प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १० वें.
हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम.
आपल्या राष्ट्रानें प्राचीनकाळीं इतर राष्ट्रांवर परिणाम घडविला, त्याचें थोडक्यांत स्वरूप सांगावयाचें म्हणजे असें म्हणतां येईल कीं, बौद्ध संप्रदाय चोहोंकडे पसरून त्यानें पाली भाषेचा आणि उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या एका विकृतीचा प्रसार केला. संप्रदायप्रवर्तनार्थ येथून अनेक लोकांची भिक्षू म्हणून चीन देशांत व तिबेट, सिलोन वगैरे ठिकाणीं जाण्याकडे प्रवृत्ति करून दिली. चित्रकला आणि मूर्तिकर्म हीं पूज्य म्हणून समजल्या जाणार्या पुरुषांच्या आश्रयानें विकास पावत असतात, या नियमानुसार प्रत्येक देशांत यांचा प्रसार व्हावयास बुद्धाचा गौरव कारण झाला. बुद्धाच्या जातकांतून ज्या अनेक कथा आहेत त्या चित्रविषय आणि मूर्तिविषय झाल्या. कांहीं ठिकाणीं आपल्या धर्मशास्त्रांचा आणि त्यांच्या आश्रयानें संस्कृत भाषेचाहि प्रसार झाला. आपलें वैद्यक सिलोन व इतर पुष्कळ ठिकाणीं गेलें. वाङ्मयाचे अनेक प्रकरा आपल्या देशांत जन्मास आले, त्यांचाहि परिणाम अनेक ठिकाणीं झाला. आपल्या देशांतील संस्कृतीच्या ज्या भागांस सर्व जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनें महत्त्व आहे ते भाग प्रमुखत्वानें म्हटले म्हणजे आपलें शास्त्रीय वाङ्मय, आणि आपला पारमार्थिक व तात्विक विचार हे होत. काव्यें, नाटकें, अलंकारशास्त्र यांचा परिणाम कांहींसा झाला आहे; पण तो तात्विक विचाराच्या परिणामाच्या मानानें फार अल्प आहे. या सांगितलेल्या परिणामांच्या दृष्टीनें पाहतां आपल्या विचारास आणि त्याच्या इतिहासास सार्वलौकिक महत्त्व आलें आहे. यासाठीं आपल्या विचारौघाचा क्रम आपणास चांगला समजला पाहिजे आणि म्हणून तद्विषयक वाङ्मयाचा आमच्याकडून चांगला अभ्यास झाला पाहिजे.
बौद्ध वाङ्मयानें पूर्वेकडे श्रद्धापूर्ण सेवक व अभ्यासक मिळविले. त्याचे परिणाम पश्चिमेकडे पूर्वेइतके झाले नाहींत, तरी मुळींच झाले नाहींत असें नाहीं. पश्चिमेकडे पारमार्थिक उपदेशाच्या बाबतींत भारतीय विचाराशीं स्पर्धा करणारे कांहीं संप्रदाय होतेच. गौतमाच्या जन्माचा परिणाम त्या संप्रदायांचें अस्तित्व असूनहि झाला. पारशांच्या पवित्र ग्रंथांत गौतमाचा उल्लेख आला आहे. झरथुष्ट्राचा संप्रदाय एका कालीं पश्चिम एशियांत बराच शक्तिमान होता असें दिसतें. ग्रीकांवर जशी भारतीयांच्या कलाकौशल्याची, शौर्याची, आणि त्याप्रमाणेंच आचारश्रेष्ठतेची छाप पडली तशी कांहीं अंशीं पर्शूंच्या उपासनापद्धतीची छाप पडली. झरथुष्ट्राच्या संप्रदायग्रंथाचा शोध प्रथम यूरोपीय लोक करूं लागले तो त्यांत कांहीं अपूर्व ज्ञान सांपडेल या भावनेनें करूं लागले. झरथुराष्ट्राच्या ज्ञानीपणाबद्दल तारीफ यूरोपांत प्राचीन कालापासून फार पसरली होती. यामुळें जेव्हां त्याचे ग्रंथ प्रत्यक्ष लोकांच्या समोर येऊन त्यांतील सामान्यपणा आणि अर्वाचीनांस बाष्कळ वाटणार्या गोष्टी त्यांस दिसल्या तेव्हां हे ग्रंथ झरथुष्ट्राचे नव्हतच असें ते म्हणूं लागले. हा झरथुष्ट्राचा संप्रदाय स्थापन होण्यांत भारतीय संस्कृतीचा संपर्क कोठवर कारण झाला हें अजून नक्की समजलें नाहीं.
