्तर हिंदुस्थानांतील शिलालेखादि प्राचीन लेखांत मात्र हा शक फारसा आढळून येत नाहीं. ज्या ठिकाणीं सौरमान प्रचलित आहे तो भाग वगळून बाकी सर्व हिंदुस्थान देशांत याचा आरंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच मानण्यांत येतो. परंतु उत्तरहिंदुस्थानांत याचे महिने पौर्णिमांत व दक्षिणहिंदुस्थानांत अमांत असतात. सौरमानांत मात्र या शकाचा आरंभ मेष संक्रातीपासून करण्यांत येतो. करणग्रंथाच्या आधारें पंचांग तयार करणारे हिंदुस्थानांतील सर्व ज्योतिषी याच ज्योतिषी याच शकाचा उपयोग करतात. पंचांगांत या शकाची गतवर्षेच देत असतात. परंतु शिलालेखांत मात्र कधीं कधी वर्तमान वर्षेंहि दिलेलीं सांपडतात.

विक्रमसंवत्:- कलियुगाची ३०४४ वर्षें होऊन गेल्यानंतर विक्रम संवत् सुरू झाला असें उत्तर हिंदुस्थानांतील लोक मानतात व त्या शकाचा वर्षारंभ ते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून धरतात. त्यामुळें कलियुगाच्या गत वर्षांतून ३०४४ वजा केले कीं त्यांच्या विक्रम संवताचें साल निघतें. परंतु दक्षिणेमध्यें विक्रम संवताचा आरंभ सात महिने मागून धरीत असल्यामुळे चैत्रारंभापासून अश्विनअखेरपर्यंत येथें कलियुगाच्या व विक्रम संवताच्या गत वर्षांमध्यें ३०४५ अंतर असतें व इतर महिन्यांत तें ३०४४ होतें. वस्तुत: ह्या शकाचा आरंभ कार्तिकापासूनच होत असला पाहिजे; कारण इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचे उत्तरहिंदुस्थानांतील जे लेख सांपडले आहेत त्यांमध्यें वर्षारंभ कार्तिकापासून मानणारेच लेख फार आहेत. पुढच्या चार शतकांतील लेखांत मात्र चैत्रापासून वर्षारंभ धरणार्‍यांची संख्या अधिक असून त्यानंतर सर्वच लेखांतून शालिवाहन शकाप्रमाणें विक्रम संवताचाहि आरंभ चैत्रापासून धरला जाऊं लागला. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानच्या कालगणनेंतील दुसरा फरक म्हटला म्हणजे दक्षिणेकडील महिना अमांत तर उत्तरेकडील पौर्णिमांत असतो. यामुळें असें होतें कीं शुद्ध पक्षांमध्ये दोन्हीहि भागांतील लोकांचे महिने एकच असतात, परंतु वद्य पक्षांत मात्र आपला जो महिना असतो त्याच्या पुढचा त्यांचा असतो. इसवी सनावरून आपल्याकडील विक्रम संवताचें साल काढणें झाल्यास इसवी सनाच्या वर्षांमध्यें नोव्हेंबर व दिसेंबर महिन्यांत (वस्तुत:  कार्तिकारंभापासून दिसेंबरअखेरपर्यंत) ५७ व इतर महिन्यांत ५६ मिळवावे लागतात; आणि उत्तरेकडील विक्रम संवताचें साल काढण्यास जानेवारी, फ्रेब्रुवारी व मार्च ह्या तीनच महिन्यांत ( वस्तुत: जानेवारीच्या आरंभापासून फाल्गुन अखेरपर्यंत ) ५६ व इतर महिन्यांत ५७ मिळवावे लागतात. काठेवाडांत, गुजराथेंत व राजपुतान्याच्या कांही भागांत ह्या संवताचा आरंभ आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून होत असे [ उदाहरणार्थ, अहमदाबादजवळील अडलिज गांवचा लेख व ‘प्रभास  क्षेत्र तीर्थयात्राक्रम’ नामक पुस्तक पहा ( इं. अँ. पु. १८, पा. २५१)] व म्हणून तेथें त्यास आषाढादि संवत् म्हणत असत. उदेपूर वगैरे राजपुतान्यांतील कांही संस्थानांत अद्यापहि राजदरबारमध्यें विक्रम संवताचा आरंभ श्रावण वद्य प्रतिपदेपासून धरण्यांत येत असतो. अलीकडे ह्या संवताचें गत वर्षच देण्याची वहिवाट आहे. जुन्या लेखांत वर्तमान वर्षे दिलेलेहि कांहीं लेख सांपडतात: पण गत वर्ष देणार्‍या लेखांच्या मानांने अशा लेखांची संख्या फारच थोडी असते.

ह्या संवतासंबंधीं अशी दंतकथा आहे कीं, विक्रम राजानें शक लोकांचा पराभव करून आपल्या नांवाचा शक सुरू केला. विक्रम संवतास मालव संवत् किंवा मालव काल असेंहि एक नांव आहे [ग्यारिसपुरचा लेख-क.आ.स.रि.पु.१०, आकृतिपट ११ ]. वास्तविक पाहिलें असतां आज उपलब्ध असलेल्या लेखांपैकीं ज्यांत विक्रम नांवाचा ह्या शकाशीं संबंध जोडलेला आहे असा जुन्यांत जुना लेख विक्रम संवत् ८९८ म्हणजे इसवी सन ८४१ मधील आहे . [ इं.अँ.पु.१९ पा. ३५] विक्रम संवत् ७९४ चाहि एक लेख काठेवाडांत सांपडला आहे [ इं. अँ. पु. ०२, पा. १५५]. परंतु लेखांत म्हटल्याप्रमाणें त्या दिवशी रविवार, ज्येष्टा नक्षत्र किंवा सूर्यग्रहण यांतील कांहीहि नसल्यामुळें व त्याची लिपीहि असावी तितकी प्राचीन दिसत नसल्यामुळें डॉ. फ्लीट व कीलहॉर्न यांनीं तो बनावट ठरविला आहे. इ. स. ८४१ च्या पूर्वीच्या सर्व लेखांत ह्या शकास मालव लोकांनी किंवा त्यांच्या राजांनीं प्रचलित केलेला संवत् एवढेंच फक्त म्हटलें आहे. [उदाहरणार्थ, मंदसोर येथें सांपडलेले ४६१ ( ए.इं.पु. १२ पा. ३२०), ४९३ (फ्ली. गु. इं. पा. ८३) व ५८९ (फ्ली.गु. इं. पा. १५४) सालचे लेख; अजमेरच्या राजपुताना म्यूझियममध्यें असलेला ४८१ सालचा नगरीचा शिलालेख आणि कोट्याजवळील कणस्व्याचा शिलालेख (इं. अँ. पु. १९. पा. ५९) पहा ]. यांतील कांही ठिकाणी ह्या संवताच्या सालास कृत हें नांव दिलेलें आढळतें. प्राचीन काळीं शकाच्या गत वर्षांस चारानें भागून एक, दोन, तीन किंवा शून्य ( म्हणजे चार ) बाकी उरली असतां त्या सालास अनुक्रमें कलि, द्वापर, त्रेता किंवा कृत हें नांव जींत दिले जात होतें अशी एक युगमानाची कालमापनपद्धति प्रचारांत होती [ आर. शामशास्त्री यांचें गवामयन पा.३, १३८; व जैनांचे भगवती सूत्र १३७१-७२, गवामयन पा. ७२ पहा ]. तिला अनुसरूनच बहुधा सदरहू ठिकाणीं या सालांस कृत म्हटलें असावें. कारण, कृत संज्ञा असलेले, ४२८ सालचा विजयमंदिरगढचा [ फ्ली. गु. इं. पा. २५३], ४६१ सालचा मंदसोरचा, ४८० सालचा गंगधारचा [फ्लि.गु.इं.पा.७४] व ४८१ सालचा नगरीचा असे जे चार लेख उपलब्ध आहेत त्यांतील दुसर्‍याचें वर्ष वर्तमान व तिसर्‍याचें गत असल्याचें त्या लेखांवरूनच दिसतें. राहिलेल्यांपैकीं पहिल्याचें वर्ष गत व चौथ्याचें वर्तमान मानलें व वर्तमान वर्षाचें गत वर्ष करण्याकरितां दुसर्‍या व चौथ्या लेखांच्या संवतांतून एक एक वजा केला तर वरील नियमाप्रमाणें ही चारहि वर्षै कृत असल्याचें आढळून येईल.

ह्या शकाच्या आरंभापासून जवळ जवळ साडे नऊशें वर्षे होऊन जाईपर्यंत विक्रम ह्या नांवाचा त्याच्याशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असल्याचें उपलब्ध झालेल्या लेखांवरून दिसून येत नसल्यामुळें या शकाचें मालव संवत् हेंच मूळ नांव असून मागून केव्हां तरी त्याला विक्रम संवत् म्हणू लागले असावे असें विद्वान् लोकाचें मत झालें आहे. समुद्रगुप्तानें मालव लोकांस कह्यांत आणलें होतें असा पुरावा मिळाला असल्यानें [ फ्ली. गु. इं. पा. ८] मालव लोक ही एक स्वतंत्र राष्ट्रजाति होती असें अनुमान निघतें. जयपूर संस्थानांत [ कर्कोटक] नगर येथें ‘मालवान (नां) जय (य:)’ असा लेख असलेलीं कांहीं नाणीं सांपडलीं [ क. आ. स. रि. पु. ६, पा. १८२ ] असून त्यांचा काल ख्रि. पू. २५० पासून ख्रिस्तोत्तर २५० पर्यंतच्या ५०० वर्षांतील असावा असें त्यांच्या लिपीवरून दिसतें. यावरून असें संभवनीय दिसतें कीं अवंतीचें राज्य जिंकून मालव लोक तेथें वसाहत करून राहिले तेव्हां त्यांनी आपल्या विजयाचें स्मारक म्हणून उपर्युक्त नाणीं पाडलीं व मालव संवत् सूरू केला; आणि ह्या मालव लोकांवरूनच अवंतीच्या आसमंतांतील प्रदेशास माळवा हें नांव मिळालें.

गुप्त घराण्यांतील दुसर्‍या चंद्रगुप्ताची जीं नाणीं सांपडलीं आहेत त्यांच्या दुसर्‍या बाजूवर ‘ श्रीविक्रम’ ‘ विक्रमादित्य,’ सिंहविक्रम व ‘ अजितविक्रम: ’ असे लेख आढळून येतात [ जॉन. अँलन संपादित गुप्तांच्या नाण्यांची सूचि ]. हा चंद्र गुप्त मोठा पराक्रमी राजा असून त्यानें माळवा प्रांतहि काबीज केला होता. यावरून काहीं विद्वानांनी असा तर्क केला आहे कीं, चंद्रगुप्तानें माळवा जिंकल्यावर (चौथ्या शतकाच्या अखेर किंवा पांचव्याच्या आरंभी) तेथील संवतास त्याचें नांव जोडलें जाऊं लागलें असावें. परंतु सदरहू चंद्रगुप्तापूर्वी विक्रम नांवाचा दुसरा कोणी पराक्रमी राजा होऊन गेला नव्हता असें सिद्ध झाल्याशिवाय हा तर्फ बरोबर मानतां येत नाहीं [ भारतीय प्राचीन लिपिमाला पान १६७]. दुसर्‍या चंद्रगुप्तापूर्वी विक्रम नांवाचे आणखीहि कांही राजे होऊन गेले होते असें दिसतें. कारण इसवी सनाच्या आरंभीं बनलेल्या [ बाँ. गॅ. पु. १ भाग २ पा. १७१ व व्हि.स्मि. अ. हि. इं. पा. २०८. भांडारकर कॉमेमोरेशन व्हॉल्यूम पा. १८८-८९ मध्यें रा. देवदत्त भांडारकर यांनी गाथासप्तशती हालाची नाहीं असें जें दाखविलें आहे तें बरोबर नाहीं असें पं. ओझा यांनां वाटतें ( प्राचीन लिपिमाला, पा. १६८).] हालाच्या गाथासप्तशतींत विक्रम नामक राजाचा उल्लेख आलेला आहे [ वेबरचें संस्करण, गाथा ४६४ पहा ]; व इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या शतकांत रचिलेल्या [ बाँ. गॅ. पु. १ भा. २ पा. १७०-७१- हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचरमध्यें वेबरनें गुणाढ्याचा काळ इ. स. चें सहावे शतक असें जें म्हटलें आहे तें निराधार आहे असें पं. ओझा म्हणतात ( भारतीय प्राचीन लिपिमाला; पा. १६८ ).] पैशाची बृहत्कथेचें सोमदेवभट्टाचें कथासरित्सागर नांवाचें जें संस्कृत रूपांतर उपलब्ध आहे त्यांतही [ लंबक ६ तरंग १ व लंबक ७ तरंग १ पहा ] उज्जयिनीच्या विक्रम राजाच्या कित्येक गोष्टी आलेल्या आहेत. सारांश, विक्रम हा एक तर ज्या मालव लोकानीं विजय संपादून नाणीं पाडलीं म्हणून वर म्हटलें आहे त्यांचाच पुढारी असेल किंवा तसें नसल्यास तो दुसर्‍या चंद्रगुप्ताच्या पूर्वीचा दुसरा कोणी राजा असला पाहिजे.

कलचुरिशक:- ह्या [ इं. अँ. पु. २०, पा. ८४; क. आ. स. रि. पु. १७, आकृतिपट २०] शकास चेदि संवत् [ इं. अँ. पु. १८, पा. २११ व पु. २२ पा. ८२] किंवा त्रैकूटक संवत् [ केव्ह टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया, पा. ५८ व आकृतिपट ] असेंहि म्हणत असत. हा शक कोणीं सुरू केला हें समजत नाहीं. डॉ. भगवानलाल इंद्रजी [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०५, पा. ५६६ ] यांच्या मतें महाक्षत्रप ईश्वरदत्त, डॉ. फ्लीट [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९०५, पा. ५६८ ] यांच्या मतें अभीर ईश्वरदत्त किंवा त्याचा बाप शिवदत्त, व रमेशचंद्र मुजुमदार [इं. अँ. पु. ४६, पा. २६९-७०]  यांच्या मतें कुशनवंशी कनिष्ट राजा ह्या शकाचा प्रवर्तक असावा. परंतु हीं सर्व अनुमानेंच असल्यामुळें त्यांवरून निश्चितार्थावबोध होऊं शकत नाहीं.

