प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता

व्यापार - मिनोई व मायसीनी काळांत व्यापार चांगला चालत असून क्रीट व पेलोपॉनीसस येथील जिन्नस इजिप्‍त व आशियामायनर येथें जात असत. पुढें हा व्यापार साफ बसला. नंतर पुन्हां ७ व्या व ६ व्या शतकांत त्याची जोरांत वाढ झाली. लिडिअन लोकांनीं नाण्यांची पद्धति शोधून काढिली तिचा ग्रीक लोकांनीं फार प्रसार केला. युबिआ, इजायना व कॉरिंथ ह्या व्यापाराच्या मुख्य पेठा होत्या. व्यापारी कारणांकरितां व्यापारीसंघ निर्माण होऊं लागले व तद्‍नुरोधानें राजकीय मित्रसंघ बनूं लागले. फ्रिजियन डोंगराळ प्रदेशांतील लोकरीची मायलीटस (मिलेटस) येथें वस्त्रें बनून एट्रुस्कन बाजारांत खपूं लागलीं. तथापि ग्रीकांचा व्यापार भुमध्यसमुद्रांतील बंदरांपुरताच चालू असे. उलट फिनीशियन व कार्थेजिअन लोकांनीं मात्र ब्रिटनपर्यंत व केपला वळसा घालून जाण्याचें धाडस वास्कोडिगामाच्या पूर्वीच दोन हजार वर्षे केलें होतें. तथापि भूगोलशास्त्रास जन्म देण्याचें श्रेय ग्रीक लोकांसच असून नकाशेहि प्रथम (६ व्या शतकांत) त्यांनींच केलेले आहेत.