प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

स्पार्टन साम्राज्य - अथेनिअन साम्राज्य लहान होतें, पण स्पार्टन साम्राज्य सर्व ग्रीसभर पसरलेलें होतें. पुढें पुढें मत्सर वाढून कॉरिंथिअन युद्धांत (ख्रि. पू. ३९४-३८७) लायसँडरच्या प्रयत्‍नानें स्पार्टांच्या विरुद्ध थीबि, अथेन्स, कॉरिंथ व आरगॉस हीं सर्व एकत्र झालीं. त्या युद्धांत स्पार्टाचाच जय झाला, पण स्पार्टाची समुद्रावरील सत्ता मात्र लयास गेली. कारण एक तर स्पार्टाचा दर्यावरील व्यापार फारसा नव्हताच; शिवाय स्पार्टाजवळ पैशाचा पुरवठा बेताचाच असल्यामुळें त्याच्या अंगीं मोठें आरमार बांधण्यास सामर्थ्य नव्हतें, व दर्यावर्दीपणांत कुशल अशीं माणसेंहि नव्हतीं. यामुळें एकाच पराजयानें (नायडस येथें ख्रि. पू. ३९१) स्पार्टन आरमार नाहींसे होऊन स्पार्टन साम्राज्य मोडकळीस आलें.