प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
पर्शियन युध्दें - लवकरच पुढें ग्रीसच्या परीक्षेची वेळ आली. त्या वेळेपर्यंत पर्शियन सैन्यांत ग्रीक लोकांचा भरणा असे; व पर्शियाबरोबर ग्रीक लोकांचा व्यापारहि मोठा चाले. परंतु पर्शियांतील सायरसच्या कारकीर्दीत हा संबंध एकदम तुटला. त्या वेळीं पर्शिया व ग्रीस यांची स्थिति परस्पर अत्यंत विरुद्ध होती. पर्शियांत एकसत्ता, तर ग्रीसमध्यें लोकशाही होती. पहिल्या ठिकाणीं घोडदळाला तर दुसर्या ठिकाणीं पायदळाला महत्त्व होतें. इकडे पर्शियनांचा धर्म जगांतील श्रेष्ठ धर्मांत मोडणारा होता, तर ग्रीसमधील धर्म खुद्द ग्रीक लोकांनांच वेडगळ व तिरस्करणीय वाटे. पुढील काळांत ग्रीक पर्शियनांनां तुच्छ मानूं लागले व पर्शियन ग्रीकांनां भिऊं लागले; पण या ख्रि. पू. ६ व्या शतकांत पर्शियनच ग्रीकांनां तुच्छ मानीत व ग्रीक त्यांनां भीत असत. प्रथम आयोनियन ग्रीकांचे व पर्शियनांचे जे सामने झडले, त्यांत म्हणजे हर्पेगसची स्वारी (ख्रि. पू. ५४६-५४५) व आयोनिक बंड (ख्रि. पू. ४९९-४९४) या दोन्हीहि वेळीं ग्रीकांनांच हार खावी लागली. कारण, व्यापारी दृष्टीनें बनलेल्या या ग्रीकांच्या संघांत एकराष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनें बिलकुल जीव नव्हता. मायलीटससारख्या नगरांनीं पर्शियांनीं स्वार्थीपणानें स्वतंत्र तह करून दुसर्यांनां ऐन वेळीं तोंडघशी पाडलें; आणि मत्सर व फितुरी या ग्रीकांच्या दुर्गुणांनीं पर्शियनांस जय मिळवून दिला. दरायस (ख्रि. पू. ४९०) व क्सर्क्सीझ (ख्रि. पू. ४८०-४७९) यांच्या स्वार्यांच्या वेळीं मात्र ग्रीकांनां पूर्ण जय मिळाला. त्या वेळचें पुढाकार घेऊन मोठ्या युक्तीनें व देशभक्तीनें जय मिळविल्याबद्दलचें सर्व श्रेय स्पार्टाकडे आहे. शिवाय ग्रीसच्या डोंगराळ प्रदेशाची व खडकाळ किनार्याची माहिती नसल्यामुळें, मूळ पर्शिया देशांतून फार लांबवर आल्यामुळें व खाण्यापिण्याचे हाल होऊं लागल्यामुळें पर्शियनांनां अपयश आलें.