प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ख्रिस्ती संप्रदाय - पूर्वेकडून ज्या पारमार्थिक विचारांनीं अगर पंथांनीं या ग्रीक जगावर आपला पगडा बसवला होता त्यांमध्यें सरतेशेवटीं एकाच पंथाचा विजय झाला. हा पंथ म्हणजे ख्रिस्ती पंथ होय. ग्रीक संस्कृतीचा व ख्रिस्ती पंथाचा संबंध जडल्यावर त्यांचे परस्परांचे परस्परांवर परिणाम घडून आले. प्रथमतः ख्रिस्ती पंथामध्यें ग्रीक संस्कृतीचा मागमूस देखील नव्हता. पण पुढें एकमेकांचा संबंध जडल्यावर ग्रीक संस्कृतीची छटा या पंथामध्यें दिसूं लागली. उदाहरणार्थ सेंट पॉलच्या लिहिण्यांत निसर्गाच्या शिकवणुकीबद्दल जें कांहीं आलें आहे, तें सर्व ग्रीक विचारजन्य आहे. हे ख्रिस्ती लोक ग्रीक भाषा बोलत असल्यानें व ग्रीक राहणींत वाढले असल्यानें त्यांच्या कल्पनांचा त्यांच्या पंथावर परिणाम होणें केवळ अपरिहार्य होतें. तथापि आरंभीं आरंभीं या नवीन पंथांत लोकमत पुष्कळसें ग्रीक संस्कृतीविरुद्धच होतें. अलेक्झांड्रियांतील ख्रिस्ती पंथानें ग्रीक ज्ञान व ख्रिस्ती पंथ यांचा टिकाऊ समेट घडवून आणला. जसजसा ख्रिस्ती पंथ परमेश्वराविषयीं अधिकाधिक खाले विचार करूं लागला तसतशी त्याला तत्त्वज्ञानांतील परिभाषेसाठी ग्रीक तत्त्वज्ञानाची मदत घ्यावी लागली. तसेंच ख्रिस्ती नीतिशास्त्रामध्यें ग्रीकांच्या स्टोइक पंथाचाहि विचार होऊं लागला. या दृष्टीनें पाहतां आपणांस ख्रिस्तीसंप्रदाय हा एक प्रकारें ग्रीकसंस्कृतीचा प्रसारक झाला असें दिसून येईल.