हा शक ज्या लेखांत सांपडतो ते गुजरात वगैरे प्रांतांतील चालुक्य, गुर्जर, सेंद्रक, कलचुरि व त्रैकूटक वंशी पुरूषांचें व चेदि देशांत- म्हणजे मध्यप्रांताच्या उत्तरेकडील भागांत राज्य करणार्‍या कलचुरि उर्फ हैहयवंशी राजांचे असून ते गुजराथेंत, कोंकणांत किंवा मध्यप्रांतांतच बहुधा आढळून येतात. ह्यांपैकी बरेसचे लेख कलचुरि उर्फ हैहयवंशी राजांचे असून त्यांतच ह्या शकास कलचुरि किंवा चेदि हें नांव दिलेलें असल्यामुळें, त्या वंशातीलच एखाद्या राजाने हा शक सुरू केला असणें संभवनीय आहे.

त्रिपुरीचा कलचुरि राजा नरसिंहदेव याच्या दोन लेखांत कलचुरि शक ९०७ [ ए. इं. पु. २, पा. १०-१३] व ९०९ [ इं. अँ. पु. १८, पा. २१२-१३ ] दिले असून विक्रम संवत् १२१६ [ इं. अँ. पु. १८,. पा. २१४ ] मधील त्याचा तिसरा एक लेख उपलब्ध आहे. यावरून कलचुरि शकाचा आरंभ विक्रम संवताच्या चौथ्या शतकाच्या आरंभाच्या सुमारास, म्हणजे इसवी सनाच्या तिसर्‍या शतकाच्या मध्यांत केव्हां तरी झाला असावा हें उघड आहे कीं, विक्रम संवत् ३०६ च्या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून [ इं. अँ. पु. १७, पा. २१५; ए. इं. पु. २ पा. २९९ ] म्हणजे इ. स. २४९ च्या २६ ऑगस्टपासून कलचुरि शकाचा आरंभ होतो असें धरलें असतां त्या शकाच्या शिलालेखांतील व दानपत्रांतील तिथी दिलेल्या वारीं पडतात. या शकाची वर्षे बहुधा वर्तमानच [ इं. अँ. पु. १७ पा. २१५ टिपण ५ ] दिलेलीं असतात व त्यांवरून इसवी सनाचें साल काढण्यास आश्विनारंभापासून पुढील तीन चार महिन्यांत (दिसेंवरअखेरपर्यंत) त्यांमध्ये २४८ व इतर महिन्यांत २४९ मिळवावें लागतात. ह्या शकाच्या जुन्यांत जुन्या लेखांतील साल २४५ [ कन्हेरीचा ताम्रपट – केव्ह टेंपल्स आँफ वेस्टर्न इंडिया पा. ५८ ] असून सर्वांत अलीकडचा लेख ९५८ [ क. आ. स. रि. पु. २१, पा. १०२ आकृतिपट २७ ] सालचा आहे. यावरून इसवी सनाच्या अजमासें तेराव्या शतकाच्या आरंभापासून हा शक प्रचारांतून नाहींसा झाला असावे असें दिसतें.

गुप्त अथवा वलभी शक:-  ह्या शकाचे जे लेख सांपडले आहेत त्यांमध्यें गुप्तकाल, गुप्तवर्ष इत्यादि प्रकारचे शब्दप्रयोग [ फ्लीट; गु.इं.पाने ६०-६१,१०७ व प्रस्तावना पानें २९-३०; इं.अँ. पु.२,पा.२५८; आणि भां. कॉ.व्हा. ( भांडारकर कॉमेमोरेशन व्हॉल्यूम ) पान २०३ पहा ] आढळून येत असल्यामुळें त्याचा प्रवर्तक कोणी तरी गुप्त राजा असला पाहिजे हें उघड आहे. समुद्रगुप्ताच्या अलाहाबादच्या लेखांत गुप्तवंशांतील गुप्त व घटोत्कच ह्या पहिल्या दोन राजांच्या नांवांमागें फक्त महाराज हीच उपाधि लाविली असून घटोत्कचाच पुत्र पहिला चंद्रगुप्त यास ‘ महाराजाधिराज ’ असें म्हटलें असल्यामुळें, आणि पहिल्या चंद्रगुप्ताचा नातू व समुद्रगुप्ताचा पुत्र जो दुसरा चंद्गगुप्त त्याच्या कारकीर्दीतील ८२ पासून ९३ पावेतोंच्या गुप्तवर्षांचे शिलालेख [ फ्लीट; गु. इं. पा. २५ व ३१-३२ पहा ] सांपडले असल्यामुळें, विद्वान् लोकांनीं त्यांवरुन असा तर्क केला आहे कीं, गुप्तवंशात पहिला चंद्रगुप्त हा मोठा प्रतापी राजा होऊन गेला असावा व त्यानें सिंहासनारूढ झाल्यावर हा शक सुरू केला असावा. गुप्तांच्या मागून काठेवाडांत वलभीचें राज्य उदयास आलें होतें. ह्या राज्याचा अस्त झाल्यावर तेथील लोक गुप्त शकास वलभी शक असें नांव देऊन तो वापरूं लागले असतील असें वाटतें. कारण ज्याच्यामध्यें गुप्त शकाच्या ऐवजी वलभी शक हें नांव घातलें आहे असा काठेवाडांतील सर्वांत जुना लेख म्हणजे वलभी शक ५७४ मधील ऊना गांव येथें मिळालेलें दानपत्र [ ए. इं. पु. ९, पा. ६ ] होय.

अलबेरुणीनें आपल्या ग्रंथांत शालिवाहन शकांतून सहाचा घन व पांचाचा वर्ग, म्हणजे २४१ वजा केले असतां वलभी किंवा गुप्त शक निघतो असें अगोदर सांगून, पुढें विक्रम संवत् १०८८ मध्यें शालिवाहन शक ९५३ व गुप्त किंवा वलभी शक ७१२ पडतो असें लिहून ठेविलें आहे [ सा. अ. इं  (एडवर्ड साचो अनुवादित अलबेरूणीज इंडिया) पु. २, पा. ७ आणि फ्लीट; गु. इं. प्रस्तावना पानें ३०-३१ पहा ]. एकाच शकास दोन नांवे असण्याचें कारण त्यानें असें दिलें आहे कीं, गुप्त वंशातील शेवटचा पुरूष वलभ हा काठेवाडांतील वलभीपुरचा राजा होता व त्यानेंच गुप्तशकास आपलें नाव देऊन तो पुढें चालू ठेविला. अलबेरूणी हा गुप्त शकाचा आरंभ झाल्यावर अजमासें ७०० वर्षांनीं हिंदुस्थानांत आला असल्यामुळें, त्याला त्या शकाच्या उत्पत्तीविषयीं खरी माहिती कळण्यास संभव कमी होता. म्हणून गुप्त वंशात वलभ नांवाचा राजा होऊन गेल्याविषयीं जोंपर्यंत आपणांस कांही प्रत्यक्ष पुरावा सांपडत नाहीं, तोंपर्यंत गुप्त शकास वलभी हें नांव वलभ नामक राजाच्या नांवावरूनच पडलें होतें असें मानणें युक्त होणार नाहीं. वलभीपूर ह्या शहरावरूनहि गुप्त शकास तें नांव मिळणें असंभवनीय नाहीं. गुजराथच्या अर्जुनदेव चौलुक्याच्या कारकीर्दीतील वेरावलचा एक शिलालेख [ इं अँ. पु. ११, पा. २४२] मिळाला आहे त्यामध्यें रसूल महंमद संवत् म्हणजे हिजरी सन, विक्रम संवत् व वलभी शक हे तीनहि दिले असल्यानें त्यावरूनहि आपणांस गुप्त किंवा वलभी शकाचा आरंभकाल निश्चित करतां येतो. ह्या लेखांत कार्त्तिकादि [ कारण, त्यांत दिलेल्या हिजरी सन ६६२ चा आरंभ चैत्रादि विक्रम संवत् १३२० च्या मार्गशीर्ष शुद्ध २ स होतो ] विक्रम संवत् १३२० च्या म्हणजे चैत्रादि विक्रम संवत् १३२१ च्या आषाढ महिन्यांत वलभी शक ९४५ दिला आहे. यावरून व अलबेरूणीनें दिलेल्या उदाहरणावरून गुप्त शकाचा आरंभ चैत्रादि विक्रम संवताचीं ३७६ किंवा शालिवाहन शकाचीं २४१ वर्षे उलटून गेल्यावर, म्हणजे इ.स. ३१९ मध्यें झाला असला पाहिजे असें निघतें. अर्थात् चैत्रारंभापासून पुढील ९ महिन्यांत ( वस्तुत: दिसेंबरअखेरपर्यंत) गुप्त शकाच्या गत वर्षांमध्यें ३१९ व इतर महिन्यांत ३२० मिळविलें असतां इसवी सनाचें वर्ष येईल. ह्या शकाचा वर्षारंभ चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून होत असे व त्याचे महिने पौर्णिमांत असत [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १७५]. ह्या शकाची बहुधा गत वर्षेच देत असत. तथापि कधीं कधी वर्तमान वर्ष दिलेलेंहि आढळून येंतें. उदाहरणार्थ, खेडा येथें मिळालेल्या धरसेन (चौथा) नामक वलभी राजाच्या दानपत्रांत गुप्त शक ३३­­० मध्यें मार्गशीर्ष महिना अधिक दिला आहे [ इं. अँ. पु. १५ पा. ३४० ], तेथें गुप्त शकाचें साल गत आहे किंवा वर्तमान­­ आहे याचा उल्लेख केला नाहीं. पण मार्गशीर्ष महिना मध्यममानाप्रमाणें विक्रम संवत् ७०५ मध्यें अधिक येत असल्यामुळें, या लेखांतील गुप्त शक वर्तमान धरल्याशिवाय त्याची वेरावेलच्या लेखाशीं व अलबेरूणीच्या उदाहरणाशीं संगति लागणार नाहीं. पूर्वी हा शक उत्तरेस नेपाळापासून दक्षिणेस काठेवाडापर्यंत प्रचलित होता. याचा शेवटचा लेख वलभी शक ९४५ म्हणजे इसवी सन १२६४ मधील आहे [ इं. अँ. पु. ११ पा. २४२ ].

गांगेय शक:- कलिंग नगर ( म्हणजे मद्रास इलाख्याच्या गंजम जिल्ह्यांतील पर्लाकिमेडीपासून २० मैलांवर असलेलें मुखलिंग ) येथें राज्य करणार्‍या गंगावंशी राजांच्या कित्येक दानपत्रांत हा शक दिलेला आढळून येतो [उदाहरणार्थ, सत्यवर्मदेवाचें ३५१ सालचें ( इं. अँ. पु. १४, पा. १२ ) व अनंतवर्मदेवाचें ३०४ सालचें ( ए. इं. पु. ३, पा. १८ ) दानपत्र पहा ]. यावरून ह्या शकाचा प्रवर्तक कोणी तरी गंगावंशी राजा असला पाहिजे असें अनुमान निघतें. परंतु हा राजा कोण होता याचा  मात्र अद्याप शोध लागला नाहीं. ह्या शकाचे जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यांत तिथीबरोबर कोठेंहि वार दिलेला नसल्यामुळें त्याचा आरंभ केव्हापासून होतो हें ठरविणेंहि दुष्कर झालें आहे.

मद्रास इलाख्याच्या गोदावरी जिल्ह्यांत महाराज प्रभाकर वर्धनाचा पुत्र राजा पृथ्वीमूल ह्याच्या कारकीर्दीच्या २५ व्या वर्षांतील जें एक दानपत्र [ ज. ए. सो. मुंबई, पु. १६, पा. ११६-१७ ] सांपडलें आहे त्यांत लिहिलें आहे कीं, ‘मितवर्म्याच्या ज्या इंद्राधिराज पुत्रानें दुसर्‍या राजांबरोबर जाऊन इंद्रभट्टारकास राज्यच्युत करण्याच्या कामीं यश संपादन केलें त्याच्या विनंतीवरून मीं चुयिपाक गांव ब्राह्मणांस दान दिला आहे.’ आतां ह्या लेखांत उल्लेखिलेला इंद्रभट्टारक जर डॉ० फ्लीट [ इं. अँ. पु. १३, पा. १२०] ह्यांनीं अनुमान केल्याप्रमाणें वेंगी देशचा त्याच नांवाचा पूर्वचालुक्य (  सोळंकी ) राजा असला, तर हें दानपत्र इं. स. ६६३ च्या सुमारास तयार झालें असावें. कारण, ह्या साली वेंगी देशाचा चालुक्य राजा जयसिंह मरण पावला असून त्याच्या नंतर त्याचा धाकटा भाऊ इंद्रभट्टारक ह्यानें अवघे सातच दिवस राज्यपदाचा उपभोग घेतला होता [ गौ. सो. प्रा. इ. ( गौरीशंकर हीराचंद ओझाकृत सोळंकियोंका प्राचीन इतिहास ) भाग १ पा. १४२ ]; आणि सदरहू दानपत्रांतील इंद्राधिराज हा, ज्याचीं [ गांगेय] ‘संवत्’ ८७ व ९१ सालचीं दानपत्रे उपलब्ध झालीं आहेत तो वेंगी देशच्या शेजारींच असलेल्या कलिंग नगरचा गंगावंशी इंद्रवर्मा राजा आहे हें डॉ० फ्लीटचें [ इं. अँ. पु. १३ पा. १२० ] दुसरें अनुमान बरोबर धरलें तर, इंद्रभट्टारकाशीं युद्ध होईपावेतों इंद्राधिराजास राज्यपद मिळालें असेल असें दिसत नसल्यामुळें [ भारतीय प्राचीन लिपिमाली पा. १७६ ], इंद्राधिराजाचें गांगेय शक ८७ तील दानपत्र इसवी सन ६६३ च्या युनंतरचें असलें पाहिजे. यावरून गांगेय शक ८७ हा इ. स. ६६३ नंतर थोड्याच वर्षांनीं आला असावा व म्हणून त्या शकाचा आरंभ इसवी सन ( ६६३-८७= ) ५७३ नंतर लवकरच पुढें केव्हां तरी झाला असावा असें अनुमान निघतें.

