प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
वर्षांतर्गत दिवसांचे वर्गीकरण व नामकरण:- महिना, पक्ष, आठवडा वगैरे महिन्याचे पोटभाग, त्याप्रमाणेंच ऋतु, त्रैमासिक ऋतु, चातुर्मासिक ऋतु, अयन, इत्यादि मापांनीं आजचें कालमापन होतें. वर्ष मनुष्याच्या दृष्टीस दिसणार्या सौर परिभ्रमणावरून, म्हणजे वस्तुत: पृथ्वीच्या परिभ्रमणावरून मोजलें जाण्याची स्वाभाविकता, आणि महिना चांद्रमानानें मोजला जाण्याची स्वाभाविकता यामुळें दोन निरनिराळ्या कालमापनपद्धती चोहोंकडे निर्माण झालेल्या दिसत आहेत. या पद्धतींचा एकमेकींशीं संबध कसा परिचित होत गेला, सूर्याच्या परिभ्रमणाचा काल कसा नक्की काढतां आला, त्याच्या संबंधानें शंका किंवा मतभेद अजून आहेत किंवा नाहीत वगैरे विषयांत येथें प्रवेश करण्याचें कारण नाहीं. निरनिराळ्या कालमापनविषयक कल्पना कशा प्रादुर्भूत झाल्या, रोजचा नित्यक्रम पार पाडण्यास लागणारें कालमापन कसें करण्यांत आलें, निरनिराळ्या राष्ट्रांत निरनिराळ्या पद्धतींचा जन्म होऊन एक पद्धतीचा प्रसार कसा झाला आणि कालाच्या प्रारंभबिंदूच्या योजनेमध्यें कांहीं थोडक्या शकांस आज जें प्रामुख्य आहे तें येण्यापूर्वी एखादा प्रारंभबिंदु योजून तो स्थित करण्याचे प्रयत्न काय काय झाले, त्यांच्या स्थूल कल्पना येथें दिल्या म्हणजे झालें.