ख्रिस्ती संप्रदायाची मात्र तशी गोष्ट नाहीं. ख्रिस्ताविषयीं उत्पन्न झालेल्या आणि शुभवर्तमानांतून व्यक्त झालेल्या कथांचें सादृश्य बौद्ध कथांशीं बरेंच दिसून आलें आहे. तथापि त्या सादृश्यावरून ऐतिहासिक निर्णय काढण्याच्या बाबतींत बराच मतभेद आहे. ख्रिस्तानें आपला उपदेश बौद्ध ग्रंथांतून घेतला आणि ख्रिस्ताची गोष्ट बौद्ध ग्रंथांवरून सजविली असें म्हणणार्या वर्गापासून बौद्ध ग्रंथांतील गोष्टीच नंतरच्या आणि ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार होऊं लागला असतां बौद्धांनीं सजविलेल्या आहेत असें म्हणणार्या पक्षापर्यंत भिन्न भिन्न मतें व्यक्त झालीं आहेत. त्यांचें साग्र विवेचन पुढें येईल.
ख्रिस्ती संप्रदाय बाजूला ठेवला तरी शामनिझम् म्हणून सैबेरियांतील वन्य लोकांत तसेंच तार्तरीच्या कांहीं भागांत जी परमार्थसाधनाची रूढ पद्धति आहे ती बौद्ध संप्रदायांतून निघालीं असें म्हणतात. शामन् म्हणजे श्रमण. त्यांचा संप्रदाय तो शामनिझम्. आज मात्र या संप्रदायांत भुतेंखेतें आणि तिबेटी मतें व सैबेरियांतील छाछू करणार्या मूळ लोकांची कर्में यांचें मिश्रण होऊन त्याला अगदींच निराळें स्वरूप प्राप्त झालें आहे. तसेंच, मध्य एशियामध्यें जो मणिसंप्रदाय स्थापन झाला व जो युरोपांतहि थोडाबहुत पसरला होता, त्यांतहि ख्रिस्ती व झरथुष्ट्री यांजबरोबर बौद्ध मतांचें एकीकरण झालेलें होतें.
एवढें मात्र सांगितलें पाहिजे कीं, बौद्धसंप्रदायाचा तुरळक प्रसार आणि त्याचा इतर संप्रदायांवर परिणाम या दृष्टीनें मात्र भारतीय संस्कृतीचा पश्चिमेकडे परिणाम झाला. पूर्वेकडे मोठमोठीं राष्ट्रें व हजारों मैल प्रदेश ज्याप्रमाणें या आमच्या बौद्ध संप्रदायानें व्यापिला त्याप्रमाणें पश्चिमेकडे त्यास यश आलें नाहीं.
आमच्या वाङ्मयाच प्रारंभ वेदांपासून होतो. बौद्धसंप्रदाय हा वैदिक परंपरेचीच एक विकृति आहे, हें सांगितलेंच आहे. हा संप्रदाय पूर्वेकडे गेला तसे वेद तिकडे गेले नाहींत. वेदांकडे लक्ष पाश्चात्यांचें वेधलें आणि वेदांचा श्रद्धापूर्वक अभ्यास करणारे पाश्चात्यांत निघाले. आज हिंदुस्थानांत कांहीं लोकांनीं वेदाक्षरें घोकलीं आहेत; कांहीं लोकांनीं संहिताच्या संहिता पाठ केल्या आहेत; तथापि वेदांचा सूक्ष्म अभ्यास यूरोप व अमेरिका येथेंच होतो.
