प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
बौद्ध कालमापन:- बौद्धांच्या कालगणनापद्धतीचा विचार स्वतंत्रपणें देण्याचें विशेष कारण नाहीं. कारण देशांत जी कालगणनापद्धति चालू होती तीच घेऊन बौद्धांनी आपले उत्सव, उपवास व व्रतें बसविलीं. नवीन संप्रदायामध्यें आपल्याकडे लोक ओढतांना जर एखादा नवीन सण सुरू करतां येईल तर तो करण्याचा प्रयत्न केला जात असे; या प्रमाणेंच चालू उत्सव किंवा दिवसमहत्त्व लक्षांत घेऊन त्या दिवशीं निराळा आचार सुरू करणें किंवा त्या दिवसाच्या महत्त्वाचें ऐतिहासिक स्पष्टीकरण निराळें देणें इत्यादि क्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ, जैनांत दिवाळीचें महत्त्व दिवाळी ही महावीरनिर्वाणाची तारीख ठरवून सिद्ध केलें आहे. संक्रांतीचें महत्त्व बौद्धांत, जैनांत व इतर हिंदूतहि सारखेंच आहे. बौद्धांमध्यें विशिष्ट महिन्याचें माहात्म्य, विशेषेंकरून अधिकमासाचें माहात्म्य ब्राह्मणी ग्रंथाप्रमाणेंच वर्णिलें आहे. तसेंच दर्शपौर्णमासाचें माहात्म्य बौद्धांत आहेच. शिवाय, बौद्धांनी पक्षमध्यांस धार्मिक महत्त्व देऊन महिन्यांतून चार उपवासाचे दिवस तयार केले. त्यांनीं षडृतू मागलेच ठेवून प्रत्येक ऋतु बदलण्याचा काळ पुण्यदिन केला. मकरसंक्रांतीस त्यांनी वर्षारंभ करून तिला महत्त्व दिलें. त्यांनीं आपला निराळा शकहि सुरू केला बुद्धनिर्वाणशक हा ब्रह्मदेशांत व पूर्वेकडील द्वीपकल्पांत ख्रिस्तपूर्व ५४३ सालीं सुरू झाला असें मानण्यांत येतें.