प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

सेनापति-राजांचीं ग्रीक शहरें : आशिया मायनर -  पण आशियामायनरचे जे भाग रोमनसाम्राज्याखालीं आलेले होते त्या ठिकाणची ग्रीक संस्कृतीची स्थिति अगदीं निराळी होती. आशियामायनरमध्यें ग्रीक संस्कृतीचा प्रसार तद्देशीय रहिवाश्यांत व रोमन सरदारांत अलेक्झांडरच्याहि पूर्वीपासून होऊं लागला होता. अलेक्झांडरच्या कारकीर्दींत या बाबतींत विशेष प्रगति दिसून येत नाहीं, व येथें त्यानें शहरेंहि वसविलेलीं आढळत नाहींत. अलेक्झांडरच्या नंतरच्या राजांनीं मात्र पुष्कळ शहरें बांधलीं व वसाहती वसविल्या. अँटिगोनसनें फ्रिजिआमधील सिलीनि ही आपली राजधानी केली. नायसीआ व अलेक्झांड्रिया-ट्रोअँस या शहरांचा प्रत्येकास अँटिगोनाया हें नांव देऊन त्यानेंच प्रथम पाया घातला; लायसिमाकसनें (ख्रि. पू. ३०१-२८१) मागाहून त्यांनां दुसरीं नांवें दिलीं. सिल्यूकिडींनीं स्थापन केलेलीं अनेक शहरें आहेत. सिल्युकिडी राजांची या प्रांताची राजधानी सॉर्डिस ही असून, ख्रि. पू. तिस-या शतकाच्या अखेरीस सार्डिस हें पूर्णपणें ग्रीक शहर बनलें होतें. याशिवाय इजिअन किनारा व पूर्व यांमधील हमरस्त्यावर पुष्कळ नवीन शहरें वसविलीं गेली होतीं. 'सिलिशिअन गेट्स' च्या पश्चिमेला लेऑडिसीआ कॅटॉसिकॉमिनि, अँपामीआ, फ्रिजिआची राजधानी, लायकसवरील लेऑडिसीआ, अँटिऑक-ऑन-मिअँडर, अँटिऑक-नायसा, अँटिऑक-ट्रालीझ हीं शहरें होतीं; ह्या हमरस्त्याच्या दक्षिणेस पिसिडिआमधील अँटिऑक आणि केरिआमधील स्ट्रॅटोनायसिआ हीं शहरें होतीं. हमरस्त्याच्या उत्तरेकडील प्रदेशांतील सिल्यूकिडींची अतिशय प्रसिद्ध वसाहत म्हणजे थायाटायरा ही होती. दक्षिणेकडील समुद्रकिना-यावर बेरिनायसि, आर्सिनोइ व टॉलिमेइस हीं शहरें होतीं. पर्गामम येथील अँट्टालिड घराण्याचा उदय झाल्यावर सिल्यूकिडी नगरांप्रमाणेंच अँट्टालाया, फिलेटीरिआ, युमीनिआ व अँपालोनिस हीं पर्गामिनींचीं शहरें अंतर्भागांत वसलीं गेलीं. तद्देशीय बिथिनिअन घराणें तिस-या शतकामध्यें ग्रीक झालें, आणि नगरसंवर्धनाच्या कामीं प्रूशिअस (जुनें सायस), अँपामीआ, कदाचित् प्रूसा व विशेषतः निकोमीडिआ यांनीं फारच मेहनत घेतली. अशा रीतीनें अंतर्भागांत नवीन ग्रीक शहरें उदयास येत होतीं तर पश्चिम किना-यावरील जुनी संस्कृति ग्रीक राजांच्या आश्रयाखालीं अधिकाधिक वृद्धिंगत पावत होती. लोकांची प्रवृत्ति या नवीन शहरांमध्यें जमाव करून रहाण्याकडे होऊं लागल्यामुळें लेबिडस, मायस किंवा कॉलोफॉन यांसारखीं लहान शहरें लवकरच नामशेष होत चाललीं. आणि एफिससचें वैभव व संपत्ति वाढत जाऊन स्मर्ना हें चार शतकांनंतर पुन्हां भरभराटीस आलें. -होड्स हें अलेक्झांडरनंतरच्या काळांत पूर्वेकडील व्यापारांत संपत्ति मिळवून वैभवास चढलें.

ख्रि. पू. २७८-२७७ सालीं केल्ट लोकांच्या स्वा-यांस सुरुवात झाल्यामुळें अंतर्भागांत ग्रीक संस्कृतीचा प्रसार होण्याची क्रिया बंद पडली. गालेशन लोकांनीं पठाराच्या उत्तरेकडील बराचसा प्रदेश व्यापला इतकेंच नव्हे, तर ते एका ठिकाणीं स्वस्थ बसणारे लोक नसल्यामुळें अस्वस्थता उत्पन्न होऊन ग्रीक संस्कृतीच्या राज्यांच्या प्रगतीस अडथळा आला. म्हणून तिस-या शतकाच्या उत्तरार्धांत पर्गामिनी राजांनीं जीं युद्धें करून या लोकांच्या प्रगतीस आळा घातला त्यांनां संस्कृतियुद्धाचें महत्त्व आहे.