या दृष्टीनें यूरोपीय पंडितांचा परिश्रम आपणांस उपयुक्त आहे. त्यांच्या परिश्रमाचा इतिहास थोडाबहुत मनोरंजक आहे. त्यांस परिश्रम करण्यास जी स्फूर्ति अगर प्रवृत्ति झाली तिचीं कारणें तीन चार आहेत. ख्रिस्ती संप्रदायाचें संवर्धन करण्यासाठीं ज्या लोकांत संप्रदायाचा प्रसार करावयाचा त्यांच्या मनावरील पूर्वसंस्काराची ओळख करून घेणें संप्रदायाच्या प्रवर्तकांस अवश्य वाटलें. त्यामुळें कांहीं भारतीय पांडित्याचा उगम झालेला आहे. रॉजर ह्याक्सलेडेन आणि पौलिनो यांचे परिश्रम या वरील हेतूनेंच झालेले दिसतात. संस्कृत अभ्यासाकडे प्रवृत्ति होण्याचें दुसरें कारण शासनविषयक होय. हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य सुरू झालें आणि हिंदुंच्या शासनसाठीं त्यांच्या कायद्याचें ज्ञान मिळविणें आवश्यक झालें. वॉरन हेस्टिंग्जच्या प्रोत्साहनानें हालहेडचे आणि तदनंतर जोन्स आणि कोलब्रूक यांचे परिश्रम या चोदनेनेंच झाले. हिंदुस्थानांतील अनेक इंग्रज पंडितांच्या परिश्रमाच्या बुडाशीं हाच हेतु होता.
फ्रान्स आणि जर्मनी येथें जे परिश्रम झाले त्यांच्या मुळाशीं भिक्षुकी किंवा राजकीय भावना प्रामुख्यानें दिसत नाहीं तथापि त्यांचा पूर्ण अभावहि आरोपितां येत नाहीं. जर्मनींतील पांडित्या फ्रेंच पांडित्याचें परिणत स्वरूप होय. उच्च प्रकारचें पांडित्य बर्नाफनें जसें प्रथम दाखविलें तसें कोणाहि इंग्रजानें दाखविलें नाहीं. आंकेति द्यु पेराँ या फ्रेंच पंडितानें इराणी संस्कृतीच्या अभ्यासास सुरुवात केली आणि तेव्हांपासून इराणी संस्कृतीवर जे महत्वाचे ग्रंथ पाश्चात्यांकडून तयार झाले त्यांत इंग्लंडातील विद्वनांच्या परिश्रमाचें फारसें महत्त्व नाहीं. जोरदारपणाचें, चिकाटीचें आणि चिकित्सक बुद्धीचें अस्तित्व फ्रेंच, डच आणि जर्मन ग्रंथावरून जसें दिसून येतें तसें इंग्रजी ग्रंथावरून दिसून येत नाहीं.
बेनफे, बर्नाफ, लासेन, रोठ, बोधलिंक, वेबर, व्हिटने (अमेरिकन), यांच्या तोडीचें नांव इंग्लडांत नाहीं. मॅक्स मूलर हाहि मूळचा जर्मन. अलीकडे बराच प्रसिद्धीस आलेला इंग्लंडांतील प्रोफेसर माकडनेल हाहि आपली परिश्रमाची पद्धति जर्मनींत शिकून पुढें आलेला आहे, आणि याचे बरेचसे ग्रंथ भाषांतरवजा आहेत. इंग्लंडांतील लोकांनीं हिंदुस्थानांत आल्या नंतर सरकारी लठ्ठ पगार खाऊन जर कांहीं चांगलें काम केलें असेल तर तें हें की, त्यांनी आर्किआलजी, न्युमिसम्याटिक्स आणि एपिग्रफी या विषयांत परिश्रम केले, म्हणजे प्राचीन अवशेष, नाणीं आणि शिलालेख यांच्या साहाय्यानें पुराणवस्तूंचें आणि वस्तूंवरून स्पष्ट होणार्या प्राचीन स्थितीचें संशोधन केलें. या कार्यांत प्रिन्सेप आणि कानिंगह्याम यांस प्रामुख्याचें स्थान दिलें