प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
रोमन अंमलाखालील ग्रीक संस्कृति - आशियामायनरमध्यें रोम हात घालूं लागल्यावर प्रथमतः त्यानें गॉलची सत्ता नष्ट केली (ख्रि. पू. १८९). ख्रि. पू. १३३ मध्यें अँट्टालिड राज्य रोमच्या हातीं आलें; व अँनॉटोलिअन द्वीपकल्पामध्यें जवळ जवळ बारा शतकें त्यानें सत्ता गाजविली. रोमन अंमलाखालीं ग्रीक संस्कृति बरीच फैलावली. पश्चिमेकडील व दक्षिणेकडील समुद्रकांठचा प्रदेश अगोदरच ग्रीक झालेला होता. स्ट्रेबोच्या वेळीं लिडियामध्यें जुन्या भाषेचा गंधहि नव्हता. मॅसिडोनियन सत्तेच्या आरंभींच लिशिआमधील देशी भाषा नष्ट झाली होती. पण फ्रिजिआमध्यें मात्र ग्रीक शहरांव्यतिरिक्त ग्रीक संस्कृति फारशी पसरली नव्हती. अँट्टालिड राजे देखील येथें विशेष कांहीं करूं शकले नाहींत; आणि रोमन लोकांच्या सत्तेखालींहि ग्रीक संस्कृतीचा प्रसार हळू हळू झाला. हेड्रिअनच्या कारकीर्दीत मात्र फ्रिजिअन पठारांतील नगरांत देवळें, नाटकगृहें, स्नानगृहें वगैरे भौतिक सुधारणा शिरल्या. फ्रिजिआमधील उत्तरेकडील व पूर्वेकडील खेड्यांमध्यें तिस-या शतकाच्या मध्यांत ग्रीक संस्कृतीचा नुकताच कोठें शिरकाव होऊं लागला होता. चवथ्या शतकापर्यंत उभारलेल्या थडग्यांवर भंजकास दिलेला शाप जुन्या फ्रिजिअन भाषेंतच लिहिलेला आढळतो. सेंट पॉलच्या वेळचे लिस्ट्रामधील खालच्या दर्जाचे लोक लिकेओनिअन भाषा बोलत असत. फ्रिजिआचा जो भाग स्वा-या करणा-या केल्ट लोकांच्या वसाहती होऊन गालेशिआ झाला, त्या भागांत ख्रिस्ती शकाच्या सुरुवातीस मोठमोठ्या शहरांत ग्रीक संस्कृतीचा प्रसार झाला होता; परंतु त्यांतील खेड्यांपाड्यांत चवथ्या शतकापर्यंत केल्टिक भाषाच उपयोगांत होती. ख्रिस्ती शकाच्या सुरुवातीपर्यंत कॅप्पाडोशिआमध्यें शहरेंच नव्हतीं, व चवथ्या शतकांत देखील तेथें ग्रीक संस्कृतीचा पूर्णपणें प्रसार झाला नव्हता. पण ख्रिस्ती संप्रदायानें जुन्या ग्रीक संस्कृतीचा इतका अंश ग्रहण केला होता कीं, मागसलेल्या प्रदेशांत इतका अंश ग्रहण केला होता कीं, मागसलेल्या प्रदेशांत ग्रीक संस्कृतीचा प्रसार त्याच्या द्वाराच होऊं लागला. आशियामायनरमध्यें देश्य भाषांच्या ऐवजीं ग्रीक भाषा प्रचारांत येऊं लागल्या. फ्रिजिअन मात्र कांहीं भागांत तुर्कांच्या स्वा-यापर्यंत टिकाव धरून राहिली होती. मेस्त्रॉप आणि सहक पंथांनीं ग्रीक वाङ्मयाचें भाषांतर केल्यानंतर ५ व्या शतकामध्यें आर्मीनियांत ग्रीक संस्कृतीचा जोरानें प्रसार होऊं लागला.