प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
देश्य राजघराणीं - रोमन लोकांनीं सिल्यूकिडी लोकांचें उच्चाटन करण्यापूर्वीच बिथिनिअन घराणें व पाँटस आणि कॅप्पाडोशिआमधील पर्शियन घराणीं हीं ग्रीकेतर छोटीं घराणीं ग्रीक बनलीं होतीं. बिथिनिआंत वरच्या वर्गांतील लोकांचे रीतरिवाज दरबारांतल्याप्रमाणेंच होतेसें दिसतें. पाँटसचें घराणें पूर्वीपासूनच ग्रीकाभिमानी होतें. कॅप्पाडोशिआ येथें, ख्रि. पू. दुस-या शतकाच्या पूर्वार्धांत सिल्यूकिडी राजकन्या पांचव्या एरिआरेथीझची राणी होऊन आल्यानंतर ग्रीकसंस्कृतीचा पगडा बसूं लागला. परंतु कॅप्पाडोशिआमधील ग्रीक संस्कृति राजाच्या किल्ल्यांच्या व कांहीं थोडक्या शहरांच्या पलीकडे गेली नव्हती.