गोवें येंथें मिळालेल्या दुसर्‍या एका दानपत्रांत [ ज. ए. सो. मुंबई, पु. १० पा. ३६५ ] असें म्हटले आहे कीं, ‘ रेवती द्वीपांत राहणार्‍या ’ चार जिल्ह्यांचा अधिपति असलेल्या बप्पूरवंशी सत्याश्रय-ध्रुवराज-इंद्रवर्म्यानें पृथ्वीवल्लभ महाराजाच्या ( चालुक्य राजा मंगळीश्वर याच्या) आज्ञेनें विजयराज संवत्सर २० म्हणजे शककाल ५३२ मध्यें माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी खेटाहार देशांतील कारेल्लिका गांव शिवार्यला दान दिला.’ डॉ. फ्लीट यांनी सत्याश्रय-ध्रुवराज इंद्रवर्मा हा राजसिंह इंद्रवर्म्याचा आजा किंवा दुसरा कोणी पूर्वज असावा व त्यानेंच आपल्या अधिकारप्राप्ती पासून गांगेय शक सुरू केला असाव असें धरून, शके ( ५३२-२० = ) ५१२-म्हणजे इ. स. ५९०- मध्ये या शकाचा आरंभ झाला असें ठरविलें आहे [ ए. ब्रि. पु. १३; पा. ४९६ व भारतीय प्राचीन लिपिमाला पान १७६ टीप ६ ].

आतांपंर्यंत ह्या शकाचे जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यांतील पहिला, गांगेय शक ८७ मधील असून शेवटचा ३५१ सालचा आहे.

 हर्ष शक:- हा शक ठाणेश्वरचा बैसवंशी श्रीहर्ष उर्फ शिलादित्य राजा सिंहासनारूढ झाल्यापासून सुरू झाला असें मानण्यांत येते; तथापि ज्यांत ह्या शकास श्रीहर्षाचें नांव जोडलें आहे असा एकहि लेख अद्याप मिळालेला नाहीं [ हर्षाच्या दोन्हीहि दानपत्रांत केवळ संवत् हाच शब्द वापरला आहे ( ए. इं. पु. १ पा. ७२ व पु. ४ पा. २११ पहा)]. अलबेरूणीनें म्हटलें आहे कीं, विक्रमादित्यानंतर ६६४ वर्षांनीं श्रीहर्ष झाला असें मीं काश्मीरच्या एका पंचांगांत वाचलें आहे [ सा. अ. इं. पु. २ पा. ५ ]. अलबेरूणीच्या सदरहू विधानाचा अर्थ असा जर घेतला कीं, विक्रम संवत् ६६४ पासून हर्ष शकास प्रारंभ होतो, तर विक्रम संवतांत ६६३ म्हणजे इसवी सनांत ६०६ किंवा ६०७ मिळविले असतां हर्ष शकाचें वर्ष निघतें असें होईल. अलबेरूणीनें दुसर्‍या एका ठिकाणीं विक्रम संवत् १०८८ मध्यें हर्षं शक १४८८ पडतो असेंहि एक विधान करून ठेविलें आहे [ सा. अ. इं. पु. २, पा. ७; फ्लीट; गु. इं. प्रस्तावना पा ३०- ३१ ]. पण ह्या दुसर्‍या विधानांतील हर्ष शकाचा एकहि लेख अद्याप कोठें सापडला नाही; इतकेंच नव्हे तर उलट पक्षीं हर्ष शक ० = इ. सन ६०६ (विक्रम संवत् ६६३) धरून ब्रह्मसिद्धांतानुसार गणित केलें असतां, इ०स० ६४० ( विक्रम संवत् ६९७) मध्यें पौषमास अधिक येऊन नेपाळच्या अंशुवर्म्याच्या लेखांतील [की. लि. इं. नॉ. इं. ( कीलहॉर्नसंगृहीत लिस्ट ऑफ इन्स्क्रिप्शन्स ऑफ नॉर्दर्न इंडिया) पा. ७३ लेख नं. ५३० ]  ‘ संवत् ३४ ’ हें हर्ष शकाचें साल आहे असें दाखवितां येतें [ इं. अँ. पु. १५ पा. ३३८ ]. अर्थात् हर्ष शकाचा आरंभ इ ०  स० ६०६ मध्येंच होत असावा व अलबेरूणीच्या दुसर्‍या विधानांतील हर्षसंवत् १४८८ हें एखाद्या निराळ्याच हर्ष शकाचें साल असावें असें आपणांस मानलें पाहिजे. हा शक संयुक्त प्रांतांत व नेपाळांत सुमारें ३०० वर्षें प्रचारांत राहू पुढें त्याचा अस्त झाला [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १७७].

भाटिक उर्फ भट्टिक शक:- हा शक जेसलमीरच्या दोन शिलालेखांत सांपडला आहे. जेसलमीरच्या राजघराण्याचा मूळपुरूष भट्टि किंवा भट्टिक नांवाचा राजा असून त्याच्या नांवावरूनच त्याचे वंशज स्वत:स भाटी असें म्हणवीत असतात. तेव्हां सदरहू लेखांतील शक भट्टिक राजानेंच सुरू केला असावा असें दिसतें. उपयुक्त शिलालेखांवरून व जेसलमीरच्या राजांविषयीं जी महिती उपलब्ध आहे तिजवरून या अनुमानास पुष्टीच मिळतें. कारण, ह्या दोन शिलालेखांपैकी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरांतील वैरिसिंह राजाच्या वेळच्या शिलालेखांत विक्रम संवत् १४९४ व भाटिक शक ८१३ दिला असून महादेवाच्या मंदिरांतील भीमसिंह सावळाच्या कारकीर्दीतील लेखांत भाटिक शक ९९३ च्या मार्गशीर्ष महिन्यांत विक्रम संवत् १६७३ व शालिवाहन शक १५३८ लिहिला आहे [ प्रो. श्रीधरपंत भांडारकर यांचा संस्कृत पुस्तकांच्या शोधासंबंधी इ. स. १९०४-५ व १९०५-६ सालचा अहवाल पानें अनुक्रमें ९५ व ९८ पहा ]. ह्या दोन्ही लेखांवरून भाटिक शक व विक्रमसंवत् यांतील अंतर अनुक्रमें ६८१ व ६८० वर्षे निघतें. आतां जोधपूर येथें प्रतिहार बाऊक याचा विक्रम संवत् ८९४ चा जो लेख मिळाला आहे त्या वरून आपणांस असें कळतें कीं, बाउकाच्या शीलुक नामक निपणज्यानें देवराज भट्टिक याचा पराजय केला होता [ कीं.लि. इं. नॉ. इं. पा. ४७ लेख नं. ३३० ]. प्रत्येक राजाची कारकीर्द सरासरीनें २० वर्षें धरलीं असतां बाउकाच्या निपणज्याचा समकालीन जो देवराज यांच्या दरम्यान एकंदर पांच राजे झालें असल्यामुळें [ मेजर अर्सकिनचें जेसलमीरचें गॅझेटियर पानें ९, १० व कोष्टक नंबर ५ पहा ], पूर्वीप्रमाणेंच प्रत्येक राजाची कारकीर्द सरासरी २० वर्षें धरून हिशेब केला असतां भट्टिकाचा काळ विक्रम संवत् ६८० च्या जवळ जवळच येऊन ठेपतो [ चारण रामनाथ रत्‍न यानें आपल्या ‘ इतिहास राजस्थान ’ पुस्तकांत भट्टिकाचा काळ वि. सं.३३६-३५२ ( पा. २३२) व देवराज याचा काल वि. सं. ९०४-१०३० दिला आहे तो बरोबर नाहीं असें पंडीत ओझा म्हणतात ]. जेसलमीरच्या राज्यांतील पुरातन लेखांच्या संशोधनाचें काम अद्याप कांहीच झालें नसल्यामुळें हा शक कोठपासून कोठपावेतों प्रचारांत होता हें आज सांगतां येणें शक्य नाहीं.

कोल्लम उर्फ कोलंब शक:- ह्या शकास संस्कृत लेखांत कोलंब वर्ष [  इं. अँ. पु. २, पा. ३६० ] व तामिळ मध्यें कोल्लम आंडु म्हणजे पश्चिमेकडील वर्ष असें म्हटलेलें आढळून येतें. हा शक कोणीं व कशाकरितां सुरू केला याविषयीं कांहीच निश्चियात्मक माहिती मिळत नाहीं. परंतु त्यास कोल्लम वर्षांप्रमाणेंच कोठें कोठें कोल्लमच्या उत्पत्तीपासूनचें वर्ष असेंहि म्हटलेलें सांपडत असल्यावरून, मलबार प्रांतांत पश्चिम किनार्‍यावर कोल्लम अथवा कोलंबपत्तन [मुंबई गँझेटिअर पु. १, भाग १, पा. १८३, टीप १] नांवाचें जें प्राचीन नगर आहे त्याचा ह्या शकाशी कांही तरी संबंध असावा असें वाटतें. तथापि, बर्नेल म्हणतो [ ब. सा. इं. पॅ. पा. ७३] त्याप्रमाणें तो किल्लोन शहराच्या स्थानेपासूनच सुरू झाला असें मात्र कदापि म्हणतां येणार नाहीं. कारण, हा शक इ. स. ८२५ च्या सुमारास चालू झाला आहे; पण किलोन शहराच्या नांवाचा उल्लेख तर इसवी सनाच्या सातव्या शतकांतील लेखांत आढळून येतो [ इंपिरियल गॅझेटिअर ऑफ इंडिया, पु. २१ पा. २२पहा]. तेव्हां, किलोन शहर कोल्लम शकाहूनहि प्राचीन असलें पाहिजे हें उघड आहे. या शकाच्या उत्पत्तीविषयीं श्रीयुत गोपीनाथराव यांचें असें अनुमान आहे कीं [ त्रा. आ. सी. ( त्रावणकोर आर्किऑलॉजिकल सीरीज) पु. २, पा. ७६; ७८-७९. व प्राचीन लिपिमाला द्वितीयावृत्ति पा. १७९ टीप ३], इसवी सन ८२५ मध्यें मरूवान् सपीर नामक कोणी एक ख्रिस्ती व्यापारी आणखी कांही ख्रिस्ती मंडळीनां बरोबर घेऊन कोल्लम बंदरांत आला असावा व त्या प्रसंगाच्या आठवणीकरितां म्हणून तेथील राजानें त्या व्यापार्‍याचें जहाज बंदरांत आलें त्या दिवसापासून हा शक सुरू केला असावा. ह्या तर्काची इमारत कोट्टयंच्या ख्रिस्त्यांजवळ मिळालेल्या ज्या एक वट्टेळुत्तु लिपीच्या ताम्रपटावर उभारलेली आहे, त्यांत एवढेंच म्हटलें आहे कीं, मरूवान् सपीर यानें कोल्लम येथें तिरिस्सापल्लि ( म्हणजे ख्रिस्त्यांचें प्रार्थनामंदीर ?) बांधिलें; व [ मलबारचा राजा ] स्थाणुरवि याच्या कारकीर्दीत राजमंत्री विजयराघवदेवर वगैरे मंडळींच्या सल्ल्यानें स्थानिक अधिकारी आय्यंडिगळ् तिरुवडी यानें त्या मंदीरास कांहीं जमीन इनाम दिली व त्यास साहाय्य करण्याकरितां त्याच्या स्वाधीन कांही कुटुंबे करून थोडेसे अधिकारहि त्यास दिले. ह्या लेखांत कोणताहि शक दिला नसतां केवळ लिपीवरूनच त्याचा काळ ठरवून व आणखी दुसर्‍या कित्येक गोष्टी पुरेशा आधारावांचून गृहीत धरून गोपीनाथ राव यांनीं जें अनुमान केलें आहे तें पंडित ओझा यांनां ग्राह्य वाटत नाहीं [ भारतीय प्राचीन लिपिमाला द्वितीयावृत्ति पा. १७९ टीप ३]. कोणी असेंहि म्हणतात कीं, मलबारचा राजा चेरूमान पेरूमाल यानें मक्केस प्रयाण केल्यापासून या शकाचा आरंभ झाला असावा. ‘तुहफुतुल् मजहिदीन ’ नामक पुस्तकाचा कर्ता, चेरूमान् हा हिजरी सन २०० म्हणजे इसवी सन ८१५-१६ मध्यें मुसुलमान झाला असें सांगतो. अरबस्थानच्या किनार्‍यावर जुफहार नामक ठिकाणीं मलबारच्या अब्दुर्रहमान सामिरीची जी कबर दाखवितात तिजवर हा चेरूमान हिजरी सन २०२ मध्यें तेथें पोंचला व २१६ त मरण पावला असें लिहिलें असल्याचें म्हणतात [ इं. अँ. पु. ११ पा. ११६; ड. क्रॉ. इं. ( डफ; क्रानॉलॉजि ऑफ इंडिया) पा. ७४]. परंतु एक तर हा लेख तेथें असल्याचें सिद्ध झालें नाहीं [ मलबार गॅझेटिअर पा. ४१ ] व दुसरें चेरूमान् बौद्ध झाला होता अशी मलबारांत सर्वसाधारण समजूत आहे [ भारतीय प्राचीन लिपिमाला ]. तेव्हा ही दुसरी असंभवनीय उपपत्तीहि त्याज्यच ठरविली पाहिजे. शंकराचार्यांच्या मृत्यूपासून या शकाचा आरंभ होतो असेंहि कांही लोकांचें म्हणणें आहे. शंकराचार्यांचा जन्म विक्रम संवत् ८४५ [ यज्ञेश्वर शास्त्री यांचें आर्यविद्यासुधारकर पा. २२६-२७ ] म्हणजे इं. स. ७८८ सालीं झाला. व केरळोत्पत्तीप्रमाणें ते आपल्या ३८ व्या वर्षी मरण पावले असें जर आपण धरून चाललों, तर ह्या तिसर्‍या उपपत्तीप्रमाणें कोलंब शकाचा आरंभ ८२६ मध्यें पडूं शकतो हें खरें आहे. परंतु मलबारांतील दंतकथेशिवाय ह्या समजुतीस दुसरा आधार नसल्याकारणानें तिला विशेष महत्त्व देतां येत नाहीं.

