प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

मॅसिडोनचा उदय - मॅसिडोनचा फिलिप किंवा अलेक्झांडर असल्या अनियंत्रिक राजसत्ताधार्‍यांचा जय व्हावा याचें कारण काय ? त्या वेळच्या नगरराज्यपद्धतीचा हा दोष, किंवा लोकशाहीचा ? याचीं राजकीय, आर्थिक व नैतिक अशीं निरनिराळीं कारणें आहेत. निरनिराळ्या संस्थानांत समतोलपणा राखण्याचें राजकारणांतील तत्त्व स्वीकारून अथेन्सनें कधीं थेलीझला तर कधीं स्पार्टाला मदत करून परस्परांतील शत्रुभाव वाढविला व सर्वांसच दुर्बलता आणली. नैतिकदृष्ट्या गर्भपात, शिशुत्याग वगैरे नीतिबाह्य रूढींमुळें लोकसंख्या कमी कमी होत चालली होती. आरिस्टॉटलसारख्या तत्त्ववेत्त्यानें शिशुत्यागावर टीका केली होती, तरी गर्भपातास त्याचीहि संमति होती. यामुळें अर्थोत्पत्तीहि मंदावली. उलट चैनबाजींत द्रव्यव्यय मात्र वाढत होता. सरकारी खजिन्यांत पैशाची टंचाई झाल्यामुळें युद्धखर्च चालविण्यास मारामार पडूं लागली. राजकारणांतील नीतिमत्ता कमी होत चालली, देशभक्ति मंदावली, लांचलुचपत वाढली, पुढार्‍यांतील परस्परांवरील विश्वास उडत चालला, व पगारी लष्करभरती सुरू झाल्यामुळें सार्वजनिक कामें करण्याची हौस मावळत गेली. डिमॉस्थिनीझनें यावर पदोपदीं टीका केली आहे. परंतु या सर्वांपेक्षांहि महत्त्वाचें व्यंग म्हटलें म्हणजे संख्यागौणत्व हें होय. आरिस्टॉटली बुद्धीस हें संख्याल्पत्व मोठें गोजिरवाणें वाटे, आणि तें संभोगेच्छेचें नियंत्रण न करतां रक्षिण्यासाठीं त्यानें मोठे घाणेरडे उपाय सुचविले आहेत.