प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
टायरंटांपासून फायदे - वास्तविक पाहतां या टायरंटांपासून अनेक दृष्टींनीं फायदेच झाले. पहिला फायदा म्हणजे या राजांनीं शिष्टसत्ताकपद्धति नाहींशी करून लोकशाहीचा मार्ग मोकळा करून दिला. दुसरें त्यांनीं राजकीय मित्रसंघ स्थापण्याचा उपक्रम केला; शिवाय व्यापार व वसाहती त्यांनींच वाढविल्या; विशिष्ट कुटुंबांकडे असलेली धार्मिक सत्ता काढून घेऊन सामान्य लोकांनीं मिळून धार्मिक उत्सव पार पाडावे अशी चाल त्यांनींच पाडली; विद्वानांनां आश्रय व कलाकौशल्याला उत्तेजन तेच देत असत; व त्यांच्या काळांत कित्येक संस्थानें अत्यंत सामर्थ्यवान् होऊन गेली. वरील सर्व गोष्टी पुढें याच पद्धतीनें वाढत गेल्या. बहुसंख्याकराज्यपद्धति किंवा लोकशाही प्रथम अथेन्समध्यें स्थापन होऊन नंतर सर्वत्र पसरली. पुष्कळ बाबतींत आयोनिया सर्वांच्या पुढें असे. गदयग्रंथलेखनास सुरुवात होऊन थेलीझ, पायथॅगोरस, झिनॉफानीझ, हेराक्लायटस, पार्मेनिडीझ, आनॉक्सिमँडर, हेकाटीअस वगैरे गणित, ज्योतिष, भूगोल, तत्त्वज्ञान वगैरे विषयांतील विद्वान् ५ व्या शतकांत आयोनियामध्येंच होऊन गेले. तथापि राजकारणांत ग्रीक संस्थानांची व लष्करी सामर्थ्यांत स्पार्टन पायदळाची बरोबरी इतर कोणीहि करूं शकत नसे.