कोल्लम शक यास मलबारांतील लोक ‘ परशुरामाचा संवत् ’ असें म्हणतात व तो एक हजार वर्षांचें एक चक्र असून सांप्रत त्याचें चौथें चक्र चालू आहे अशी त्यांची समजूत आहे. परंतु ज्या अर्थी इ. स. १८२५ सालीं त्याची १००० वर्षे पुरी झालीं असतांहि पुन्हां एकापासून त्याची गणना सुरू करण्याऐवजीं तो १००० च्या पुढेंच मोजण्यांत येत आहे, त्या अर्थी त्याला एक हजार वर्षांचें चक्र मानण्यास आपणांस कांहीच आधार नाहीं. त्रिवेंद्रम् येथें मिळालेल्या एका शिलालेखांत [ त्रा. आ. सी. पु २, पा. २८] ( वर्तमान) कलियुग संवत् ४७०२ बरोबर कोल्लम शक ७७६ दिला आहे. यावरून गत कलियुग संवत् व काल्लेम शक यांच्यामधील अंतर ( ४७०१-७७६=) ३९२५ वर्षें निघतें. बर्नेलच्या मतें ह्या शकाचा आरंभ इसवी सन ८२४ च्या सप्टेंबर महिन्यांत होतो [ सा. इं. पॅ. पा. ७३]. डॉ. हॉर्न यांनी कोल्लम शकाच्या कित्येक शिलालेखांतील संक्राती, वार वगैरे तपशीलांसंबंधी गणित करून कोल्लम शकाच्या सालांत ८२४ किंवा ८२५  मिळविले असतां इसवी सनाचें वर्षे निघतें असें ठरविलें आहे [ इं. अँ. पु. २५, पा. ५४]. दिवाण बहादूर एल. डी. स्वाभिकन्न पिल्ले हे इसवी सनांतून ८२५ वजा केले असतां कोल्लम शक निघतो असें धरून चालतात [इंडियन कॉनॉलॉजी पा. ४३ ].

हा शक मलबारपासून कन्याकुमारीपर्यंत व तिन्नवेल्लि जिल्ह्यांत अद्यापहि चालू आहे. याचें वर्ष सौर असतें व महिन्याचा आरंभ संक्रातीपासून होत. मलबारांत ज्या राशींत सूर्य असेल त्या राशीचेंच नांव महिन्याला देतात. परंतु तिन्नवेल्लि जिल्ह्यांत मेष महिन्यास वैशाख, वृषभ महिन्यास जेष्ठ, अशा रीतीनें बाराहि सौर महिन्यांस चैत्रवैशाखादि नांवेंच देण्यांत येतात. उत्तर मलबारांत वर्षारंभ कन्यासंक्रातीपासून म्हणजे सौर आश्विनापासून मानतात, पण दक्षिण मलबारांत व तिन्नवेल्लि जिल्ह्यांत तो सिंहसंक्रातीपासून म्हणजे सौर भाद्रपदापासून धरतात. ह्या शकाचा सर्वांत जुना लेख १४९ सालचा मिळाला आहे. [ए. इं पु. ९, पा. २३४].
नेवार शक:- डॉ. भगवानलाल इंद्रजी यांनां नेपाळांत जी वंशावळ मिळाली तिजवरून असें दिसतें कीं, नेवार ( नेपाळ) शक हा तेथील दुसर्‍या ठाकूर वंशांतील अभयमल्ल राजाचा पुत्र जयदेवमल्ला यानें सुरू केला. जयदेवमल्ल कांतिपुरावर व ललितपट्टणावर राज्य करीत होता व त्याचा बंधु आनंदमल्ल हा भक्तपूर ( भाटगांव ) नांवाचें नगर बसवून तेथे रहात होता. इतक्यांत नेपाळ शक ९ म्हणजे शालिवाहन शक ८११ मध्यें श्रावण शुद्ध ७ मीस कर्नाटक वंशाचा संस्थापक नान्यदेव यानें दक्षिणेंतून येऊन समग्र ( नेपाळ ) देश पादाक्रांत करून दोन्हीहि मल्लांनां तिरहूतकडे हांकून दिलें [ इं. अँ. पु. १३, पा. ४१४ ]. ह्या वंशावळीप्रमाणें जयदेवमल्ल इ. स. ८८० मध्यें विद्यमान होता असें होतें. परंतु वस्तुत; त्याचा काळ इ. स. १२५२-१२६० याच्या दरम्यान असावयास पाहिजे. जनरल कर्निगहॅम म्हणतो कीं राजा राघवदेव हा या शकाचा प्रवर्तक असून त्यानें इं. स. ८८० त नेपाळमध्यें तो सुरू केला होता [ कनिंगहॅम; इंडियन ईराज ( क. इं. ई.) पा. ७४]. भगवानलाल इंद्रजी ह्यांच्या वंशावळींत किंवा नेपाळच्या इतिहासावरील इंग्रजी पुस्तकांत राघवदेवाचें नांव नाहीं. पण राजा जयस्थितिमल्ल (इ. स.१३८०-१३९४) याच्या वेळीं लिहिलेलें जें वंशावळींचें पुस्तक प्रॉ. सोसंल बेंडाल यांनां नेपाळांत मिळालें होतें त्यांत ह्या राजाचें नांव आहे; व नेपाळांत सांपडलेल्या संसकृत हस्तलिखित पुस्तकांच्या शेवटी दिलेल्या तेथील राजांच्या नांवांवरून व शकांवरूनहि राघवदेवानेंच हा शक सुरू केला असणें अधिक संभवनीय दिसतें [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १८०].

वर दिलेल्या जयदेवमल्लाच्या हकीकतीवरू नेपाळ शक व शालिवाहन शक यांच्यामधलें श्रावण महिन्यांतील अंतर ८०२ निघतें. नेपाळांत मिळालेल्या दामोधरभट्टरचित ‘ नवरत्‍नम् ‘ नामक पुस्तकाच्या शेवटीं शालिवाहन शक १६०७ मार्गशीर्ष वघ ८, मघा नक्षत्र, सोमवार व नेपाळ शक ८०६ दिला आहे [ ह. कॅ. पा. (हरप्रसादशास्त्री संपादित कॅटलॉग ऑफ पामलीफ अँड सिलेक्टेड पेपर मॅनस्किप्ट्स बिलाँगिंग टु दि दरबार लायब्ररी नेपाळ) पा. १९५]. यावरून दोन्ही शकांतील मार्गशीर्ष महिन्यांतलें अंतर ८०१ असतें असें दिसतें. डॉ. कीलहॉर्न यांनीं नेपाळ शकाच्या शिलालेखांत दिलेले मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र इत्यादिकांवरून गणित करून त्या शकाचा आरंभ इ. स. ८७९ च्या आक्टोबर महिन्यांतील २० व्या तारखेस म्हणजे चैत्रादि विक्रम संवत् ९३६ च्या कार्त्तिक शुद्ध प्रतिपदेपासून होतो असें ठरविलें आहे [ इं. अँ. पु. १७, पा. २४६ ].  ह्या शकाचे महिने अमांत होते व वर्षे बहुतकरून गतच देत असत. अर्थात ह्या शकाच्या वर्षांत कार्तिकारंभापासून दिसेंबरअखेरपर्यंत ८७९ व जानेवारीच्या आरंभापासून आश्विनअखेरपर्यंत ८८० मिळविलें असतां इसवी सनांचें साल निघेल.

नेपाळांत कांही दिवस गुप्त शक, मग हर्ष शक व त्यानंतर हा शक प्रचारांत आला. तेथें गुरख्यांचा अंमल होईपर्यंत (इ. स. १७६८) तो तसाच चालू राहिला. परंतु नंतर मात्र सरकारी दफ्तरांत त्याच्या जागीं शालिवाहन शक लिहूं लागले. अद्यापहि पोथ्या लिहिणारे आपल्या ग्रंथांत हाच शक देत असतात [ भारतीय प्राचीन लिपिमाला पा. १८१ ].

चालुक्य विक्रम शक:- कल्याणपूर ( निजामाच्या राज्यांतील कल्याणी ) येथील चालुक्य (सोळंकी) राजा विक्रमादित्य ( सहावा ) यानें आपल्या राज्यांत शालिवाहन शकाच्या ऐवजीं आपल्या नांवाचा नवीन शक सुरू केला होता. हा शक माळव्यांतील विक्रम संवताहून निराळा आहे हें दाखविण्याकरितां शिलालेखांत त्यास ‘ चालुक्य विक्रमकाल ’ [ ज. ए. सो. मुंबई, पु. १० पा. २९०], ‘ चालुक्य विक्रम वर्ष ’ [ इं. अँ. पु. ८, पा. २० ]. ‘वीरविक्रमकाल’ ज.ए.सो. मुंबई, पु. २० पा. १९७], व ‘ विक्रमवर्ष’ [ की. लि. इं. स. इ. पा. ३८ लेख नं. २१२ ] अशीं निरनिराळीं नांवे दिलेलीं आढळतात. ह्या शकाचा आरंभ उपर्युक्त राजाच्या राज्याभिषेकाच्या वर्षापासून झाला असें मानण्यांत येतें.

सदरहू विक्रम राजाचे दुसर्‍या व सहाव्या विक्रमवर्षांतील दोन लेख अनुक्रमें येवूर गांवी व कुर्तकोटी येथें मिळाले आहेत. यांतील पहिल्यांत पिंगल संवत्सर श्रावण शुद्ध १५, रविवार, चंद्रग्रहण [ इं. अँ. पु. ८, पा. २० ] व दुसर्‍यात दुंदुभि संवत्सर पौष शुद्ध ३ रविवार, उत्तरायण संक्राति व्यतिपात [इं. अँ. पु.२२, पा. १०९ ], दिला आहे. बार्हस्पत्य गणनेप्रमाणें पिंगल व दुंदुभि संवत्सर अनुक्रमें शालिवाहन शक ९९९ व १००४ मध्यें येतात. तेव्हां ह्या दोन्हीहि लेखांवरून ( वर्तमान ) विक्रम शक व ( गत) शालिवाहन शक यांतील अंतर ९९७ च निघतें. ह्या शकाचा वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतो. तो सुमारें १०० वर्षें प्रचारांत होता व त्याचा शेवटचा लेख [ इं. अँ. पु. ९, प. ९७-९८ ] विक्रम शक ९४ मधील आहे.

सिंहशक:- मांगरोलच्या सोढडी विहिरीच्या लेखांत [ भावनगर प्राचीन शोधसंग्रह भाग १ पा. ७.] सिंह सवत् ’ ३२ बरोबर विक्रम संवत् १२०२ आश्विन वद्य १३ सोमवार, चौलुक्य राजा दुसरा भीमदेव याच्या दानपत्रांत [ इं. अँ. पु.१८, पा. ११२ ] ‘ सिंह संवत् ’ ९६ बरोबर विक्रम संवत् १२६६ मार्गशीर्ष शुद्ध १४ गुरूवार व चौलुक्य अर्जुनदेवाच्या वेळेच्या ‘ सिंह संवत् ’ १५१ च्या लेखांत [ इं. अँ. पु.११ पा. २४२ ] विक्रम संवत् १३२० आषाढ वद्य १३ दिलेली आढळते. यांपैकी शेवटच्या लेखांतील विक्रम संवत् कार्तिकादि असल्यामुळें त्याचा चैत्रादि किंवा आषाढादि विक्रम संवत् १३२१ होईल. तेव्हां, ह्या तीनहि लेखांवरून सिंहशक व चैत्रादि विक्रमसंवत् यांच्या मधील अंतर ११७० असतें असें दिसून येत आहे. या शकाचा आरंभ ( अमांत ) आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून [ भारतीय प्राचीन लिपिमाला, पा. १८४ ] होत असल्यामुळें, त्याच्या वर्षांत आषाढारंभापासून दिसेंबरअखेरपर्यंत १११३ व जानेवारीच्या आरंभापासून ज्येष्ठअखेरपर्यंत १११४ मिळविले म्हणजे इसवी सनाचें साल निघेल. ह्या शकाचा उपलब्ध असलेला सर्वांत अलीकडचा लेख सिंह शक १५१ मधील आहे [ प्राचीनलिपिमाला, पा. १८४ ]. सिंह शकाचे जे काय थोडेबहुत लेख आज उपलब्ध आहेत ते सर्व काठेवाडांत मिळालेले आहेत. चालुक्य भीमदेवाच्या दानपत्रांत सिंह शक असण्याचें कारण, त्यांतील दान दिलेल्या भूमीचा संबंध काठेवाडाशा आहे. ज्यांचा काठेवाडाशीं कांहीच संबंध नाही असे फक्त तीनच लेख सिंह शकाचे म्हणून दाखविण्यांत आले आहेत. वस्तुत: त्यांत संवत् एवढींच अक्षरें असून तो सिंह संवत् आहे हें केवळ अनुमानानेंच ठरविण्यांत आलें आहे. यांतील पहिला लेख गुजराथचा चौलुक्य राजा भीमदेव याचें संवत ९३ चें दानपत्र असून प्रो. देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांनां कोटाच्या राज्यांत अट्रू येथें मिळालेला महाराजाधिराज जयसिंह याचा संवत् १४ चा लेख व जोधपूरच्या राज्यांत सेवाडी गांवी मिळालेला कटुक राजाचा संवत् ३१ चा लेख हे दुसरे दोन आहेत. या तिहीपैकीं दानपत्र विक्रम संवत् १०९३ मधील पहिल्या भीमदेवाचें आहे व कोट्याचा लेख विक्रम संवत् १३१४ मधील माळव्याचा महाराजधिराज दुसरा जयसिंह ( जयतुगिदेव ) याचा आहे, असें पंडित गौरीशंकर हीराचंद्र ओझा यांनीं दाखविलें असून तिसर्‍या लेखाविषयीं ते असें म्हणतात कीं, एक तर तो बरोबर वाचला गेला नसावा किंवा वाचला गेला असला तर विक्रम संवत् ११८९-१२०२ मध्यें नाडोलचा राजा रायपाल असल्यामुळें त्यांतील संवत् सिंह शक मानतां येत नाहीं [ भारतीय प्राचीन लिपिमाला पानें १८२- ८४ टीप].

