प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
यहुद्यांचा ग्रीकसंस्कृतीशीं संबंध - मॅसिडोनियन सत्तेच्या पहिल्या दीड शतकांतील या दोहोंमधील संबंध स्पष्ट कळत नाहीं. अलेक्झांडरनें यरुशलेमला भेट दिली किंवा नवीन मॅसिडोनियन राज्यांत यहुद्यांनां कांहीं हक्क दिले, असें जें जोसीफसनें म्हटलें आहे तें खोटे आहे असें म्हणतात. कांहींच्या मतें त्या वेळच्या जुन्या करारांतील 'म्हणींचें पुस्तक' यासारख्या भागांत ग्रीक संस्कृतीचा परिणाम दिसून येतो; पण याहि बाबतींत कांहीं थोड्या विचारसाम्यावरून जन्यजनकत्वाचा संबंध स्पष्ट सिद्ध होत नाहीं. ग्रीकवर्चस्वाला अनुकूल अशी एक गोष्ट म्हणजे ख्रि. पू. तिस-या शतकामध्यें ग्रीक भाषेंत झालेलें यहुदी कायद्याचें भषांतर ही होय. यावरून त्या वेळी अलेक्झांड्रिया येथील यहुदी डायास्पोरा हा पॅलेस्टाइनची भाषा विसरून जाण्याइतका ग्रीक झाला होता असें दिग्दर्शित’ होतें. ख्रि. पू. दुस-या शतकाच्या आरंभास सिरियांतील सर्व ठिकाणच्या सधन लोकांप्रमाणें यरुशलेम येथील भिक्षुकशाहीवरहि ग्रीक विचारांचा पगडा बसलेला होता. ही गोष्ट तत्कालीन पुराणमताभिमानी पक्षाच्या विरोधाच्या तीव्रतेवरून चांगली व्यक्त होते. फारिसी (न्या भिक्षुकी आचरणाचे लोक )आणि साडुसी( ग्रीक संस्कृतीचे अभिमानी) असे यहुद्यांतले उद्धारक, सुधारक पक्ष प्रसिद्धच आहेत.
चवथा अँटायोकस एपिफानीझ (ख्रि. पू. १७६-१६५) याच्या कारकीर्दीत ग्रीकाभिमानी पक्षानें यरुशलेम हे ग्रीक शहर करण्याचा प्रयत्न केला; जिकडे तिकडे आखाडे दिसूं लागले व ग्रीक पोशाखाचा तरुण पिढींत प्रसार होऊं लागला. पण पुढें जेव्हां राजकीय हेतूनें अँटायोकस यरुशलेमच्या कारभारांत ढवळाढवळ करूं लागला तेव्हां तेथील पुराणमताभिमानी पक्षानें जोराचा विरोध केला, व त्याला सर्व राष्ट्राचा पाठिंबाहि मिळाला. हॅसमोनीअन घराण्याच्या नेतृत्वाखालीं बंड होऊन ख्रि. पू. १४३-१४२ सालीं लोकांनीं हॅसमोनीअन राजाच्या आधिपत्याखालीं स्वतंत्र यहुदी राज्य स्थापन केलें. जुन्या ग्रीकाभिमानी पक्षाची सत्ता नष्ट झाली खरी, पण हॅसमोनीअन राजे हे उदारमतवादी होते. मोझेइक कायद्याला जरी त्यांच्या राज्यांत मान मिळत असे, तरी ग्रीक संस्कृतीनेंहि तेथें निरनिराळ्या स्वरूपांत प्रवेश केला होता. पहिला अँरिस्टोब्यूलस (ख्रि. पू. १०४-१०३) हा हॅसमोनीअन राजा ग्रीकांनां ग्रीकाभिमानी वाटत होता. त्यास आणि त्याच्या नंतरच्या इतर राजांस ग्रीक आणि हिब्रू अशीं दोन्ही नांवें होती, आणि जेनीअस अलेक्झांडर (ख्रि. पू. १०३-७६) नंतर नाण्यांवरहि हिब्रूबरोबर ग्रीक लेख दिलेले आढळतात. हॅसमोनीअन घराण्यांस काढून त्याची गादी बळकावणा-या हेरडनें (ख्रि. पू. ३७-३४) जुडीआच्या बाहेर नवीन ग्रीक शहरें व देवळें बांधून व जुन्यांनां आश्रय देऊन ग्रीक संस्कृतीचा प्रसार केला. इतकेंच नव्हे तर दमास्कसच्या निकोलेअससारख्या ग्रीक विद्वानांनां त्यानें आपल्या दरबारीं आश्रयहि दिला. यरुशलेमच्या आसमंतांत त्यानें नाटकगृह व सार्वजनिक दिवाणखाना बांधला. सिरियामध्यें ग्रीक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठीं हेरडच्या घराण्यानें कसे प्रयत्न केले हे वर दिलेच आहे. या वेळीं ग्रीक शहरांमध्यें जो यहुदी समाज पसरला होता त्याची तर ग्रीक ही मातृभाषाच झाली असून, पॅलेस्टाइनच्या यहुद्यांपेक्षां त्यांच्यावर ग्रीक आचारविचारांचा पुष्कळच अधिक परिणाम झाला होता. तरी पण त्यांनीं आपल्या मातृनगराशीं संबंध तोडला नव्हता, व यरुशलेम येथें त्यांच्या स्वतंत्र धर्मपरिषदा भरून त्यांत तेथें कांहीं कारणांनिमित्त आलेले हे ग्रीक यहुदी लोक भाग घेत असल्याचें आढळतें. तिस-या शतकांत कायद्याचें भाषांतर झाल्यापासून यहुदी वाङ्मयाची ग्रीक भाषेंत बरीच वाढ झाली होती. यांत पुष्कळशीं हिब्रू धर्मग्रंथांचीं भाषांतरें होतीं. कित्येक हिब्रू वाङ्मयाचें अनुकरण करणारीं अशी ग्रीक भाषेंत लिहिलेलींच स्वतंत्र पुस्तकें होतीं; कांहीं पुस्तकांत ग्रीक वाङ्मयाचें व ग्रीक विचारांचें अनुकरण केलेलें होतें; ग्रीक धर्तीवर कांहीं काव्येंहि निर्माण झालीं होतीं; व कांहीं तर एस्किलस अगर सांफोक्लीझ यांच्या नांवांवर प्रसिद्ध केलेल्या कविता होत्या. साहेबांचें हिंदूंविषयीं चांगले मत व्हावें म्हणून धडपडणा-या हिंदू पुस्तकांप्रमाणें या सर्वांचा उद्देश मूर्तिपूजकांच्या मनांत इस्त्रायली धर्मकथांविषयीं आदर उत्पन्न करण्याचा होता.
या ग्रीक संस्कृतीखालीं आलेल्या यहुदी लोकांच्या द्वारें ग्रीक आचारविचार यरुशलेमपर्यंत जाऊन पोहोंचले. तथापि अरमइक भाषा बोलणा-या रॅबिनिक शाखांवर याचा परिणाम विशेष झाला नाहीं. तरी मिशना आणि टॅलमड यांच्या भाषेंत बरेच ग्रीक शब्द आले आहेत ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हेड्रिअनपर्यंत रॅबिनिक पंडित ग्रीक शिक्षणाच्या विरुद्ध नव्हते. पॅलेस्टाइनमधील यहुदी लोकांच्या कल्पनांत ग्रीक कल्पनांचें मिश्रण होत होतें हें एसीनीझ पंथावरून व्यक्त होतें. मॅकाबींचें बंड हें या दोन उद्धारकसुधारक पक्षांच्या लढ्याचाच भाग आहे.