प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

शासनसंस्था - ग्रीक संस्कृतीचा उदय नगरराज्यांपासून झाला होता. केरोनीआच्या लढाईनंतर नगरराज्यांच्या ऐश्वर्याला उतरती कळा लागली. याचा अर्थ नगर राज्यांचें स्वातंत्र्य सर्वत्र नष्ट झालें असा नाहीं. खुद्द अलेक्झांडरच्या वेळीं सुद्धा ग्रीक संस्थानें गडबड करूं लागलीं होती, व इटोलिआचा बंदोबस्त तर अखेरपर्यंत झाला नाहीं. अलेक्झांडर मेला व राज्यामध्यें दुही माजली तेव्हां या नगरराज्यांनां पुन्हां संधि सांपडली. यानंतरच्या दोन तीन शतकांत हीं नगरराज्यें स्वस्थ अशीं मुळींच बसून राहिली नाहींत. ऱ्होड्सनें कोणत्या तरी एखाद्या संस्थानाचा पक्ष स्वीकारून अधिक व्यापक राजकारणांत बराच भाग घेतला होता. खुद्द ग्रीसमध्यें सुद्धां अलेक्झांडरच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणें साम्राज्य सत्ता प्रस्थापित झाली नव्हती. आगंतुक अडचणींनां तोंड देण्याकरितां सामुदायिक संघस्वरूपांत राहून सुद्धा स्वतंत्रपणें आपली राजकीय प्रगति करण्याची पात्रता ग्रीक संस्थानांनीं सिद्ध केली होती. आकिअन आणि इटोलिअन संघ हे आपआपल्या हद्दींत पूर्णपणें स्वतंत्र होते. स्पार्टानें मॅसिडोनियाशीं दोन हात करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. ग्रीसच्या बाहेरील पण मॅसिडोनियन राज्याच्या सरहद्दीवर असलेले सिल्यूकिड व टॉलेमाइक आणि ॲट्टालिड वगैरे प्रांत कमी अधिक प्रमाणांत स्वतंत्र होते. ख्रि. पू. दुसर्‍या शतकाच्या आरंभास एकीकडे लँप्साकस (स्मर्ना) वगैरे जुन्या पुराण्या शहरांनीं आपलें स्वातंत्र्य राखण्याचा प्रयत्‍न चालविला होता; तर दुसरीकडे ॲलेक्झांड्रिया, ॲटिऑक आणि पर्गामम यांसारखीं राजधानींचीं शहरें राजप्रतिनिधींच्या ताब्यांत नांदत होतीं. पण रोमनें हा ग्रीक संस्कृतीचा प्रदेश पादाक्रांत केल्याबरोबर ही स्थिति पालटली. मॅसिडोनियन लोकांच्या जयामुळें ग्रीक संस्कृतीचा जिकडे तिकडे फैलाव झाला, तरी ग्रीसच्या स्वातंयास आळा बसला; व रोमनें आपल्या लगतच्या पौरस्त्य राष्ट्रांत ही ग्रीक संस्कृति पूर्णपणें रुजविली तरी ग्रीक स्वातंत्र्य मात्र नष्ट करून टाकलें. तथापि अथेन्स अगर ऱ्होड्स यांसारखीं संस्थानें मित्रराष्ट्रें म्हणून मानलीं गेली होतीं, व खंडणी देणारीं मांडलिक संस्थानें देखील अंतर्गत कारभारांत स्वतंत्रच होतीं; फक्त कांहीं महत्त्वाच्या बाबतींत मात्र रोमनें नेमलेल्या अधिकार्‍यास ढवळाढवळ करतां येत होती. बौली आणि डेमॉस या सभा बरेच दिवस अस्तित्वांत होत्या व ग्रीक स्वयंसत्ताक पद्धतीचा ध्वनि अद्यापि ऐकूं येत होता. पण ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत हें अंतर्गत स्वातंत्र्य देखील नष्ट झालें; व डेमॉस सभा नामशेष झाली. दुसर्‍या शतकाच्या शेवटीं साम्राज्य सरकार अंतर्गत कारभारांत ढवळाढवळ करूं लागलें; व पैशासाठीं त्यांनीं ही अंतर्गत व्यवस्था आपल्याच हातांत घेण्यास सुरुवात केली. सारांश डायोक्लीशिअननंतर व पूर्वेकडील साम्राज्याखालीं ग्रीक प्रदेशाचा राज्यकारभार नोकरशाहीच्या तंत्रानें चालूं लागला.