हा शक कोणीं सुरू केला याविषयी खात्रीलायक कांहीच माहिती आज उपलब्ध नाहीं. कर्नल जेम्स टॉड यानें ह्या शकाचें नांव ‘ शिवसिंह संवत् ’ असें दिलें असून तो काठेवाडच्या दक्षिणेस असलेल्या दीव बेटांतील गोहिल लोकांनीं सुरू केला होता असें त्यानें म्हटलें आहे [ इं. अँ. पु. ९, पा ९७-९८]. ह्या उपपत्तीवरून सिंह शकाचा प्रवर्तक गोहिल शिवसिंह होता असें ध्वनित होतें. भावनगर संस्थानचे माजी दिवाण विजयशंकर गौरीशंकर ओझा हे असें म्हणतात कीं, पोरबंदरच्या एका लेखांत श्रीसिंहाचें नांव आढळून येत असून त्यांत तो सौराष्ट्राचा मंडलेश्वर असल्याविषयीं लिहिलें आहे; परंतु कांहीं दिवसांनी अधिक प्रबळ झाल्यावर त्यानें विक्रम संवत् ११७० मध्यें आपल्या नांवाचा शक चालू केला असावा असें वाटतें [ भावनगर प्राचीन शोधसंग्रह, भाग १ पा. ४-५ (गुजराथी); इंग्रजी भाषांतर पानें २-३ ]  पोरबंदरचा उपर्युक्त सिंहाचा लेख अद्याप प्रसिद्ध झाला नसल्यानें तज्ज्ञ मंडळींच्या तत्त्वनिकषप्राव्याच्या कसोटीस लागून त्याचा खरेपणा सिद्ध झाला नाहीं. डॉ. भगवानलाल इंद्रजी यांचे असें मत आहे कीं, [ चौलुक्य ] जयसिंह ( सिद्धराज ) यानें बहुधा इ. स. १११३-१४ ( म्हणजे वि. सं. ११६९-७० ) च्या सुमारास सोरठ ( दक्षिण काठेवाड ) येथील खेंगार [ राजा ] वर विजय संपादन करून त्या विजयाच्या स्मरणार्थ हा शक चालू केला असावा [ मुंबई गॅझेटिअर पु. १, भाग १, पा. १७६ ]. परंतु, एक तर जयसिंहाने खेंगारवरील विजय इ. स. १११३-१४ तच मिळविला याबद्दल आपणांजवळ कांही पुरावा नाहीं, व दुसरें तो जयसिंहानें सुरू केला म्हणावा तर त्या शकास ह्या राजाचें नांव नाहीं किंवा त्याच्या वंशजांनींहि तो पुढें चालू ठेवलेला दिसत नाहीं. तेव्हां ज्या अर्थी काठेवाडाव्यतिरिक्त इतर कोणत्याहि ठिकाणी ह्या शकाचे लेख अद्याप सांपडले नाहीत त्या अर्थी काठेवाडचाच कोणा तरी सिंह नामक राजा त्या शकाचा प्रवर्तक असावा, हें विजय शंकर ओझा यांचे अनुमानच अधिक संयुक्तिक दिसतें.

लक्ष्मणसेन शक:- अबुलफजल याच्या अकबरनाम्यांत [ ज. ए. सो बंगा. पु. ५७, भाग १, पान. १-२ ] गत लक्ष्मणसेन शक ४६५ बरोबर गत शालिवाहन शक १५०६, स्मृतितत्त्वामृत नांवाच्या हस्तलिखितांत [ नोटिसेस ऑफ संसकृत मॅन्युस्किप्ट्रस पु. ६ पा. १३] लक्ष्मणसेन शक ५०५ बरोबर शालिवाहन शक १५४६ आणि नरपतिजयचर्या ह्या दुसर्‍या एका हस्तलिखितांत [ ह. कॅ. पा. पा. १०९ ] लक्ष्मणसेन शक ४९४ बरोबर ( वर्तमान ) शालिवाहन शक १५३६ दिलेला आहे. उलट पक्षीं तिरहूतच्या शिवसिंहदेव राजाच्या एका बनावट दानपत्रांत [ इं. अँ. पु. १४ पा. १९०, १९१ ] लक्ष्मणसेन शक २९३ बरोबर शालिवाहन शक १३२१ लिहिला असून द्विजपत्रिकेच्या १५ मार्च सन १८९३ च्या अंकात ह्या शकाचा आरंभ शके १०२८ मध्यें होतो असें म्हटलें आहे, व तो इ. स. ११०६ च्या जानेवारी महिन्यांत म्हणजे शके १०२७त होतो असें डॉ. राजेद्रलाल मित्र यांजकडून दाखविण्यांत आलें आहे [ ज. ए. सो. बंगा. पु. ४७, भाग १, पा. ३९८ ] मिथिला देशांतील निरनिराळ्या पंचांगात शालिवाहन शकाबरोबर जे निरनिराळे लक्ष्मणसेन शक हल्लीं देण्यांत येत असतात त्यांवरून लक्ष्मणसेन शकाचा आरंभ शके १०२६-२७,१०२७-२८,१०२९-३० किंवा १०३०-३१ यांपैकी कोणत्याहि एका वर्षीं येऊं शकेल [ क. इं. ई. पा. ७९]

वर दिलेल्या भिन्न भिन्न लेखांतील पुराव्यांचा असा मथितार्थ निघतो कीं, लक्ष्मणसेन शकाचा आरंभ एकतर शके १०४१ मध्ये झाला असावा किंवा त्याचा आरंभकाल शके १०२८ च्या जवळपास कोठें तरी असेल. डॉ. कीलहॉर्न यांनी एक शिलालेख व पांच हस्तलिखितें घेऊन त्यांच्या तिथिवारांसंबंधी गणित करून असें दाखविले आहे कीं, गत शक १०२८ च्या मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस म्हणजे तारीख २९ आक्टोबर सन ११०६ रोजीं ह्या शकाचा आरंभ होतो असें धरलें तर सहांपैकीं पांच लेखांतील तिथींचे वार जमतात. परंतु तोच जर गत शक १०४१ च्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेस म्हणजे तारीख ७ आक्टोबर सन १११९ ला धरला तर सहाहि तिथींचे वार जुळून येतात [ इं. अँ. पु. १९ पान ५-६ ]. गुलामवंशी कुतबुद्दिनाच्या कारकीर्दीत इ. स. ११९८-९९ च्या सुमारास [इं. अँ. पु. १९ पा. ७ ] बख्त्यार खिलजीनें नदिआ जिंकून लक्ष्मणसेनास हांकून लाविलें तेव्हांच लक्ष्मणसेनाची कारकीर्द आटोपली असें मानिलें तर त्या स्वारीची हकीकत लिहिणार्‍या मिनहाज उस्सीराज या मुसुलमान इतिहासकारानें म्हटल्याप्रमाणें लक्ष्मणसेनाची ८० वर्षांची कारकीर्द शक १०४१ च्या सुमारासच सुरू झाली पाहिजे. म्हणून तारिख ७ आक्टोबर सन १११९ ह्याच दिवसापासून लक्ष्मणसेन-शकाचा आरंभ होतो असें मानणेंच विशेष सयुक्तिक होईल.

बंगालचा लक्ष्मणसेन राजा सिंहासनारूढ झाल्यापासून ह्या शकाचा आरंभ होतो असें मानण्यांत येतें. पूर्वी ज्या मुसुलमान इतिहासकाराच्या नांवाचा उल्लेख आलेला आहे त्यानें आपल्या तब्कात-इ-नासिरी ग्रंथांत असें लिहून ठेविलें आहे. कीं, लक्ष्मणसेन गर्भावस्थेंत असतांच त्याचा बाप मरण पावल्यामुळें त्त्यास जन्मत:च गादी मिळाली होती. परंतु हा केवळ जनप्रवादच होता असें दिसतें [ लघुभारत खण्ड २, ज. ए. सो. बंगा. इ. स. १८९६]. कारण, लक्ष्मणसेनाचा  बाप बल्लाळसेन यानें पुत्रलाभामुळें त्यास जो आनंद झाला त्यांत आपल्या मुलाच्या जन्मदिवसापासून त्याच्या नांवाचा शक सुरू केला असला तरी तो त्यानंतर कित्येक वर्षे जिवंत होता. इतकेंच नव्हे तर शके १०९१ मध्यें त्यानें दानसागर नांवाचा एक ग्रंथ लिहून संपविला होता [ ज. ए. सो. बंगा. इ. स. १८९६ भा. १ पा. २३ ]. त्याच्या आधल्याच वर्षीं त्याने अदभुतसागर नांवाचा दुसराहि एक ग्रंथ लिहिण्यास आरंभ केला होता; तथापि वृपकामुळें तो आपल्या हातून संपूर्ण होणें शक्य नाहीं असें पाहून आपल्या मुलाच्या स्वाधीन सर्व राज्यकारभार करून त्यानें गंगाप्रवाही देहत्याग केला [अदभुतसागर; भारतीय प्राचीन लिपिमाला, पा. १८४]. आरंभीं ह्या शकाचा प्रचार बंगाल बिहार व मिथिला एवढ्या देशांत होता परंतु आतां फक्त मिथिलेंतच त्याचा प्रचार राहिला असून तेथें त्याचा वर्षारंभ माघ शुद्ध प्रतिपदेपासून मानण्यांत यतो [ भा. प्रा. लि. पा. १८६ ].

राज्याभिषेकशक किंवा राजशक:- मराठी राज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून म्हणजे गत शक, १५९६, चैत्रादि गत विक्रम संवत् १७३१, आनंद संवत्सर, ज्येष्ट शुद्ध १३, तारीख ६ जून सन १६७४ पासून [ त्रा. आ. सी. पु. १, पा. २९ ] ह्या शकास आरंभ होत असून तो मराठी राज्यांत प्रचलित होता. याचा वर्षारंभ ज्येष्ठ शुद्ध १३ पासून होत असे व वर्षे वर्तमान लिहिलीं जात. आतां हा शक प्रचारांत राहिला नाहीं.

पुडुवैप्पुशक:- मलयाळम् भाषेंत पुडुवैप्पु शक याचा अर्थ नवीन वसाहतीचा शक असा होतो ( पुडु = नवीन, वेप= वसाहत ). इ. स. १३४१ मध्यें कोचीनच्या उत्तरेस १३ मैल लांब व १ मैल रूंद असा जो एक जमिनीचा तुकडा समुद्रांतून वर आला त्याच्या स्मरणार्थ सदरहू शक सुरू करण्यांत आला होता [ त्रा. आ. सी. पु. १ पा. २८-२९ ]. कोचीनचें राज्य व डच ईस्ट इंडिया कंपनी यांच्या दरम्यान झालेला तह ज्यांवर खोदविला आहे असें पांच ताम्रपट आढळून आले आहेत. त्यांत पुडुवैप्पू शक ३२२, १४ मीनम् ( मीन महिन्याचा १४ वा दिवस = ता. २२ मार्च ) असें लिहिलेलें आहे. या शकाचा कोचीनच्या राज्यांत पूर्वी थोडासा प्रचार होता, परंतु आतां तो समूळ नाहींसा झाला आहे.

हिजरी सन:- ह्या सनाचा आरंभ मुसलमानी धर्माचे प्रवर्तक महंमद पैगंबर यांनी मक्केकडून मदीना येथें ज्या दिवशी पलायन केलें त्या दिवसापासून होतो असें मानण्यांत येतें. अरबी भाषेत ‘हिजर’ धातूचा अर्थ वेगळे होणे किंवा सोडणे असा असल्यामुळे ह्या शकास म्हणजे सनास हिजरी सन असें नांव पडलें. तथापि, हा सन पलायनाच्या दिवसापासून लागलाच प्रचारांत आला असें मात्र घडलें नाहीं. आरंभी मुसुलमान लोक वर्षांनां आपल्या पैगंबराच्या निरनिराळ्या कार्यांची नांवें देत असत. उदाहरणार्थ, पहिलें ‘ यजन ’ म्हणजे मक्केहून मदीना येथें जाण्याच्या आज्ञेचें वर्ष; दुसरें ‘ हुक्म ’म्हणजे ज्या वर्षी मुसुलमान न होणार्‍या लोकांशी लढण्याचा हुकूम झाला तें वर्ष इत्यादि. पुढें एकदां असें झालें कीं खलीफ उमर (इ. स. ६३४-६४४) यांच्या कारकीर्दीत, त्याच्या जुन्या कागदपत्रांत दिलेले चांद्रमास कोणत्या वर्षांतील आहेत हें समजत नाहीं अशी तक्रार करण्यांत आली; तेव्हां त्यानें विद्वानांच्या सल्ल्यानें असें ठरविलें कीं, ज्या वेळी आपल्या पैगंबरानें मदीन्यास येण्याकरितां मक्का सोडली त्या वेळेपासून –म्हणजे ता. १५ जुलै इ. स. ६२२ विक्रम संवत् ६७९ श्रावण शुद्ध २ ह्या दिवसाच्या संध्याकाळापासून- हिजरी सनाचा आरंभ होतो असें धरून कालगणना करण्यांत यावी [ नवलकिशोर प्रेस ( लखनौ ) ची अयने अकबरी दफ्तर १ पान ३३७]. ही गोष्ट हिजरी सन १७ मध्यें घडली असें म्हणतात [ ‘अजायब उल बुलदान ’, नवलकिशोर प्रेसचे गयासुल्लुगात पुस्तक पान ३२४ पहा ].

हिजरी सनाचें वर्षे चांद्र आहे. त्यांतील प्रत्येक महिन्याच्या आरंभ चंद्रदर्शनापासून म्हणजे बहुधा शुद्ध द्वितीयेपासून होतो. १ मोहरम ( मुहर्रम ), २ सफर, ३ रविलावल ( रबी उल अव्वल ), ४ रबिलाखर (रबी उल आखिर किंवा रबीउस्मानी), ५ जमादिलावल ( जमादि उल अव्वल), ६ जमादिलाखर ( जमादिल आखिर, किंवा जमादि उस्मानी), ७ रज्जब ( रजब ), ८ साबान (शाबान). ९ रमजान, १० सवाल (शव्वाल), ११ जिल्काद व १२ जिल्हेज (जिल हिज्ज); ही हिजरी सनांतील बार महिन्यांचीं नांवें आहेत. एका चांद्र मासांत जवळ जवळ २९ दिवस, ३१ घटिका, ५० पळें व ७ विपळें एवढाच काळ असल्यामुळें एका चांद्र वर्षांत सौर वर्षाहून जवळ जवळ १० दिवस, ५३ घटिका, ३० पळें व ६ विपळें कमी येतात. याचा परिणाम असा झाला आहे कीं, ता. १५ जुलै सन १९२२ (दक्षिण विक्रम संवत् १९७८ श्रावण वद्य ६ ) रोजी संध्याकाळीं ह्या सनास आरंभ होऊन बरोबर १३०० वर्षे होत असतां, त्या वेळीं हिजरी सन १३४० च्या जिल्काद महिन्यांतील २० व्या तारखेस आरंभ होणार आहे. म्हणजे १३०० सौर वर्षांत हिजरी सनाचीं ३९ वर्षें १० महिने व १९ दिवस अधिक झाले. या हिशेबानें १०० सौर वर्षांत चांद्रमानानुसार ३ वर्षे, २४ दिवस व ९ घटिका अधिक होतात. अशा स्थितींत हिजरी सनावरून इसवी सनाचे अगर हिंदू लोकांच्या चांद्रसौर मानाच्या शक संवतादिकांचे वर्ष काढण्याकरितां प्रत्येक वेळीं गणित करून पाहिल्याशिवाय गत्यंतरच नाहीं.