पाहिचे. मानववंशशास्त्रासाठीं एन्थाग्रफिच्या खात्यामध्यें जें इंग्रजांनीं काम केलें त्यांत अथलस्टन बेन्स, रिस्ले, आणि गेट यांची नांवें देतां येतील. तथापि यांच्या खातेशाहीमार्फत झालेल्या कामापूर्वींचें जें संशोधन झालें त्यांत विलसन् आणि स्टील यांची नांवें प्रमुख होत. यांच्या परिश्रमाचा उपयोग जुन्याशीं नव्याचा धागा जोडण्याकडे होतो. या मानववंशशास्त्रामध्यें जे सरकारी नोकर पंडित म्हणून चमकले त्यांस शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षां शास्त्रसाहित्योत्पादक म्हटल्यास शोभेल. या जातिवर्णनात्मक लेख लिहिणारामध्यें वर दिलेल्या नांवांखेरीज दुसरींहि कित्येक नांवें देतां येतील पण त्यांत चांगले थोडके आणि गचाळ पुष्कळ. थरस्टन् यानें मद्रासेकडील जातीसंबंधानें जे सात भाग प्रसिद्ध केले आहेत त्यापेक्षां अधिक गचाळ काम सुशिक्षितास करतां येईल किंवा नाहीं याची शंका आहे. सध्याच्या जाती आणि जुनी परिस्थिति यांचे धागे जोडण्याची खटपट करणारा पाश्चात्य म्हटला म्हणजे गस्टाव्ह ऑपर्ट होय. याचा ‘भारताचे मूळ लोक’ यावर लिहिलेला ग्रंथ स्वैरकल्पनांस माहितीचें आणि पांडित्याचें नियंत्रण नसतां मनुष्य किती बहकतो याचें उत्तम उदाहरण आहे.
भाषाशास्त्राकडे लक्ष देणारे विद्वान् जे निपजले त्यांत प्राकृतावर पिशेल (जर्मन) आणि एकंदर सर्वावलोकनावर ग्रिअरसन आणि तौलनिक व्याकरणावर बीम्स ही तीन नावें महत्त्वाची आहेत.
ही स्थूल माहिती झाली. विशेष माहिती प्रत्येक विषयावर लिहितांना येईल. अलीकडच्या अभ्यासकांच्या परिश्रमाचें विवेचन व त्यावर मत पुढें मधूनमधून द्यावें लागणार आहे, आणि यासाठीं असे अलीकडचे पंडित लेखक गाळून पूर्वींच्या लोकांची माहिती येथें देतों.
अॅब्राहम रॉजर.- (१६५१) हा पालिकट्टा (मद्रास) येथें उच्च पाद्री होता; पुरातन ब्राह्मणी वाङ्मयावर ह्यानें एक ग्रंथ लिहिला व भर्तृहरीचे कांहीं श्लोक पोर्तुगीजमध्यें प्रसिद्ध केले.
जोहान अर्न्स्ट हँक्सलेडन.- ह्या मलबार किनार्यावरील जेसुइट पाद्य्रानें पहिलें संस्कृत व्याकरण लिहिलें (१६९९). हा ग्रंथ छापला नाहीं.
फ्रा पौलिनो. - हा आस्ट्रियन मिशनरी होता; ह्यानें दोन संस्कृत व्याकरणें व अनेक ग्रंथ व प्रबंध लिहिले आहेत. “Systema Brahmanicum” (Rome) “Reise nach Ostindien” (Berlin) हे ग्रंथ यानें लिहिले.
वॉरन हेस्टिंग्ज.- ह्यानें हिंदू वाङ्मयाच्या अध्ययनाला चांगलें प्रोत्साहन दिलें; त्यानें पंडितांकडून हिंदू कायदेपुस्तकांवरून “विवादार्णवसेतु” (१७७३) हा ग्रंथ तयार करून घेतला; ह्याचें इंग्रजींत “A Code of Gentoo Law” (१७७६) म्हणून हालहेडकडून भाषांतर करून घेतलें. ह्यांबर्ग येथें ह्याचें जर्मन भाषांतर झालें (१७७८).
