प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
बाबिलोनियाचें ज्योतिष:- आतां आपण भारता इतक्या जुन्या संस्कृतीकडे व तिजमधील ज्योतिषाकडे वळूं वाविलोनियांतील ज्योतिष फार जुनें. असुरांचें राष्ट्र जर फार जुनें तर त्यांचें ज्योतिषहि जुनेंच असणार. त्यांच्या ज्योतिषाचें सविस्तर विवेचन आपणांस अवश्य आहे. कां कीं, कालगणनाविषयक ज्ञानाच्या बर्याच पूर्णतेला गेलेला अत्यंत प्राचीन काळचा हा विकास होय. यांनी आपल्या ऐतिहासिक कालांत कालगणनाविषयक विकास कोठपर्यंत नेऊन भिडविला हें आपण पाहूं. वर्षाचे तीनशें साठ दिवस, चार महिन्यांचे तीन काल, तीनशें चोपन दिवसांचें चांद्र वर्ष व तीनशें पासष्ट दिवसांचे सौर वर्ष इत्यादि कल्पना त्यांनी फारच प्राचीन काळांत विकासविल्या. सौरचांद्र वर्षांची जुळणी करून घेण्याची पद्धति बाबिलोनी व मिसरी राष्ट्रांची परस्परांहून भिन्न होती. इजिप्शियन लोक वर्षांती अधिक दिवस घालीत, तर बाबिलोनी लोक अधिक मास वापरीत. पारशी लोकांच्या वर्षांत शके १८४३ सालच्या निर्णयसागरी पंचांगांत ५ ते ९ सप्टेंबर हे गाथादिवस म्हटले आहेत. हे गाथादिवस म्हणजे सौरचांद्रमीलनार्थ तोडगा होय. ही पद्धति मिसरी लोकांत होती. आणि बाबिलोनी लोकांत अधिकमासपद्धति होती. बाबिलोनी लोकांच्या महिन्यांची नांवें मूळ सुमेरियन लोकांची आहेत. यामुळें बाबिलोनी लोकांस त्यांच्या ज्योतिषाचे मूळ प्रवर्तक म्हणतां येत नाहीं. तें श्रेय सुमेरियन लोकांस दिलें पाहिजे. बाबिलोनियाचें एकंदर ज्योति:शास्त्र खल्डियांत, म्हणजे युफ्रेटिसच्या पश्चिमेकडील व अरबस्थानच्या पूर्वेकडील प्रदेशांत पैदा झालें होतें, आणि खाल्डियन ज्योतिष हें फल ज्योतिषस्वरूपी होतें. यांच्यातच बारा राशींची कल्पना उत्पन्न झाली. खाल्डियन लोकांनां संपाकतचलनाचेंहि ज्ञान होतें. त्यांनी प्राचीन दंतकथांच्या आधारावर आपल्या कालगणनेस राशिचक्रारंभस्थान मिथुन राशीच्या पूर्व टोंकास होतें तेव्हां सुरूवात झाली असें ठरविलें होतें. यावरून खाल्डियन लोकांची कालगणनापद्धति सात हजार वर्षांपूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व पांच हजार वर्षांपूर्वी सुरू झाली असावी असें निघतें. त्यांची युगकल्पना संपातचलनावरून बसविलेली दिसते. मनुष्याची उत्पत्ति जगाच्या आरंभदिवशी झाली अशी त्यांची समजूत असून जगाचा आरंभ कर्कयुगांत ( म्हणजे ख्रि. पू. ७००० वर्षांपूर्वी ) झाला असें तें मानीत असत. बाबिलोनी ज्योतिष्यांनी निर्माण केलेल्या कल्पनेचा ख्रिस्ती धर्मसंप्रदायांत केवढा परिणाम झाला हें सर्वांस परिचितच आहे. खाल्डियन ज्योतिषाचा भारतीय ज्योतिषावर जो परिणाम झाला त्याचें विवेचन पूर्वी केलेंच आहे ( प्रथम विभाग पृ. ३०१ ). त्यांत द्रेष्काणपद्धति ही खाल्डियन किंवा इजिप्त येथील शास्त्रांतून भारतीयांनी घेतली अशा अर्थाचें एक मत आहे असें दाखविलें आहे.