हिंदुस्थानांत मुसलमानी अंमलापासून हिजरी सनाचा प्रचार सुरू झाला. व त्याचा क्वचित् प्रंसगी संस्कृत लेखांतही उपयोग होऊं लागला ( इं. अँ. पु. ११, पा. २४२) पहा). हा सन हिंदुस्थानांत महमुद गझनीच्या मंहमदपूर म्हणजे लाहोर येथील हिजरी सन ४१८-४१९ (इं. स. १०२७-१०२८) मधील नाण्यावरच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या संस्कृत लेखांत पहिल्या प्रथम वापरलेला दृष्टीस पडतो (एडवर्ड थाँमस, क्रानिकल्स आँफ दि पार्शियन किंग्ज आँफ डेल्हि, पृ. ४८).

सूरसन- याचें मूळ नांव शाहूर सन, पण त्यास सूर किंवा सुरू सन आणि अरबी सन असेंहि म्हणतात. ह्या शकास शाहूर हें नांव कां पडलें याचें कारण बरोबर समजत नाही. परंतु असा एक तर्क आहे कीं, अरबी भाषेंत महिन्याला जो शहर असा शब्द आहे त्याचें अनेकवचन शहूर असल्यामुळें त्यापासून शाहूर शब्दाची व्युत्पत्ति झाली असावी. हा सन मराठशाहींत प्रचारांत होता. मराठ्यांच्या कागदपत्रांत सूर सन व त्याबरोबर हिजरी सनाचे चांद्रमास व चंद्र दिलेले आढळतात. हल्ली हा सन महाराष्ट्रांत कोणी वापरीत नाहीं. परंतु महाराष्ट्रांतील पचांगात सूर सनाच्या वर्षांरंभी त्याचें साल देण्याची जी पूर्वीपासून वहिवाट पडली ती अद्याप तशीच कायम राहिली आहे. ह्या सनाची वर्षें आंकड्यांत न लिहितां संख्यावाचक अरबी शब्दांत व्यक्त करीत असतात. खाली अरबींतील मूलभूत संख्यांची नांवे व त्या बरोबरच त्यांचे मराठी अपभ्रंश कंसात दिले आहेत. या अंकात कोणतीहि संख्या सांगावयाची असल्यास प्रथम एकंच्या, मग दहंच्या, नंतर शतंच्या व मागून सहस्त्राच्या अंकाचें नाव घालावें. उदाहरणार्थ, १३२१- इहिद्दे, अशरीन, सल्लास मय्या व अल्लफ. मूलभूत अरबी संख्याची नांवें पुढें दिल्याप्रमाणें आहेत.

१ अहद ( इहिद्दे), २ अस्ना (इसन्ने), ३ सलासह (सल्लास), ४ अरबा (आर्बा), ५ खम्मा (खंमस),६ सित्ता (शीत), ७ सबा (सब्बा), ८ समानिआ (सम्मान), ९ तसआ (तिस्सा), १० अशर, २० अशरीन,३० सलासीन (सल्लासीन), ४० अरबईन (आबैंन), ५० खमसीन (खमसैन),६० सित्तीन (शितैन), ७० सबीन (सब्बैन), ८० समासीन (रूम्मानीन), ९० तसईन (तिस्सैन),१०० माया (मय्या),२०० मअतीन (मय्यातैन),३०० सलास माया, ४०० अरबी माया इत्यादि. १००० अलफ (अलफ), १०००० अशर अलफ (अशर अल्लफ).

ह्या सनाचा वर्षारंभ मृग नक्षत्रीं सूर्य आल्यापासून होत असल्याकारणानें त्याचें वर्ष सौर असतें. त्याच्या वर्षांत मृग नक्षत्रापासून- मे किंवा जून महिन्यापासून- दिसेंबर अखेरपर्यंत ५९९ व  इतर महिन्यांत ६०० मिळविले असतां इसवी सनांचे वर्ष निघतें. त्याचे महिने सौर असतात तरी त्यांनां हिजरी सनाच्या चांद्र महिन्यांचीच नांवें दिलेलीं आहेत. ता. १५ मे सन १३४४ (वि. सं. १४०१ ज्येष्ठ शुद्ध २) रोजी हिजरी सन ७४५ च्या मोहरम महिन्यास आरंभ झाला असून त्याच दिवशीं सूर्यहि मृग नक्षत्रीं आला होता व सूर सनाचेंहि ७४५ वें वर्ष त्याच दिवशीं सुरू झालें होतें. या वेळीं दिल्लीस महंमद तघलक (इं. स. १३२५) राज्य करीत असून त्यानें दिल्लीहून आपली राजधानी काढून ती देवगिरी (दौलताबाद) शहरीं आणण्याचा प्रयत्नहि केला होता. तेव्हां असा एक संभव आहे कीं रवी व खरीफ या दोन हंगामाचा हिजरी सन व त्याचे चांद्रमास यांच्याशी संबंध न  राहूं लागल्यानें सरकारी सारा वसूल करण्यास जी गैरसोय होऊं लागली ती टाळण्याकरितां म्हणून महंमद तघलकानें हिजरी सनाचे चांद्र मास व चांद्र वर्ष सौर करून दक्षिणेंत हा सन सुरू केला असावा. ह्या सनाच्या वर्षास मृगापासून आरंभ होतो म्हणून त्यास मृगसाल असेंहि कधीं कधीं म्हणत असत.

फसलीसन– हिंदुस्थान देशांत मुसुमानांचें राज्य झाल्यापासून सरकारी कागदपत्रांत हिजरी सन वापण्यांत येऊं लागला, परंतु त्याचें वर्ष शुद्ध चांद्र असल्यानें तें सौर वर्षाहून सुमारें ११ दिवसांनी लहान पडतें व त्यामुळें त्याच्या महिन्यांचा किंवा वर्षाचा शेतकर्‍याच्या रबी व खरीफ ह्या दोन फसलांशी म्हणजे हंगामांशी कांहीच संबंध राहीना. हिजरी सनामुळेमं फसलांचा हा जो घोटाळा होत होता तो दूर करण्याकरितां अकबर बादशहानें हिजरी सन ९७१ (इं. स. १५६३) पासून फसली सन सुरू केला. त्या वर्षी हिजरी सनाचें जें साल होतें तेंच फसली सनाचेंहि मानलें गेलें, परंतु त्यापुढे फसली सनाचें वर्ष सौर किंवा चांद्रसौर धरण्यांत येऊं लागल्यामुळें त्याचें साल हळूहळू हिजरी सनाच्या मागें पडूं लागलें. आरंभी हा सन पंजाबांत व संयुक्त प्रांतांत सुरू करण्यांत आला होता, परंतु पुढें बंगाल वगैरे प्रांत अकबराच्या राज्यास जोडले गेले तेव्हां तेथेंहि तो चालू करण्यांत आला. दक्षिणेमध्यें तो शहाजहान बादशहाच्या कारकीर्दीत आला. हा सन अद्यापहि कोठें कोठें वापरण्यांत येतो; पंरतु निरनिराळ्या भांगात त्याची निरनिराळ्या प्रकारची गणना प्रचलित आहे. पंजाब, संयुक्तप्रांत व बंगाल एवढ्या देशांत ह्याचा आरंभ (पौर्णमांत) आश्विन कृष्ण प्रतिपदेपासून होतो व तेथें त्याच्या सालांत ५९२ किंवा ५९३ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें. दक्षिणेंत हा सन हिजरी सन १०४६ (इ. स. १६३६) मध्यें प्रथम चालू करण्यांत आल्यामुळें उत्तरेकडील व दक्षिणेकडील हिजरी सनांत सुमारें २ वर्षांचें अंतर पडलें. मुंबई इलाख्यांत याचा आरंभ मृग नक्षत्रापासून म्हणजे ता. ५,६ किंवा ७ जूनपासून होत असतो व त्याचे महिने मोहरम आदिकरून असतात. मद्रास इलाख्यांत अगोदर ह्या सनाचा आरंभ कर्क संक्रांतीपासून होत असे. परंतु इं. स. १८०० च्या आसपासपासून तो १३ जुलैपासून धरण्यांत येऊं लागला व पुढें इ. स. १८५५ पासून १ जुलै हा त्याचा आरंभदिवस निश्चित करण्यांत आला. दक्षिणेंतील फसली सनांत ५९० किंवा ५९१ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें.
विलायतीसन:- विलायती सन हें एक प्रकारे बंगालमधील फसली सनाचेंच दुसरें नांव आहे ( फसली सन पहा). हा ओरिसांत व बंगालच्या कांही भागांत चालू असून याचे महिने व वर्षें हीं दोन्हीहि सौरच आहेत. महिन्यांस चैत्रादि बारा नांवें आहेत व वर्षारंभ कन्या संक्रांतीपासून म्हणजे (सौर) आश्विनापासून धरण्यांत येतो. ज्या दिवशीं सूर्यांचें दुसर्‍या राशींत संक्रमण होतें तोच महिन्याचा प्रथम दिवस असतों. याच्या वर्षांत ५९२ किंवा ५९३ मिळविले असतां इसवी सनाचें साल निघतें.

अमलीसन:- अमली सन हा ओरिसाच्या व्यापारी लोकांत व कचेर्‍यांमध्यें प्रचलित आहे. ह्यांत व त्याच देशांत चालू असलेल्या विलायती नामक दुसर्‍या सनांत एवढाच फरक आहे कीं, विलायती सनाचा वर्षारंभ कन्या संक्रांती- पासून होतो तर याचा भाद्रपद शुद्ध द्वादशीपासून होतो (विलायती सन पहा). अशा रीतीनें वर्षारंभ भिन्न असण्याचें कारण असें सांगतात कीं, सदरहू दिवशीं ओरिसाच्या इंद्रघुम्र नामक राजाचा जन्म झाला होता.

बंगालीसन:- बंगाली सनास गंगाब्द असेंहि दुसरें एक नांव आहे. हा बंगाल्यांतील फसली सनाचाच एक निराळा प्रकार आहे. ह्यांत व तेथील फसली सनांत एवढाच फरक आहे कीं, फसली सनाचा वर्षारंभ आश्विन वद्य प्रांतपदे पासून होतो तर याचा पुढें सात महिन्यांनंतर मेषंसंक्राती पासून म्हणजे सौर वैशाखापासून होतो. याचे महिने सौर असल्यामुळें त्यांत गणना नाहीं. सूर्याचें ज्या दिवशी दुसर्‍या राशींत संक्रमण होतें त्यास पहिला दिवस मानून त्याच्या सौर महिन्याचे दिवस मोजीत असतात. ह्या सनांत ५९३ किंवा ५९४ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें.

मगीसन:- बंगालच्या चितागांग जिल्ह्यांत ह्या सनाचा प्रचार आहे व त्याच्या सालांत ६३८ किंवा ६३९ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें. बंगाली सनाप्रमाणें ह्याचाहि वर्षांरंभ मेष संक्रांतीपासून म्हणजे सौर वैशाखापासून होतो; व त्याच्या महिन्यांस चैत्रवैशाखादि नांवें असून सूर्य ज्या दिवशी दुसर्‍या राशींत प्रवेश करितो तो नवीन महिन्याचा पहिला दिवस समजून त्या महिन्याचें पुढील दिवस मोजण्यांत येत असतात. हा सन कोणीं सुरू केला व त्याला मगी असें नांव कां मिळालें हें नीट समजत नाहीं. आराकानच्या राजानें इसवी सनाच्या नवव्या शतकांत चितागांग जिल्हा जिंकून घेतला होता. व इ. स. १६६६ त तो मोगलांच्या राज्यास जोडला जाईपर्यंत त्यावर बहुतेक आराकानी म्हणजे मगी लोकांचीच सत्ता राहिली होती. तेव्हां कदाचित् मग लोकांवरूनच ह्या सनास मगी हें नांव पडलें असण्याचा संभव आहे [ ए. ब्रि. पु. १३, पा. ५०० ११ वी आवृत्ति].

इलाही सन:- तारीख-इ-इलाही नावांचा हा शक अकबर बादशहानें सुरू केला असून तो ज्या वर्षी गादीवर बसला तें ह्या शकाचें पहिलें वर्षे होतें असें अबदुल कादिर वदायूनी नामक अकबराच्या दरबारांतील एका पंडितानें आपल्या ‘  मुंतखवुत्तवारीख’ पुस्तकांत लिहून ठेविलें आहे  [ क. इं. ई. पान ८४].वास्तविक पाहतां हा सन अकबर सिंहासनारूढ झाल्यावर २९ साव्या वर्षी म्हणजे हिजरी सन ९९२ ( इं. स. १५८४) मध्यें सुरू करण्यांत आला होता. परंतु मागील वर्षांचा हिशेब करून अकबर ज्या वर्षीं गादीवर बसला तें ह्या शकाचें प्रथम वर्ष होईल अशी व्यवस्था केली गेली. अकबराचें राज्यारोहण तारीख २ रवी उस्सानी हिजरी सन ९६३ म्हणजे तारीख १४ फेब्रुवारी इ. स. १५५६ रोजीं झालें होतें. परंतु त्या त्या दिवसापासून ह्या शकाचा आरंभ न धरतां पुढें २५ दिवसांनी म्हणजे तारीख ११ मार्च सन १५५६ रोजी इराणी (पार्शी) लोकांचा फरवर्दिन नांवाचा वर्षांरंभीचा महिना सुरू झाला तो त्याचा आरंभदिवस समजण्यांत आला. ह्या सनाचें वर्ष सौर आहे व महिन्यांची व तारखांची नांवें पार्शी लोकांसारखीच आहेत. ह्या सनाचें कांही महिने २९ दिवसांचे कांही एकतिसांचे व एक बत्तिसाचा होता. महिन्याच्या तारखा आंकड्यांत न मांडता त्यांची पार्शी नांवेच लिहिण्यांत येत होतीं. पार्शी लोकांचा प्रत्येक महिना तीस दिवसांचाच असल्यामुळें ३१ व ३२ ह्या दोन तारखांकरितां मात्र अनुक्रमें रोज व शब या दोन नवीन नांवांची योजना केली गेली होती. (पार्शी महिन्यांची व तीस तारखांची नांवे यज्दजर्द सनाखालीं पहा.)

हा सन अकबर व जहांगीर ह्या दोनच बादशहांच्या कारकीर्दीत चालू होता. शहाजहान अधिकारारूढ होतांच त्यांने तो बंद करून टाकल्यानें अकबर व जहांगीर यांच्या कारकीर्दीतील कागदपत्र, नाणीं व ऐतिहासिक ग्रंथ यांच्या खेरीज इतर ठिकाणीं तो सांपडत नाहीं. ह्या सनांत १५५५ किंवा १५५६ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें.