चार्लस विल्किन्स. - ह्यानें प्रथम काशीस पंडितांजवळ संस्कृतभाषेचें अध्ययन केलें; व संस्कृत पुस्तकांवरून इंग्रजी ग्रंथ लिहिले. यानें भगवद्गीता, हितोपदेश व शाकुंतल यांची भाषांतरें अनुक्रमें १७८५, १७८७ न १७९६ या वर्षीं प्रसिद्ध केलीं. त्याचें संस्कृत व्याकरण, पहिल्याप्रथमच युरोपमध्यें, त्यानें तयार केलेल्या संस्कृत टाइपमध्यें प्रसिद्ध झालें (१८०८). अंकित लेख शोधून त्यांचें अध्ययन व इंग्रजीमध्यें भाषांतर करणारांपैकीं पहिला हाच होय.
विल्यम् जोन्स. - हा पौरस्त्य भाषा जाणणारा चीफ जस्टिस (हिंदुस्थानांत) होता; हा चांगला संस्कृतज्ञ होता. ह्यानें बंगाल्यांत एशिआटिक सोसायटी स्थापिली(१७८४); शाकुंतल नाटकाचें इंग्रजींत भाषांतर केलें (१७८९); ह्या भाषांतरावरून फॉर्स्टरनें जर्मन भाषांतर केलें (१७९१); तें हर्डर, गटे वगैरे जर्मन विद्वानांनां फार आवडून, शाकुंतलाविषयीं व संस्कृत ग्रंथाविषयीं त्यांचा उत्तम ग्रह झाला. जोन्सनें ऋतुसंहाराची संस्कृत प्रत काढली (१७९२); हेंच पहिलें संस्कृत छापील पुस्तक. त्यानें “Institutes of Hindu Law” (१७९४) म्हणून मनूवरून पुस्तक केलें. ह्या पुस्तकाचें वीमर येथें जर्मन भाषांतर प्रसिद्ध झालें (१७९७). ग्रीक, लॅटिन व संस्कृत या तीनहि भाषा मूळ एकाच भाषेपासून निघाल्या असें जोन्स यानें प्रथमच स्पष्टपणें दाखवून दिलें व जर्मन, केल्टिक आणि पर्शियन यांच्याशीं संस्कृतचा कांहीं तरी अशाच प्रकारचा संबंध असावा असेंहि अनुमान यानेंच प्रथम बांधलें. तसेंच त्यानें प्राचीन भारतीय व ग्रीक-रोमन पुराणकथांमधील साम्यहि लोकांच्या नजरेस आणलें.
हेनरी थॉमस कोलब्रूक. - हिंदु पुराणवस्तुशास्त्र व भाषाविज्ञान ह्यांचा हा खरा उत्पादक; हा कलकत्त्यास नोकरीवर होता. यानें “A Digest of Hindu Law on Contract and Successions” (करार आणि वारसा यासंबंधीं संक्षिप्त हिंदु कायदा), हा चार भागांचा कायद्याचा ग्रंथ हिंदु धर्मशास्त्रावरून तयार केला (१७९७-१७९८); ह्याचा वेदावरील निबंध प्रसिद्ध आहे (१८०५); ह्यांशिवाय त्यानें अमरकोश, कित्येक दुसरे शब्दकोश, हितोपदेश, किरातार्जुनीय वगैरे ग्रंथ छापून काढले; वेदांत, धर्मशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, गणित वगैरेवर त्यानें बरेच निबंध लिहिले आहेत.
अलेग्झँडर हॅमिलटन.- हाहि संस्कृतज्ञ होता; हा पॅरिसमध्यें असतांना (१८०२ ते १८०४) जर्मन कवि फ्रेडरिक है ह्याच्याजवळ संस्कृत शिकला; जर्मन लोकांनां ह्या काळीं शाकुंतलावरून संस्कृत वाङ्मयाची फार चटक लागली होती.
