प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

टायरंट उर्फ अन्यायी राजे - ७ व्या शतकांत अनेक अन्यायी राजे उत्पन्न झाले व त्यांचा राजकारणावर व त्याचप्रमाणें सांपत्तिक, धार्मिक व वाङ्‌मयीन गोष्टींवर फार परिणाम झाला. अलीकडे टायरंट याचा अर्थ दुहेरी म्हणजे बेकायदेशीर (बिगरहक्क) राजा व अराजनिष्ठ (जुलुमानें पीडिलेल्या) लोकांचा राजा, असा आहे. परंतु ग्रीक इतिहासांत टायरंट म्हणजे केवळ राजा एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. शिवाय सर्व ग्रीक संस्थानांतून असले राजे होऊन गेले हें म्हणणें खोटें असून 'टायरंटांचें युग' असेंहि कांहीं झालेलें नाहीं. फक्त पेलोपॉनीसस, सिसिली, अथेन्स, सिसिऑन, कॉरिंथ, सिराक्यूस वगैरे कांहीं ठिकाणीं व अगदीं निरनिराळ्या शतकांत (ख्रि. पू. ७ व्या ते ४ थ्या शतकांत) असले राजे होऊन गेले. तसेंच एकतंत्रीं राजसत्ता ही अल्पसत्ताकपद्धति व लोकशाही यांस जोडणारी संक्रमणावस्था होय, हा सामान्य सिद्धान्तहि खरा नाहीं. कारण अथेन्स, कॉरिंथ येथील इतिहास या प्रमेयाला धरून नाहीं. टायरंटांच्या उद्याचें कारण मात्र सर्वत्र सारखें दिसतें, व तें लोकांतील असंतोष हेंच होय. पण तेंहि एकजात राजकीयच नसून सिसिऑनमध्यें जातिविषयक, अथेन्समध्यें सांपत्तिक, व मायलीटसमध्यें औदयोगिक असंतोष हें कारण होतें. हा असंतोष दूर करून लोकांचें कल्याण करण्यांत पुढाकार घेत तेच पश्चिमेकडे म्हणजे यूरोपांत टायरंट समजले जात. उलट पूर्वेकडे (आशियाखंडांत) पर्शियन बादशहानें जिंकलेल्या आशियामायनर प्रांतांवरील टायरंट उर्फ बेजबाबदार राजे म्हणजे वस्तुतः त्यांचे अधिकारी असून ते राष्ट्रहितविघातक व प्रजापीडक असत. असा हा दोन खंडांतील टायरंटांमध्यें महत्त्वाचा फरक आहे. यूरोपमध्यें ग्रीसशिवाय रोमन इतिहासांतील सीझर व फ्रान्सवरील अलीकडील नेपोलिअन बादशहा हे याच प्रकारचे राजे होते. ग्रीकवाङ्‌मयांत प्लेटो, आरिस्टॉटल, किंवा हिरोडोटस व इतर इतिहासकार या सर्वांनीं या टायरंट राजांची एकजात निंदाच केलेली आहे. पण हीं पूर्वग्रहदूषित मतें होत.