यज्दजर्द सन:- हा पार्शी लोकांचा सन आहे. याचें वर्ष सौर असून त्यांतील महिन्यांस अनुक्रमें १ फरवर दीन् (फरवर्दीन), २ उर्दिबहिश्त (आर्दीबेहस्त), ३ खुर्दाद, ४ तीर (तियर), ५ अमरदाद् (अमुरदाद), ६ शहरेवर (शारेवर), ७ मेहर (मेहेर), ८ आवां (आबान), ९ आजर (आदर), १० दे, ११ बहमन व १२ अस्फंदिआरमद (आस्पंदाद) अशीं नांवें आहेत. प्रत्येक महिन्यांत तीसच दिवस असतात; परंतु वर्षाच्या अखेर गाथाचे अहुनवद्, ओश्तवढ्, स्वेतोमद्, बहुक्षव्र व वहिश्तोयश्त हे पांच दिवस मिळवून एंकदर ३६५ दिवस करण्यांत येतात. दर १२० वर्षांनीं महिन्याच्या अनुक्रमानें एक महिना अधिक धरिला जातो. ह्या अधिक मासास कबीसा असें म्हणतात. प्रत्येक महिन्यांत जे तीस दिवस असतात त्यांनां पुढें दिल्याप्रमाणें नांवें आहेत:-

१ अहुर्मज्द, २ बहमन्, ३ उर्दिबहिश्त, ४ शहरेवर, ५ स्पंदारमद्, ६ खुर्दाद, ७ मुरदाद (अमरदाद), देपादर, ९ आजर (आदर), १० आवां (आवान), ११ खुरशेद्, १२ माह (म्होर), १३ तीर, १४ गोश, १५ देपमेहर, १६ मेहर, १७ सरोश, १८ रश्नह, १९ फरवरदीन् २० वे हराम , २१ राम, २२ गोवाद, २३ देपदीन, २४ दीन, २५ अर्द (अशीश्वंग), २६ आस्ताद, २७ आस्मान्, २८ जमिआद, २९ मेहरेस्पंद व ३० अनेरां.

इसवी सन:- ह्या सनाचा आरंभ ख्रिस्ती संप्रदायाचा प्रवर्तक येशू ख्रिस्त याच्या जन्मवर्षापासून होतो असें मानण्यांत येतें. येशू ख्रिस्तास हिंदी लोक ‘ ईसा मसीह ’ असें म्हणत असल्यामुळें त्याच्या शकास इसवी सन हें नांव पडलें आहे. हा शक इसवी सन ५२७ च्या सुमारास रोम येथील डायोनीसिअस एक्सिगुअस नामक एका विद्वान् पाद्य्रानें सुरू केला. १९४ व्या ऑलिपिअडच्या चौथ्या वर्षांत म्हणजे रोम शहराच्या स्थापनेपासून ७५३ व्या वर्षी येशू खिस्ताचा जन्म झाला असें त्यानें प्रथम हिशेब करून ठरविलें; व मग त्या वर्षी शकारंभ धरिला असतां आज त्या नवीन शकाचें कोणतें वर्ष पडतें हें काढून त्या कालगणनेचा ख्रिस्तानुयायी राष्ट्रांत प्रसार करण्याचा त्यानें प्रयत्‍न केला. त्याच्या प्रयत्‍नांनीं हा शक इसवी सनाच्या सहाव्या शतकांत इटलीमध्यें, आठवें शतक संपण्यापूर्वी इंग्लंडमध्यें, आठव्या व नवव्या शतकांत फ्रान्स, बेल्जम, जर्मनी व स्विट्झरलंड या देशांत व इसवी सन १००० पावेतों यूरोपांतील राहिलेल्या बहुतेक सर्व खिस्ती राष्ट्रांत वापरण्यांत येऊं लागला. त्यानंतर पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रसाराबरोबर ह्याचाहि दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसार होत जाऊन आतां तर बहुतेक सर्व जगभर त्याचा उपयोग होऊं लागला आहे.

वर्षाचे आंकडे सोडून इतर सर्व बाबतींत ह्या शकाची कालगणना प्राचीन रोमन लोकांप्रमाणेंच आहे. आरंभी रोमन लोकांचे वर्ष ३०४ दिवसांचें होतें व त्यांत मार्चपासून दिसेंबरपर्यंत १० महिने होते. जुलै व ऑगस्ट ह्या दोन महिन्यांस च्या वेळीं ‘ किनक्टिलिस ’ व सेकस्टिलिस अशी नांवें होतीं.पुढें ‘ नुमा पांपिलिअस ’ ( ख्रिस्तपूर्व ७१५- ६७२ ) नांवाच्या राजानें वर्षाच्या आरंभी जानेवारी व अखेरीस फेब्रुवारी असें दोन महिने अधिक घालून रोमन वर्षास ३५५ दिवसांचें चांद्र वर्ष केलें. त्यानंतर ह्या चांद्र वर्षाचें सौर वर्ष करण्याच्या हेतूनें ख्रिस्तपूर्व ४५२ सालापासून एक टाकून दुसर्‍या वर्षी वर्षाच्या शेवटी अनुक्रमें बावीस व तेवीस दिवस अधिक धरूं लागले. फेब्रुवारी महिना शेवटून निघून जानेवारीच्या पुढें आला तो ह्याच वेळीं.ह्या योगानें रोमन वर्ष सरासरी ३६६| दिवसांचें होऊन त्यांत सौर वर्षापेक्षां दर चार वर्षांमागें चार दिवस अधिक वाढूं लागले. म्हणून पुढें अधिक मासाचे दिवस वेळोवेळी कमी जास्त करण्यांत येऊं लागले. परंतु वर्षाचे दिवस कमी अधिक करण्याचा अधिकार ज्याच्याकडे होता ते त्याचा दुरूपयोग करूं लागल्यामुळें रोमन वर्षाचा सौर वर्षाशीं मेळ बसूं शकला नाहीं. ख्रिस्तपूर्व ४६ साली जूलिअस सीझरनें रोमन वर्ष व सौर वर्ष ह्यांत ९० दिवसांचें अंतर पडलेलें पाहून चालू वर्ष ४५५ दिवसांचे धरून त्यानें तें सौर वर्षाशीं मिळवून घेतलें, व ‘ क्किन्टिलिस ’ महिन्यास जुलै असें नांव देऊन जानेवारी, मार्च, मे, जुलै, सेप्टेबंर व नोव्हेंबर या महिन्यांचे प्रत्येकीं ३१ दिवस, व राहिलेल्या महिन्यांपैकीं फेब्रुवारीचे २९, बाकीच्यांचे ३० व दर चौथे वर्षीं फेब्रुवारीचेहि ३० दिवस धरावे असें ठरविलें जूलिअस सीझरनंतर ऑगस्ट बादशहा झाल्यावर त्यानें ‘ सेकस्टिलिस ’ महिन्यास आगस्ट हें नवीन नांव देऊन त्याचे ३१ दिवस केले व फेब्रुवारीचे २८, सेप्टेंबर व नोव्हेंबर या महिन्यांचे प्रत्येकीं ३० व दिसेंबरचे ३१ दिवस करून दर चौथे वर्षी फेब्रुवारीचे २९ दिवस धरावे असा नियम केला. अशा रीतीनें पंचांगांत सुधारणा होऊन जें जूलियन वर्ष सुरू झालें तें ३६५| दिवसांचें झाल्यामुळें त्याचा सौर वर्षाशीं मेळ बसूं लागला. पुढें डायोनीसियस यानें इसवी सनाकरितां जें वर्ष घेतलें तें हेंच होय.

तथापि मध्यममानानें एका सौर वर्षांत ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटें व ४६ सेकंद असल्या कारणानें जूलियन वर्षहि सौर वर्षाहून ११ मिनिटें व १४ सेंकंदांनी मोठेच होऊं लागलें. याचा परिणाम असा झाला कीं जूलियन पद्धत सुरू झाली त्या वेळी वसंत ऋतूंतील जो क्रांतिसंपात तारीख २५ मार्च रोजी पडला होता तोच इ. स. ३२५ मध्यें नेसच्या कौन्सिलच्या वेळीं२१ व्या तारखेस पडला व त्या वेळी हीच तारीख क्रांतिसंपाताची धरावी असें ठरविण्यांत आलें. पुढें इसवी सन १५८२ सालीं १२ वा पोप ग्रेगरी यानें ख्रिस्ती पंचागांत सुधारणा केली तेव्हां हा क्रांतिसंपात ता, ११ मार्च रोजीं म्हणजे आणखी १० दिवस मागें गेलेला होता. म्हणून क्रांतिसंपाताचा काळ प्रत्यक्ष संपाताशी जुळविण्याकरितां पोपनें सर्व यूरोपांत असें जाहीर केलें कीं, त्या सालच्या आक्टोबर महिन्याच्या ४ थ्या तारखेनंतरची ५ वी तारीख १५ वी तारीख समजावी, व पुढच्या वर्षांकरितां शतकांशिवाय इसवी सनाच्या ज्या वर्षांस चारानें व ज्या शतकांच्या वर्षांस चारशेंनें भाग जाईल तीं लीप वर्षे धरावी-म्हणजे त्यांच्या फेब्रुवारी महिन्याचे २९ दिवस धरावे, ही सुधारणा करूनहि इसवी सनाच्या वर्षांत थोडीशी चूक राहिलीच आहे, पण ती इतकी सूक्ष्म आहे कीं तिजमुळे ३३२० वर्षांनी एक दिवसाचें अंतर पडणार आहे. तेंहि भरून काढतां यावें म्हणून असें सुचविण्यांत आलें आहे कीं, ४००० वें व ४००० चीं गुणक वर्षें लीप धरूं नयेत. पोपची ही आझा इटली, स्पेन- पोर्तुगाल वगैरे रोमन सांप्रदायी राष्ट्रांनीं लागलीच मान्य केली. जर्मनी, इंग्लंड वगैरे प्रोटेस्टंट पंथी कांही राष्ट्रांनीं तीस आरंभी विरोध केला; पण इ. स. १६९९ सालीं जर्मनीनें वर्षाच्या शेवटचे दहा दिवस सोडून १७०० सालचा आरंभ धरला व इंग्लंडनें इसवी सन १७५२ सालीं सेप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या तारखेच्या पुढें १४ वी तारीख धरून जुन्या जूलियन पद्धतीच्या जागीं ग्रेगोरयन पद्धति चालू केली. रशिया, ग्रीस वगैरे ग्रीक चर्चच्या राष्ट्रांनी तर अगदी अलीकडेच ह्या पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यापूर्वीच्या त्यांच्या कागदपत्रांत जूलियन व ग्रेगोरियन ह्या दोन्हीहि पद्धतींच्या तारखा आढळून येतात.

यूरोपीय राष्ट्रांतल्या कागदपत्रांतील व तेथील मध्यकालीन इतिहासकारांच्या ग्रंथांतील कालगणना नीट समजण्याकरितां, वर सांगितलेल्या अधिक दिवसांच्या घोटाळ्याशिवाय आणखी एक दोन गोष्टी ध्यानांत ठेविल्या पाहिजेत. इसवी सनापूर्वीची वर्षे लिहिण्याची आपली व ज्योतिषी लोकांची रीत सारखी नाहीं. ज्याला इतिहासकार खिस्तपूर्व पहिलें वर्ष म्हणतात त्यास ज्योतिषी लोक इसवी सन असें लिहितात; व त्याच्या पूर्वीच्या सालास खिस्तपूर्व पहिलें वर्ष हें नांव देतात. या योगानें इतिहासकारांच्या गणनेंत ख्रिस्तपूर्व पाहिलें, पांचवें, नववें इत्यादि जी चाराचे गुणक नसलेली वर्षे लीप येतात तीं ज्योतिष्यांच्या गणनेंत तशी येत नाहींत. वास्तविक पाहिलें असता सीझरच्या सुधारणेचा अर्थ तत्त्कालीन लोकांस नीट न समजल्यामुळें ३६ वर्षांनीं ऑगस्टस बादशहा पंचांगांत पुन्हां सुधारणा करीपर्यंत ते चौथ्याच्या ऐवजीं तिसरेंच वर्ष लीप मानीत आले होत या चुकीमळें रोमन वर्ष तीन दिवस मागें पडलें होतें ते सौर वर्षाबरोबर आणण्यासाठी ऑगस्टसनें अशी आज्ञा केली कीं, ३७ व्या वर्षापासून ४८ व्या वर्षाच्या अखेरपावेतों प्रत्येक वर्षी फेब्रुवारीचे २८च दिवस धरीत जावेत. यामुळें सीझरच्या पंचांगसुधारणेनंतरच्या ४८ वर्षांतील तारखांत ज्या चुका झाल्या त्या इतिहासकारांनी आपल्या हिशेबांत मुळीच धरल्या नाहीत.

इसवी सनाचा प्रवर्तक डायोनीसिअस यानें त्या शकाचा आरंभ खित्जन्मापूर्वीच्या मार्च महिन्यांतील २५ व्या तारखेस- म्हणजे ख्रिस्तावतारप्रसिद्धीच्या दिवशीं धरला होता ही पद्धत इटलींतील कांही संस्थानांत व पिसा येथे इ. स. १७४५ पावेतों चालू होती व पोपच्या कांही आज्ञापत्रांतहि तिचाच पुरस्कार केलेला होता. ११ व्या शतकाच्या मध्यात फ्रान्समध्येंहि ती चालू असल्याचा पुरावा सांपडला आहे. परंतु १० व्या शतकांतील फ्लोरेन्टाइन आदिकरून कांही बखरकारांनी ख्रिस्तजन्मानंतरच्या २५ मार्चपासून शकारंभ धरलेला सांपडतो तर उलट पक्षीं दुसर्‍या कांही लेखकांनीं कोणी मार्चच्या आरंभापासून, कोणी जानेवारीच्या आरंभापासून, कोणी ईस्टरपासून, कोणीं नाताळापासून व एका उदाहरणांत मार्चच्या १८ व्या तारखेपासून-म्हणजे वसंत संपातापासू- वर्षारंभ धरल्याचें आढळून आलें आहे. खुद्द इंग्लंडमध्यें सातव्या शतकांत नाताळपासून वर्षारंभ धरण्याचा प्रघात पाडण्यांत आला व १३ व्या शतकांत तो अस्तित्वांत असल्याचीं चिन्हेंहि आढळून येतात. परंतु १२ व्या शतकांत तेथें २५ मार्चपासूनहि वर्षारंभ धरण्यांत येऊं लागला होता व तीच रूढि पुढें बळावत जाऊन अखेर सार्वत्रिक झाली. इ. स. १७५२ मध्यें इंग्लंडनें ग्रेगोरियन पद्धतीचा पुरस्कार केला तेव्हांपासून २५ मार्चच्या जागी जानेवारीची पहिली तारीख हा तेथें नेहमी वर्षारंभदिवस मानीत आले आहेत. वर्षारंभदिवसाच्या फेरबदलामुळें इतिहासविषयक ग्रंथांत कशा प्रकारचा घोटाळा होता याचें एक उदाहरण म्हटलें म्हणजे जिला इंग्रज लोक आपल्या देशांतील १६८८ ची राज्यक्रांती म्हणतात तीच जर त्या वेळीं वर्षारंभ २५ मार्चच्या जागीं १ जानेवारीपासून असता तर १६८९ ची राज्यक्रांति म्हटली गेली असती.