फ्रेडरिक शलेजेल- जर्मनींतील पहिला संस्कृत भाषाभिज्ञ पंडित; ह्यानें पॅरिस येथें संस्कृतचा अभ्यास केला “Uber die Sprache nnd Weisheit des Indier Ein Beitrag zur Begrundung der Altertumskunde” हें पुस्तक प्रसिद्ध केलें; ह्यांत रामायण, महाभारत, मनु इत्यादि ग्रंथांतील बर्याच उतार्यांचें भाषांतर होतें. ह्यानें बरीच जागृति केली. मूळ संस्कृतावरून प्रथमच हीं जर्मन भाषेंत भाषांतरें केलेलीं होतीं.
ऑगस्ट विल्यम व्हॉन शलेजेल. - हा फ्रेडरिक शलेजेलचा भाऊ. ह्यानें पॅरिस येथें शेझी (Chezy) नांवाच्या फ्रेंच संस्कृत प्रोफेसराजवळ संस्कृताचा अभ्यास केला (१८१४). हा जर्मनीचा पहिला संस्कृत प्रोफेसर. बॉन युनिव्हर्सिटीचा हा संस्कृत प्रोफेसर झाला (१८१८). ‘हिंदी वाङ्मय’ हें नियतकालिक यानें सुरू केले. याच्या पहिल्या ग्रंथांत भारतीय भाषाशास्त्रावर निबंध होते. यानें त्याच वर्षीं लॅटिन भाषांतरासह भगवद्गीतेची प्रत काढली (१८२३). तसाच यानें रामायणाचा पहिलें कांड प्रसिद्ध केलें (१८२९).
ए. एल. शेझी. - हा फ्रान्समधील पहिला संस्कृत प्रोफेसर; हा बर्यात भारतीय ग्रंथांचा प्रकाशक व भाषांतरकार होता.
फ्रँझ् बॉप्.- (Franz Bopp) हा शलेजेबरोबरच शेझीजवळ पॅरिस येथें संस्कृत शिकला. (१८१२). यानें तुलनात्मक भाषाशास्त्रावर पहिलाच उत्तम ग्रंथ लिहिला (१८१६); यानें संस्कृत वाङ्मयाचा शोधकबुद्धीनें अभ्यास केला; रामायण महाभारतांतील कांहीं कथांचें यानें छंदोबद्ध भाषांतर मूळ संस्कृतवरून केलें; व नलदमयंती आणि इतर सुंदर कथांचीं लॅटिन अर्थासह टीकात्मक पुस्तकें लिहिलीं. यानें कांहीं संस्कृत व्याकरणें लिहिलीं (१८२७, १८३१, १८३४). तसाच यानें संस्कृत कोश “Glossarium Sanscritum” तयार केला (१८३०).
विल्यम् व्हॉन हंबोल्ट.- प्रख्यात भाषाभिज्ञ व मुत्सद्दी. यानें संस्कृताचें महत्त्व जाणून त्याचा अभ्यास सुरी केला (१८२१); भगवद्गीतेला तो फार चाहत असे. त्यानें ह्या गीतेवर बरेच प्रबंध लिहिले आहेत.
फ्रेडरिक रूक्कर्ट.- जर्मन कवि व उत्तम भाषांतरकर्ता; ह्यानें हिंदू आर्षकाव्यें व रसात्मककाव्यें ह्यांतील कांहींचे अत्युत्तम मासले जर्मनमध्यें आणिले आहेत.
आंकेतिल द्यु पेराँ.- (Anquetil du Perron) ह्या फ्रेंच विद्वानानें फारसीमधून लॅटिनमध्यें उपनिषदांचें भाषांतर १९ व्या शतकाच्या आरंभीं केलेलें आहे.
फ्रेडरिक् रोझेन.- यानें कलकत्त्यास ऋग्वेदाचें पहिलें अष्टक प्रसिद्ध केलें (१८३८). त्यापूर्वीं राजा राममोहन राय यांनीं १८१६-१९ त इंग्रजीमध्यें उपनिषदांचें भाषांतर केलें होतें.
यूर्जन बर्नाफ्.- फ्रेंच पौरस्त्यभाषाभिज्ञ, ह्यानें यूरोपमध्यें पहिल्यानेंच वेद शिकविण्यास आरंभ केला (१८४०). त्याचबुद्धवाङ्मयाच्या अभ्यासास सुरवात केली. यानें बरेच शिष्य तयार केले (१८२६).
