प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
रोमन काल - ख्रि. पू. ६४ सालीं पाँपीनें ज्या वेळीं रोमन साम्राज्याला सिरिया जोडला त्या वेळेस सिरियांतील शहरांमध्यें सर्वस्वीं अंदाधुंदी असलेली त्याला आढळून आली. नॅबाटीअन आणि यहुदी लोकांनीं ग्रीकसंस्कृतीखालच्या मुलुखांत प्रवेश केला होता, व दक्षिणेकडे या यहुदी लोकांच्या स्वा-यांमुळें अनेक शहरें उध्वस्त झालीं होतीं. रोमन लोकांनीं हीं शहरें पुन्हां बांधली व ग्रीकसंस्कृतीचें रक्षण केलें. ग्रीकांचा नागर आयुष्यक्रम, त्यांच्या राजकीय संस्था, त्यांचे महोत्सव, त्यांच्या करमणुकी वगैरे आतां पुन्हां मोठ्या प्रमाणांवर अस्तित्वांत आलें. सिरियामधील ग्रीकसंस्कृतीचे बहुतेक अवशेष रोमन काळांतील आहेत. जीं कांहीं स्थानिक राजघराणीं रोमनांनीं राहूं दिलीं होतीं ती सर्व थोडीबहुत ग्रीकसंस्कृतीखालीं आलेलीं अशींच होतीं. हेरडचें घराणें अशांपैकींच एक होतें. मोठा हेरड (ख्रि. पू. ३७-३४) यानें यरुशलेम येथें ग्रीक संस्कृतिदर्शक चिन्ह असें एक नाटकगृह बांधलें, व त्याच्या घराण्यानें एकंदरींत नगरसंस्थापनेच्या संबंधीं बरेंच कार्य केलें. मोठ्या हेरडनें सिबॅस्टि (पुरातन सामेरिआ), सेसारीआ, अँटिपाट्रिस हीं शहरें स्थापिलीं. हेरड अँटिपस (ख्रि. पू. ४-इ. स. ३९) यानें टायबीरिअस शहर स्थापलें. हॉरनच्या जंगली मुलुखांत वसाहत करून तो ग्रीकसंस्कृतीखालीं आणण्याचा प्रयत्न प्रथम हेरड घराण्यानेंच केला. सिरियामध्यें सुद्धां रोमन छत्राखालीं ग्रीक संस्कृतीचा नवीन दिशेनें प्रसार झाला. रोमन काळापूर्वी ज्याचें नांवहि ऐकुं येत नव्हतें असें पॅल्मायरा शहर हें याचें उत्तम उदाहरण आहे.