संवत्सरात्मक कालगणना:- दीर्घ काळाच्या गणनेंत मनुष्याच्या गर्वानें अस्पृष्ट, कांही काळपर्यंत तरी कालक्रम दाखविण्यास समर्थ असणारी व हिंदुस्थानांत प्राचीन काळीं होती आणि जिचा अजूनहि उपयोग होतो अशी कालगणनापद्धति म्हटली म्हणजे संवत्सरांची होय. प्राचीन काळाच्या गोष्टींची तारीख काढतांना जसा निरनिराळ्या शककर्त्यांशी प्रसंग येतो तसा संवत्सरांशीहि येतो. संवत्सर, तिथि व वार इतकी माहिती असली म्हणजे आज आपणांस अचूक तारीख काढतां येईल. तथापि येथें एक लक्षांत ठेविलें पाहिजे कीं हिंदुस्थानांत संवत्सरपद्धती निरनिराळ्या दृष्टीस पडतात. एक बार्हस्पत्य संवत्सर, दुसरें नुसते संवत्सर व तिसरें ग्रहपरिवृत्ति संवत्सर.

बार्हस्पत्य संवत्सर:- बार्हस्पत्य संवत्सरें दोन प्रकारची आहेत. एक महाकार्तिकादि बारा वर्षांचें व दुसरें प्रभवादि साठ वर्षांचें चक्र आहे. यांतील दुसर्‍या चक्रास आपण व्यवहारांत नुसतें. संवत्सर असेंच म्हणतों. पहिले चक्र अजमासें बारा वर्षांत गुरूचें बारा राशींतून जें परिभ्रमण होतें त्यावर बसविलें असल्यामुळे चांद्रमासाप्रमाणें त्यांतील वर्षांस चैत्रवैशाखादि नांवे पडलेलीं आहेत. तथापि चांद्रमासांच्या व बार्हस्पत्य संवत्सरांच्या नांवांमध्ये घोटाळा होऊं नये म्हणून बार्हस्पत्य संवत्सराच्या नांवामागें कधी कधी ‘ महा’ हा शब्द लाविलेलाहि आढळून येतो. राशींतील भ्रमणांत सूर्याची गति गुरूहून अधिक असल्यामुळें तो बहुधा दर वर्षी गुरूच्या जवळ येऊन पुढें निघून जातो. सूर्य गुरूच्या जवळ आला कीं गुरूचा अस्त होतो व तो त्याचा पुन्हां २५ पासून ३१ दिवसांनी उदय होईपर्यंत तसाच राहतो. हा उदय ज्या वर्षी कृत्तिका किंवा रोहिणी नक्षत्रीं होतो त्यास कार्तिक किंवा महाकार्तिक, मृग किंवा आर्द्रा नक्षत्रीं होतो त्यास मार्गशीर्ष, पुनर्वसू किंवा पुष्य नक्षत्री होतो त्यास पौष, आश्लेषा किंवा  मघा नक्षत्रीं होतो त्यास माघ, पूर्वा, उत्तरा किंवा हस्त नक्षत्रीं होतो त्यास फाल्गुन, चित्रा किंवा स्वाति नक्षत्रीं होतो त्यास चैत्र, विशाखा किंवा अनुराधा नक्षत्री होतो त्यास वैशाख, ज्येष्ठा किंवा मूळ नक्षत्री होतो त्यास ज्येष्ठ, पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्री होतो त्यांस आषाढ, श्रवण किंवा धनिष्ठा नक्षत्री होतो त्यास श्रावण, शततारका, पूर्वाभाद्रपदा किंवा उत्तराभाद्रपदा नक्षत्रीं होतो त्यास भाद्रपद व रेवती, अश्विनी किंवा भरणी नक्षत्रीं होतो त्यास आश्विन म्हणतात  वाराही संहिता अध्याय ८ श्लोक १-२]. बारा वर्षांत गुरूचे अस्तोदय फक्त ११च होत असल्यामुळें तेवढ्या अवधींत एका बार्हस्पत्य संवत्सराचा क्षय होतो. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापूर्वीच्या शिलालेखांत व दानपत्रांत बार्हस्पत्य संवत्सर दिलेले पहावयास मिळतें [ कोटगांव शिलालेखांतील महाचैत्र संवत्सर (रि. रा. म्यु. अ. इ. स. १९१६-१७ पा. २), परिव्राजक हस्तिनच्या लेखांतील महा आश्वयुज संवत्सर (फ्ली. गु. इं. पा. १०२), मृगेशवर्म्याच्या दानपत्रांतील पौष संवत्सर (इं. अँ. पु. ७. पा. ३५)] इत्यादि ].त्यानंतर व्यवहारांत त्याचा प्रचार राहिला नाहीं, पण पंचागांत मात्र त्याचें नांव देण्याचा प्रघात आहे.

संवत्सर:- आपल्या पंचागांत शालिवाहन शकाबरोबर जें संवत्सर देण्यांत येतें तें साठ वर्षांचें एक चक्र आहे. ह्या साठ संवत्सरांची नांवें म्हटली म्हणजे (१), प्रभव, (२) विभव, (३) शुक्ल, (४) प्रमोद, (५) प्रजापति, (६) अंगिरा, (७) श्रीमुख, (८) भाव, (९) युवा, (१०) घाता, (११) ईश्वर, (१२) बहुधान्य, (१३) प्रमाथी, (१४) विक्रम, (१५) वृष, (१६) चित्रभानु, (१७) सुभानु, (१८) तारण, (१९) पार्थिव, (२०) व्यय, (२१) सर्वजित्, (२२) सर्वधारी, (२३) विरोधी, (२४) विकृति, (२५) खर, (२६) नंदन, (२७) विजय, (२८) जय, (२९) मन्मथ, (३०) दुर्मुख, (३१) हेमलंब, (३२) विलंबी, (३३) विकारी, (३४) शर्वरी, (३५) फ्लव, (३६) शुभकृत्, (३७) शोभन, (३८) क्रोधी, (३९) विश्वावसु, (४०) पराभव, (४१) फ्लवंग, (४२) कीलक, (४३) सौम्य, (४४) साधारण, (४५) विरोधकृत, (४६) परिधावी, (४७) प्रमादी, (४८) आनंद (४९) राक्षस, (५०) अनल, (५१) पिंगल, (५२) कालयुक्त, (५३) सिद्धार्थी, (५४) रौद्र, (५५) दुर्मति, (५६) दुंदुभि, (५७) रूधिरोद्रारी, (५८) रक्ताक्ष, (५९) क्रोधन व (६०) क्षय हीं होत. आपल्याकडे म्हणजे नर्मदा नदीच्या दक्षिणेस असलेल्या हिंदुस्थान देशाच्या सर्व भागांत कलियुगाचें  प्रथम वर्ष प्रमाथी संवत्सर होतें असें मानण्यांत येतें व दर वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सराचा आरंभ धरला जातो. अशा रीतीनें क्रमश: क्षय संवत्सरापावेतो येऊन एक चक्र पूर्ण झालें कीं पुन्हां प्रभव संवत्सरापासून आरंभ होतो.

वास्तविक पाहिलें असतां संवत्सर हें बार्हस्पत्य वर्ष आहे. ‘बृहस्पतेर्मध्यमराशिभोगात्संवत्सरं सांहितिका वदन्ति ’ अशी भास्कराचार्यानीं सिद्धांतशिरोमणींत संवत्सर ह्या शब्दाची व्याख्या दिली आहे. म्हणजे मध्यममानानें गुरू हा एका राशींत जितके दिवस राहतो तेवढ्या काळास बार्हस्पत्य संवत्सर किंवा संवत्सर असें म्हणतात. बार्हस्पत्य संवत्सरांत ३६१ दिवस, २ घटिका व ५ पळें असतात. परंतु सौर वर्ष हें ३६५ दिवस, १५ घटिका, ३१ पळें व ३० विपळांचें असल्यामुळें ८५ सौर वर्षांत बार्हस्पत्य संवत्सरांचीं ८४ वर्षेच होतात. नर्मदेच्या उत्तरेकडील हिंदुस्थानच्या भागांत संवत्सराचा आरंभ तत्वत:  गुरूच्या संक्रमणापासूनच मानण्यांत येतो; परंतु व्यवहारांत मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच नवीन संवत्सर सुरू होतें असें समजलें जातें. उदाहरणार्थ, झुंथालाल ज्योतिषरत्‍नकृत राजपुतान्याच्या चैत्रादि विक्रमसंवत् १९७५ सालच्या पंचांगावर प्रमोद संवत्सर लिहिलें होतें व त्या सालच्या चैत्रापासून फाल्गुनापर्यंत तेथें सर्वत्र प्रमोद संवत्सरच मानण्यांत आलें. परंतु त्याच पंचांगात असेंहि लिहिलें आहे कीं, मेषार्काच्या वेळी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेस ह्या संवत्सराचे १० महिने १६ दिवस, ४२ घटिका व १५ पळें लोटली असून बाकी फक्त १ महिना, १३ दिवस, १७ घटिका, व ४५ पळेंच शिल्लक राहिली आहेत. अर्थात्, विक्रम संवत १९७५ च्या बारा महिन्यांपैकी १०|| महिने प्रजापति संवत्सराचे असतांहि तें सर्व वर्ष प्रमोद संवत्सराचेंच मानलें गेलें. अशा रीतीनें जेव्हा एक वर्षाचा फरक पडतो तेव्हां एका संवत्सराचा क्षय झाला असें समजून त्याच्या पुढचें संवत्सर मानण्यांत येतें व सौर वर्ष व बार्हस्पत्य संवत्सर यांची पुन्हां सांगड घालून दिली जाते. कलियुगाच्या प्रथम वर्षी कोणतें संवत्सर मानावें याविषयीं उत्तर हिंदुस्थानांत मतभेद आहे. वराहमिहिराच्या मतें तें विजय आहे, पण ‘ज्योतिषतत्त्व’ पुस्तकाचा कर्ता प्रभव संवत्सरापासूनच कलियुगास आरंभ झाला असें समजतो. शालिवाहन शक दिला असतां त्यावरून बार्हस्पत्य संवत्सर काढण्याची वराहमिहिरांनें अशी रीत सांगितली आहे कीं, ‘ गतानि वर्षाणि शकेन्द्रकालाध्दृतानि रूदैर्गणयेच्चतुर्भि:| नवाष्टपंचाष्टयुतानि कृत्वा विभाजयेच्छून्य शरागरामै:| फलेन युक्तं शकभूपकालं संशोध्य षष्टया....... शेषा: क्रमश:समा: स्थु: ( अध्याय ८, श्लोक २०-२१). म्हणजे, शालिवाहनशकाच्या गत वर्षांस ११ नें गुणून आलेल्या गुणाकाराची चौपट करावी व मग तींत ८५८९ मिळवून जी बेरीज येईल तीस ३७५० नें भागावें; नंतर भागाकारांत शालिवाहन शकाचीं गत वर्षे मिळवून आलेल्या बेरजेस ६० नें भागून जी बाकी राहील तो आंकडा प्रभवादि संवत्सरांच्या गत वर्षांचा निदर्शक होय. अर्थांत् त्यामध्यें आणखी एक मिळविला असतां तो चालू संवत्सराचा अनुक्रमांक दाखवितो. दक्षिणेकडील संवत्सराचा गुरूच्या गतीशीं कांहीहि संबध नसल्यामुळें त्यांत क्षय संवत्सराची भानगड नाहीं व म्हणून इकडील संवत्सर काढण्याकरितां शालिवाहन शकाच्या गत वर्षांत १२ मिळवून बेरजेस साठानें भागावें म्हणजे राहिलेली बाकी वर्तमान संवत्सराचा अनुक्रमांक दाखविते.

उत्तर हिंदुस्थानांत शिलालेखादि प्राचीन लेखांत बार्हस्पत्य संवत्सर दिल्याची उदाहरणें फारच थोडी आढळतात. दक्षिण हिंदुस्थानांत मात्र त्याचा प्रचार पूर्वीपासूनच अधिक होता. प्रभवादि संवत्सर दिल्याचें सर्वांत जुनें उदाहरण दक्षिणेंतील मंगळेश (इ. स. ५९१-६१०) नामक चालुक्य राजाच्या बदामीच्या स्तंभावरील लेखांत सांपडत असून त्यांत दिलेला संवत्सर सिध्दार्थी आहे         [ इं. अँ. पु. १९ पा. १८ जवळील आकृतिपट].

ग्रहपरिवृत्ति संवत्सर:- ग्रहपरिवृत्ति संवत्सर हें एक ९० वर्षांचें चक्र आहे. यांत वर्तमान वर्ष चालू ग्रहपरिवृत्ति संवत्सराच्या चक्रांतील कितवें वर्ष आहे तें दर्शविणारा आंकडाच केवळ लिहिण्याचा प्रघात असून, एका चक्राची ९० वर्षे पुरीं झाल्यावर पुन्हां पहिल्यापासून संवत्सराची गणना सुरू होते. ह्या संवत्सराचा प्रचार  मद्रास इलाख्याच्या मदुरा जिल्ह्यांतच बहुतेक आढळून येतो. त्याचीं कालगणना वर्तमान कलियुग संवत् ३०७९ (ख्रि. पू. २४) ह्या वर्षापासून सुरू झाली असें म्हणतात. वर्तमान कलियुग संवतांत ७२ किंवा वर्तमान शालिवाहन शकांत ११ मिळवून व आलेल्या बेरजेस नव्वदानें भागून जी बाकी राहते ती ह्या संवत्सराचें वर्तमान वर्ष असते.