रुडोल्फ रोठ.- बर्नाफचा शिष्य. ह्यानें जर्मनींत वेदाभ्यासाचा पाया घातला व वेदावर एक चांगला ग्रंथ लिहिला.
मॅक्स मुल्लर. -बर्नाफचा शिष्य व चांगला संस्कृतज्ञ. यानें सायनाचार्यांच्या भाष्यासह ऋग्वेदमंत्रांचा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८४९-१८७५). ह्या ग्रंथाच् वाङ्मय-शोधनाच्या कामीं फार उपयोग झाला.
थिओडोर ऑफ्रेच्.- ह्यानें संपूर्ण ऋग्वेदमंत्रांचा एक आटपसर ग्रंथ काढला(१८६१-६३) व उपलब्ध असलेल्या संस्कृत ग्रंथांची व लेखकांची एक सूची तीन वेळां (१८९१, १८९६, १९०३) तयार केली.
ख्रिश्चन् लासेन.- विल्यम शलेजेलचा शिष्य. ह्यानें त्याच्या वेळीं उपलब्ध असलेली हिंदुस्थानाबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करून ती चार खंडांत प्रसिद्ध केली (१८४३-६२). “Sanskrit Worterbuch” हा संस्कृत कोश ओटो बोटलिंग (Otto Bohtlingk) व रुडोल्फ रोठ ह्यांनीं सात खंडांत प्रसिद्ध केला(१८५२-७५). ह्या अवाढव्य कामाला बरींच वर्षें लागलीं पण ह्यापासून फार फायदा झाला.
आल्बर्ट वेबर.- ह्यानें हिंदु वाङ्मयचा संपूर्ण इतिहास लिहिला (१८५२). हिंदु वाङ्मयाच्या निरनिराळ्या भागांत येथपर्यंत केलेल्या संशोधनाचें एकीकरण “Outlines of Indoâryan Philology and Ârchaeology” ह्या जर्मन ग्रंथांत, बुल्हर व मागाहून किलहॉर्न ह्यांच्या नेतृत्वाखालीं केलें गेलें (१८९७). “पाली टेक्स्ट सोसायटी” ह्या नांवाची संस्था टी. डब्ल्यू. डेव्हिड्सनें स्थापिली (१८८२). ह्यानें बौद्धवाङ्मयाच्या संशोधनाच्या कामीं बरीच मदत झाली. अल्बर्ट वेबरनें जैन लोकांच्या पवित्र ग्रंथावर एक मोठा प्रबंध लिहून वाङ्मयाची एक नवी दिशा दाखविली (१८८३-८५).
या कालानंतर भारतीय विद्येचे संशोधक पुष्कळ वाढले आणि भारतीय वाङ्मय पुष्कळ बाहेर पडूं लागलें. सर्व देशांत भारतीय विषयांचा संशोधक वर्ग वाढला. आज पंडितवर्गाच्या सुमारें ४० संस्था भारतीय विषयांचा अभ्यास करीत आहेत.
वेदांच्या आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासानें यूरोपीयांचा त्यांच्या पूर्वजांशीं अधिक परिचय करून दिला असेल तथापि पाश्चात्यांच्या या अभ्यासानें आपलाहि कांहीं प्रत्यक्ष फायदा करून दिला आहे, आणि तो म्हटला म्हणजे आपल्या खालावलेल्या आजच्या स्थितींत आपणांस यूरोपीय आणि अमेरिकन लोकांनीं आपलें म्हणावें या गोष्टीला त्यानें साहाय्य केलें आहे. भारतीय आज वर्णानें काळा असला तीर अमेरिकेत त्याची गणना कायद्यानें गोर्यांत होते आणि त्यास नागरिकत्वाचे हक्क प्राप्त होतात. हा परिणाम बर्याच अंशीं वेदांचा आणि वैदिक धर्मांचाच होय. वेदमूलक धर्मांनीं निरनिराळे भारतीय इतके जखडले गेले आहेत कीं, पूर्वींच्या आर्यन् लोकांचे वंशज कोणते आणि दस्यूंचें वंशज कोणते यांची निवड हिंदुस्थानांत जातिभेद राहूनहि करतां येईनाशी झाली आहे.
