प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

सिरियाः सिल्यूकिडी साम्राज्य- सिरियामध्यें विशेषतः ग्रीक लोकांच्या नवीन वसाहती पुष्कळ झाल्या होत्या. या कामाला सुरुवात अलेक्झांडरनेंच केली होती. त्यानें अलेक्झांड्रिया-बाय-इसस (आधुनिक अलेक्झांड्रेट्टा), सामेरिआ, पेल्ला, (उत्तरकालीन अँपामीआ), करी इत्यादि शहरें वसविलीं होतीं. अँटिगोनसनें अँटिगोनाया वसविलें. हें पुढें थोडक्याच वर्षांनीं अँटिऑकमध्यें अंतर्भूत झालें; व त्याच्या नंतर (ख्रि. पू. ३०१) सिरियामध्यें ग्रीक शहरें वसविण्याचें काम लेबानॉनच्या उत्तरेला सिल्यूकसच्या घराण्यानें व त्याच्या दक्षिणेला टॉलेमीच्या घराण्यानें केलें. सिरियाच्या उत्तरेला चार शहरें सर्वांत पुढें आलीं. (१) ओराँटीझवरील अँटिऑक, सिल्यूकिडी राजधानी; (२) ओराँटीझच्या मुखाजवळ सिल्यूशिआ-इन-पायिरा; (३) अँपामीआ (अर्वाचीन फेमिआ), ओराँटीझच्या मध्यावर राज्याचें लष्करी ठिकाण; आणि (४) सिरियन दारूच्या निर्गतीसंबंधांत महत्त्व पावलेलें ''समुद्रकांठचें'' ठिकाणें लेऑडिसीआ. सीलिसिरियांत टॉलेमींनीं वसविल्यापैकीं टॉलिमेइस हें एकच समुद्रकांठचें ठिकाण वरच्या इतक्या महत्त्वाचें होतें. जॉर्डनच्या पूर्वेकडील ग्रीक शहरें देखील ख्रि. पू. तिस-या शतकामध्यें टॉलेमीच्या राज्यांत आलीं. तिस-या अँटायोकसनें (ख्रि. पू. २२३-१८७) सिलिशिआसहित सर्व सिरिया सिल्यूकिडी साम्राज्याखालीं आणला. चवथ्या अँटायोकसच्या कारकीर्दीत (ख्रि. पू. १७५-१६४) सिरियामध्यें ग्रीकसंस्कृतीला नवीन चालना मिळाली. आपल्या वाडवडिलांचे रीतरिवाज सोडून सर्वांनीं एक प्रकारचे ठरलेले रीतरिवाज स्वीकारावे अशी त्यानें आपल्या प्रजेला आज्ञा केली होती असें म्हणतात. पण हें जरी अगदीं बरोबर नसलें तरी त्याचें एकंदरींत धोरण काय होतें हें यावरून उघड दिसतें. इतर गोष्टींवरूनहि हेंच दिसून येतें. या शहरांनीं आपआपल्या नांवाची नाणीं काढलेलीं आढळून येतात. पुष्कळ शहरांनीं आपलीं नांवें बदलून अँटिऑक, सिल्युशिआ अगर एपिफानीआ अशीं नांवें ठेवून घेतलीं. खुद्द अँटिऑकमध्यें कायदेमंडळाची इमारत, लष्करासाठीं जागा इत्यादि नवीन ठिकाणें बांधण्यांत आलीं. सिल्यूकिडी घराण्याचा जसजसा -हास होत चालला तसतशीं हीं शहरें अधिकाधिक स्वतंत्र होऊं लागलीं; पण त्याबरोबरच मध्यवर्ती सत्तेकडून संरक्षण केलें जाण्याची आशाहि त्यांनां राहिली नाहीं. यामुळें या शहरांवर रानटी लोकांच्या स्वा-या होऊं लागल्या.