प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
हिंदुस्थान - अलेक्झांडरनें हिंदुस्थानामध्यें अनेक शहरें वसविली. कॉकेशस पर्वतापाशीं अलेक्झांड्रिया नांवाचें शहर, काबूल खोर्यांत नायसीआ नांवाचें शहर, झेलम नदीच्या कांठीं दुसरें नायसीआ नांवाचें शहर त्याच्याच समोर बूकेफल शहर व चिनाबच्या कांठीं एक शहर वसविलें; आणि सिंधूपासून समुद्रापर्यंत पुष्कळ किल्ले बांधले. ख्रि. पू. ३२१ नंतर सिंधूपलीकडील सर्व मॅसिडोनियन सत्ता मौर्य राजांनीं नष्ट करून टाकली, व ख्रि. पू. ३०३ सालीं सिंधूच्या पश्चिमेकडील मोठमोठे जिल्हे देखील सिल्यूकसनें सोडून दिले. तथापि ग्रीक सत्ता अजीबात नष्ट झाली नाहीं. मौर्य घराण्याचा नाश १८० सालीं झाला, व याच वेळी बॅक्ट्रियाच्या ग्रीक राजांनीं हिंदुकुश पर्वताच्या पलीकडे स्वार्या करण्यास सुरुवात केली. ख्रि. पू. दुसर्या शतकांत मिनँडरनें हिंदुकुश पर्वतापासून गंगानदीपर्यंतचा सर्व टापू जिंकला. यानंतर मध्यआशियामधील शक आणि युएचि लोकांनीं बॅक्ट्रियाचें राज्य काबीज करून हिंदुस्थानांतील ग्रीक सत्तेचेंहि हळू हळू उद्धाटन केलें. ख्रि. पू. ३० या सालीं शेवटचा ग्रीक राजा हर्मीअस याचा पाडाव झाला. याच वेळीं पश्चिमेकडील यूरोपीय ग्रीक व रोमन प्रदेश हे रोमन साम्राज्यांत अंतर्धान पावले. ग्रीक सत्तेचें हिंदुस्थानांतून उच्चाटन झालें तरी हिंदुस्थानाशीं ग्रीक लोकांचा व्यापार बंद पडला नाहीं. अशा रीतीचे फेरफार घडून येत असतांना अलेक्झांडरनें वसविलेल्या शहरांतील ग्रीक लोकांनीं आपलें काय वैशिष्टय राखलें, ग्रीक संस्कृतीचा हिंदू लोकांवर काय परिणाम झाला, इत्यादि प्रश्न साहजिकच उद्भवतात व त्यांनां उत्तर देणें फार अवघड काम आहे. यावर स्पष्ट लिहिण्यास महत्त्वाची प्रमाणें अद्यापि उपलब्ध नाहींत. याकरितां काबूलच्या आसपास संशोधन जितकें होईल तितकें पाहिजे आहे.