फक्त वेदांकडेच पाश्चात्यांची दृष्टी वळली असें नाहीं तर वेदांताकडे देखील वळली . आपल्या या बाबतींत झालेल्या विचारांचा पाश्चात्यांवर परिणाम होत आहे. आजच्या आधिभौतिक शोधांच्या आड पाश्चात्यांच्या पारमार्थिक ग्रंथांचीं किती जरी वचनें आलीं आणि त्यांचीं पारमार्थिक मतें व त्यांच्या पारमार्थिक ग्रंथांनीं व्यक्त केलेला विचार यांचा आणि अर्वाचीन शास्त्रज्ञांच्या शोधांचा कितीहि विरोध आला, तरी त्यांचा वेदांताच्या तत्त्वांशी फारसा विरोध येत नाहीं, आणि याप्रमाणें शास्त्रज्ञांस देखील मान्य असें तत्त्वज्ञान आपणांकडे आहे म्हणून आपल्याकडे अर्वाचीन तत्त्ववेत्त्यांचें थोडेंबहुत लक्ष आहे, व आपल्या वेदान्ती मतांच्या प्रवर्तक संस्था कांहीं प्रत्यक्ष आणि कांहीं प्रच्छन्न रूपानें पाश्चात्यांत आढळत आहेत. असो.
यूरोपांत बौद्ध ग्रंथांचा प्रसार केवळ पांडित्याचा एक भाग म्हणूनच होत नाहीं तर श्रद्धास्पद पारमार्थिक ग्रंथ म्हणूनहि होतो. आज यूरोपांत आणि अमेरिकेंत मिळून वीस हजारांवर लोक आपणांस बुद्धानुयायी म्हणवितात. लंडन येथें ‘बुद्धिस्ट सोसायटी’ बौद्ध संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीं स्थापन झाली आहे. प्रो० र्हीस डेव्हिड्स हे तिचे अध्वर्यू होते. बौद्ध संप्रदायाचा प्रसार यूरोपांत झाला तो जराशा विलक्षण परिस्थितींत झाला. ख्रिस्ती मिशनर्यांनीं आपल्या संप्रदायाचा प्रसार बौद्ध देशांत करणें सुलभ व्हावें म्हणून बौद्ध ग्रंथांच्या अभ्यासास सुरुवात केली आणि याच हेतूनें त्यांनीं बौद्ध ग्रंथांचीं भाषांतरें यूरोपांतील भाषांत केलीं. पण त्या भाषांतरांचा परिणाम उलटा झाला. बौद्ध संप्रदायास पाश्चात्यांमध्यें अनुयायी मिळाले.
भारतीय संस्कृतीचा इतरत्र जो प्रसार झाला आणि येथील वाङ्मयाचा जो इतरत्र परिणाम झाला तो आपल्या लोकांचे थवेच्या थवे किंवा मोठ्या फौजा त्या त्या ठिकाणीं जाऊन झाला असें नाहीं, तर केवळ ग्रंथांमार्फत व प्रसंगीं कांहीं धर्मप्रचारक वगैरे जाऊन झाला असें दिसतें. कांबोजमध्यें जी मोठी लोकवस्ती हिंदु आहे ती व बलीबेटांतील लोकवस्ती ही देखील, आपल्याकडील लोकांच्या मोठ्या वसाहती तेथें होऊन उत्पन्न झाली, असें त्या तर्हेचा बळकट पुरावा आल्याखेरीज म्हणतां येणार नाहीं.
आपला परिणाम इतर लोकांवर होतो तो आपल्या लोकांशीं संपर्क अधिक झाल्यानें व्हावयाचा; तथापि जे अनेक लक्ष हिंदू विदेशीं गेले आहेत त्यांची बौद्धिक छाप तेथें पडली नाहीं. यास मुख्य कारण म्हटलें म्हणजे त्यांच्या बरोबर आपला सुशिक्षित वर्ग गेला नाहीं हें होय.