प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ग्रीक-इराणी संस्कृति - आशियाच्या भूमीवर निर्माण झालेले जे पंडित ग्रीक वाङ्मयांत व तत्त्वज्ञानांत चमकून गेले त्यांचाहि उल्लेख येथें केला पाहिजे. प्रसिद्ध तत्त्वज्ञ डायोजिनीझ (ख्रि. पू. १५६ त पीठाचा अध्यापक) हा सिल्यूशिआचा रहिवाशी होता. सिल्यूकस हा प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी(ख्रि. पू. २६१ पूर्वीं) बाबिलोनचा रहिवाशी होता. ग्रीक भाषेंत बाबिलोनियाचा इतिहास लिहिणारा बिरोसस हा ग्रीक बनलेला तद्देशीय रहिवाशी होता. पार्थियन इतिहासाच्या बाबतींत स्ट्रेबोनें प्रमाण मानलेला आपॉलोडोरस हा असुयरियामधील आर्टिमायटा नांवाच्या ग्रीक गांवचा होता. पार्थियन लोकांनीं सिल्यूकिडी साम्राज्यापासून त्यांचे प्रांत हिसकावून घेतले तरी तदंतर्गत ग्रीक शहरांचें अस्तित्व नष्ट झालें नाहीं. ख्रि. पू. १४० व १३० मध्यें इराणांतील या ग्रीक वसाहती स्वारी करून येणा-या एका सिल्यूकिडी राजाला मदत करावयास तयार झाल्या होत्या. त्याचप्रमाणें मेसापोटेमियामध्यें जीं ग्रीक शहरें होतीं त्यांनीं क्रॅसस याचें स्वागत केलें. इ. स. ३६ त सिल्युशिआनें आपला संस्थापक जो सिल्यूकस त्याची स्मृति कायम ठेविली होती, व तें रानटी लोकांच्या वर्चस्वापासून अलिप्त राहण्यास समर्थ होतें असें टॅसिटसनें म्हटलें आहे. पार्थियन लोकांनां ग्रीक लोकांचें महत्त्व किती वाटत होतें हे पार्थियाचे राजे स्वतःला ग्रीक संस्कृतीचे अभिमानी म्हणवीत असत यावरून दिसून येईल. आर्टाबेनसच्या कारकीर्दीपासून (ख्रि. पू. १२७-१२३) नाण्यांवर 'ग्रीकसंस्कृतीचे अभिमानी' असा छाप पार्थियन राजे लावून घेऊं लागले. यानंतर ग्रीक शहराचें सगुण स्वरूप जी 'टायकीची आकृति' तिचा त्यांच्या नाण्यांवर छाप आला. ग्रीक व्यापारी या राज्यांत फार असल्या कारणानें त्यांच्यासाठीं म्हणून मुद्दाम हे पार्थियन राजे नाण्यांवर ही ग्रीक आकृति उपयोगांत आणीत असावेत हेंहि संभवतें. आज अफगाणिस्तानांत ज्याप्रमाणें व्यापारी वर्ग बहुतेक अफगाणेतर लोकांचा आहे. तद्वतच त्या वेळची स्थिति होती. ग्रीक नाटकवाले राजासमोर नाटक करीत असतां तेथें राजासमोर क्रॅससचें डोकें आणल्याची जी गोष्ट आहे तिजवरून पार्थियन राजे हे ग्रीक संस्कृतीचे केवढे भोक्ते होतें हें दिसून येतें. एकढ्यावरूनच केवळ असें अनुमान काढणें थोडेसें धाडसाचें होईल हें खरें, पण त्यांच्यावर ग्रीक संस्कृतीची छाप बसलेली होती ही गोष्ट नाकबूल करतां येणार नाहीं. आर्मीनियाचा राजा आर्टाव्हॅसडीझ (ख्रि. पू. ५४?-३४) यानें ग्रीक इतिहास व शोकपर्यवसायी नाटकें लिहिलीं. त्या वेळचे पुष्कळसें पार्थियन राजे ग्रीक राण्यांच्या पोटीं जन्मलेलें होतें. फ्राएटीझच्या (ख्रि. पू. ३-२-इ.स. ४) नाण्यावर ज्या म्यूसा नामक राजमातेचा मुखवटा आहे ती इटालियन गुलामाची मुलगी होती. पुष्कळ पार्थियन राजे रोमन साम्राज्यांत ओलीस अगर आश्रयास म्हणून राहिले होते. तरी पण एकंदर जनसमाजाची वृत्ति या ग्रीक चालीरीतींच्या अंगीकारास फारशी अनुकूल नव्हती, हें मात्र कोणासहि सहज दिसून येतें.
पाश्चात्त्य वाङ्मयांतून जे त्रोटक उल्लेख सांपडतात, त्यांवरून ग्रीक संस्कृतीचा प्रसार इराणामध्यें किती झाला होता हें नीटसें कळत नाहीं. यासाठीं अवेस्ता व पह्लवी ग्रंथाकडे वळलें पाहिजे. येथेंहि दुर्दैवानें काल निश्चित करतां येत नसल्यानें फार अडचण भासते. आणि जरी काल निश्चित झाला तरी कल्पनासादृश्यावरूनच केवळ अनुमानें काढावीं लागतात. हल्लींच्या अवेस्ता ग्रंथावर ग्रीक तत्त्वज्ञानाचा पगडा बसला आहे असें डार्मेस्टेटरनें आपलें मत दिलें आहे; पण डॉ. मिल्सनें ही गोष्ट नाकारली आहे. कलाविषयक अवशेषांसंबंधी पाहतां येथेंहि उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा पुरावा संशयग्रस्त आढळतो. रत्नासारख्या लहान वस्तूंच्या उत्पत्तीचे ठिकाण त्या जेथें सांपडल्या तेथून फार दूरवर देखील असूं शकतें. वास्तुकलाविषयक अवशेष हे जेथल्या तेथें सांपडतात; पण सुसामधील इमारतींबद्दलचा काळ ठरवितांना डयूलेफॉय व मॉर्गन या विद्वानांमध्यें ५ शतकांइतका मतभेद होतो. तथापि एवढें मात्र खरें कीं, इराण आणि बाबिलोनिया देशांत अलेक्झांडरच्या नंतरच्या काळांतील ग्रीक धर्तीवरचे असे पुष्कळ कलाकौशल्याचे पदार्थ सांपडतात, व अशा रीतीच्या जिनसांची आवश्यकता ज्या अर्थी भासली त्या अर्थी या ग्रीक संस्कृतीचा परिणाम निदान श्रीमंत व सुखवस्तु वर्गावर जरी खास झाला असला पाहिजे असें अनुमान काढणें गैर होणार नाहीं.