प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ग्रीकसंस्कृतीचा इतिहास - ग्रीकसंस्कृति या शब्दामध्यें खुद्द ग्रीसमध्यें निरनिराळ्या स्वरूपांत असणारी व भासमान होणारी ग्रीक लोकांची विचारपरंपरा एवढाच अर्थ विवक्षित नसून हल्लींच्या सुधारणेमध्यें सुद्धां ग्रीक लोकांच्या आचारविचारपरंपरेची दिसून येणारी छटा हा विशिष्ट अर्थहि त्यांत समाविष्ट होतो. हा दुसरा अर्थ ग्रीकसंस्कृतीविषयीं बोलतांना अर्नोल्डनें प्रचारांत आणला. जर्मन इतिहासकार ड्रॉयसेन यानें अलेक्झांडरच्या विजयापासून पुढें जी ग्रीक आचारविचारपरंपरा ग्रीकेतर राष्ट्रांवर पसरली तिजबद्दल ग्रीकसंस्कृति म्हणजे ''हेलेनिझम'' हा शब्द उपयोगांत आणला. वस्तुतः या दोन्ही अर्थांतील तत्त्व एकच आहे. ज्याप्रमाणें एखाद्या वस्तूचा प्रकाश व त्या वस्तूच्या प्रतिबिंबांत दिसून येणारा प्रकाश हे भिन्न नसतात, तद्वतच ग्रीकसंस्कृतीविषयीं म्हणतां येतें. पण येथें मात्र ग्रीक संस्कृति या शब्दाचा दुसरा अर्थ घेऊन इतर राष्ट्रांमध्यें ग्रीक आचारविचारपरंपरा अलेक्झांडरच्या विजयानंतर कशी पसरली याचा विचार केला आहे. तथापि तसें करण्यापूर्वी ग्रीकसंस्कृतीमध्यें कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो हें पहाणें जरूरीचें आहे.
एखाद्या राष्ट्राचा अगर युगाचा जीवितक्रम ठरीव शब्दांत सांगणें अशक्य असतें. पण जर आपण सर्व मानवजातीच्या इतिहासाचें निरीक्षण करून व त्यांत अंधश्रद्धा व खुळ्या समजुती यांमुळें शास्त्रीय विचारांच्या प्रसाराला कसे अडथळे आले, व शास्त्रीय विचारांनां हळू हळू विजय प्राप्त होऊन विचारशून्य समजुतींचा लोप होऊन शास्त्रीय शोधांची कशी प्रगती होत आली हें पाहिलें; आणि या सर्व गोष्टींचे सूक्ष्म पर्यालोचन करून मग अशा प्रकारच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा जन्म प्राचीन ग्रीक लोकांत होऊन त्यांच्या मार्फत त्याचा यूरोपमध्यें प्रसार कसा झाला हें पाहिलें, तर जुन्या ग्रीक शहरांचें व त्यांच्या आयुष्यक्रमाच्या विकासाचें महत्त्व आपणांस सहज दिसून येईल. ज्या वेळीं ग्रीकसंस्कृति या शब्दानें कांहीं दृश्य स्वरूपाचा अगर गोष्टींचा बोध होऊं लागला त्या वेळेस त्याचें तात्त्विक स्वरूप जाऊन तिचें भाषेमध्यें, कलाकुसरीमध्यें व वाङ्मयामध्यें प्रतिबिम्ब पडूं लागलें. पुराणग्रीक लोकांच्या संस्कृतीचा जणूं काय आदर्शच असलेलें जें होमरचें काव्य त्यांत, जिच्यामुळें पुढें बौद्धिक व कलाविषयक क्षेत्रांमध्यें ग्रीकांनीं नांवलौकिक मिळविला ती योग्य स्वरूप व प्रमाणशीरपणा अवगमिण्याची बुद्धि दृग्गोचर होऊं लागलेली आढळते. ख्रिस्ती शकापूर्वी सातव्याआठव्या शतकांतील वसाहतीस्थापनेचा काळ येईपावेतों ग्रीक लोकांनां आपल्या राष्ट्रीयत्वाची जाणीव उत्पन्न झाली नव्हती. या वेळीं मात्र जेव्हां 'रानटी' विरुद्ध 'ग्रीक' असा शब्दप्रयोग होऊं लागला त्या वेळीं ही भावना उत्पन्न झाली; आणि तीन शतकानंतर कला, वाङ्मय, राजनीति व विचार यांमध्यें ही भावना पूर्णपणें प्रतिबिम्बित झाली. या नवीन भावनेस आधारभूत संस्कृतीचा जगावर काय परिणाम झाला हें पहाणें जरूरीचें आहे. ग्रीकसंस्कृतिविकासाच्या इतिहासाचे शिकंदरपूर्व आणि शिकंदरोत्तर असे दोन भाग पडतील.