प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
फिनीशियन - चवथ्या शतकाच्या प्रथमार्धांतच फिनीशियन व्यापार्यांनीं पैरिअसमध्यें आपलें ठाणें दिलें होतें. ग्रीक व सेमेटिक राष्ट्रांच्या सरहद्दीवर सायप्रसमध्यें या दोन लोकांची सत्तेसाठीं झटापट चालू होती. या बेटामध्यें सालामिसचा राजा इव्हॅगोरस हा सत्तेच्या जोरावर ग्रीक संस्कृति लादीपर्यंत फिनीशियन संस्कृतीचेंच वर्चस्व होतें. आयसॉक्राटीझ यानें याबद्दल असे उद्गार काढले आहेत. ''इव्हॅगोरस आपली सत्ता स्थापीतोंपर्यंत हे (फिनीशियन) लोक ग्रीकांच्या इतके विरुद्ध होते कीं, जो राजा ग्रीकांचा कट्टा हाडवैरी असेल तो सगळ्यांत उत्तम गणला जात असे. पण इव्हॅगोरसनें आपली सत्ता स्थापन केल्यावर विलक्षण फरक पडून आला. प्रत्येक जण सर्व बाबतींत जास्त ग्रीक होण्याची स्पर्धा करूं लागला आहे; प्रत्येकाला भावी मुलें ग्रीकांसारखीं व्हावींत यासाठीं ग्रीक बायका करून घ्याव्या असें वाटत आहे; व ग्रीक चालीरीतींचें अनुकरण करण्यांतच त्यांनां धन्यता वाटत आहे.'' फिनीशियनांच्या मूळ ठिकाणींहि ग्रीक संस्कृति शिरकाव करूं लागली. एकदां तर इव्हॅगोरस (अजमासें ख्रि. पू. ३८६) यानें टायर देखील ताब्यांत घेतलें होतें त्याचा नातू दुसरा इव्हॅगोरस हा पार्शियन राजाच्या तर्फे सायडॉनचा सुभेदार असल्याचें आढळून येतें (ख्रि. पू. ३४९-३४६).
सायडॉनचा राजा अबदाशटार्ट (ख्रि. पू. ३७४-३६२) यानें ग्रीक लोकांशीं निकट संबंध ठेवलेला होता, व त्यानें सायप्रसच्या ग्रीक राजांचें पूर्णपणें अनुकरण केलें होतें. सार्डिनिआंतील फिनीशिअन वसाहतवाले ग्रीक कलाकौशल्याच्या वस्तू विकत घेत असत, किंवा स्वतः तशा बनवीत असत.